सुरवंट - ४

The internal changes that happen in puberty, creates attraction for unnecessary things.

विषय:- कौटुंबिक कथामलिका 

टीम:-अमरावती

शीर्षक:-सुरवंट

भाग:-4

"सांगते, माझे नाव सीमा सुनील ठाकरे. मी सिसको कंपनीत अॅडमिनीस्र्टेशन सांभाळते. येऊ का आत..? तुमच्याशी बोलायचे होते. तसे सनीच्या मैत्रिणीची मी आई आहे..नमस्कार !" तिने हात जोडत म्हंटले. "अरे हो , या या आत..बसा, कसं काय येण केलत..?" एवढा वेळ बाबांच्या मागे उभी राहून त्यांचे संभाषण ऐकत असलेली सनीची आई म्हणाली.

मग सीमाने आवंढा गिळत, कसे बसे घडलेला प्रकार त्यांना सविस्तर पणे सांगितला. दोघेही आश्चर्याने कधी एकमेकांकडे बघत...तर कधी सीमा कडे बघत. "बघा, मुलं लहान आहेत. म्हणून त्यांच्याशी फार कडक ही बोलता येत नाहीये. त्यांच्या भाषेतच त्यांना प्रेमाने समजावून सांगावे लागेल. मी तर माझ्या मुलीला मानसोपचार तज्ञाकडे समुपदेशना साठी घेऊन गेले होते. सगळ्या गोष्टी तिला, पटवून सांगितल्यावर ती समजली आहे. आता तुमचे काम आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सगळ्या गोष्टींची कल्पना द्या आणि समजावून सांगा त्याला...!" 

"ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण माझा सनी असं काही करत असेल असे कधी वाटले नाही. त्याला कधी काहीच कमी पडू दिले नाही. दुसरं अपत्य सुद्धा होऊ दिले नाही आम्ही. तो म्हणेल ते ते घेऊन दिले...आणि आज त्याच्या बद्दल हे ऐकावं लागत आहे. ताई साॅरी तुम्हाला त्रास झाला. पण आम्ही त्याला समजावून सांगू. तो ऐकेल आमचं. आणि हो तुमच्या मुलीला पण समजवा. आजकाल मुली पण फारच वाया गेल्यात....ऐकत नाहीत आईवडीलांचे. मोकाट फिरतात. आणि मग असं काही झालं की, मुलावर आरोप ठेऊन घरात बसतात...!" त्या मृण्मयीवर ताशेरे ओढत म्हणाल्या.

सीमाला त्यांचे आरोप काट्या प्रमाणे बोचलेत...पण ती काहीच प्रती उत्तर देऊ शकली नाही. कारण "माती" तर तिच्या मुलीनेही खाल्ली....आता ह्यांच तोंड मी कशी बंद करु...?

"ताई मुलांकडून चूक झाली. पण अजून काही बोलण्यात अर्थ नाहीये. पुन्हा मी एवढेच म्हणेन, तुम्ही सनीशी बोला...नसता काही उलटसुलट होऊन बसायचे...! निघते मी." 

सीमा घरी आली. मृण्मयी तिच्या जवळ येत काही विचारणार, तेव्हढ्यात सीमा त्रासून तिला म्हणाली," मला काॅफी दे, माझं डोकं भणभणतय...आणि लगेच झोपायचं आहे मला. तू जेवून घे, आणि झोपायला ये माझ्या जवळ."

सकाळी तिच्या मोबाईल मध्ये तिने बघितले तीसच्या जवळपास मिस्ड काॅल. सनीचे ! बरेचसे मेसेजेस...आणि दोनचार नग्न फोटो मृण्मयीचे...!

सीमा तर दात घासायचे सुद्धा विसरली. ह्रदय धडधडायला लागले. हे काय भलतच...मुर्ख आहे का हा मुलगा की वेडा...!

