सूर तुझे लागता...-२

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...


दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने बाहेर येऊन बघितले तर, आज त्या घराला कुलूप होते. तिथे कोण राहतं, हा त्याचा प्रश्न तसाच अनुत्तरित राहिला. थोड्या नाराजीतच त्याने आवरायला घेतले. डी. एस. पी. ओजस बल्लाळ, परवाच त्याची पोस्टिंग मुंबईमध्ये झालेली आणि जुहूजवळ त्याने राहायला घर घेतले. सर्व आवरून तो पोलीस स्टेशनला निघून गेला. दिवसभर कामाच्या व्यापात थोडाफार का होईना, पण रात्रीच्या घटनेचा त्याला विसर पडला होता.

ती आज वेळेत कॉलेजला आली. अधरा लिमये, कॉलेजवर प्रोफेसर म्हणून ती कार्यरत होती. मूळची पुण्याची असलेली अधरा, नोकरीसाठी मुंबईमध्ये आलेली. तिला इथे येऊन दोन वर्षे झालेली. आज लेक्चरमध्ये मात्र शिकताना तिचे मुळीच लक्ष लागत न्हवते. मधूनच हसत होती, मधूनच भानावर येत होती. आधी कधी आपल्या मॅमना एवढं हसताना न बघितलेली मुलं आज जरा कुतूहलानेच तिचं निरीक्षण करत होती. कॉलेज सुटल्यावर दुपारी अधरा घरी आली आणि झोपून गेली.

सायंकाळी उठल्यावर अंगणात आली. घर समुद्राजवळ असल्याने छान वारा सुटलेला… ती तिथेच पायरीवर डोळे बंद करून बसली. काही वेळ गेला असेल आणि तिला कोणाचीतरी चाहूल लागली म्हणून तिने डोळे उघडले तर, कुरियर देणारा होता. तिने तर मागच्या काही दिवसात काहीच मागवले न्हवते, मग हा इथे कसा…

"नमस्कार, मी फास्ट वे कुरियर मधून आहे. हे पार्सल बाजूच्या बंगल्यामध्ये द्यायचं होत, पण ते घर बंद आहे. तर तुम्ही घेऊन त्यांना द्याल का ? मी उद्या पुन्हा आलो असतो पण बहुतेक हे पार्सल महत्वाचं असावं कारण मला ऑफिसमधून सांगितलं गेलं की आजच्या आज हे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही प्लिज हे द्याल का त्यांना…?", श्वास न घेता एक सलग तो बडबडत होता. त्या बडबडीमध्येच त्याने तिच्या हातात ते पार्सल दिले.

"मॅडम सही करा ना ?"

"हे म्हणजे खरंच महत्वाचं आहे का, तुम्ही उद्या येऊन नाहीच देऊ शकत का ?", अधरा पूर्णपणे गोंधळून म्हणाली.

"मॅडम नाही ना, प्लिज द्या ना तुम्ही…"

"ठीक आहे, देते मी!", अधरा हलकासा उसासा सोडून सही करत म्हणाली.

साधारण एक अर्धा तास झाला असेल, पण अधराचे चित्त काही थाऱ्यावर न्हवते. इकडून तिकडे ती घरात फेऱ्या मारत होती.

"कसं देऊ आता त्याला हे पार्सल, एकतर आधीच मी रात्री गोंधळ घातलाय! आता त्यांच्या समोर जायचं म्हणजे अवघडच आहे. चेहऱ्यावरून तर तसा ठीकठाक वाटतोय. काय करू… जाऊ की नको, जायला तर हवंच! तो सांगून गेलाय की महत्वाचं आहे म्हणून… काय करू, काय करू, काहीच का सुचत नाहीये मला… म्हणजे आता जायला लागणार हे नक्की! त्याच्या घराची लाईट पण अजून चालू झाली नाहीये म्हणजे, तो अजून घरी आला नाहीये. जाऊदे, तोपर्यंत मी जेवायला बनवते. आता पहिल्यांदा शेजारच्या घरी जायचं म्हणजे काहीतरी न्यावंच लागणार! काय बनवू… बासुंदी आवडेल का त्याला… बासुंदीच बनवते!", अधरा बोलत बोलत किचनकडे वळाली आणि कामाला लागली.

ओजसला आज घरी यायला आठ वाजले. नेहमीप्रमाणे कामामुळे उशीर झाला. घरी आल्यावर डोळे मिटून शांत सोफ्यावर पडलेला, तर बेल वाजली. आता या वेळी कोण आलं असेल हा विचार करत त्याने दार उघडले तर समोर एक मुलगी हातात डबा आणि पिशवी घेऊन उभी होती.

"मी अधरा, इथे बाजूला राहते. हे तुमचं पार्सल दुपारी आलेलं पण, तुम्ही घरी न्हवतात म्हणून त्याने माझ्याकडे दिलं!", अधरा मान खाली घालुन पटापट सांगून मोकळी झाली.

"अधरा, हे नाव सोडून मला काहीच कळालं नाही ओ… एक मिनिट तुम्ही आत या ना…"

"हो हो मी येणारच होते. असं कसं बाहेर उभं राहणार ना…", अधरा पटकन त्याच्या बाजूने निघत घरात गेली आणि ओजस स्तब्ध झाला.

