Login

सुरमयी प्रवास...भाग 14

Love story


सुरमयी प्रवास...भाग 14

अपर्णा आणि स्वराली दोघीही हॉस्पिटलमधून घरी आल्या.
अपर्णाने हातातली पर्स सोफ्यावर ठेवली.
उशीवर डोकं ठेवत ती थोड्यावेळ पाय लांब करून बसली. तिच्या बाजूला स्वराली बसली. दोघींच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता.

किचन मधून कुसुम बोलतच बाहेर आली.

"काय ग आज उशीर झाला तुला यायला?"
ती हॉलमध्ये येताच तिला स्वराली दिसली.

"अरे वा स्वराली आली होय. कशी आहेस."

स्वराली हलकं स्मितहास्य दिलं.

"अपर्णा थकलेली दिसत आहेस."

"हो ग मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, स्वरालीच्या भावाचा एक्सीडेंट झाला आहे त्याला बघायला गेली होती."

"काय हे कधी झालं आता."

"सकाळी झालं, ही ऑफिसला आली नाही म्हणून मी हिला फोन केला तेव्हा हिने सगळं सांगितलं. मी ऑफिस संपल्यानंतर गेले होते आणि भेटून आले."

"स्वराली बरी आहेस ना बाळा?"

"हो काकू बरी आहे."

"माई स्वयंपाक झालाय का ग, स्वरालीने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे."

"हो तुम्ही दोघी फ्रेश व्हा, मी गरमगरम जेवण वाढते."

दोघीही फ्रेश झाल्या.

कुसुमने त्या दोघींना जेवायला वाढलं, जेवताना सुद्धा स्वरालीचे डोळे पाणावलेले होते. अपर्णाने तिच्या हातावर हात ठेवून तिला धीर दिला. दोघीही जेवल्या आणि अपर्णाच्या खोलीत गेल्या.

थोडयावेळाने सुहास घरी आला,

"काय ग आई आज तायडी नाही आली का घरी?"


"आली आहे रे, तिच्या खोलीत आहे. तिच्या सोबत स्वराली पण आली आहे. तिच्या भावाचा एक्सीडेंट झाला म्हणे. दोघी हॉस्पिटलमधूनच आल्या."


"काय! बापरे.. आणि बाबा कुठे आहेत?"

"बाबा असतील चौकात कुलकर्णी काकांसोबत बसले असतील."

"तुला जेवायला वाढू का?"

"नाही नको, बाबा आल्यावर सोबतच बसू."

"अरे तू जेव, मी थांबते तुझ्या बाबासाठी."

"हम्म."

सुहास जेवला आणि माळीवर जाऊन बसला.
अपर्णा आणि स्वरालीला बराच वेळ झोप आली नव्हती.

दोघीही कुस पलटत होत्या.
स्वराली उठून बसली.

"काय ग काय झालं का उठून बसलीस ?"

"काही नाही झोप लागत नाहीये."


"झोपण्याचा प्रयत्न कर लागेल तुला झोप."

बऱ्याच वेळानंतर तिला झोप लागली. ती झोपल्यानंतर अपर्णा बाहेर आली. तिला कुसुम हॉलमध्ये बसलेली दिसली.

"काय ग माई अशी का बसलीस? जेवण झाले नाहीत का अजून?"

"नाही, तुझे बाबा अजून आले नाहीत."

"पण इतक्या रात्रीपर्यंत ते बाहेर कसे."

"कुलकर्णी काकासोबत गेले होते अजून आले नाहीत."

"सुहासला पाठवलं नाहीस का? त्याला पाठव ना बघायला."

"तो झोपलेला आहे."

"रात्र बरीच झालेली आहे, एव्हाना बाबा यायला हवे होते. अच्छा ठीक आहे मी जाऊन बघते."


"इतक्या रात्री एकटीच जाणार आहेस का? थांब मी पण तुझ्यासोबत येते."

त्या दोघी विनायकरावांना शोधायला निघाल्या.
बराच वेळ त्यांनी नाक्यावर शोधलं, आजूबाजूचा परिसर पण    शोधून काढला पण कुणीच दिसलं नाही कुलकर्णी काका पण नाही आणि विनायकराव पण नाही.
दोघीही आवाज देऊन थकल्या.

दमून रस्त्यालगतच्या बाकावर बसल्या,
"माई आता कुठे शोधायचं? मला तर काही कळतच नाही. थोडा वेळ शोधू नाहीच काही झालं तर पोलीस स्टेशन गाठूया."

"अग एकदम पोलीस स्टेशन?"

बोलत असतानाच ती थोडी मागे वळली आणि एकदम ओरडली.

"अपर्णा sss तुझे बाबा.."
अपर्णा आणि ती ताडकन तिथून उठल्या आणि विनायकरावांजवळ गेल्या, तिथे ते बेशुद्ध पडून होते.


"बाबा.. बाबा उठा.." अपर्णा त्यांना जोरजोरात हलवू लागली.

"माई पाणी मिळते का बघ कुठे?"

कुसुम इकडे तिकडे सैरभैर शोधू लागली.

एक गाडी दिसली, धावत त्या गाडीकडे गेली. तिथून पाण्याची बॉटल मिळाली.
कुसुम धावत आली, तिने त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपळल.

काही वेळाने ते शुद्धीत आले.

"बाबा तुम्ही इथे कसे आलात? आणि कुलकर्णी काका कुठे आहेत?

विनायकराव काहीच बोलायला तयार नव्हते, म्हणजे त्यांना काही बोलायला जमतच नव्हतं.

