सूर तुझे लागता...-१

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...


आज तिला थोडा उशीर झालेला… घाईघाईत आवरून ती कॉलेज ला निघाली. ६.५२ ची लोकल ६.५८ झाले तरी आली न्हवती. धो धो पाऊस कोसळत होता. जस जसा एक एक मिनिट पुढे सरकत होता, तस तशा तिच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या लकेरसुद्धा हलक्या हलक्या गडद होत होत्या. भर पावसातसुद्धा ती घामाने ओथंबलेली! आणि ट्रेन आली.

उशीर झाल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती पण, तिला बसायला जागा मिळाली. खिडकीतून येणारी गार हवा जशी तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती, तशी ती हळू हळू शांत झाली आणि प्रवासाचा आनंद घेऊ लागली. तिने तिची डायरी काढली आणि लिहू लागली…

"एक प्रसन्न सकाळ… रात्रीची नशा उतरून आता सूर्याची प्रसन्नता सगळीकडे हळू हळू विखुरतेय… जो तो आपापल्या मार्गाने दैनंदिन जीवनाला सुरवात करतोय… आयुष्याचे रहाटगाडगे असल्याप्रमाणे सर्व काही अगदी सवयीप्रमाणे चालू आहे… किती छान वाटतं ना अशा प्रसन्न सकाळी… सकाळी गर्दीतली लोकल… थोडी भांडणं… थोडे प्रसन्न चेहरे… थोडे चिंतेतले… आणि खूप जास्त गडबड… प्रत्येकाची… काम, शाळा, कॉलेज, नोकरी… पण या सगळ्या धावपळीमधून सकाळी सकाळी खिडकीच्या बाजूला बसून थोडी फार दिसणारी हिरवळ बघायला मिळणं म्हणजे सुवर्णयोग… प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतःची कहाणी… आणि त्यात आपलीसुद्धा एक… आपण ही त्यांच्यामधलेच एक, पण ट्रेनमध्ये जागा मिळवायला जगातली सगळी काम करून दमलेले फक्त आपणच असतो… विनोदाचा भाग सोडला तर, मुंबईकरांच्या अंगवळणी पडलेलं आहे हे सगळं… सगळ्या अडचणींवर मात करून स्वतःच स्थान बनवणं हे त्यांना लहानपणापासूनचं परिचीत!..."

तीच स्टेशन जवळ आल्याने डायरी बंद करून ती उठली. पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला. थोडी रिपरिप चालू होती फक्त! झपाझप पाऊलं टाकीत ती कॉलेजकडे निघाली. साडी सांभाळत ती कॉलेजला पोहोचली. पाहिले लेक्चर मानसशास्त्राचे होते. स्वतःला नीट करून ती वर्गात गेली. एक छान स्माईल देऊन तिने शिकवायला सुरवात केली. नंतरचे दोन लेक्चरसुद्धा तिचेच होते दुसऱ्या वर्गावर!

आज नाश्ता करून न आल्यामुळे ती बऱ्यापैकी दमली होती. ब्रेकमध्ये तिने आधी नीट डबा खाऊन घेतला. दुपारी कॉलेज सुटल्यावर ती ग्रंथालयात जाऊन बसली. आधीचे पुस्तक देऊन तिने व. पु. काळेंचे "पाहिले प्रेम" पुस्तक घेतले आणि घरी निघाली. आतासुद्धा पावसामुळे ट्रेन उशिरा होत्या. घरी पोहोचेपर्यंत तीन वाजले होते. जेवण करून सगळं आवरून ती पुस्तक वाचायला बसली…

आज तो अगदी वेळेत घरी आलेला. रोज काही कारणास्तव वाढत जाणारे काम आज अगदी वेळेत झाले होते! नवीन घरी सामानदेखील बरचसं लावायचं राहील होतं. त्यामुळे ड्युटीवरून आल्यावर त्याने आधी ते काम करायला घेतले. रात्री साधारण आठ पर्यंत त्याचं आवरून झाले. आता जेवून झोपायचे अशा विचारात तो किचनमधे गेला. पटकन डाळ भाताचा कुकर लावून तिथेच काट्यावर बसला. थोडा वेळ गेला असेल की त्याच्या कानावर काही स्वर पडले…

मी मज हरवून बसले गं…
मी मज हरपून बसले गं…
सखी मी हरपून बसले गं….

आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले गं…
साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले गं…

मी मज हरवून बसले गं…
मी मज हरपून बसले गं…
सखी मी हरपून बसले गं….

त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले गं…
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले गं…

मी मज हरवून बसले गं…
मी मज हरपून बसले गं…
सखी मी हरपून बसले गं….

त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं…
दिसला मग तो देवकिनंदन अन्‌ मी डोळे मिटले गं…

मी मज हरवून बसले गं…
मी मज हरपून बसले गं…
सखी मी हरपून बसले गं….

मी मज हरपून…

"आई…", त्याने अलगद साद दिली.

"कोण होती ती… तोच आईसारखा आवाज, तेच स्वर… तो आवाज आईचा नसला तरी मला ओळखीचा वाटतोय! खरंच मी हरवून गेलो त्यात… आवाज तर बाजूच्या बंगल्यातून आल्यासारखा वाटला… बघू का बाहेर जाऊन… "

तो विचार करतच बाहेर अंगणात आला. बाहेर रातराणीचा सुगंध दरवळत होता. टिपूर चांदणे आणि चंद्राची कोर सहज दृष्टीस पडत होती. कुठूनशी अलगद एक झुळूक आली आणि तो तिथेच थबकला. क्षणभर नकळत त्याचे डोळे बंद झाले आणि चाफ्याचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. किती प्रसन्न, शांत होत ते वातावरण… आणि सोबतीला तिचे सूर!

बाहेर तर कोणीच न्हवते. पण मग कोणाचा आवाज होता तो…, विचार करतच तो पुन्हा घरात आला. जेवून झोपायला निघाला पण त्याची पावले पुन्हा अंगणात वळली. अंगणातल्या झोक्यात जाऊन तो डोळे मिटून बसला. आईच्या आठवणीने अगदी गलबलून आल्यासारखं झालं त्याला!

थोडा वेळ तसाच शांत गेला आणि तो तिथून उठला. घरात जातंच होता की त्याचं लक्ष अंगणात एका कोपऱ्यात पडलेल्या चमकणाऱ्या वस्तूकडे गेले. त्याने जवळ जाऊन बघितले तर, एक छोटी चांदणी होती आणि त्याला खाली गुंडाळून एक कागद घट्ट बांधला होता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि मग ती चिठ्ठी उघडली.

"मनात असणाऱ्या गोष्टी मनापर्यंतच ठेवल्या की नकळत हृदयावरचा भार वाढू लागतो. त्यापेक्षा कधीतरी मोकळं होऊन बघावं, छान वाटतं…!"

"किती सुंदर अक्षर आहे हे… पण इथे कशी ही चिठ्ठी? माझ्यासाठी आहे का ही? कोणी टाकली असेल?...पण ज्याने कोणी दिली असेल, किती छान वाटतंय मला!", वर आकाशात बघून त्याने अलगद हसून दिले आणि घरात गेला.

तो घरात गेला तसा इकडे हिने श्वास सोडला.
"काय करतेय मी हे… हा असला वेडेपणा मी आधी कधीच केला न्हवता. पण तो मगाशी एवढा शांत बसलेला डोळे बंद करून, हतबल वाटला मला… जशी मी होते चार वर्षांपूर्वी! किती वेळ शोधत होता इकडे तिकडे बघून, मला तर वाटलं आता दिसतेय का काय मी त्याला… पण नाही दिसले! पण मला का आज असं वेगळं वाटतंय… मी का चिठ्ठी दिली त्याला… काय चालू आहे माझं! आज पहिल्यांदा असं थोडं मनापासून हसावं वाटतंय!", ती घराचे दार बंद करत आत आली आणि डोळे मिटून विचार करत बेडवर पडली.🎭 Series Post

View all