सुरवंट

The internal changes that happen in puberty, creates attraction for unnecessary things.

विषय:- कौटुंबिक कथामालिका

टीम:-अमरावती

शीर्षक:-सुरवंट

भाग:-1

भिरभिरणार मनं पाखरु पाखरु...जसे फुलपाखरु....नजर काळ्या सुरवंटा कडे वळली. हाताने दूर सारणार तेव्हढ्यात लक्षात आले, त्याच्या अंगावर बोचरे काटे असतात. तसे टोचत नसले तरी सुरवंटाला स्पर्श झाल्यास त्याचे काटे शरीरात रुतून बसतात आणि सलतात.

केरसुणी शोधण्यात वेळ गेला. तोपर्यंत सुरवंट जागचे हलले.

दोन दिवसाने लक्षात आले. भिंतीवरच्या एका कोपर्‍यात त्याने आपल्या भोवती कोष बनवला होता. कोषाचा बहूदा पहिला थर होता. म्हणूनच आतला काळा सुरवंट स्पष्ट दिसत होता. 

मी ऐकलय, सुरवंटातून फुलपाखरु तयार होतं. म्हणजे एक प्रकारे, आपले कुरुप जीवन संपवून त्याला मुक्त आकाशात विहार करायचा असतो. सुंदर लोभस रंगात रंगून जायचं असतं.

आज गुलाबावर तर उद्या मोगर्‍यावर बसून रस चाखायचा असतो. अश्या तरल विश्वात रमून जायचं असतं. समरसून त्याला जगायचं असतं.

पण काय फायदा? त्याचे हे विश्व क्षणभराचं असतं. देह त्यागून यातना भोगून सुंदर रुपात पदार्पण करुन तो स्वतःकडे दुसर्‍यांचे लक्ष वेधून घेतो. एकाच स्पर्शात घायाळ होतो. जीव गमावून बसतो. 

अरे, मी काय विचार करत आहे. नाही नाही असा विचार करणे बरोबर नाही. जीवन हे क्षणभंगूर आहे म्हणून का त्याने स्वप्नं बघूच नये....?

मुलांचे वयात येणे...हे सुद्धा,"सुरवंटाचे फुलपाखरात रुपांतर होणे"असच म्हणू नां आपण....! पण मी असा का विचार करतेय..? बालपण सरुण तारुण्य येणारच. तारुण्य आलं की नवनवीन गोष्टींकडे मन आकर्षित होणारचं.....

तेव्हढ्यात मृण्मयी बेडरुम मध्ये आली. आईला एकटक भिंतीकडे बघताना बघून, हळूच तिच्या कुशीत शिरली. आई चुकलेच गं मी! मला हवी ती शिक्षा कर. मला मान्य आहे. आणि स्फुंदून स्फुंदून रडू लागली.

तिला रडताना बघून भिंतीवरुन नजर हटवून मृण्मयीच्या डोक्यावरुन हात फिरवत ती जणू तिला सांत्वना देत होती. सुख दुःखात मी नेहमीच तुझ्या सोबत असेन.

थोडा वेळ रडल्यावर मृण्मयी शांत झाली. आईच्या जवळच पलंगावर आईला खेटून मांडी घालून बसली. डोळे पुसले आणि आईला म्हणाली. "आई तू सांग मी आता काय करु?"

आईला हसूच आले."काय तू पण मृण्मयी, मी जेव्हा काही सांगायला जायचे तेव्हा किती चिडायचीस माझ्यावर? 'मी काय कुक्कुळ बाळ आहे का, सदानकदा मला हे नको करु ते नको करु, सांगतेस!' आठवले का?"

"आई विसरना गं ते आता...तुला सांगते, तेव्हा मला काही कळतचं नव्हतं. म्हणजे बाकी सगळं कळतं होतं. पण, मनात ह्रदयात काही तरी होतं आई...नाही सांगू शकत तुला ते...!"

लाजून ओशाळून मृण्मयी म्हणाली.

"बरं बाई चल सांग तुला खायला काय करु? तुझ्या आवडीचं सांग काहीतरी!" तिचा लाड करत सीमा म्हणाली. 

"आज बटाट्याची सुकी भाजी आणि पुरी खावीशी वाटतेय!"

"जी हुजूर!" कमरेत थोड खाली वाकून सीमाने तिची आॅर्डर घेतली आणि हसतच किचन कडे वळली.

