Login

सुरमयी प्रवास...भाग 13

Love story
सुरमयी प्रवास...भाग 13

अपर्णा नीरजच्या बाजूला जाऊन बसली.

"अच्छा ती वेडी आहे का तुझ्याशी उगाच भांडायला? तू काहीतरी केलं असशील रे, मी काय म्हणते तू प्रयत्न कर तिला शांत करण्याचा आणि नाही झालं तर आपण संध्याकाळी बोलूया. पण मला आता जाऊ दे मला उशीर होतोय बाय बाय."

अपर्णा ऑफिसला जायला निघाली, बस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेली होती आणि अचानक तिला तो दिसला.

ती त्याच्याकडे बघतच राहिली,
तो तिच्याकडे बघत होता.
ती उठली आणि त्याच्याजवळ जाऊ लागली.
थोडया दूर गेली आणि बघितलं तर...
तिथे कुणीच नव्हतं. अपर्णाला भास झालेला होता.
अपर्णाला जिकडे तिकडे तोच दिसू लागला.
ती भिरभिर बघू लागली.

हॉर्नच्या आवाजाने ती भानावर आली.
आणि पटकन बस मध्ये बसायला पुढे गेली, त्यातही ती क्षणोक्षणी मागे वळून बघत होती. जणू तो तिला पुन्हा दिसणार होता. बस मध्ये चढली. सीट वर बसली आणि बाजूला बघितलं आणि बघतंच राहिली.

"अहो मॅडम सरकाना थोडे तिकडे, माझ्या मुलाला बसू द्या की." बसमधील एक प्रवासी जोरात बोलला.

त्याच्या आवाजाने ती पुन्हा भानावर आली.

थोडी सरकली,
"हो हो बसा ना."

अपर्णा खिडकीतून बाहेरचं दृश्य निरखू लागली.

काही वेळातचं ती ऑफीसच्या स्टॉपवर उतरली. सपासप पाय टाकत ती लिफ्ट मध्ये घुसली. लिफ्टमध्ये कसंबसं तिने स्वतःला कोंबल होतं. श्वास घेणेही अवघड होतं.
सेकंड फ्लोअरला उतरली.

ऑफिसच्या आत गेली, हातातली पर्स टेबलवर ठेवली आणि दीर्घ श्वास घेत खुर्चीवर बसली.

बाजूला  बसलेली नैना तिच्याकडे बघत होती.

"हिला काय झालंय? ही अशी काय बसली आहे." ती स्वतःशीच बोलली.

"काय झालं अपर्णा? अशी का बसली आहेस?" नैना अपर्णाच्या बाजूला जाऊन उभी राहिली.

"काही नाही ग." अपर्णा व्यवस्थित बसली.

"कॉफी आणू तुझ्यासाठी?" तिने अपर्णाच्या खांद्यावर हात ठेवला.

"नको ग."
तिने तिचा हात बाजूला केला.

"अग घे ग तुला बर वाटेल." तिने पुन्हा तिला चिअर्स करण्याचा प्रयत्न केला.
ती गेली आणि दोन कॉफी घेऊन आली.

"अपर्णा कॉफी घे."
"नको ग.."
"अग आता आणलीय ना, मग घे ना."

तिने तिच्या हातातला कॉफीचा मग घेतला.

"आज स्वराली कशी आली नाही? फोन लावून बघते." म्हणत तिने हातातला कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि स्वरालीला फोन लावला.

"रिंग जाते आहे पण उचलत नाही आहे." ती मनातल्या मनात बोलली.

थोडया वेळाने स्वरालीचा फोन आला.

"हॅलो स्वराली, अग ऑफिसला का आली नाहीस? कधीची वाट बघते मी तुझी. फोनही उचलला नाहीस."

"सॉरी अग थोडी बिझी होते, तुझा कॉल आला तेव्हा उचलू शकले नाही."

"काय झालं?"

"दादाचा एक्सीडेंट झालाय, त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. आम्ही सगळे इथेच आलो आहोत म्हणून मी फोन उचलू शकले नव्हते.

"बापरे मला ऍड्रेस पाठव मी लगेच येते."

"लगेच येऊ नको मी तुला नंतर कॉल करते. आता येऊनही तुला त्याला बघता येणार नाही, त्याला ओटीमध्ये नेलंय.
पाय फ्रॅक्चर आहे, सर्जरी करत आहेत."


"बापरे इतक सगळ झालं आणि तू मला कळवले देखील नाही."

"सॉरी अग, इतकी धावपळ झाली ना तुला कळवायला जमलंच नाही."

"कसं झालं ग हे सगळं?"

"तो फिरायला गेला होता आणि एका ट्रकने त्याला उडवलं. थोडक्यात वाचला असं समज. सकाळ पासून तेच सुरू होतं त्यामुळे तुला कॉल करता आला नाही.

"ठीक आहे, तू काळजी घे आणि काही लागलं तर मला फोन कर आणि हो फोन कर नक्की संकोच करू नको आणि काही लागलं तर बिनधास्त बोल काळजी करू नकोस, मी ठेवते अड्रेस पाठवून ठेव, मी येते संध्याकाळी."


दोघींचं बोलणं झालं, बाजूला नैना उभी होती.

"काय ग अपर्णा काय झालं?"

