सूर्य मावळलाच नाही तर? मराठी निबंध (Surya Mavalach Nahi Tar Marathi Essay)

Essay About Surya Mavalach Nahi Tar?
"अंधार पडायला लागला आहे चला घरी." घरून एक हाक आली आणि मला नाईलाजाने घरी जावं लागलं. यामुळे मला सूर्यावर खूप राग आला. एक जळजळीत कटाक्ष आकाशाकडे टाकूनच मी घर गाठलं. शाळेला सुट्टी लागली पण अंधार पडला म्हणून खेळ थांबवून घरी जाताना मला फार उदास वाटत होतं. आईला खूप विनवण्याचा प्रयत्न केला पण सगळं फोल ठरलं आणि नाईलाजाने मला घरी जावच लागलं. हात पाय धुवून माझ्या खोलीत गेल्यावर माझ्या डोक्यात एक विचार आला; 'सूर्य मावळलाच नाही तर?'

काय मजा येईल ना? संपूर्ण दिवसभर उजेड असेल मग अंधार पडला म्हणून घरी लवकर जा ही घाई नसेल. सूर्य कायमच आकाशात तळपत राहिला तर चोऱ्या पण होणार नाहीत. सूर्याचे किती फायदे आहेत ना! सध्याच्या या उन्हाळी दिवसात तर ऊन जिथे जाईल तिथे आईने केलेले पापड, कुरडया फिरवावे लागतात पण सूर्य न मावळता तसाच आकाशात राहिला तर तेही एक काम वाचेल शिवाय आईला कधीही पापड करता येतील. खूप मजा असेल ना तेव्हा? चोवीस तास सगळीकडे लख्ख प्रकाश ज्यात कोणालाच कसलीच भीती वाटणार नाही. बाजूच्या मोनुला अंधाराची खूप भीती वाटते पण सूर्य न मावळल्याने मोनूची भीती दूर पळून जाईल. सूर्य हा एकमेव असा ऊर्जा स्त्रोत आहे जो आपल्याला विनामूल्य भरपूर शक्ती देत असतो त्यामुळे चोवीस तास सूर्य तसाच राहिला तर लोकांना वीज बिल फार कमी येईल कारण घरात लाईट लावायची गरजच उरणार नाही. याशिवाय सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांच्या मागणीत वाढ होईल आणि सगळेच सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे वापरतील त्यामुळे बऱ्याच प्रमाणात इंधनाची आणि पैश्यांची बचत होईल.

सतत उजेड असल्याने कधीही दुकानात जाऊन खाऊ आणता येईल. वाढदिवसाच्या दिवशी तर वेळ काळ न बघता आई - बाबांकडे हट्ट करून कुठेही फिरता येईल, खूप खरेदी करता येईल. किती मजा येईल ना तेव्हा? बाबांना ऑफिसला जायला उशीर होत असेल आणि त्यांना इतर काही कामं करायची असतील तरी त्यांना काळजी राहणार नाही कारण ते ऑफिस सुटल्यावर ती कामं करू शकतील. सूर्य न मावळ्यामुळे दुकानदारांच्या नफ्यात पण वाढ होईल.

'खरंच असं कधी घडेल का? जर असं झालं तर अजून काय बरं होईल?' मी मनातच अजून विचार केला. चोवीस तास खेळायला मिळणार या कल्पनेनेच माझ्या पोटात फुलपाखरं उडत होती पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला; जसं आत्ता चोवीस तास खेळायला मिळेल तसाच शाळा सुरू झाल्यावर चोवीस तास अभ्यास करावा लागेल. शाळेच्या वेळा वाढतील परिणामी क्लासेस पण जास्त वेळ चालतील मग जो काही थोडावेळ खेळायला मिळतो तो मिळेल का?

शाळेतून मग लवकर घरी सोडतील का? चोवीस तास सूर्य असेल तर शाळेच्या आणि आई - बाबांच्या ऑफिसच्या वेळा पण वाढवतील का? आणि खरंच अश्या वेळा वाढवल्या तर आम्ही सगळं कुटुंबं एकत्र कधी येणार? आत्ता मला सुट्टी आहे म्हणून आई - बाबा लवकर ऑफिसमधून येतात पण सूर्य मावळला नाही तर त्यांना लवकर निघणं जमेल?

रात्री झोपताना आपल्याला सगळीकडे अंधार लागतो मग रात्री पण सूर्य तसाच तळपत राहिला तर झोपेचं तर खोबरं होईल. आराम मिळणार नाही ही तर दूरची गोष्ट पण सतत जागं राहिल्याने भूक लागत राहील आणि आईची डबल ड्युटी सुरू होईल. सगळीकडे सतत काम सुरूच राहिल्याने लोकांना आराम मिळणार नाही आणि मग सगळे हळूहळू आजारी पडायला लागतील.

सतत एवढे ऊन असल्याने झाडे, वेली, पिके करपू लागतील आणि हळूहळू पृथ्वीवरुन अन्न नाहीसे व्हायला लागेल. झाडेच नष्ट होऊ लागली तर आपल्याला मिळणारा प्राणवायू सुद्धा नष्ट होईल. सतत होणाऱ्या बाष्पीभवनाने पाण्याचे साठे; नदी, तलाव, धरणे आटतील आणि सगळ्याच सजीवांना अन्न, पाण्याशिवाय जीव गमवावा लागेल. पाण्यात राहणारे मासे, कासव, मगर हे सगळे कुठे जातील? पाणीच शिल्लक राहिले नाही तर बोटीचा किंवा जहाजाचा प्रवास कसा करायचा? निसर्गाने जे नेमून दिलं आहे त्यात काही ना काही तथ्य आहेतच आणि असं जर घडलं तर निसर्गचक्र बिघडेल आणि संपूर्ण जीव सृष्टीचा विनाश हा अटळ होईल.