"तुम्ही का दरवाजात उभे आहेत… आत या!", ओजसला विचार करायची संधी न देता अधरा म्हणाली.

"हो आलोच!", ओजस गोंधळून म्हणला.

"हे बघा हे पार्सल, दुपारी आले आणि ह्या डब्यात बासुंदी आहे. पहिल्यांदाच आले म्हणून घेऊन आले. किचनमध्ये ठेऊ का ?"

"हो, ठेवा ना." ओजस फक्त मान डोलावून शांतपणे म्हणाला.

"तू… तुम्ही मला अहो जाओ का करत आहात ?, प्लिज नका करू!"

"डबा ठेवतेयस ना अधरा…"

"हो हे काय निघालेच आहे!", अधरा झपाझप पावले टाकीत किचनमध्ये गेली. काट्यावर डबा ठेवला आणि ग्लासभर पाणी पिऊन शांत झाली.

"अधरा काय होतंय, शांत हो… तो पोलीस असला तरी तुला काही करणार नाहीये. नको घाबरुस!", ती पुटपुटत बाहेर आली.

"थॅंक्यु… बासुंदीसाठीसुद्धा आणि पार्सलसाठी सुद्धा!"
"वेलकम, मी जाऊ आता…", असं म्हणून ओजसच्या उत्तराची वाट न बघता ती दरवाजाकडे निघाली.


"अधरा…"

"हा, काय झालं ?",अधरा हळूच मागे वळत म्हणली.

"काल मला ती चांदणी तू दिलीस का ?", ओजसने विचारलं आणि अधराने डोळे घट्ट मिटून घेतले.

"हो, हे बघा मी ती चांदणी तुम्हाला दिली कारण तुम्ही नाराज वाटत होतात. बाकी काहीच माझ्या मनात न्हवतं! प्लिज तुम्ही या साठी मला ओरडू नका. मला माहितेय तुम्ही पोलीस आहात पण, मी खरंच सांगतेय मी फक्त तुम्ही नाराज दिसलात म्हणून ती दिली!", अधरा डोळे घट्ट मिटुनच एक सलग म्हणाली आणि शांत झाली. दोन मिनिटांनी हळूच डोळे उघडून बघितले तर तो समोर न्हवता.

"जाऊदे गेले वाटतं, हुश्श! हे पोलीस आहेत माहिती न्हवतं मला… नाहीतर कशाला नादाला लागले असते.", असं म्हणत अधरा बाहेर आली.

"अय्या झोका, किती छान आहे हा… काल लांबून नीट दिसलाच नाही पण किती मस्त आहे! बसू का एकदा, असं पण ते आत गेलेत…",अधरा दबक्या पावलाने जाऊन हळूच झोक्यावर बसली आणि डोळे बंद केले.

"खरंच शांत वाटतंय इथे बसून…", आणि एकाकी ती किंचाळली.

"ओजसssss….", सेकंदाच्या वेगाने ओजस तिथे धावत आला.

"अधरा काय झालं, ठीक आहेस ना…?"

"ते बघा तिथे साप… तुमच्याकडे काठी असेल तर जा ना पटकन घेऊन या, प्लिज!"

"हे बघ, घाबरू नकोस. आपण सर्पमित्रांना कॉल करून बोलवू. मारायला नको ग त्याला…"

"ओजस काठी देणार आहात की नाही…",अधरा थोडी चिडून म्हणाली.

"आणतो…", ओजस हतबल होऊन काठी घेऊन आला.

आता अधरा पुढे सरसावली. हळू हळू अंदाज घेत ती सापाच्या जवळ होती. जवळ जात तिने हळूच काठीच्या आधाराने शेपटी पकडली आणि दुसऱ्या हाताने सापाचे तोंड पकडले.

"अधराsss…",ओजस ओरडला.

"अहो मला येतो साप पकडायला. मी सुद्धा एक सर्पमित्रचं आहे!", अधरा त्या सापाला नीट पकडत म्हणाली. तिने तो साप नीट पकडत थोडं चालत जाऊन दूरवर झाडीत सोडून आली. ओजससुद्धा होताच तिच्या मागेच! आणि परत येताना अचानक अधराला हसू आलं.

"तुम्हाला काय वाटलं, मी सापाला मारणार होते काठीने? अहो मला आवडतात साप! कॉलेजला होते तेव्हा पकडायला शिकले आणि मग जिथे असे साप अडकलेले असतात, त्यांना सोडवायला जाते कधीतरी!", अधरा स्वतःच्याच धुंदीत बोलत होती.

घराजवळ आले तसं अधरा म्हणली,"गुड नाईट! अजून जेवण बाकी आहे. तुम्ही पण जेवला नसाल ना… भूक लागली असेल ना, रोज पण एवढाच उशीर होतो का यायला तुम्हाला? तुम्ही…."

"अधरा… चाफा छान आहे तुझा!", असं म्हणून ओजस निघून गेला.

"असे काय हे… मी बोलत होते ना, तर मला थांबवलं! असूदे, असं पण मला आता भूक लागलेय…!", असं म्हणत अधरा गेट बंद करून आत आली.


🎭 Series Post

View all