सुरवंट - २

The internal changes that happen in puberty, creates attraction for unnecessary things.

विषय:- कौटुंबिक कथामालिका

टीम:-अमरावती

शीर्षक:-सुरवंट

भाग:-2

"आई माझा फोन दे!"

"हो देते गं...थांब फोटो बघू दे..जुने फोटो बघत होती बाळा..?"

तिने प्रेमाने तिच्याकडे बघत म्हंटले.

"माझा फोन तू असा बघू शकत नाही. बॅड मॅनर्स आई..."

"अरे वा, फोन मी घेऊन दिला तुला बाळा!" अजूनही ती हसतच बोलत होती. "मग फोन तू घेऊन दिलास पण पैसे माझ्या बाबांचे होते. माझ्यावर उपकार नाही केलेस. दे तू आधी मोबाईल परत...." मृण्मयी आता सीमाच्या हातून फोन हिसकावू पहात होती. सीमाला तिचे शब्द जणू बोचले.

"थांब मृण्मयी, बर्‍याच दिवसांपासून बघतेय तू माझ्याशी नीट बोलत नाही. उलट उत्तर देतेस. बेडरुम लाॅक करुन बसतेस. घरी कुणी आल्यास जुजबी बोलून मोबाईल मध्ये गुंग असतेस. जेवण सुद्धा मला एकटीला करावं लागतं. तुझी तू बेडरुम मध्ये जाऊन जेवतेस नाहीतर उशीरा जेवतेस. काय चालवलस तू हे...? आणि आज तर कहर केलास. कशी तोडून बोललीस तू मला...!" सीमा मुलीच्या बोलण्याने दुखी झाली होती.

"हो ते असू दे, मला माझा फोन परत कर..!" ती पुन्हा सीमाच्या हातून फोन घ्यायचा प्रयत्न करु लागली. मात्र चिडलेल्या सीमाने पुर्ण ताकदीने तिला दूर सारले आणि एक सणसणीत चपराक गालावर मारली. मृण्मयी आ वासून तिच्याकडे बघत राहीली. सोळा वर्षाच्या मृण्मयीने आज पहिल्यांदा चपराक खाल्ली आईच्या हातून...! ती थोडी वरमली आणि मागे सरकली. 

आईने फोटो फाईल उघडली आणि त्यातले फोटो बघून तिचे डोळेच विस्फारले. तिने डोळे उघडझाप करुन पुन्हा एकदा निरखून बघितले. हो...हो, ही माझी लाडकी लेक मृण्मयीच...!

माझं आणि बाबांच विश्व...जीव की प्राण...नवर्‍यानंतरचे माझे आधारस्थान, माझी आशा...माझा विश्वास...माझी लाज...अशी, अशी....निर्वस्त्र....!

सीमाला ग्लानी यायला लागली. ती मटकन मृण्मयीच्या बेडवर बसली. बाजूला टेबलवर असलेल्या ग्लासमधले पाणी गटकन पिऊन टाकले. आणि तिने मृण्मयीकडे बघितले. ती भीतीने थरथरत होती...दोन्ही हाताने ती स्वतःची पॅन्ट पकडून होती. "मी नाही आई...मी नाही आई..."पुटपुटत होती.

हे असं कसं झालं? माझं लाडकं कोकरु...हे काय करत होतं? का हिने असे केले? मी तिला वाढवण्यात काही चूक केली? एवढी कशी काय मी हिच्या कडे दुर्लक्ष करु शकते? पण ही कधी बिघडली? आणि माझ्या लक्षात कसे नाही आले...? एक ना अनेक प्रश्न, घना सारखे तिच्या मस्तकावर आघात करत होते. तिला रडू आवरेना. जवळच टेबलवर असलेला सुनीलचा फोटो उराशी कवटाळून ती दुःखाने विव्हळू लागली...!

घाबरलेल्या मृण्मयीने बाबा गेल्यानंतर पहिल्यांदा आईला असे रडताना बघितले. आता तिलाही रडू यायला लागले. आई रडता रडता म्हणत होती,"सुनील बघितले का? तुमची सोनपरी तुमच्या माघारी काय करत आहे. मी तिच्या सुखासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी झटत आहे. एक अश्रू सुद्धा डोळ्यातून बाहेर पडू देत नाही..का? तर, माझ्या लेकीला तसू भरही बाबांची उणीव नको जाणवायला...सगळं करत होते तिच्या साठी...पण, कुठे तरी कमी राहीली...म्हणूनच तर आज मला हा दिवस दिसला...!" आणि ती अजूनच भावविव्हल होउन रडू लागली.

एका क्षणात, सुनील गेल्यानंतर जमवलेला आत्मविश्वास धराशायी पडला होता...! जीवनात आता काहीच शिल्लक राहीले नाही असे तिला वाटू लागले.

