सुशीला

जन्म बाईचा साधा नव्हे
“सुशीला “


एका झोपडी वजा घरात ती अंथरुणाला खिळलेली..गेले महिनाभर तिला अचानक ताप आला आणि सतत कामाच्या व्यापात असल्याने आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती आजारी पडली. सतत शेतात गुरासारखं राबविले जायचे. पोटाला अन्न कधी असायचं तर कधी भूक मारून ती शेतात राबायची. मुकाट्याने शिळ अन्न पोटात ढकलायची का ?तर सासुरवास चाललेला तिचा.
दोन वर्ष झालेलं तिच्या लग्नाला.नवरा दिसायला थोडा बरा होता. घरात गुरंढोरं, शेती, रहायला झोपडी वजा घर होतं. माहेरची बिकट परिस्थिती त्यात आईबापाच्या पोटी चार पोरीच जन्माला आलेल्या,खाण्यापिण्याची अवस्था अतिशय बिकट एकटा बाप मोलमजुरी करणारा,तर आई पाटलाच्या वाड्यावर घरकाम करायची.
चार ही पोरी अतिशय देखण्या होत्या.त्यात सगळ्यात जास्त देखणी,साधी असेल तर ही सुशीला आई बाबा,सगळ्या बहिणी तिला सुशी म्हणूनच बोलवत. अंगाने बारीक, लांबसडक केस, दाट भुवया, किंचित घारे डोळे,अन् मनमोहक हास्य कोणीही तिच्या सुंदरपणावर पाहताक्षणी मोहित होईल अशी तिची
सौंदर्याची अदा.
मोठ्या दोन बहिणीची कशीबशी साधेपणाने लग्न झालेली होती.त्यामुळे आता मोठी म्हणून सुशीला घर सांभाळायची,अजून एक लहान बहीण तिला सगळ्या कामात मदत करायची. लहान असलेली बेबी थोडी दिसायला सावळी होती.पण सगळ्या कामात हुशार आणि थोडी तापट होती. त्यामुळे सहजासहजी तिच्या वाटेला कुणी जायचं नाही. आपल्या मोठ्या बहिणीकडे पाहणाऱ्या सर्व पोरांना ती खाऊ की गिळू या नजरेने बघायची. सुशिलाची जणू सावलीच होती ती.

एका रात्री आई बाबाचे बोलणे सुशिलाच्या कानावर पडले.

“ आवं… मी म्हनत्येय त्या शालीनीच्या भावाला सुशीला पसंत हाय तर घरला स्थळ येऊ दयाव म्हनत्ये”

“ तुझं बराबर हाय, पर पैका नगं व्हय आपुनकडं?”

“पाटलाकडं मागल मी बघू देत्याल की नाय”

“ अगं, आधीच दोन पोरींच्या लग्नाला पैका दिल्यात त्यांनी अजून किती पैसं मागायच ? नग,बघू सावकाराकड दुभती म्हस हाय ती घांनवट ठेऊ देत्याल पाच हजार त्यातच निभवू सगळं “

“बराबर हाय , एवढं मुबईला राहणार पोरग हाय.. लई सुखात राहील पोरं”

“व्हय,दोन पोरींना नरकात घालवून बसलावात लई वाईट वाटतय.. बिचाऱ्या माझ्या सोन्यासारख्या पोरी सासुरवास सोसत हाईत “


शेवटी बापाचं काळीज ते दोन मोठ्या पोरींची लग्न कबाड कष्ट करून देऊन देखील जराही सुख त्यांच्या आयुष्यात नव्हतं. दोन्हीही जावई दारुडे त्यात सासवा ही तापट बिचाऱ्या शेतात दिवसभर राबराब राबायच्या आणि घरात आल्यावर सासूचे टोमणे आणि नवऱ्याचा मार खायच्या. माहेरी कधी तरी दोघींचं येणं व्हायचं ते बी गावच्या जत्रेलाच नाहीतर माहेरची ओळख नाहीच.

