सूर तुझे लागता...-३

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास…


"डोकं सुन्न झालं आहे माझं! ती साप पकडते यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. साप पकडायला घाबरत नाही पण मी पोलीस आहे म्हणून घाबरते… आणि तिची बडबड! चिडली असेल आता मी असा निघून आलो म्हणून पण, मी तरी काय करू… एवढी छान बडबडत होती की पहिल्यांदा असं वाटलं, ऐकावं कुणाचं तरी निखळ बोलणं आपण… दमलेली वाटली पण! नसतं थांबवलं तर अजून एक अर्धा तास काही मॅडम शांत झाल्या नसत्या!", ओजस गालातच हसून म्हणाला.

"किती भांबावलेली पण, थोडी अल्लड, वेळप्रसंगी कणखर, खूप बोलणारी, खोटं बोलायला न जमणारी… आईसारखी वाटली ती! आई तिला बघितल्यापासून तुझी खूप आठवण येतेय गं… झोपाळ्यावर तिला बसलेलं बघून असं वाटलं, शांत तिच्या मांडीवर डोकं ठेऊन पडावं… अधराss… बासुंदी खरंच छान होती पण… कोणीच नसतं का तिच्या घरी, कालपासून तर एकटीच वाटली. धीट आहे पण बरीच! अधरा… माझ्या दारावर धडकलेलं गोड वादळ!", आणि त्याने दीर्घ उसासा सोडला.


दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे आवरून निघून गेली. तोदेखील त्याचं आवरून निघून गेला. दुपारी स्टेशनवरून घरी जाताना अधरा तिच्याच विचारात होती. घराच्या थोडं अलीकडे आली असेल की तिच्या सॅंडलचा बंध तुटला.
"आई गं, ह्याला पण आताच तुटायचं होत का… आलेय ना मी जवळ… शी बाबा, आता थोड्यासाठी अस काढून हातात घ्यायला लागेल. कसा काढू… ही पिशवी कुठे ठेऊ, मला पण नेमकं आजच सामान घ्यायचं होतं…"

"दे इकडे मी पकडतो."

"हो धरा ना, मला हे काढायचंय… एक मिनिट, तू.. तुम्ही इकडे!", अधरा डोळे ताणून ओजसला म्हणाली.

"ते महत्वाचं आहे का, मला जायचंय परत आवर लवकर!"

"मी नाही सांगितलं मग थांबायला, जा ना…", अधरा तोंड वेंगाडून म्हणाली.

"नक्की जाऊ ?"

"नाहीsss…. थांबा ना, मी काढतेय ना हे!", अधरा म्हणाली.

"चल बस लवकर आता गाडीवर…"

"नाही म्हणजे असं कसं… गाडीवर बसायचं…"

"अधरा हे बघ आधीच उशीर झालाय आणि एवढ्या पाच मिनिटाच्या अंतरावर मी तुझ्यासोबत काय करेन असं तुला वाटतं?"

"मी कधी म्हणलं, मला काही कराल… ते तर हे आपलं हे…"

"अधराssss…"

"बसतेय! आयुष्यात पहिल्यांदा साडी घातल्याचा पश्चाताप होतोय मला… असे काय हे, एवढं काय चिडायचं.. आता अचानक कोणी सांगितलं की बस गाडीवर, तर अवघडणार नाही का माणूस… माहितेय पोलीस आहेत पण म्हणून मग काय लगेच ऐकलं पाहिजे असं थोडी आहे… तसे छान दिसतायत वर्दीत, पोस्ट काय असेल ह्यांची… बघून तरी वाटतं मोठ्या पोस्टवर असतील…", अधरा रागात पुटपुटत होती आणी नंतर शांत होऊन तिच्याच विचारात गुंतली.

"अधरा आलो आपण… आणि मी छानचं दिसतो!", ओजस तिला गोड हसून म्हणला.

"ते… हे… म्हणजे बॅग द्या माझी, जाते मी, थॅंक्यु!", अधरा डोळे मोठे करत गोंधळून म्हणली.

"डी. एस. पी. आहे मी… अजून काही ओळख मॅडम?", ओजस तिची मज्जा घेत म्हणाला.

"काही नाही बाय! रात्री लवकर घरी या…", अधरा आत पळत म्हणाली.

"ही मला म्हणाली का की लवकर या… बोलत तर माझ्याशीच होती. काय स्वीट वेडी आहे ही!... चला ओजस, उशीर होतोय… नंतर विचार करा! असं पण आज लवकर घरी यायला सांगितलंय…", ओजस खुशीतचं घरात गेला आणि काही कागदपत्रे घेऊन परत निघून गेला.

