सुरेख माझे माहेर भाग -3 (माहेरवाशीण)

Katha maherachi

चार दिवस कसे मजेत गेले. आता करुणाला आपल्या नवऱ्याची आठवण छळू लागली. तसेच सासुबाई, आत्याबाई, मोठ्या सासुबाईंची सय येऊ लागली.

माहेरी कोणी कामही करू देईना. मग नुसतं बसून कंटाळा आला म्हणून ती स्वयंपाक घरात लुडबुड करू लागली.
"वन्स, अहो कशाला काम करता! मी आहे ना? जा बघू. तुमच्या मैत्रिणी तुमची वाट पाहत असतील. त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. थोडं फिरून या. सासरी एकदा का जबाबदारी अंगावर पडली की, तुम्हालाच करायचे आहे सगळे. तेव्हा आत्ता मजा करून घ्या." वहिनी म्हणाली.

इतक्यात करुणाची पक्की मैत्रीण धावत -पळत आली. तिच्या चेहऱ्यावर निराळेच भाव होते. अचानक करुणाचे हात हातात घेऊन तिने एक गोल गिरकी घेतली आणि घाईघाईने म्हणाली, "अगं करुणे.. माझंही लग्न ठरलं. मुहूर्त पुढच्याच महिन्यातला आहे. तू आणि भाऊजींनी नक्की यायचं हं...मी काहीही कारणं ऐकून घेणार नाही. कित्ती छान वाटताय सांगू तुला!" मग दोघी बराच वेळ बोलत राहिल्या.

मैत्रीण गेली आणि करुणाच्या नवऱ्याचे पत्र आले. 'मी उद्याच तुला न्यायला येतो.' असा मजकूर लिहिला होता त्याने. पत्र वाचून करुणाला आनंद झाला खरा. 'पण आत्ता कुठे चार दिवस झाले, अजून माहेरपण साजरे झालेच नाही.' असे वाटू लागले तिला.
तिने घरी आपल्या नवऱ्याचे पत्र दाखवले. तशी 'जावई ' येणार म्हणून एकच गडबड उडाली. आई आणि वहिनी उद्याचा बेत ठरवू लागल्या, तर दादा आणि बाबा खरेदीला बाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी सत्यजित ठरल्या वेळेत हजर झाले. तसे सख्खे शेजारी जावईबापूंना पाहायला गोळा झाले. "इतकेही करमत नाही का आता? लगेच पाठोपाठ बायकोला आणायला आलात!" म्हणून चिडवू लागले.
आईने छानसा स्वयंपाक केला आणि जावई आवडीने जेवले म्हणून साऱ्यांनी कौतुकही केले.

निघताना करुणाचा पाय जड झाला. 'मानाची माहेरवाशीण' म्हणून आईने तिला हळद -कुंकू लावले आणि साडी -चोळी देऊन तिची ओटी भरली. तर जावईबापू पहिल्यांदाच घरी आले म्हणून सोन्याची अंगठी देऊन त्यांचा मानपान केला.
हे सारे पाहून करुणाचे मन व्याकूळ झाले. माहेर कायमचे सुटले म्हणून ती रडू लागली. "अगं, तुझे माहेर सुटले, तरी नाती तुटत नाहीत. उलट ती अधिकच जवळ येतात. सासरी नीट, प्रेमाने वाग. कोणाला दुखावू नको आणि कोणी बोलले तर मनावर घेऊ नको." आईने आपल्या लेकीला, प्रेमाने सल्ला दिला. वहिनीने आपल्या नणंदेच्या हातावर बांगड्या भरायला पैसे ठेवले.

"जावईबापू..आमच्या लेकीला सुखी ठेवा. काही चुकलं तर माफ करा आणि अधून -मधून येत जा इकडे." बाबा आपल्या जावयाला म्हणाले.

"अहो बाबा, तुमची लेक आमच्या घरी सर्वांना खूपच आवडली आहे. सारे जण तिचे कौतुक करतात. सासरी तुमच्या लेकीचे इतके लाड होणार आहेत म्हणून सांगू? आता भीती वाटू लागली आहे, मलाच सारखे सारखे इथे माहेरवाशीण म्हणून यावे लागेल की काय म्हणून!" जावईबापूंचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसू लागले आणि करुणा उरात नवी स्वप्न, नव्या आकांक्षा घेऊन आपल्या माहेरहून सासरी जायला निघाली.

समाप्त.
©️®️सायली.

🎭 Series Post

View all