असाच महिना लोटला आणि एकदाची सुशीलाच्या लग्नाची सुपारी फुटली. त्याच गावात राहणाऱ्या आणि कायम सुशिलाच्या घरी उठ बस करणाऱ्या शालिनीचा भाऊ जयसिंग सोबत शालिनीचे लग्न जुळले. सतत बहिणीकडे येणाऱ्या जयसिंगला सुशीला बघताक्षणी आवडली होती. आणि त्याने ते आपल्या बहिणीच्या कानावर घातले होते.कायम मुंबईत असणाऱ्या जयसिंग चे वर्षातून एकदा गावाकडे येणे व्हायचे. गावाकडे आला की मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी तो लागलीच बहिणीच्या गावी यायचा असच तो मागच्या आठवड्यात आला होता. तो रस्त्याने जात असतानाच पाण्याची घागर काखेत घेऊन येणारी सुशीला त्याच्या दृष्टीस पडली.आधीच दिसायला देखणी असणारी सुशीला त्याच्या मनात बघताच भरली.पण कोण कुठली ?नाव काय?आणि ती राहते कुठे?या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तिच्याविषयी माहित असणाराच सांगू शकणार होता.आता तिची माहिती काढण्यासाठी जयसिंगला बहिणीच्या घरी काही दिवस मुक्कामास राहावे लागणार होते.
आठ दिवसाच्या सुट्टीवर आलेला जयसिंग बहिणीकडे जास्त दिवस रहात नसे. आताची पहिलीच खेप तो बहिणीकडे त्या मुलीची म्हणजेच सुशीलाची माहिती काढण्यासाठी राहणार होता. तो दिवस तिच्याच विचारचक्रात कधी संपला त्याचे त्यालाही कळले नाही.
त्या रात्री त्याला काही झोप लागेना.सतत त्याला घागर घेतलेली सुशिलाच दिसत होती. तिच्या सौंदर्यावर तो एका भेटीतच फिदा झालेला. अस म्हणतात की,प्रेमात पडल्यावर जगाचा विसर पडतो…असच आज जयसिंग च्या बाबतीत घडलेलं.
दुसरा दिवस उजाडताच जयसिंग फिरण्यासाठी गावच्या वेशीपर्यंत चालत निघाला. काल पाहिलेल्या त्या मुलीचं खुळ अजूनही त्याच्या डोक्यात घोळत होतं. तिची माहिती काढल्याशिवाय त्याला आता चैन पडणार नव्हतीच.कालची मुलगी आज ही भेटू दे म्हणून तो देवाला विनवत होता.आणि त्याची विनवणी देवाने ऐकली असावी दूध घालण्यासाठी डेअरी मध्ये गेलेली सुशीला त्याच रस्त्याने घराकडे येत होती.तिला बघताच त्याला भास असावा अस वाटलं आणि त्याने हाताचा चिमटा काढून पाहिलं तर खरच ती त्याच रस्त्याने येत होती.फक्त तिला बघून त्याच मन भरणार नव्हते.ती राहते कुठे हेही त्याला पहायचं होतं म्हणून तो तिच्या मागून लपत छपत चालत राहिला. गावापासून एक किलोमीटर वर तीच घर होत. म्हणजेच शेतात त्याची झोपडी होती. त्यामुळे दूध घालण्यासाठी रोज गावातील डेअरी मध्ये जावं लागायचं.तीच म्हशींची सारी निगा राखत असे. म्हशी धुणे, त्याची धार काढणे, दूध डेअरीला घालणे,त्यांना चारा घालणे यासारखी सगळी कामे सुशीला रोज करायची. आई बाबा बाहेर कामाला जात त्यामुळे घराची सगळी जबाबदारी सुशीला सांभाळत असे.

गावापासून आपण खूप दूर आलोत हे एव्हाना जयसिंग च्या लक्षात आलं.पण गावाकडे जायची सरळ वाट असल्यामुळे त्याला जास्त टेन्शन आले नाही पण,सुशीला आपल्या समोर सतत राहावी अस त्याला वाटू लागलेले. तिथल्याच आडोशाला थांबून सुशीला घराबाहेर येण्याची तो वाट पाहू लागला.
पण सुशीला स्वयंपाक करण्यात गुंतल्याने ती बाहेर आलीच नाही.एक दीड तास तो तसाच उभा होता ती एकदा बाहेर यावी तिला मनसोक्त बघता यावं आणि आपण माघारी फिरावं अस त्याला वाटत होत.पण आता तिच्या घराजवळच्या रस्त्यावर शेतात काम करणाऱ्या लोकांची ये जा चालू झालेली.त्याने घड्याळात पाहिलं अन् डोक्यावर हात मारून घेतला. सकाळी सात वाजता आलेला तो आता साडेनऊ वाजत आलेले, आणि आपण इतका वेळ तिच्या घराबाहेर उभे आहोत कुणीतरी पाहिले तर बेदम मारल्याशिवाय सोडणार नाहीत याची त्याला जाणीव झालेली.त्यामुळे तिथून त्याने लगेच काढता पाय घेतला.

इथे सकाळपासून आपला भाऊ दिसत नसल्याने शालिनी घाबरली तसा तो काही लहान मुलगा नव्हताच.तरीदेखील आपल्या भावाच्या जीवाची तिला काळजी होतीच. वर्षातून एकदाच तो तिच्या गावी यायचा बहिणीच्या हातचे खाऊ माखून मग माघारी फिरायचा. आज भाऊ आलाय म्हणून शालिनी ने त्याच्या आवडीचे घावन बनवले होते. ताज्या नारळाची चटणी आणि घावन बनवून ती भावाची वाट पाहू लागली. घरचा गडी नामदेव आल्याबरोबर तिने त्याला भावाला शोधायला गावात धाडलं.नुकताच तो सारा गाव शोधून आलेला.पण त्याला जयसिंग काही दिसला नाही. त्यामुळे शालिनी अजूनच चिंताग्रस्त झालेली.

