सुरवंट - ३

The internal changes that happen in puberty, creates attraction for unnecessary things.

विषय:- कौटुंबिक कथामालिका

टीम:-अमरावती

शीर्षक:-सुरवंट

भाग:-3

मृण्मयी सगळ्या गोष्टी समजून चुकली. आणि तिने आता चांगले वागण्याचा निर्धार करुन, 'करीयरवर फोकस करणार' ह्याची खात्री आईला दिली होती.

शूऽऽ कुकरने शिट्टी दिल्या बरोबर सीमाची तंद्री भंग झाली.

पटापट बटाटा भाजी बनवली. गरमा गरम पुरी बनवून दोघी मायलेकी खुप दिवसानंतर एकत्र जेवल्या.

वयात येणारी मुलं हार्मोनल चेंजेस मुळे अती विश्वासाला बळी पडतात. ती जेव्हा वयात येतात...आईवडीलांनी त्यांना योग्य तो मार्ग दाखवायला हवा. ह्याचा अर्थ असा नाहीये की, तुम्ही सारखे छडी घेऊन त्यांच्या प्रत्येक कृतीवर त्यांना उपदेशाचे डोज पाजत रहाल. गरज आहे शांत डोक्याने त्यांचे मन चांगल्या गोष्टींकडे वळवणे. मध्यम मार्ग समजावण्याचा असावा. त्यांचे ही मन राखावे...आणि आपल्याला हवा तो मार्गही दाखवावा...! झोपताना सीमाला मानसोपचार तज्ञाचे बोल आठवत होते. आता तिनेही निर्धार केला होता. झाल्या प्रकाराचा मृण्मयीला दोष न देता, ह्यातून "समज" घेऊन..आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित करायचे. मृण्मयीच्या पाठीशी रहायचे, माझी मुलगी शहाणी आहे. आईला ती नक्कीच समजेल....आणि मग निद्रेच्या ती स्वाधीन झाली.

सीमाने मनोमन ठरवल्या प्रमाणे, पाच दिवसांची सुट्टी घेऊन त्या दोघीही 'मनाली' फिरुन आल्या. सीमा एक नवीन बाँड दोघींमध्ये तयार करु पाहत होती. ह्यापुढे तू मैत्रिणी सारखे माझ्याशी कुठलीही बाब शेयर करु शकते. बोलू शकते. फक्त आधी जबाबदारीने शिक्षण पुर्ण कर, तुझी आर्थीक बाजू भक्कम कर. मग तुझ्याच पसंतीच्या मुला सोबत तू लग्न कर...! मृण्मयीला आपल्या मनातले सांगून सीमा मोकळी झाली. मृण्मयीनेही तिला विश्वास दिला. आता ती चुकणार नाही. आणि सनी सोबत आता मैत्री ठेवणार नाही. सीमा ऐकूण सुखावली...!

पण तिचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. आणि नवीनच डोके दुखी सुरु झाली. तिचा मोबाईल वाजला. अननोन नंबर होता. तरी सुद्धा तिने उचलला."मृण्मयीला माझ्यापासून दूर केले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील..." कोण कोण बोलतय...तेव्हढ्यात फोन कट झाला. कोण असावा....लगेच तिला कळून चुकले, नक्कीच सनी असावा...तिने मनातून फोनवरचे बोलणे विसरायचा प्रयत्न करत, मृण्मयीला समजावून आॅफीस मध्ये गेली. तिथेही तिला दोनदा काॅल आला. आता तिला नंबर कळला होता. म्हणून तिने रिसीव्ह केला नाही. पण कुठे तरी ती आता अस्वस्थ झाली. तिला मृण्मयीची काळजी वाटू लागली. पुन्हा जर ती ह्या मुला मध्ये अडकली तर....कुठे तरी ह्रदयात कळ निघाली. घड्याळीकडे तिचे लक्ष गेले. पाच वाजत आले होते. तिने टेबल आवरला आणि पर्स खांद्याला अडकवून घाईघाई घरी निघाली. रस्त्यात तिच्या टुव्हिलर समोर एक मोटरसायकल आडवी आली. ते बरं झालं की तिची स्पीड जास्त नव्हती. म्हणून पुढील अपघात टळला. तिने लगेच ओळखले, हा तर सनी..."तुझी हिंमत कशी झाली मला अडवायची. टक्कर झाली असती नां पोरा..." ती दरडावून म्हणाली. "हे बघा, मृण्मयीच्या आणि माझ्या मध्ये येऊ नका तुम्ही. गेले काही दिवस तिने मोबाईल बंद ठेवला आहे. काॅलेजमध्ये ती आली नाही. किती दिवस तुम्ही तिला घरी ठेवणार..? ती माझी आहे. मी तिच्या शिवाय राहू शकत नाही. तिला तुम्ही काॅलेजमध्ये पाठवा. तिला अडवायच नाही....सांगून ठेवतो...." सीमा अवाक् होऊन त्याचे बोलणे ऐकत होती. जेमतेम अकरावीतला मुलगा तिला धमकी देत होता....त्या लहान मुलाची एवढी हिंमत...तो तिच्या समोर येऊन डोळ्यात बघून हे सगळ बोलत होता....तिला काहीच सुचेना...काय बोलावं ह्या मुलाला....तिच्या मुलीपेक्षा एका वर्षाने मोठा. छोटा बाळ वाटावा असा...आणि किती निलाजरे पणाने तो हे सगळ बोलत होता...! बोलून तो भर्रकन तिच्या पुढून निघून पण गेला. तिला, त्याच्या वागण्यावर कसं व्यक्त व्हावं कळल नाही. आणि ती त्याच तंद्रीत घरी आली.

