सूर तुझे लागता…-११

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...
"शांत हो ना बाळा…"

"हम्म…"

"असं नाही सारखं सारखं रडू…, चल आता जेवायला…"

"मी तुम्हाला खूप त्रास दिला ना आज…", अधाराच्या डोळ्यात अजून पाणी होतं.

"नाही…", ओजस मंद हसून म्हणाला.


जेवून झाल्यावर दोघे झोपाळ्यात बसले होते.

"अधरा नक्की थंडी वाजत नाहीये ना, नाहीतर आत जाऊया…"

"नाही, छान वाटतंय आता…", अधरा गोड हसून म्हणाली.

"अहो, तुम्हाला माहितेय… आमच्या घरी पण असाच झोपाळा आहे… आई आणि मी तिथे बसायचो आणि मग मी तिला गोष्ट सांगायचे माझ्या शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या… तिला खूप आवडायच्या माझ्या गप्पा ऐकायला…"

"मला सांगशील आज…"

"हो… आणि तुम्ही झोपून गेलात तर…", अधरा खुदुखुदु हसत म्हणाली.

"झोपलो तर झोपलो… उठव मग मला…"

"चालेल… एक काम करा आतून उशी घेऊन या आणि इथे डोकं ठेवून झोपा…"

"नको उशी…", ओजस अलगद तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. अधरा शांतपणे त्याला बघत होती आणि त्याने डोळे मिटून घेतले होते.

"अजून ही असेच आहेत, मांडीवर डोकं ठेवून झोपायला आवडतं… उशी नावाचा प्रकार माहीतच नाही…"

"अधरा…"

"हम्म…"

"सांगतेयस ना…"

"हो…"

"मी कॉलेजला होते ना तेव्हा सुरुवातीला खूप अबोल होते. मैत्रिणी वैगेरे कोणीच न्हवत्या…", अधरा बोलत होती आणि ओजसने तिचा हात घेऊन डोक्यावर ठेवला.

"हा बोल आता…"

"अगं बोल…"

"हो…", अधरा गडबडून मिळाली. त्याच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तिच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत न्हवत्या. आणि ती वेडी, क्षणात भार हरपून जायची…

पाच मिनिटे झाली नसतील की अधराला लक्षात आले त्याला झोप लागली आहे. शांत बसली मग तीसुद्धा त्याला बघत… काय वाटत होतं, काय मनात चाललं होतं ह्यापेक्षा आता या क्षणी तो सोबत होता…
कितीतरी वेळ मग ती तशीच बसलेली, शांत… त्याला एकटक बघत…!
"ओजस…", तिच्या मुखातून अलगद एक हुंकार आला… आणि त्याने तिचा हात पुन्हा अलगद पकडला.

"अहो, जागे आहेत तुम्ही… मला वाटलं झोप लागली तुम्हाला…"

"हम्म…"

"अहो…"

"हम्म…"

"झोप लागत असली तर आत जाऊन झोपा ना… अवघडायला होईल इथे…"

"हम्म…"

"काय झालं… बोलायचं आहे का काही…"

"नाही…"

"शांत वाटतंय…", तिने हे विचारल्यावर ओजसने डोळे उघडले आणि तिच्याकडे बघितलं…

"खूप जास्त…"

"ठिके झोप मग… आहे मी इथेच…"

"तुला नाही झोप आली…"

"नाही…", अधरा मंद स्मित करत म्हणाली.

ओजसने एकदा तिच्याकडे बघून तिचा हात घट्ट छातीशी धरून काही क्षण डोळे मिटून घेतले… आणि उठला.

"चल… झोप आता की झोपतेयस इथेच…?"

"नाही…"


ओजस तिला सोडायला घरी गेला.
"झोप शांत आता… काही लागलं तर फोन कर…"

"हो…"

"झोपशील ना एकटी की थांबू मी…"

"नको, झोपते मी…", अधरा हसून म्हणाली.

"गुड नाईट…"

"गुड नाईट रातराणी…", ओजस तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला…


सकाळी अलार्मने अधराला जाग आली. अशक्तपणा असल्यामुळे उठवत न्हवते. तिने कॉलेजमध्ये कॉल करून रजेची परवानगी मिळवली आणि पुन्हा गुरफटून झोपून गेली.

सकाळी १०च्या दरम्यान तिला जाग आली. हळूहळू सर्व आवरून अंगणात येऊन बसली आणि फोन बघितला. नेट चालू केलं तर ओजसचा एक मेसेज होता. तिने घाईघाईत तो उघडला आणि भरल्या डोळ्यांनी एकटक फोनकडे बघत बसली.