"मूर्ख… मूर्ख आहेस तू अधरा! गरज होती का काय पुढचं बोलायची… जाऊ दे, आता काय बोलले तर बोलले… आहह, खूप झोप आलीये मला, गुड नाईट अदु…!", अधरा तशीच झोपून गेली.

"हुश्श! संपलं एकदाच काम… सात वाजलेत म्हणजे आठपर्यंत पोहोचेल. आज पण उशीर…", ओजस थोड्या नाराजीतच म्हणला.

पटकन गाडी काढून तो निघाला. आज गाडीचं स्पीड थोडं जास्तच होतं आणि सोबत एक गोड हसूदेखील!


डिंग डाँगssss….

"कोण आहे आता, झोपुद्या ना मला…", अधरा साडी नीट करत उठली आणि दार उघडले.

"कोण आ.……", अधरा डोळे मोठे करून समोर बघत म्हणली.

"तुम्हीssssss…..", अधरा डोळे चोळत म्हणली.

"काय गं, बरं वाटत नाहीये का ?"

"उम्म, म्हणजे बरी आहे मी पण आज दमलेले… तुम्ही या ना आत…"

"नाही नको, आवरतो मी… मी तर फक्त सांगायला आलेलो की सॉरी उशीर झाला आज! काय आहे कोणीतरी सांगितलेलं ना की लवकर या, मग सॉरी म्हणायला नको का…", ओजस हसत म्हणाला.

"नका ना मज्जा घेऊ! एकतर आत तरी या तुम्ही… असं बाहेरून आल्यावर जास्त वेळ बाहेर उभं राहू नये."

"बरं… आत नको यायला आता, पण तू आवर आणि १५ मिनिटांमध्ये घरी ये! आजिबात उशीर नकोय मला…आणि हे असं तोंड बारीक करून माझ्यावर काही फरक पडणार नाहीये. लवकर ये!", असं बोलून ओजस निघून गेला.

"१५ मिनिट! खूप झाली… १० मिनिटे अजून थोडी झोप आणि ५ मिनिटांत आवरायचं…!",असं बोलून अधरा परत झोपली.


"अहोsss… कुठे आहात ?, अय्या ही गुलाबाची झाडं किती छान आहेत! आज आणलीत का…"

"अधरा किचनमध्ये ये ना…"

"आले आले… अहो ते गुलाब किती छान आहेत!"

"हो, मदत कर मला नंतर लावायला…"

"काय करताय आता किचन मध्ये…", असं म्हणत अधरा आत आली.

"काही नाही जेवायला वाढून घेत होतो आपल्याला…"

"अहो… म्हणजे ते… हे… मी जेवेन ना घरी जाऊन!", अधरा मान खाली घालुन म्हणली.

"तू अजून पण साडीवरच आहेस… मी आवरून यायला सांगितलेलं ना!", ओजस रोखून बघत म्हणला आणि अधरा साडीच्या पदराशी खेळत होती.

"कंटाळा आलेला मला… आणि मी खरंच जेवेन घरी जाऊन, बनवते काहीतरी पटकन! नाही जास्त वेळ लागणार…"

"अधरा प्लिज…", ओजस शांतपणे म्हणला.

"हम्म…"

"अधरा मी चायनीज मागवलंय… आवडतं ना तुला?"

"हो… आवडतं मला!"

"अहोsss… "

"बोल ना…"

"काही नाही, चला जेवून घेऊ…"

"बोलणारेस आता ?"

"घाम आलाय तुम्हाला…"

"अगं ते सकाळची भांडी घासत होतो, सकाळी माझी गडबड झाली मग ते राहून गेलं! आणि फॅन चालू करायचा राहिला, हात वैगेरे ओले झालेले म्हणून मग ते घाम…", त्याचे पुढचे शब्द ओठातचं विरून गेले. अधरा थोढीशी थरथरत्या हाताने घाम पदराने त्याचा घाम पुसत होती.

"झालं, चला!"

"हो… "

त्यानंतर दोघांचे पण जेवण शांततेत झाले.

"मी भांडी घासते प्लिज आता…"

"हो घास…", असं म्हणत ओजस शांतपणे बाहेर निघून गेला.


"अहो…"

"ये बस…"

"छान वाटतं ना इथे झोपाळ्यावर, हवा पण फार छान लागते!"

"हम्म…"

"अहो, चालायला जायचं चौपाटीला…प्लिज प्लिज प्लिज!"

"एकदा सांगितलं असतंस तरी ऐकलं असत गं मी…"

"हम्म… चला जाऊ!"

"दोन मिनिटं, चावी घेऊन येऊदे… तू केलंस ना तिकडे लॉक ?"

"हो…"

ओजस आणि अधरा चौपाटीला निघून गेले.


🎭 Series Post

View all