घरात येताच मृण्मयी तिच्या गळ्यातच पडली. आणि घाबरत हळू आवाजात तिला म्हणाली."आई सनी घरी आला होता. बराच वेळ त्याने डोअरबेल वाजवली. पण मी दार उघडले नाही. 'तर तुला बघून घेईल म्हणाला'." 

"अरे बापरे, हो का...." तिने मृण्मयीच्या पाठीवरुन डोक्यावरुन हात फिरवत तिला शांत केले. त्याने मला ही अडवले. हे जर मी हिला सांगणार तर, ती अजून घाबरुन जाईल. म्हणून तिने,"काही होणार नाही. मी बघते त्याला कसे आवरायचे ते..."असे म्हणून ती विचार करायला लागली.'मी तर असे काही होईल ह्याची कल्पनाच केली नव्हती. काय म्हणावं ह्या बालीश मुलांना. कोणते उपदेशाचे डोज पाजावे आता ह्यांना. माझी मृण्मयी तर समजून गेली. पण, हा मुलगा आता काय करेल...? कुणाला सांगू...?हसतील माझ्यावर नातलग...वाटले होते, एवढे प्रेम देऊ मुलीला की, वडीलांची काय किंवा दुसर्‍या कोणत्याच नात्याची तिला गरज भासणार नाही....पण हे काय होऊन बसले...कसं माझ्या नजरे समोर हे सगळं घडलं...कसं...?'

"आई अगं आई मी पुन्हा साॅरी म्हणते तुला..मी खरे बोलत आहे. माझा फोन बंद आहे. आणि खरच मी पण खुप विचार केला गं तुझ्या बोलण्याचा. बाबा गेल्यावर तू कुठेही मला त्यांची कमी भासू दिली नाही. पण एका क्षणी मी चुकले...आता मला कळले आहे. तसा मी सनीला मेसेज केला होता त्यादिवशी. पण लगेच त्याचा रिप्लाय आला. तो म्हणाला, 'माझ्या शिवाय राहू शकणार नाही, म्हणून' तरी मी त्याला सांगितले आहे, आपण ह्या नंतर बोलायचे नाही...खरच गं !" ती गळ्याला हात लावत आईच्या डोळ्यात बघू लागली.

तिच्या निरागस बोलण्याकडे सीमा बघू लागली. तिला वाटले आपण काळजी करत बसण्यात अर्थ नाही. घाबरुन चालणार नाही. काहीतरी ठोस पावले उचलावी लागतील. मग तिने ठरवले. आता लगेच सनीच्या आईबाबांच्या कानावर हा प्रकार टाकूया. ते त्यांच्या मुलाला आवरतील. म्हणजे मग बोंबाबोंब न होता हा प्रकार इथेच थांबून जाईल. त्यानंतर मात्र अश्या घटनांपासून मी मृण्मयीला लांब ठेवेन. विचार करुन तिला हुरुप आला. जणू काही अडचण तिची सुटली होती.

सनीचे घर शोधायला तिला वेळ लागला नाही. घरा बाहेरची त्याची गाडी तिने ओळखली. दुमजली बंगलेवजा घर होतं त्याचं. वडील प्राध्यापक आई शिक्षिका. समोरच एक कार उभी. निरीक्षण करतच सीमाने डोअरबेल वाजवली. सनीच्या वडीलांनी दार उघडले. "सनीचे बाबा का तुम्ही..?" तिचा प्रश्न.

"हो हो, आपण..?"

क्रमशः

संगीता अनंत थोरात

08/09/22

०००

🎭 Series Post

View all