"स्वरालीच्या भावाचा एक्सीडेंट झालाय, ती सकाळपासून हॉस्पिटलमध्येच आहे."

काही वेळाने दोघी आपापल्या कामाला लागल्या.

संध्याकाळी अपर्णा हॉस्पिटलमध्ये गेली.

स्वराली तिथेच होती.

"हाय अग कसा आहे दादा आता?"

"ऑपरेशन व्यवस्थित झालंय, आता काही दिवस त्याला पायावर भार द्यायचा नाही आहे. आणि त्याला त्रास होईल असंही काही वागायचं नाही आहे."

"आता भेटू शकते का त्याला?"

"आता झोपलाय, थोडावेळ थांबव लागेल."

"काही हरकत नाही तोपर्यंत चल आपण चहा घेऊया."

"नाही ग माझी इच्छा नाही."

"स्वराली मला माहिती आहे सकाळपासून तू काही खाल्ल नाही आहेस, चल माझ्यासोबत इथे बाजूलाच एक छानसं हॉटेल आहे. थोडस चहा पी थोडसं काही खाऊन घे तुला बरं वाटेल."

"पण आई-बाबा नाही आहेत आणि मी त्याला सोडून असं जाऊ शकत नाही.

"आपण सिस्टर ला सांगूया आणि थोड्या वेळात येऊया नाहीतर आईबाबाला फोन करून सांग ना पाच मिनिटांसाठी बाहेर चालले आहे."

त्यांचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात स्वरालीचे आई-बाबा आले.

"नमस्ते काका काकू."

"नमस्ते बेटा कधी आलीस?"

"आत्ताच आली सकाळी स्वरालीकडून सगळं कळलं आणि राहवलं नाही, मघाशी येणार होते पण ही बोलली की संध्याकाळी ये म्हणून आता आले. मी स्वरालीला घेऊन जाऊ आम्ही पाच मिनिटात आलोच."

"हो ठीक आहे."

दोघीही चहा प्यायला गेल्या.

दोघी आत जाऊन बसल्या, स्वरालीच्य चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं.

"टेन्शन घेऊ नकोस स्वराली, दादा बरा होईल ग."


"अपर्णा काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय."


"म्हणजे?"

"दादाचा एक्सीडेंट झालाय खरा पण हे एकच कारण नाहीये यामागे अजून काहीतरी आहे. का कुणास ठाऊक, राहवून राहवून अनेक विचार माझ्या डोक्यात घोळत आहेत. त्याला कुठला तरी मानसिक धक्का बसला असेल असं वाटतं."


"अगं पण त्याचा तर एक्सीडेंट झालाय ना त्यामुळे होऊ शकतं असं."

"नाही एक्सीडेंटच्या आधीपासूनच तो विचित्र वागायला लागला होता. शांत शांत राहायला लागला होता. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय."

"हे बघ स्वराली तू टेन्शनमध्ये आहेस ना म्हणून तुझ्या डोक्यात निगेटिव्ह विचार येत आहेत. असं काही नसेल गं आणि दादा असा का वागेल? त्याची चांगली नोकरी आहे, फक्कड पगार आहे, अजून काह हवंय?"

असं तर नाही ना की त्याचं एखाद्या मुलीसोबत अफेअर आणि मग ते ब्रेकअप झालेलं."

"किती विचार करतेस तू स्वराली? टेन्शन घेऊ नकोस आणि असं जर काही असेल ना तर आपण बोलूया दादाशी शांतपणे. त्याला विचरूया पण आत्ताच नको. काही दिवस जाऊ दे त्याला नॉर्मल होऊ दे. वेळ बघून आपण बोलू त्याच्याशी."

दोघींचा चहा पिऊन झाला.

"चल आता निघूया."

दोघी हॉस्पिटलला गेल्या तोवर स्वरालीचा भाऊ राहुल हा जागा झाला होता. स्वराली आणि अपर्णा दोघी त्याला आत भेटायला गेल्या.


"कसा आहे दादा?"
त्याने फक्त हसून मान हलवली.

"सगळं काय होऊन बसलं? आता स्वतःची नीट काळजी घ्यायची. या अपघातामुळे सगळे टेन्शनमध्ये आलेत काका काकू स्वराली सगळे टेन्शनमध्ये दिसतायेत."

त्याने पुन्हा होकारार्थी मान हलवली.

स्वराली त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याचा हातात हात घेतला

"दादा लवकर बरा हो, तुझ्याशिवाय मला नाही करमत, तुला असं बघवतही नाही. तू लवकर बरा होऊन घरी ये." स्वराली रडायला लागली.

अपर्णाने तिला बाजूला नेलं.

"त्याच्यासमोर असं रडू नकोस ग, त्याला वाईट वाटेल."

अपर्णा तिला बाहेर घेऊन आली.

"स्वराली आज तू माझ्या घरी चल, काका काकू थांबले
आहेत. तू माझ्या घरी आलीस तर तुला बरं वाटेल."


"नाही मी दादाला सोडून कुठेही जाणार नाही."

"अग माझ्याकडे येशील तर तुझं माईंड फ्रेश होईल, थोडं बरं वाटेल. इथे तेच तेच विचार तुझ्या मनात घोळत राहतील.

स्वराली तयार झाली आणि दोघी घरी गेल्या.