सूर तुझे लागता... -८

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...
रात्रीचे जेवण आवरून दोघे आज पुन्हा चालायला गेलेले.

पुन्हा तोच मंद वारा, अवखळ लाटा, शांत किनारा, गोड हसणारी रातराणी आणि ते हसू टिपणारा चाफा…!

"अहो, तुमचा वाढदिवस कधी असतो ?"

"का गं…?", त्याच्या ह्या प्रतिप्रश्नावर तिने शांत राहणेच पसंत केले.

"पुढच्या रविवारी आहे…", ती हिरमुसलेय हे कळताच ओजसने जास्त आढेवेढे न घेता सांगितले.

"बरं…"

"रातराणी रुसली ?", ओजसने चालता चालता तिच्या समोर येत विचारलं.

"आsss…", अधरा लाजून त्याला चिडून बाजूला करून पुढे जायला निघाली.

"अगं थांब!... ये, बसूया इथेच…", ओजसने आवाज देऊन तिला बोलावले आणि दोघे त्या थंड रेतीत बसले. थोड्या वेळाने ओजस तिथेच खाली पहुडला. तिचा मोकळा पदर वाऱ्यावर उडत त्याच्या तोंडावर येत होता म्हणून त्याने तिच्या नकळत त्याचे टोक हातात धरून ठेवले.

"का एवढी सुंदर आहे ही… किती छान लाजली मगाशी… हे एवढं सगळं सुंदर फक्त तिलाच जमू शकतं! स्फटीकासारखी निर्मळ आहे… स्वतःमधलं लहान निरागस मूल अजून तसच जपून ठेवलंय… रोज नव्याने उलगडते ही मला… हा रातराणीचा दरवळ असाच आयुष्यभर सोबत असावा! ही आणि हिच्या साड्या… असं वाटतं सगळ्या फक्त हिच्याचसाठी बनल्या आहेत… हवेवर उडणारे हे मुजोर केस, सोबतीला पदर… मानसशास्त्रज्ञ एवढे सुंदर असतील तर काय कोणाची मजल मनाचा तोल ढासळायची! माझाच तोल गेलाय पण सध्या… पण हिच्याकडे बघून कधी वाटलंच नाही की ही लांबची आहे, असं वाटलं ही तर माझीच आहे खूप वर्षांपासून… अधराssss, वेडं केल आहेस तू मला… !"

स्पर्श होता आत लाखो आर्जवांची झुंबरे…
स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे…
जाईल आता आस ही उतू बघ रातही सरे…
पावसाच्या खुणांचे,
दिवस हे पैंजणांचे…
मी हवेतून चालताना, सावर रे ए मना,
सावर रे सावर रे
सावर रे एकदा,
सावर रे…!!!

"काय होतंय हे मला… हे असे सोबत असले की सगळं छान छान वाटायला लागतं परिकथेसारखं! उगाच हसावसं वाटतं, लाजावसं वाटतं… त्यांच्या नजरेत यायचं असूनसुद्धा स्वतःला कुठेतरी गुडूप करावंसं वाटतं… लहान मुलांसारखे वागतात कधीकधी… ते जे युनिफॉर्ममध्ये असतात ते हे नाहीच जणू! हे तर खूप वेगळे आहेत… चाफ्यासारखे, हवेहवेसे! आतासुद्धा किती शिताफीने ते पदराचे टोक पकडून ठेवले आहे… साडी आवडतेच मला नेसायला पण हे सोबत असले की अजून असं छान दिसावसं वाटतं… ओजस वेड केलंय तुम्ही मला…!"


मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे…
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे…
येतील आता आपुले ॠतू,
बघ स्वप्न हेच खरे….
पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्याचे…
पानगळ ही सोसताना, सावर रे मना…
सावर रे मना ,सावर रे…
सावर रे एकदा ,सावर रे…

"अधरा…."

"हम्म…"

"तुला आज खरंच आवडलेलं…?"

"काय…", अधराला त्याच्या प्रश्नाचा रोख समजला तसं ती kओशाळून म्हणाली.

"चित्र गं…"

"चित्र होय, छानच होतं की!"

"हो मग तुला काय वाटलं…?", ओजस तिची फिरकी घेत म्हणाला.

"का..काही नाही!", अधरा डोळ्यांवर हात ठेवत पटकन म्हणाली आणि ओजस हसू लागला.

"पदर सोडा…", तो हसला म्हणून अधरा चिडून म्हणाली.

"नाही सोडणार…"

"सोडा, बसा तुम्ही इथेच… मला जाऊद्या घरी!"

