सुरुवात नात्याची

Katha sasu sunechya natyachi

साखरपुडा पार पडला आणि दोघे ऑफिशियली एंगेज झाले. लग्न ठरल्यानंतर फोनवर कमी बोलणं व्हायचं. पण आता दोघे तासन् तास फोनवर बोलू लागले. ती प्रचंड बोलकी आणि तोही तितकाच बोलघेवडा. मस्त जमायचं दोघांचं.
मग दोघे वेळ काढून एकमेकांसोबत फिरायला जाऊ लागले.
आता सगळ्याच गोष्टीत तिला त्याची पसंती विचारात घ्यावी वाटू लागली आणि तोही बारीक सारीक बाबतीत तिचे मत घेऊ लागला. एकंदर दोघेही खूप आनंदात होते. लग्नाला अजून दोन महिने बाकी असले तरी, साखरपुडा ते लग्न हा अनोखा प्रवास मनापासून एन्ज्योय करत होते.

आता दोघांचे एकमेकांच्या घरी येणे -जाणे सुरु झाले. त्याला 'जावई 'म्हणून मान मिळू लागला. पण तिला 'सून ' म्हणून जसा मान मिळायला हवा तसा मिळेना.
एकुलता एक जावई म्हणून तिचे बाबा त्याचे लाड करू लागले आणि तिच्या होणाऱ्या सासुबाई मात्र तिच्याशी थोडं अंतर ठेऊन वागू लागल्या. हे जाणवताच ती हिरमुसली.

तिला वाटायचं, 'सासुने आपले सून म्हणून लाड करावेत. आपल्या आवडीप्रमाणे सासुबाईंनी घर सजवावे. आपण त्यांच्याकडून घरातल्या माणसांच्या आवडी-निवडी जाणून घ्याव्यात. पण सासुबाई मात्र तिच्याशी जेवढ्याच तेवढं बोलून बाजूला होत.

न राहवून तिने आपल्या आईला सांगितलं, "सासुबाई फारशा बोलत नाहीत माझ्याशी."

हे ऐकून आई म्हणाली, "अगं नवी सून येणार म्हणून थोड दडपण असतं, त्यामुळे होत तसं आणि त्यांचा स्वभाव कमी बोलका असेल. त्यात एवढं टेन्शन घेण्यासारख काही नाही. शिवाय दोघी एकमेकींना नवख्या आहात. स्वभावाचा अंदाज यायला वेळ हा लागतोच. नात्याला थोडा वेळ द्यावा लागतो गं, म्हणजे ते नातं छान खुलून येतं."

तिच्या मैत्रिणींच्या सासवा सगळ्या चांगल्या होत्या. अगदी मैत्रिणीसारख्या राहत होत्या एकमेकींसोबत. तशीच तिचीही अपेक्षा होती.

आता लग्नाआधीच आपल्या नवऱ्याकडे सासुची तक्रार कशी करायची? म्हणून ती गप्प बसली. पण सासुबाई अशा का वागत असतील? हे तिला कळेना.

नकळत याचा परिणाम दोघांच्या नात्यावर झाला. ती पहिल्यासारखी वागत नाही हे पाहून तो विचारात पडला. "नक्की काय बिनसलं आहे?" तिला विचारू लागला. पण हिने काहीच सांगितल नाही.
आता ही काहीच बोलत नाही हे पाहून तो मात्र चिडला. "तुझं काही अफेअर वगैरे नव्हतं ना लग्नाआधी? काय सांगायचं असेल ते सांगून टाक एकदा." तो चिडून म्हणाला.

हे ऐकून तिला हसूच आलं. "अरे नाही.. मी त्या अफेअरच्या गावी कधी साधी चक्करही मारली नाही." तिच्या या उत्तराने त्याच समाधान झालं खरं. पण तिच्या मनात काहीतरी सलत होत हे त्याला जाणवलं होत.
तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, "जे काही मनात साठवलं आहेस ते सांगून तर बघ. मी त्यावर नक्की सोल्युशन काढेन."

बराच वेळ विचार करून ती म्हणाली, "आईंना मी पसंत नव्हते का रे? कारण त्या माझ्याशी फारशा बोलत नाहीत. मी बोलेल तितकचं बोलतात."

"अगं, आत्तापासूनच तू सासुच्या तक्रारी करायला लागलीस का?" तो गाल फुगवून म्हणाला.

"नाही रे. बघ हे असं असतं म्हणून मी सांगत नव्हते काही." ती रागावून म्हणाली.