काय मेसेज केलेत ह्याने....ती पुढील भयंकर प्रकाराची कल्पना करुन शहारलीच...जेठांची मदत घेऊ का...? दादाला सांगू का...? एवढे दिवस मी एकटीनेच सगळं निस्तरलय आणि आता अचानक हा गलिच्छ प्रकार मी त्यांना सांगू...? काय म्हणतील मला...?एवढी असमर्थ ठरली मी मुलीला सांभाळायला..? किती लाजीरवाणे हे सगळं...तिचा धीर सुटला आणि ती ओक्साबोक्सी रडायला लागली. कसं करु, कसं करु...? अचानक डोअरबेल वाजली, सीमाचे ह्रदय तर आवाजाने घश्यात आले जणू...आता बाहेर पडते की काय...अशी अवस्था. दार उघडू नको, तिला ओरडून सांगायचे होते, मृण्मयीला...पण आवाजच निघेना. तेव्हढ्यात मृण्मयीचा ओरडायचा आवाज आला. "अहो बाबा, कसे काय अचानक..."

"बाबा, म्हणजे माझे बाबा...आलेत..?" सीमा धावतच हाॅल मध्ये आली. अचानक समोर बाबांना बघून, आनंदाश्रू झरझर वाहू लागले. दोघीही बाबांच्या गळ्यात पडल्या...दोघींना बघून बाबाही गहिवरले. त्यांना थोपटून, मृण्मयीला चहा बनवायला सांगून ते सीमाला म्हणाले,"काय अडचण आहे बाळ...? हे अश्रू साधे नव्हते. काहीतरी झाले हे नक्की...तुझी आई गेले कित्येक दिवस म्हणत होती. 'माझी पापणी फडफडतेय...दोन्ही मुले तर माझ्या नजरे समोर आहेत. सीमा तेवढी नजरेआड आहे. मला प्रवास सूट होत नाही. तुम्ही त्यांची भेट घ्या. बघा कशा आहेत दोघी.' तुझ्या चेहर्‍यावर काळजी आणि दुःखाचे सावट आहे. सांग बाळा काय झाले...?"

सीमाने सर्व हकीकत त्यांना ऐकवली. शांत चित्ताने त्यांनी सगळं ऐकून घेतलं. मग म्हणाले, "मी सनीच्या बाबांना भेटतो."

थोड्या वेळाने ते सनीच्या घरी गेले. सनी बद्दल बोलले. त्याने रात्री पाठवलेल्या मेसेज बद्दल त्यांना सांगितले. आणि म्हणाले,"तुम्ही त्याला माझ्या समोर बोलवा. माझ्या समोर समजावून सांगा...हा प्रकार बरोबर नाही. एवढ्या लहान वयात तुमचा मुलगा अशी भाषा बोलतोय...किती गलिच्छ मेसेज केलेत त्याने माझ्या मुलीला. वरुन धमकी देतोय...मुलीला माझ्या सोबत संबंध ठेऊ द्या. नाहीतर तिचे फोटो व्हायरल करतो. सोशल मीडीयावर टाकतो...काल तुम्ही त्याला काहीच बोलले नाही का...?"

"आपण वयाने मोठे आहात. म्हणून मी आपला मान राखून बोलतोय. पण तुमच्या नातीने हा सगळा प्रकार केला..तुम्ही तिला काही न बोलता, आमच्याकडे कसे काय बोलायला आलात...?काल तुमची मुलगी आली. उलटसुलट बोलून गेली माझ्या मुला विषयी...मी माझ्या मुलाला काहीच बोलू शकत नाही...नाही त्याला अडवू शकत. तो ऐकत नाही आमचं....आणि तुम्हालाही सजेशन देतो, तुम्ही सुद्धा त्याला काही बोलू नका...तो काय करेल त्याचा नेम नाही...एकुलता एक मुलगा आहे आमचा...तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळा...तिलाच दूर कुठे तरी घेऊन जा...म्हणजे तो तिच्या पर्यंत पोहोचणार नाही....आणि हो, निघा आता इथून...!" ते प्राध्यापक महोदय, एका वयस्क नागरीकाशी अश्या तर्‍हेने बोलत होते. मुलांना शिकवणारे हे दांपत्य...स्वतःच्या मुलाला शहाणपणा शिकवू शकत नव्हते आणि दुसर्‍यांना सांगत होते...त्याला अडवू नका....

