सुरेखाची भरारी

आकाशी झेप घे

कथेचे शिर्षक: सुरेखाची भरारी

विषय: आकाशी झेप घे

स्पर्धा: गोष्ट छोटी डोंगराएवढी


तुकोबाने व्याजाचे पैसे वेळेत न दिल्याने सावकार आपल्यासोबत काही माणसांना घेऊन आला आणि तुकोबाच्या घरातील टेलिव्हिजन, फॅन, त्याच्या मुलाची मोटारसायकल घेऊन चालला होता. तुकोबा व त्याची बायको सावकाराच्या हातापाया पडत होते. कर्ज फेडण्यासाठी अजून मुदतवाढ मागत होते, पण सावकाराला त्यांची दया येत नव्हती. सावकार त्यांना उलटसुलट बोलत होता. 


आजूबाजूचे लोकं तुकोबाच्या घराजवळ जमून कुजबुजत होते. सर्वांना तुकोबाची कीव येत होती, पण सावकाराला अडवण्याची कोणातच हिंमत नव्हती. तुकोबा व त्याची बायको रडत होते.


"सगळं सामान जागच्या जागी ठेवा. तुमचे जे काही पैसे असतील ते मी लगेच व्याजासकट परत करते. एकाही वस्तूला हात लावू नका." 


सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने बघितले, तर तुकोबांची मुलगी सुरेखा पोलीसाच्या पोशाखात उभी होती. सुरेखाला बघून लोकांमध्ये पुन्हा कुजबुज सुरु झाली. सुरेखा सावकार जिथे उभा होता, त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली.


"तुम्ही गरजवंतांना कर्ज देऊन त्याबदल्यात त्यांच्याकडून अवाजवी व्याज गोळा करतात, हा कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही हा जो काही छळवाद मांडला आहे, तो ताबडतोब थांबवा, नाहीतर मी स्वतः तुमच्यावर गुन्हा दाखल करेल. हे पन्नास हजार रुपये घ्या आणि अजून काही पैसे बाकी असतील, तर पुढील महिन्यात ते देऊन टाकेल, तोपर्यंत माझ्या आई वडिलांना अजिबात त्रास द्यायचा नाही."


सुरेखाने दिलेले पन्नास हजार रुपये घेऊन सावकार व त्याची माणसे गुपचूप निघून गेले. सुरेखाचे आई वडील आणि भाऊ तिच्याकडे आश्चर्याने बघत होते. गावातील लोकं एकेकजण निघून जायला सुरुवात झाल्यावर सुरेखा म्हणाली,


"कृपया सगळ्यांनी आपापल्या जागेवर थांबा. तुमच्या सगळ्यांच्या मनात बरेच प्रश्न उभे राहिले असतील, उगाच काही चुकीचे ग्रह करुन घेण्यापेक्षा मी तुम्हाला सगळं खरं सांगते. खऱ्या खोट्याची शहानिशा न करता गावात काहीही चर्चा करण्याची तुमच्यातील काही जणांना सवयच आहे. बरोबर ना शांताराम मामा.


मी एका मुलासोबत पळून गेल्याची गावात चर्चा तुम्हीच केली ना, त्यानंतर माझ्या आई वडिलांना पूर्ण गावाने वाळीतचं टाकले होते ना. तुमच्यापैकी कोणीतरी मला मुलासोबत गावातून जाताना बघितलं होतं का? तुम्हाला अशी चर्चा करताना कसं काही वाटलं नाही.


ह्या राजाराम मामाने माझ्यासाठी एका दारुड्या मुलाचं स्थळ आणलं होतं. माझ्या भोळ्या भाबड्या आई वडिलांना फसवण्याचं काम ते करत होते. मी कितीही सांगितलं, तरी त्यांचा विश्वास राजाराम मामावर होता, तेव्हाच मी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. एका दारुड्यासोबत मला लग्न करायचं नव्हतं. मला माझ्या शिक्षणाचा काहीतरी फायदा व्हावा, असे वाटत होते. 


मी घरातून कोणालाही न सांगता एकटीच निघून गेले. माझी दूरची अलका आत्या मुंबईत राहते, तिच्याकडे मी गेले होते. अलका आत्त्याला माझे म्हणणे पटल्याने तिने मला आश्रय दिला. शहरात रहायचे म्हटल्यावर काहीतरी काम करणे गरजेचे होते. एका अकॅडमीत मला आत्त्याच्या ओळखीने मला नोकरी मिळाली होती. पोलीस भरतीचे प्रशिक्षण सुरु होते, ते बघून आपणही पोलीस व्हावे, असे वाटत होते. प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते, मग बघून बघून शिकण्याचा मी प्रयत्न केला. पाच किलोमीटरवर असणाऱ्या शाळेत पळत जाण्याची सवय असल्याने मी कितीही किलोमीटर धावू शकते, हा विश्वास होताच.


अकॅडमीचे सर जरा दयाळू होते. मी पोलीस होण्याची इच्छा दर्शवल्यावर त्यांनी मला सगळी मदत केली. मी फॉर्म भरला आणि परीक्षेची तयारी सुरु केली. कष्ट केले तर त्याचे फळ मिळतेचं. मी सगळ्याचं परीक्षेत पास झाले होते. पोलीस ट्रेनिंग सुरु असल्याने मला गावाकडे येऊन आई बाबांना ही आनंदाची बातमी देता आली नाही.


आपल्या गावातील लोकांनी आम्हा मुलींना गावाबाहेर जाऊन शिक्षण किंवा नोकरी करु देण्याची परवानगी दिली नाही, आमच्याभोवती अनेक बंधने लादली गेलीत, त्यामुळे आम्ही मुली फक्त चुल आणि मुलं एवढंच करत राहिलो आहोत. मला तरी हे मान्य नाही. मी पोलीस झाल्याने दोन पैसे कमवू शकत आहे. त्याच पैश्यांमुळे मी आज सावकाराचे कर्ज फेडू शकले आहे.


तुम्ही सर्वांनी यावरुन काहीतरी शिकवण घ्यायला पाहिजे. मुला- मुलीमध्ये भेद न करता मुलीला शिक्षण घेऊन नोकरी करु द्यावी. जेणेकरुन ती स्वतःच्या पायावर उभी राहील. मुलीला बंधनात न ठेवता तिला आकाशात झेप घेऊ द्यावी.


आई तू नेहमी म्हणत असते की, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काही नियम असतात, ते पाळावे लागतात. तू या समाजासाठी मला घराबाहेर पडून नोकरी करण्यास मनाई करत होतीस. आज जेव्हा सावकार आपल्या घरातील सामान घेऊन जात होता, तेव्हा तुमचा हा समाज फक्त डोळे वटारुन बघत होता, यातील कोणीही तुमच्या मदतीला कोणीही आलं नाही.


मी ह्या समाजातील नियमांचे बंध तोडून आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून आज सावकाराला पैसे देऊ शकले. माझ्यासारखी झेप घेण्याचा प्रयत्न आपल्या गावातील मुली करतील, अशी आशा करते."


सुरेखाचं बोलणं संपल्यावर गावातील लोक खाली माना घालून निघून गेले, तर तिच्या आईने तिला मिठी मारली आणि तिच्या वडिलांनी तिच्यासमोर हात जोडून माफी मागितली.


समाप्त…


©® Dr Supriya Dighe