सतत आकाशात सूर्य तळपल्याने पृथ्वीचे तापमान वाढेल आणि सगळीकडे शुष्कपणा निर्माण झाल्याने कोरड्या पडलेल्या झाडांना वणवा लागेल. पृथ्वीवर सर्वत्र वणव्याच्या ज्वाला बघायला मिळतील. असं झालं तर बिचारे छोटे छोटे पक्षी म्हणजेच चिमणी, कावळा, कोकीळ कुठे राहतील? संध्याकाळ होत आली की पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात परततात पण सूर्य मावळला नाही तर ते घरी कधी परत येतील?

पहाटेचा सूर्य उगवतो तेव्हाचा देखावा, तो गारवा, पानांवर पडणारे दव, प्रसन्न वेळ, कोवळे ऊन हे काहीच अनुभवता येणार नाही. सतत कडक ऊन असल्याने कोणालाच कोवळे ऊन अंगावर घेता येणार नाही मग लहान बाळाला कसे बरे ते मिळेल? उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी जेवढी उष्णता जाणवते तेवढीच इतरवेळी जाणवेल मग शरीराला थंडावा कसा मिळेल?

"अति तिथे माती" असं म्हणतात त्यानुसार सूर्य मावळा नाही तर सतत होणाऱ्या उष्म्याने सगळेच हैराण होतील. एका वर्षात आपण ज्या ऋतुंची मजा घेत असतो त्यातले कोणतेच ऋतू आपल्याला अनुभवता येणार नाहीत. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ती आकाशात जाऊन थंड होते तेव्हा त्याचे मेघ होतात आणि पाऊस येतो पण सूर्य न मावळ्यामुळे ही प्रक्रिया होणारच नाही आणि आपल्याला पावसाळा अनुभवता येणारच नाही. उष्णतेने हवेतील आर्द्रता वाढेल त्यामुळे मग विमानाची उड्डाणे रद्द करावी लागतील. असं झालं तर विमानात कधीच बसता येणार नाही. दूरच्या राज्यांमधील, देशांमधील पर्यटन स्थळे कशी बघता येतील? बरं बस किंवा गाडीने प्रवास करायचा म्हणलं तर एवढ्या तापलेल्या रस्त्यावर गाड्यांचे रबरी टायर कितीवेळ तग धरू शकतील? यामुळे रस्ते अपघात वाढतील.

पावसाळ्यात येणारा मातीचा सुगंध, कांदा भजी, मक्याचे कणीस, वडे, चहा आणि पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद फक्त स्वप्नात आणि आठवणीत राहील. थंडीच्या दिवसांत मिळणारी लाले लाल सफरचंद खायला मिळणार नाहीत. एवढंच नाही तर द्राक्ष, मोसंबी, संत्री अशी थंड वातावरणात पिकणारी फळे पूर्णपणे नामशेष होतील. फक्त थंडीच्या दिवसात खायला मिळणारे उष्ण पदार्थ जसे, गुळाची पोळी, तिळाचे लाडू, बाजरीची भाकरी असे एक ना अनेक चविष्ट पदार्थ खाता येणार नाहीत कारण सूर्यामुळे आधीच तापमान वाढ झालेली असेल मग हे उष्ण पदार्थ खाऊन आपल्याच शरीराला त्रास होईल. ज्या लोकांचा स्वेटर, मफलर अश्या गरम कपड्यांचा व्यवसाय आहे त्यांना तर नवीन काहीतरी काम शोधावे लागेल. दिवाळीला पण काहीच मजा उरणार नाही. एवढा उजेड असताना फटाके फोडण्यात काहीच अर्थ नसेल आणि त्यातलं सौंदर्य पाहताच येणार नाही.

एवढंच नव्हे तर परदेशातून येणारे पाहुणे पक्षी पण स्थलांतर करणार नाहीत. बर्फाळ प्रदेशातील बर्फ वितळू लागेल आणि समुद्राची पातळी वाढून महापूर येण्याचा धोका निर्माण होईल. बर्फ वितळल्याने पेंग्विन, ध्रुवीय अस्वल हे क्षणात आपला जीव गमावून बसतील.

रात्री वेगवेगळ्या चांदण्या बघण्याची मजा मग कधीच घेता येणार नाही. सूर्याच्या तेजाने आकाशात कधी बघताच येणार नाही आणि मग आपल्या चांदोबाला पण कधी भेटता येणार नाही. गावाला गेल्यावर मोकळ्या अंगणात झोपण्याची मजा कायमची विसरावी लागेल.

मी या विचारत असतानाच मला आजीची हाक ऐकू आली. ती रोज संध्याकाळी माझ्याकडून शुभं करोति म्हणून घेते. जर सूर्य मावळला नाही तर ती माझ्याकडून हे कधी म्हणून घेईल? यानंतर ती मला रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगते त्या कधी सांगेल? संध्याकाळी सात नंतर आजीचा खास पौष्टिक खाऊ मिळतो तो कधी मिळेल? बापरे! हा सूर्य मावळला नाही तर फायदे कमी आणि तोटेच जास्त आहेत. नको! नको! निसर्गाचे जसे चक्र सुरू आहे तसेच असुदे रे देवा.

थोरा मोठ्यांनी म्हणलं आहेच "जैसे ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान." मला जेवढा वेळ खेळायला मिळतंय तेवढ्यात मी समाधानी आहे. सूर्य देवा तू आपला तुझी दिनचर्या नियमित ठेव.