तिची अवस्था बघून, मृण्मयी भावनावश झाली. आईला बिलगून रडू लागली. आई तिला दूर लोटत होती. आणि ती पुन्हा पुन्हा आईला बिलगत होती. "आई मी चुकले, आई मी चुकले...मला माफ कर...तू म्हणशील तेच करेन मी...रडू नकोस ना...आई आई...!" आता दोघीही एकमेकींना घट्ट पकडून रडू लागल्या....!

मनसोक्त रडून झाल्यावर दोघीही शांत झाल्या. घसा कोरडा झाल्यामुळे मृण्मयी प्यायला पाणी घेउन आली. आईला तिने पाणी पाजले."आई मी आपल्यासाठी काॅफी बनवून आणते..." म्हणत ती काॅफी बनवायला किचन मध्ये गेली. काॅफीचे दोन मग घेऊन आली मृण्मयी. तिची भीती जावून आता तिच्या चेहर्‍यावर शांतता होती. ती आईला सरेंडर झाली होती. आईचे प्रेम जिंकले होते. गेल्या दोन वर्षात उकललेले धागे पुन्हा घट्ट झाले होते. 

असे काय बघितले होते की, सीमा हताश झाली होती?

बाराव्या वर्षी मृण्मयीचे पिरीयेड्स सुरु झाले. सीमाने तिला शरीरात होणारे चेंजेस वगैरे सगळे समजावून सांगितले. आता ती मोठी होत होती. अंर्तगत हार्मोन्स आपले काम करत होते. ती लाजत होती. वयानुरुप नटत होती. विरुद्ध लिंगांचे तिला आकर्षण वाटू लागले. तसेही शाळेतल्या वरच्या वर्गातल्या मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू तिच्यासारख्या काही मुली होत्या. हळूहळू तिला आवडणार्‍या मुलासोबत तिची घट्ट मैत्री झाली. मुलं मुली मिळून बागेत फिरायला गेलीत. सिनेमा बघायला गेलीत. वेळ मिळेल तेव्हा शाळेत किंवा शाळे बाहेर मिळून गप्पा मारु लागले. सगळ्या विषयांवर बोलू लागले. सिनेमा बघितला की एखाद्या रोमँटिक सीन वर चर्चा घडू लागली. तशातच एकदा सनीने तिला म्हंटले,"तू तुझ्या मोबाईल मधून फोटो काढ आणि मला पाठव. मी तुझा क्लोज फ्रेंड आहे. आपण नंतर लग्नं करु. तुला बघायचे आहे मला. आपण काही वाईट थोडे ना करतोय. लांबच तर आहोत. तू कशी आंघोळ करतेस? ते मला बघायचे आहे...!" हो नाही करता करता मृण्मयी तयार झाली. आणि तिने तिचे विना कपड्याचे विडीओ आणि काही फोटो काढून सनीला पाठवले.

सनीने त्याचेही काही फोटो तिला पाठवले. आज ती तेच फोटो बघत होती. आईचा फोन फुटल्यामुळे...आज मृण्मयीचे भांडे फुटले होते...! आणि आईचे डोळे उघडले होते.

मृण्मयीची शाळा म्हणजे ज्युनीयर काॅलेज होते. म्हणूनच अकरावीतला सनी तिचा मित्र बनला होता. 

आईने तिला सर्व बाबी समजावून सांगितल्या. दहावीचे वर्ष आहे. सध्या अभ्यासाकडे लक्ष देवून काहीतरी बनण्याची म्हणजेच करीयर वर फोकस करण्याची गरज आहे, मैत्री असेल तर निखळ मैत्री असावी, त्यात अश्या भानगडी नकोत. विरुद्धलिंगाचे आकर्षण वाटू शकते, पण हे वय दोघांसाठीही योग्य नाही....तू त्याच्याशी मैत्री ठेवू शकते. पण अश्या प्रकारे नाही. आणि खरेच जर तो तुझा फक्त मित्र आहे. तर, तुम्ही असा प्रकार केलाच नसता, आणि असे करणे चांगले नव्हे...हे तिला पटवून सांगितले. 

त्याच बरोबर तिने फोन करुन मानसोपचार तज्ञाची अपाॅईनमेंट घेतली. आणि दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडे नेऊन तिने सविस्तर चर्चा केली. हार्मोन्सच्या बदलामुळे वयात येणार्‍या मुला मुलींच्या वागण्यात फरक पडतो. भिन्नलिंगाचे आकर्षण वाढतं. आपण सुंदर दिसावं असं वाटायला लागतं. 

हे वय असच असतं...उगाचच, 'सोळावं वरीस धोक्याचं गं बाई सोळाव वरीस धोक्याचं' म्हणत नाहीत.

क्रमशः

संगीता अनंत थोरात

08/09/22

०००

🎭 Series Post

View all