"अच्छा, हे असं होत तर तुझ्या नाराजीचं कारण!
तू हे मला आधी का बोलली नाहीस? अगं, आईचा स्वभावच तसा आहे. एकदम शांत. पण एकदा का तू घरात रुळलीस ना, मग बघ तुला किती जीव लावेल ती!
मी बोलतो तिच्याशी. बाई, तुझ्या होणाऱ्या सुनेशी जरा भरभरून बोल. अगदी सासुसारखी वाग." तो आता चेष्टेच्या मुडमध्ये आला. 

"ए, नको रे असलं काही बोलू. त्यापेक्षा मीच बोलते त्यांच्याशी." ती नाराज होत म्हणाली.

दोघेही आपापल्या घरी परतले आणि तिने सासुबाईंना फोन लावला.
"कशा आहात आई? बरेच दिवस झाले, आपलं बोलणं झालं नाही म्हणून फोन केला."

"मी छानच आहे गं. बरं..मी तुला फोन करणारच होते. तुमची बेडरूम रंगवायची आहे ना, तर तुझ्या आवडीने सजवून घेऊ म्हणते. कलर, पडदे, बाकी सारं तुझ्या आवडीचं असलं म्हणजे बरं. मग सामान घ्यायला कधी जायचे ते सांग. लवकरात लवकर जाऊ. कारण आता लग्न जवळ आले आहे. त्याआधी घर नेटकं व्हायला हवं."
आपल्या होणाऱ्या सासुबाईंचे हे बोलणे ऐकून तिला कोण आनंद झाला!
"हो आई, अगदी उद्याच जाऊ. मी येईन सकाळी घरी." तिने लागलीच त्यांना सांगून टाकले.

ती धावतच आईकडे गेली आणि सासुबाईंच सारं बोलणं तिने आईच्या कानावर घातलं.
"बघ, म्हंटल होत ना? प्रत्येक नात्याला थोडा वेळ द्यावाच लागतो." आई म्हणाली.

दुसऱ्या दिवशी ती आपल्या सासरी पोहोचली. सासुबाई तिची वाट पाहत दारात उभ्या होत्या. तिला पाहून त्यांना समाधान वाटलं.
"काय घेतेस? चहा की कॉफी? तुझ्या नवऱ्याला कॉफी आवडते म्हणून विचारलं."

"आई, मी चहाच घेते. कॉफी फारशी आवडत नाही मला." ती म्हणाली आणि सासुबाईंनी अगदी काही मिनिटांतच वाफाळत्या चहाचा कप तिच्या हातात दिला.
"आई, चहा खूप मस्त झाला आहे. अगदी मला हवा तसा." ती कौतुकाने चहाचा घोट घेत म्हणाली. तिने केलेल्या कौतुकाने सासुबाई सुखावल्या.
मग सासुबाईंच्या चेहऱ्यावरचे समाधान निरखत ती बराच वेळ बोलत राहिली.
थोड्या वेळाने दोघी खरेदीला बाहेर पडल्या. सासू -सुनेची मनसोक्त खरेदी झाली आणि गप्पाही.

सासुबाई म्हणाल्या, " अगं, किती बोलतेस? मी आपली शांत आहे. मला सांभाळून घे बाई."

हे ऐकून तिला कसंतरीच वाटलं. "एक सांगू का आई? तुम्ही माझ्याशी फारसे बोलत नव्हता ना म्हणून मी तुम्हाला पसंत नाही असा माझा गैरसमज झाला होता. पण आज तो मिटला बरं का. तुमचा स्वभाव खूप छान आहे. मीच आपली साळढाळ..मलाच सांभाळून घ्या तुम्ही."

"आपण दोघी एकमेकींना सांभाळून घेऊ, झालं तर. आपल्या स्वभावात अंतर असणं साहजिकच आहे. पण ते अंतर नात्यात यायला नको म्हणून आपण काळजी घेऊ आणि यासाठी एकमेकींत संवाद असणं आवश्यक आहे."
सासुबाई म्हणाल्या आणि तिच्या सगळ्या शंका दूर झाल्या. मनोमन तिने ठरवून टाकले, 'आपण आपल्या सासुबाईंना कधीच दुखवायचे नाही.'

आणि बोलता बोलता दोघींची पावले आईस्क्रीम पार्लरकडे आपसूकच वळली, एका गोड नात्याची सुरुवात म्हणून!