Login

सुरमयी प्रवास...भाग 48

Love story
सुरमयी प्रवास...भाग 48

अपर्णा घरी आली खूप थकलेली असल्यामुळे ती डायरेक्ट तिच्या खोलीत गेली आणि झोपली.

सकाळी उठून बाहेर आली.

"उठलीस का ग?"

"हो माई."

"काल उशिरा आलीस का?"

"खूप नाही पण थोडा झाला होता. तू झोपली होतीस म्हणून मी तुला उठवलं नाही आणि मलाही खूप थकायला झालं होतं मग मी सरळ झोपायला गेले. माझं डोकं खूप दुखतय ग."


"का काय झालं?"

"माहिती नाही ऍसिडिटी मुळे दुखतंय की अजून काही. काल स्वरालीच्या घरी खूप खाणं झालं. अग माई तिने काय काय पदार्थ बनवले होते तू असतीस ना तू बघतच राहिली असती. खूप छान केळवण केलं तिने, खूप सुंदर. माझं ताट सजवलेलं होतं त्याच्याभोवती रांगोळी काढली होती. मागे केळीचे पान, आंब्याचे पान लावून सजवलं होतं. खूप छान तयारी केली."


"छान, तुला आवडला ना? मग झालं. जा फ्रेश होऊन ये, चहा टाकते तुझ्यासाठी?"

"तुझा झाला?"


"हो माझा आणि बाबांचा झालाय."

"सोहम?"


"तो कसला इतक्या लवकर उठतो."


"त्याला ना सकाळी लवकर उठाण्याची सवय करावी लागेल नुसता झोपून असतो." अपर्णा

"हो ना, धड शिक्षणही होत नाहीये त्याचं. किती टवाळक्या करत फिरत असतो."


"माई तू काळजी करू नकोस काहीतरी करू आपण. होईल सगळं ठीक."

"मला तुझी काळजी कधी वाटली नाही ग, पोटची नव्हतीस तर तरी मला कधी भासू दिलं नाहीस, किती प्रेम देतेस. पण हा धोंड्या याचीच खूप काळजी वाटते एकदा का तो मार्गी लागला ना की माझी काळजी मिटेल."

कुसुमने तिला जवळ घेतलं.


अपर्णा फ्रेश झाली तिने चहा घेतला.

फ्रेश होऊन ती ऑफिसला गेली.


ऑफिसला पोहोचताच तिला श्वेतांग दिसला, तो काम करत बसलेला होता.

"हाय श्वेतांग."

"हाय."

"काय रे इतका काय कामात गुंतलास? मी आले तरी तुझं लक्ष नाही."


"अरे काय माझं कामच संपत नाहीये."


"आपण या ऑफिसमध्ये आलो तेव्हाच आपल्यात बोलणं होत नाही. जुन ऑफिस तरी चांगलं होतं, तिथे आपण बोलत होतो एकमेकांसोबत वेळ घालवत होतो. ऑफिस सुटल्यानंतर बाहेरही वेळ घालवत होतो पण इथे जॉईन झाल्यापासून तसं काहीच होत नाही."


"होईल ग सगळं नीट डोन्ट वरी."

"खरेदीला गेला होतास का तू?"

"नाही ग माझे निघणच नाही झालं. पण आई तुला बहुतेक फोन करेल अंगठी घ्यायला जायचंय सो आई म्हणाली होती की अपर्णाला सोबत घेऊन जाऊया. उद्या किंवा परवा जमलं तसं मी कळवतो म्हणजे आई करेल तुला फोन."

"चालेल आपण ऑफिसमधून सुट्टी घ्यायची का?"


"नाही ग बॉस सुट्टी देणार नाही आपण ऑफिस संपल्यानंतर जाऊया."

"काही हरकत नाही."

"ओके."

ती तिच्या कामाला लागली. ऑफिसमधून घरी गेल्यानंतर श्वेतांगच्या आईचा फोन आला,


"हॅलो अपर्णा मार्केटमध्ये जायचं आहे, तू तयार राहशील मी तुला पत्ता पाठवते "

"हो काकू तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा."

दोन दिवसानंतर श्वेतांग, अपर्णा, कुसुम आणि श्वेतांगची आई चौघेही साक्षगंधासाठी अंगठी घ्यायला मार्केटमध्ये गेले.

दागिन्यांच्या दुकानात गेले.

"दोघांसाठी अंगठ्या दाखवा. आधी मुलींसाठी दाखवा."

दुकानदार अंगठ्या दाखवत होता.
अपर्णाने एक अंगठी घालण्यासाठी घेतली.

"अग या बोटात नाही घालायची, ह्या बोटात घाल."

"का पण काकू?"

"त्यालाही शास्त्रीय कारण आहेत.

लग्न हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. हिंदू रितीरिवाजानुसार लग्नामध्ये विविध विधी केले जातात. हिंदू विवाहाच्या परंपरेत लग्नाचे सर्व विधी साखरपुडा समारंभाने सुरू होतात, ज्यामध्ये होणारे वधू-वर दोघेही एकमेकांना अंगठी घालतात. या विधीमध्ये, मुलीच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी घातली जाते."

"हो का हे मला माहीतच नव्हतं."

"लग्नाची अंगठी किंवा साखरपुड्याची अंगठी नेहमी अनामिकेतच का घातली जाते? अनामिकेच्या बोटावर एंगेजमेंट किंवा वेडिंग रिंग घालण्याचे महत्त्व एका पुस्तकात मी वाचले आहे ते सांगते."