“आक्का,,,अग,आज नाष्टा काय बनवलं आहेस?”

नुकताच व्हरांड्यात पाय ठेवत जयसिंग बोलला.आणि त्याच्या काळजीने घाबरलेल्या शालिनी ने सुटकेचा निःश्वास सोडला. पहाटेपासून तिची चाललेली काळजी थोडी का असेना कमी झालेली.

“कुठं होतास तू?”

“अग, आक्का फिरायला गावाबाहेर गेलो होतो.”

“घ्या नामदेव दा नं सगळ गाव पिंजून काढले पण तू नाही दिसला किती घाबरली होती मी..”

“आक्का मी काय लहान मुल आहे व्हय…गावात हरवायला..”

“ अस नव्हं…तू मुंबई वाला त्यात या गावाच्या शंभर वाटा आणि जवळच जंगल त्या जंगलात रानटी जनावरांचा सुळसुळाट असतो. जर चुकून त्या जनावराच्या तावडीत सापडलास तर हाडं बी मिळायची नाहीत.” बिचारी डोळ्यात पाणी आणून बोलत होती. एकुलता एक भाऊ वर्षातून एकदा येणारा जर चुकून त्याच्या जिवाचं बरं वाईट झालं तर?यामुळे तिला टेन्शन आलेलं.

जयसिंग ने अंघोळ आवरली अन् नाष्टा करायला बसला.

“आक्का घावन लई भारी झाल्यात बघ” भावाची स्तुती ऐकून शालिनी हरखली..आणि अजून दोन घावने तिने त्याच्या ताटात वाढले.

“खा पोटभर…मुंबईला काय तुला खायला मिळणार नाहीत.”

“आक्का मुंबईत सगळं मिळतं पण,आपल्या माणसाच्या हाताची चव नाही भेटत..”

“म्हणून म्हणते लगीन कर…”जणू काय भावाच्या मनातली गोष्ट शालिनी ने ओळखली असावी.

“आक्का..”

“मला याच गावातली पोरगी आवडली आहे.”

“कोण ती?”

“मला तिचं नाव गाव काहीच माहीत नाही पण पोरगी देखणी आहे..” जयसिंग ने काल ती दिसल्यापासून ते आता घरात येईपर्यंत ची सगळी हकीकत त्याला सांगितली. अन् शालिनीला आपला भाऊ कोणाविषयी बोलतोय हे ओळखायला वेळ लागला नाही.तिने लगेच ओळखलं की,ती सुशीला आहे.आणि अख्या गावात दिसायला खूप देखणी सुद्धा आहे.तीच मुलगी आपल्या भावाला पसंत आहे म्हटल्यावर बहिणीला अती आनंद झाला.अन् चार घावन हातात घेऊन शालिनी सुशिलाच्या घराकडे निघाली.

“आक्का कुठे निघालीस..?

“आलेच तू हवे तर अजून चार घावन निवांत बसून खा”

“अग,पण तू…”जयसिंगचे बोलणे ऐकायला ती थांबलीच कुठे होती?

जयसिंग ने डोक्याला हात मारून घेतला. आक्काने आणि तिच्या घरात जाऊन गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवलं तो मनाशीच पुटपुटला.
त्याची ती घालमेल लांब बसून बघणारा नामदेव बोलला

“आवं काय बी काळजी करू नगसा ताईसाब नव्हं त्या सुशीच्या घराकड गेल्यात…तुम्हासनी ती सुशी आवडली नव्ह तेच सांगायला गेल्या असतील..”

“ही सुशी?”

“आव दादा तुम्हाला नाही का ती देखणी पोरं आवडली तीचच नाव सुशीला हाय..”

“वा…खूप छान नाव आहे अगदी तिच्या रूपाला साजेल असच…तो मनातच तिच्या नावाची उजळणी करू लागलेला.

तास झाला दोन तास झाले पण शालिनी काय घरी आली नाही. त्यामुळे धडधडत्या हृदयाला चिंतेने ग्रासलं…आधीच शालिनी वागणं तापट..त्यात शालिनीच्या घरून काही तरी नकार आला असला तर शालिनी त्याच्या नावाने खडे फोडल्याशिवय राहणार नाही हे त्याला पक्क ठाऊक होत.

पुढे काय होणार? सुशीला च्या घरून होकार येणार का नकार ? पाहू पुढच्या भागात…

©®सविता पाटील रेडेकर

क्रमशः…








🎭 Series Post

View all