'काही कामानिमित्त बाहेर निघालो आहे. अर्जंट आहे म्हणून जावं लागत आहे. कधी येईन हे मला देखील माहीत नाही… माझ्या रातराणीची काळजी घे… म्हणजे चाफा तिला बघून टवटवीत राहील…!'

भानावर येऊन अधराने ओजसला कॉल केला तर अपेक्षेप्रमाणे फोन स्विच ऑफ होता… तीने आत जाऊन बघितले तर की होल्डरला त्याच्या घराची चावी होती.

"अहो, का असं केलंत… एकदा भेटून तरी जायचं ना… आता कधी येणार तुम्ही… मला बघून गेलात ना जाताना, मग उठवलं का नाहीत… खूप खूप वाईट आहात तुम्ही… खूप जास्त… रातराणी आजिबात बोलणार नाहीये आता चाफ्याशी…", बोलत बोलत अधरा त्याच्या अंगणात चाफ्याजवळ आली.

"आणि तू… हट्टी चाफा… अजिबात म्हणजे आजिबात बोलणार नाहीये मी तुझ्याशी… असं कसं सोडून जाऊ शकतात ते मला… मी आजारी आहे ना… आधी एवढी काळजी घ्यायची आणि मग असं लांब जायचं… खूप खूप वाईट आहेस बरं तू… पुन्हा कधी येणार ते सुद्धा नाही सांगितलं… कशाला गेलेत काही माहिती नाही… फोनसुध्दा बंद येतोय रे त्यांचा… काय करायचं रे आता… गेले मला ठेवून इथेच… येऊच दे आता… नाहीच बोलणार बरं मी…"

"पण तुला माहितेय तू खूप छान आहेस… शांत वाटतं अगदी… ह्यांची आठवण येतेय… करमत नाहीये रे… किती दिवस वाट बघायची आता… काहीच माहिती नाही!... आजुबाजुला असायचे तर छान वाटायचं रे… सहवास दरवळायचा त्यांचा… तुझ्यासारखाच… कधी येतील… ओढ लागून राहील रे आता… ही रातराणी खूप खूप वाट बघेल आता त्यांची… खूप…!", आणि अधराला हुंदका आवरला गेला नाही…

आज सारेच शांत होते… ढग संथपणे चालले होते… सूर्य तळपत असूनसुध्दा त्याचा प्रकाश सौम्य जाणवत होता… मधूनच एखादी हवेची झुळूक येत होती… समुद्राची गाज आज शांत भासत होती… आणि, रातराणी… मलूल होऊन चाफ्याजवळ बसलेली, त्याचा सुगंध साठवत… अगदी तशीच जशी शकुंतला दुष्यंत राजाच्या आठवणीत बसायची… झाडे, पाने, फुले साऱ्यांमध्ये त्याचं अस्तित्व तो ठेवून गेलेला… आणि ती त्या अस्तित्वाच्या खुणा आठवत होती, जपत होती… अडकत होती चाफ्याच्या सुगंधात… त्याच्याही नकळत!

आजसुध्दा तेच गाणं आठवत होतं…

परीकथेतिल राजकुमारा…
स्वप्‍नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक,
साद तयांना देशिल का ?...तो दिवस असाच त्याच्या आठवणीत गेला. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला गेली. लक्ष लागत नसलं तरी आवडत विषय असल्यामुळे ती तीच मन त्यात रमवायचा प्रयत्न करत होती. टिफिन खाताना अचानक त्याची आठवण आली म्हणून तिने फोन केला पण, फोन अजूनही बंद लागत होता. कॉलेजवरुन घरी येऊन ती झोपून गेली. बरं वाटतं असलं तरी थकवा अजून जाणवत होता. संध्याकाळी शांतपणे अंगणात बसली होती. ना उठायची इच्छा होती, ना काही करायची…
पण, त्या चाफ्याला बघून डोळे मात्र सारखे भरून येत होते…
गुडघ्यावर हनुवटी ठेवून, डोळे बंद करून ती कितीतरी वेळ शांत बसलेली…

"ओजस, कधी येणार आहात… खरंच खूप आठवण येतेय तुमची… काहीच सुचत नाहीये… शांत वाटतंय सगळं… अगदी तसंच जसं आई गेल्यावर वाटायचं… जिथे कुठे असाल, नीट रहा… मी बघेन वाट तुमची… खूप आठवण येतेय पण तुमची…", आणि अधराला हुंदका दाटून आला. डोळे मिटून ती शांत होण्याचा प्रयत्न करत होती आणि पटकन एक झुळूक चाफ्याचा सुगंध तिच्या ओंजळीत देऊन गेली… जणू तो तिला सांगत होता… अधरा आहे मी इथेच, तुझ्या जवळ!!!

🎭 Series Post

View all