"तुम्हाला माहीतआहे?"

"हो मी सांगते तुला, पण तोवर तू अंगठी ट्राय करत रहा, कुठली आवडते ते बघ.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनामिका हे प्रेम, उत्साह, तेज यांच्याशी संबंधित आहे. डाव्या हाताच्या तिसऱ्या बोटाला वैवाहिक जीवनात महत्त्वाचे स्थान असते. अनामिका जोडप्यामधील प्रेम दर्शवते. अनामिका हे दोन्ही जन्मापर्यंत एकत्र असण्याचे प्रतीक आहे, म्हणून या बोटात लग्नाची किंवा साखरपुड्याची अंगठी घातली जाते."

"किती छान माहिती सांगितली तुम्ही काकू.

ही अंगठी छान आहे ही घेऊ का काकू?"


"हो तुला आवडते ती घे. आता आपण श्वेतांगसाठी बघूया."


"हो श्वेतांग कुठे गेला?"


"फोनवर बोलतोय, येईलच."

"तो बघा आलाच."


"अपर्णाची आई तुम्ही तुमच्या पसंतीने अंगठी बघा, हा अगदी आळशी झालाय जसं लग्न जमलं तसं झालं काय झालं याला कुणास ठाऊक?"

"काकू त्याला कामाचं खूप टेन्शन आहे."

अपर्णा, कुसुम आणि त्याच्या आईने श्वेतांगसाठी अंगठी पसंत केली, खरेदी झाली त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले.


घरी आल्या आल्या विनायकरावांनी एक वाईट बातमी सांगितली.

"काय झालं बाबा अशे उदास का बसले आहात?"


"कुलकर्णी काका गेलेत."

"म्हणजे नक्की काय झालं सांगा ना."

"अगं कुलकर्णी काकांची लाश सापडली आहे."


"काय? कुठे? कशी? काय झालं होतं पण?"


"ते पोलीस तपास करतील."

"बापरे पण हे खूप भयंकर आहे ना? तुम्ही दादा वहिनीला कळवले का?"

"फोन केला होता, त्यांना यायला जमणार नाही. पोलिसांनी डेड बॉडी लगेच पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलला नेली. कदाचित तिकडून ते त्यांचा अंत्यविधी सुद्धा करतील."


"पण मुलगा असूनही अंत्यविधी असा होणार? आपण काहीच करू शकणार नाही का? बाबा आपण जाऊया का हॉस्पिटलमध्ये?"


"नाही ग ते डेड बॉडी बघू देत नाही, जाऊनही काय उपयोग?"

"वडिलांपेक्षा अजून काही महत्त्वाचा असू शकत का? शेवटचा अंत्यविधी करायला सुद्धा येऊ शकत नाहीत. मग मुलगा असूनही काय उपयोग त्यापेक्षा नसलेला बरा."

"बाळा तू नको जास्त विचार करू, थकली असशील जा आराम कर."


"नाही बाबा आता कशातच लक्ष लागणार नाही."


"असं करून कसं चालेल साखरपुडा आहे ना विसरलीस का?"


"नाही विसरले, तुम्ही पण असेच बसून राहू नका तुम्ही आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे."

"कुलकर्णीचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही ग."


"बाबा मी समजू शकते, तुमच्या भावना जोडल्या होत्या त्यांच्याशी. तुमच्या दोघांचं नातं घट्ट होतं त्यामुळे तुम्हाला दुःख होणे साहजिक आहे पण यातून आपल्याला सावरायला हवं ना? आम्हा सगळ्यांसाठी तुमची तब्येत महत्त्वाची आहे तुमच्या तब्येतीच्या पुढे काही महत्त्वाचं नाहीये.
बाबा मी त्यांच्या मुलाला म्हणजे दादाला फोन लावून बघू का?"


"नाही नको काही गरज नाहीये, त्याला यायचं असेल तर येईल आपल्याला काय करायचं आता पण एकदा जाऊन येऊ हॉस्पिटलला."

पण बाबा आताच तर म्हणालात ना बघू देत नाही."


"नाही बघू दिले तरी चालेल पण मी माझ्या मनशांतीसाठी तरी जाणार आहे."


"बाबा मग मी पण येते तुमच्यासोबत."


"चालेल, उद्या सकाळी आपण जाऊ त्यांना भेटायला, आधी हॉस्पिटलला जाऊ मग त्यानंतर तू तुझ्या ऑफिसला जा."


"हो चालेल बाबा."

दुसऱ्या दिवशी विनायकराव आणि अपर्णा हॉस्पिटलला गेले, डॉक्टरांनी डेड बॉडी बघू दिली नाही कारण डेड बॉडीचे अवस्था खूप खराब होती. दोघे तिथून निघाले.

अपर्णा ऑफिसला गेली, विनायकराव घरी गेले.


साखरपुड्याची सगळी तयारी झाली.

संध्याकाळी स्वराली घरी आली,

"आपण आज मेहंदी करायची आहे ना?"

"हो ग करूया, दोन दिवसावर साखरपुडा आलाय मेंदी तर लावावी लागेल."

"आणि फेशियल? फेशियलचं काय झालं?"

"ते मी कालच करून आली."


"म्हणूनच तुझा चेहरा इतका ग्लो करतोय."

"तू पण ना."