"असं कसं चालेल… इथे कोण घेऊन आलं मला, मग आता मी सांगेन तेव्हाच जायचं…"

"सोडा पदर… मला घरी जायचंय, नुसते चिडवत असतात मला…!"

"दुसऱ्या कोणाला चिडवू का मग ?"

"आजिबात नाही… कोणाशी बोलायला गेलात ना तर बघा!", अधरा पटकन वळून थोडी रागात म्हणाली.

"रातराणी असल्यावर चाफा कोणाकडे जाईल का…?"

"अहोssss…", अधरा लाजून म्हणाली.

"अहो हात ठेवा ना इथे दोन मिनिटं रेतीत…"

ओजसने रेतीत हात ठेवला तसे तिने त्याच्या हाताच्या बाजूने बॉर्डर काढली आणि त्याचा हात काढला. आता त्याच्या त्या हाताच्या ठश्यावर तिने तिचा तो छोटासा हात ठेवला आणि बॉर्डर काढली. ओजस तिचे हे लहान मुलांचे खेळ बघत होता.

"अहो हे बघा ना, किती छान वाटतंय…!", ते सगळे नीट करून झाले तसे अधरा त्याला आनंदाने म्हणाली.

"सुंदर…", ओजस तिच्याकडे बघत म्हणाला.

"काय सुंदर… मी हे दाखवतेय ना तुम्हाला…"

"हो मग मी त्यालाच म्हणालो सुंदर! तुला काय वाटलं…"

"तु.. तुम्ही माझ्याकडे बघून म्हणालात…!"

"हात दे इकडे… हे बघ हेच जर एवढं सुंदर असेल तर ते का नसणार!", ओजस तिचा हात त्याच्या हातावर ठेवत म्हणाला आणि तिचा हात घट्ट पकडला. ती शांतपणे त्या घट्ट धरलेल्या हाताला बघत होती. त्याने डोळे मिटून तो सुद्धा शांत पडून होता. तिच्या बोटांच्या टोकांवर अलगद अंगठा फिरवत होता आणि ती… ती त्याच्या ह्या एवढ्याशा कृतीने हवेत गेलेली!

आणि मग किती तरी वेळ ती हवेत होती आणि तो त्या धुंद सहवासात…

तिचा तो उडणारा पदर अजूनही त्याच्या चेहऱ्यावर विसावला होता. वातावरण हळू हळू कुंद होत चाललेले. आणि हे एवढे सुंदर दृश्य आकाशातल्या त्या चांदण्या लुकलुकत बघत होत्या… त्या घट्ट धरलेल्या हातावर चंद्राचा प्रकाश पडला होता आणि ते हात कायम असेच गुंफून राहतील ही खात्री तिला होती… आणि त्या सगळ्या जाणिवेपासून अनभिज्ञ तो फक्त तिचं सोबत असणं अनुभवत होता, मनापासून!

"अहो, चला घरी जाऊन झोपा…"

"हो…"

दोघेही उठून शांतपणे चालू लागले. हात मात्र त्याने अजूनसुद्धा सोडला न्हवता.

"अहो…"

"अधरा…", दोघेही एकदमच म्हणाले आणि हसले.

"छान वाटतंय…!"

"छान वाटतंय…!", पुन्हा दोघे एकसाथ म्हणाले आणि हसले.

"आज थंडी नाहीये ना…"

"हो ना, तरी पण मी खांद्यावर हात ठेवू शकतो. एक मिनिट, मी आज खांद्यावर हात नाही ठेवला म्ह्णून म्हणालीस का तू…?"

"अहो… का छळताय?", अधरा लाजून म्हणाली तोपर्यंत त्याने खांद्यावर हात ठेवलासुद्धा!

"नको ठेवू का…?", ओजस तिच्याकडे मिश्कीलपणे पाहत म्हणला. त्याच्या ह्या प्रश्नावर अधराने शांत राहणेच पसंद केले. त्याने सुद्धा मग तिला जास्त त्रास न देता खांद्यावरचा हात काढला आणि पुन्हा हात घट्ट धरला.

"काळजी घे!", घराजवळ आल्यावर तो हळूच तिचा गाल ओढून म्हणाला.

"तुम्हीसुद्धा, शुभ रात्री…"

"शुभ रात्री रातराणी…", त्याच्या ह्या वाक्यावर अधरा गोड हसून आत पळाली.

उनका हाथ हाथमें हों, चांद का साया साथमें हों…
कुछ अनकही बातें हों और वोह पल वही थमा हों…!

🎭 Series Post

View all