बाबा घरी आलेत. सीमाला सांगितले सर्व. ती डोक्यावर हात देऊन बसली. आता कसे...! मृण्मयीने सगळ ऐकलं होत. तिने पण कल्पना केली नव्हती. सनी असा वागेल म्हणून..शेवटी ह्यावर उपाय म्हणून वकीलाचा सल्ला घ्यावा असे ठरले. वकीलाला गाठून सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. वकीलाने त्यांना पोलीस कंम्प्लेंट करायला सांगितले. सोबत हेही म्हंटले,'आज जर तुम्ही इज्जतीला घाबराल...तर, उद्या कोणत्याही वाईट प्रसंगाला तोंड द्यायला तयार रहा...! त्यामुलाच्या हातून अजून जघन्य अपराध व्हायच्या आत, तुम्ही पोलीसांकडे जा...वेळीच त्याला रोखायला हवे. कोण काय म्हणेल...लोकं कितीही घोर अपराध एखाद्याने केला. तर, फक्त दोन दिवस बोलतात. आणि नंतर सगळं विसरुन त्याच व्यक्तिसोबत साधारणपणे वागतात...म्हणून घाबरु नका, आणि मुलीला वाचवायसाठी तुम्ही कंम्प्लेंट द्या...!' 

आता मृण्मयी पण सीमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,"आई होऊ दे जे व्हायचं ते. चल पोलीस स्टेशनला. मी तयार आहे." तिघेही पोलीस स्टेशनला गेले. रीतसर कंम्प्लेंट केली. मग सनी सकट त्याच्या आईवडीलांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून समज देण्यात आली. पण सनी ऐकत नव्हता. त्याला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तोही चुप झाला. त्याच्या मोबाईल मधून, लॅपटाॅप मधून, हार्ड डीस्क मधून सगळे व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यात आले. त्याने पुन्हा असे केल्यास, कोण कोणत्या कलमा अंर्तगत त्याला बालसुधारगृहात जावे लागेल. पुढील करीयर डागाळेल ते सविस्तर सांगितले. त्याचे समुपदेशन करण्यात आले. 

अश्या रितीने, घाबरुन चुप न बसता. वेळीच सीमाने तत्परता दाखवत पाऊल उचलले. आणि आपल्या मुली सकट...उमलत्या वयातील एका भरकटलेल्या मुलाला वळणावर आणले.

आजकालचा मोबाईल म्हणजे आपल्याला मिळालेले टेक्नाॅलाॅजीचे वरदान आहे. मोबाईल मुळे जग आपल्या हातात आले आहे. एका "टच" वर आले आहे. पण त्याचा योग्य वापर व्हायला हवा. त्याच बरोबर न कळत्या वयातील शारीरीक आकर्षण डोके दुखी ठरत आहे आईवडीलांसाठी. मला वाटत,"मुलांना, शरीरशास्त्र मोकळेपणाने शिकवायला हवेच. जेणे करुन आकर्षण कमी होऊन, अश्या घटना किमान होणार नाहीत..."

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे...विभक्त कुटुंब पद्धती मुळे मुले, दुसर्‍या कुणाचेही ऐकत नाहीत. वेगळाच अहंभाव मनात राहतो. आईवडीलांना "अडचन" जवळच्या नातेवाईकांना कशी सांगायची...हा पण प्रश्न पडतो....अशी आपली जीवन पद्धती झाली आहे सद्याची....!

वाचल्यावर नक्की प्रतिक्रिया द्या...!

समाप्त

सत्यघटना

संगीता अनंत थोरात

08/09/22

०००

🎭 Series Post

View all