"अपर्णा बोलत काय बसलीस आधी चल त्यांना घरी घेऊन जाऊया."

दोघींनीही विनायकरावांना कसंतरी उचललं आणि त्यांना चालत घरी घेऊन गेले.

घरी दारात पाऊल टाकताच अपर्णा ओरडायला लागली,

"सुहास सुहास खाली ये, सुहास लवकर खाली ये."


तिच्या आवाजाने सुहास पटकन खाली आला.

"काय ग ताई काय झालं बाबांना?"


"तिकडे नाक्यावर बेशुद्ध पडलेले होते. जा पाणी घेऊन ये आधी."


सुहास धावत जाऊन पाणी घेऊन आला.

त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडल. आता विनायक शुद्धीत आले.

"बाबा काय झालं होतं तुम्हाला? आणि कुलकर्णी काका कुठे आहेत?

"अरे ते कुलकर्णीला कुणीतरी उचलुन घेऊन गेलं."

"काय?" तिघेही किंचाळले.

त्यांच्या आवाजाने स्वराली बाहेर आली.
"काय झालं?" तिने सगळ्यांकडे बघितलं.

"काकांना काय झालं?" अपर्णाकडे बघून बोलली.

"अग बाबा बरे आहेत पण कुलकर्णी काकांना कुणीतरी किडनॅप केलंय."

"काय? पण कुणी? कशासाठी? बापरे आता? तुम्ही त्यांच्या घरी कळवलंत का?"

"कुणाला कळवणार? एकुलता एक मुलगा तोही परदेशी राहतो." विनायकराव डोळे पुसत बोलले.

"काय? बापरे त्यांचं इथे कुणीच नाही?"
स्वराली डोक्यावर हात ठेवत सोफ्यावर बसली.

"स्वराली रिलॅक्स पॅनिक होऊ नकोस. सगळं ठीक होईल."

"आपण पोलिसात कळवू." अपर्णा सुहासकडे बघून बोलली.

"हो तायडे चल आपण जाऊन येऊ."

"माई तू बाबांची काळजी घे."
"स्वराली तू जाऊन झोप तुलासकाळी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना? जा झोप."

स्वराली आत झोपायला गेली.

अपर्णा आणि सुहास पोलीस स्टेशनला जायला निघाले.

कुसुमने विनायकरावांसाठी चहा केला.
ते चहा प्यायले. थोडावेळ आराम करून ते उठले.
कुसुमने त्यांना जेवायला वाढलं.

त्यांचं जेवण सुरू होतं, कुसुमने बोलायला सुरुवात केली.

"अहो तुम्ही असं रात्रीचं फिरायला जात जाऊ नका. संध्याकाळी जात जा आणि रात्री जेवण केलं की सरळ झोपायला रूम मध्ये जात जा. उगाच बाहेर भटकत जाऊ नका. आता बघितलंत ना काय झालं कोण कुठले मेले घेऊन गेले त्या कुलकर्णीला. तुम्हाला काही झालं असतं तर? आम्ही कुणाकडे बघायचं. तुमच्यामागे आम्ही आहोत एवढं तरी ध्यानात असू द्या."

विनायकराव शांत जेवण करत होते. कुसुमची बळबळ सुरूच होती.


अपर्णा आणि सुहास पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी पोलिसांना सगळं सांगितलं आणि तक्रार नोंदवून आले.

"आम्ही तपास करू आणि विनायकरावांना चौकशीसाठी इथे बोलवू." असं त्यांनी सांगितलं होतं.

दोघे घरी परत आले, घरी आल्यानंतर बघितलं तर सगळे झोपले होते.

सकाळी स्वराली उठून हॉस्पिटलला जायला निघाली.

"अपर्णा मी हॉस्पिटलला जाते, तू ऑफिसला निघालीस का?"

"नाही ग आज ऑफिसला जाण्याचा मूड नाहीये, म्हणजे माझी इच्छाच होत नाहीये. एकतर काल बाबांचं असं झालं, कुलकर्णी काकांचा कुठेच पत्ता नाहीये. बघते मी सरांना कळवते तसं आणि आज श्वेतांगला डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे मला तिकडे जावं लागेल. बघू काय होते मी सरांना कळवते की आज येत नाही. हॉस्पिटलला निघालीस का? अशी जाऊ नकोस. चहा नाश्ता कर आणि मग जा आणि काकू काकांसाठी काहीतरी घेऊन जा. चल मी तुझ्यासाठी चहा करते."असं म्हणून अपर्णा किचनमध्ये केली.

स्वरालीही तिच्या मागे मागे गेली,

"अपर्णा मी काय म्हणते उगाच का त्रास करून घेतेस ग? काय करत बसतेस राहू दे मी निघते तिथेच काहीतरी मागवून घेईल."

"नाही तू बस थोडा वेळ."

अपर्णाने पटापट चहा नाश्ता बनवला, स्वरालीला दिलं आणि काका काकूंसाठी पॅक करून दिला.

अपर्णा विनायकरावांच्या खोलीत गेली, त्यांच्या बाजूला जाऊन बसली,

"आता कसं वाटतंय तुम्हाला?"

"मी बरा आहे गं."

"तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते."असं म्हणून अपर्णा बाहेर गेली.

ती बाबांच्या खोलीत नाश्ता घेऊन जाणारच होती तितक्यात तिचा फोन वाजला. बघितलं तर श्वेतांगचा फोन होता.