स्वयंपाक करताना तिच्या नजरे समोर मृण्मयीचं बालपण दिसत होतं. सुनील आणि सीमा आपल्या संसारात गुरफटून गेलेले होते. त्यांनी आधीच ठरवले होते. मुलगा होवो वा मुलगी आपलं एकच अपत्य असेल. त्यालाच चांगले जीवन देऊ. त्यानुसार त्यांना पहिले अपत्य झाले. फुलासम नाजूकशी कन्या. नाव ठेवले मृण्मयी. बाबांचे विश्वच मृण्मयी. सीमा म्हणायची पण त्याला,"तू आता पुर्वी सारखा माझ्यावर प्रेम करत नाहीस." पण हे सगळं गमतीने...! आपला नवरा कुटूंबवत्सल आहे हे बघून तिला अतीव आनंद होई.

मृण्मयी दहा वर्षाची झाली. अचानक एका कार अॅक्सीडेंट मध्ये जागीच सुनीलचा मृत्यू झाला. जणू सीमा आणि मृण्मयीचे आभाळच फाटले. रंगीत जीवन बेरंगी भासू लागले. कशातच मन रमेना दोघींचेही. दुःखात जवळच्यांनी साथ दिली. आईवडीलही थांबलेत काही दिवस. मग, मुलाच्या मुलांना सांभाळायचा प्रश्न उपस्थित झाला. कारण सीमाचे भाऊ वहीनी नोकरी करणारे, मग लहान दोन मुलांना सांभाळायला आईवडील जवळ हवे होते. शेवटी नाईलाजाने ते दोघे मुलाकडे निघून गेले. सीमाला सासरे होते. पण त्यांना चालता येईना म्हणून ते सीमाच्या मोठ्या जेठांकडे रहात होते गावी. मग राहत्या घरी आता सीमा आणि तिची सोनपरी मृण्मयीच राहील्या.

म्हणतात नां, काळ कुणासाठीही थांबत नाही. मागे राहणार्‍याला जीवन जगावचं लागतं. त्या उक्तीनुसार सीमा घराकडे, मुलीकडे लक्ष देवून नोकरीही सांभाळीत होती. तसे ती सुनील असताना पण हे सगळं करतच होती. पण तेव्हा तिला मानसीक सपोर्ट असायचा सुनीलचा. एक काॅन्फीडन्स असायचा स्वतःवर...का कोण जाणे आताशा तिला एकट वाटायला लागले होते. मग ती स्वतःला कामात गुरफटून घेऊ लागली. थोडी मैत्रिणींमध्ये रमू लागली. मृण्मयीला पण मोकळीक देऊ लागली. तिला वाटायचे मृण्मयीला बंधनं घातल्यास तिला सुनीलची आठवण येईल, त्याची कमी जाणवेल. छानसा स्मार्ट फोन तिने मुलीला घेऊन दिला होता.

नेहमी तिच्याशी कनेक्ट रहायला.

आज सीमाला आॅफीसचे महत्वाचे काम होते. गडबडीत तिच्या हातून फोन खाली पडून स्क्रीन फुटून बंद झाला. तिला महत्वाचा काॅल करायचा होता आॅफीसमध्ये. डायरीत तिने नंबर शोधला आणि घाईघाईने ती मृण्मयीच्या बेडरुम मध्ये गेली. मृण्मयी मोबाईल मध्ये काही बघतच होती. "तुझा मोबाईल दे पटकन...मला उशीर होतोय. महत्वाचा फोन करायचाय आॅफीसमध्ये...." सीमाने जवळ जवळ हिसकावून घेतला तिच्या हातातून मोबाईल. पटापट बॅक जाऊन तिने नंबर डायल केला आणि आॅफीसमधील व्यक्ती सोबत बोलली. बोलल्यावर तिच्या लक्षात आले. काही फोटो होते जे तिने बॅक जात असताना बघितले होते. बहूदा मृण्मयी ते फोटो बघत होती. तिने लगेच पिक्चर फाईल उघडली. तिला वाटले होते मृण्मयी बाबांचे आणि स्वतःचे जुने फोटो बघत होती. कारण तिला आंघोळ करतानाचा फोटो थोडा दिसला होता....

क्रमशः

संगीता अनंत थोरात

08/09/22

०००

🎭 Series Post

View all