सूर तुझे लागता... -६

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...


"अहो, खूप उशीर झालाय… झोपायचं का ?"

"हो… थॅंक्यु!"

दोघे एकमेकांकडे शांतपणे बघत होते. तो निर्विकार चेहऱ्याने तर ती जणू खूप काळाचे मळभ दूर झाल्यासारखे शांत चेहऱ्याने… पण तो सध्या खूप अस्वस्थ आहे हे त्याच्या चेहऱ्यावरूनच वाटत होते. अधरा पुढे आली आणि अलगद त्याला मिठी मारली. क्षणभर भांबावलेला तो तसाच शांत उभा होता… जशी अलगद त्याच्या कुशीत ती शिरली तशीच अलगद बाहेरसुद्धा आली आणि एक प्रसन्न हसू चेहऱ्यावर ठेवून त्याचा निरोप घेतला.

"अधरा… सुन्न झालोय गं मी, काय होतं ते! अजब रसायन आहेस तू खरंच… कशी अलगद मिठीत आलीस माझ्या, माझी रातराणी!... आपण न सांगता सुद्धा समोरच्याला आपल्या मनातलं कळणं हे किती सुखावणारं असतं आज अनुभवलं… आईच असते ना आपल्या आयुष्यात एक जी न सांगता सगळं समजून घेते… आज तुझ्यात ती भासली! काही झालं की रडायला आईची कुशी असते, समजवायला आई असते… ४ वर्ष आईशिवाय राहिलोय आणि आता कुठूनतरी अचानक तीच प्रसन्नता माझ्या आयुष्यात प्रवेश करू पाहतेय… आज तू मिठी मारलीस पण, खरंच माझे हात नाही धजावले तुला जवळ घ्यायला… पवित्र आहेस तू खूप जास्त… तुझ्या मनाचा ठाव का लागत नाहीये मला, सतत असं वाटतंय की काहीतरी आहे आपल्यात… जुनी ओळख किंवा जुने ऋणानुबंध… पण मनापासून सांगायचं झालं तर आवडायला लागलीयेस मला!... माझी रातराणी!"

आजची सकाळ दोघांसाठी सुद्धा प्रसन्न होती. तो सकाळीच लवकर गेलेला तर ती आज थोडं उशिरा उठलेली! सर्व काम करून थोडं कॉलेजचं काम करत बसलेली… काम रोजचीच असली तरी आज चेहऱ्यावर एक खूप गोड हसू होते. ते कसले होते, का होते हे फक्त तिलाच माहिती होते.

सर्व आवरून घराला लॉक लावून ती पलीकडे गेली. आज केलेली चिकन बिर्याणीसुद्धा डबा भरून घेतलेली. तो डबा काट्यावर ठेवून ती अंगणात आली आणि साडीचा पदर खोचून कामाला लागली. एक एक करून ती गुलाबाची रोपं लावत होती. सगळी रोपं लावून झाली तशी ती तिथून उठणार तर तिला मधूनच काहीतरी आठवलं आणि ती तिथेच बसली. मस्त चिखल बनवून त्याच्या वस्तू बनवायला लागली.

१५ मिनिटांपूर्वी आलेला तो गेटवर हात ठेवून तिला बघत होता. तिचा तो चिखलात खेळायचा उत्साह, छोटीशी वस्तू नीट बनली तरी होणारा आनंद, बिघडली तर होणारी चिडचिड सगळं टिपत होता. त्याच धुंदीत कधी त्याने तिचे ते मग्न असताना फोटो काढले त्याला सुद्धा कळालं नाही!

"झाली रोपं लावून ?"

"हो, हे बघा ना… मी हे बनवलं!", छोटसं बनवलेलं ते घर ती त्याला दाखवत म्हणाली. लहान मुलांसारखा तिचा तो आनंद बघून त्यालासुद्धा हलकं हसू आलं.

"छान आहे, चल आता आत… हात पाय धुवून घे. आज काय आणलस ?"

"अय्या तुम्हाला कसं माहीत मी काहीतरी आणलंय…", ती डोळ्यात चमक आणून त्याला विचारत होती.

"माईंड रिडींग येत मला…", तो तिची मस्करी करत म्हणाला.

"हुह्ह…", त्याला वाकडं दाखवत ती आत निघून गेली.


"अहो हे कुठे ठेऊ ?"

"वर चल, माझ्या खोलीत ठेव."

ती त्याच्या बरोबर वर त्याचा खोलीत गेली. हळूच ते घर त्याचा टेबलवर ठेवलं आणि हात पाय धुवून घेतले. बाहेर येत होती तर हलका पाय घसरला आणि ती सटकली. तिने पटकन दरवाजा पकडला आणि डोळे घट्ट मिटून उभी राहिली.

"अगं हळू, पडशील!", दरवाजाचा आवाज आला तसं त्याने वळून बघितलं.

"कशाला त्या साड्या नेसायला पाहिजेत… आई पण अशीच करायची. "

"अहो काही नाही, ठीक आहे मी…", अधरा चेहऱ्यावर उसनं हसू आणत म्हणाली आणि पटकन खाली पळली.

"घाबरते एवढी तरी ऐकायचं आजिबात नसतं!"


खाली येऊन तिने जेवण गरम केले आणि त्याची वाट बघत बसली.

"अधराssss…", त्याने वरून तिला आवाज दिला. त्याचा आवाज आला तशी ती पटकन वर पळाली.

"अहो काय झालं ?"

"हळू एवढं पळत कशाला आलीस… बस जरा! अगं ह्या मोगऱ्याला बघ ना काय झालंय…", असं म्हणत तो तिला त्याच्या बाल्कनीतला मोगरा दाखवायला गेला. त्याने स्लाईड उघडली आणि अधरा एकदम ओरडली.

"अहोssss… इथे पण झोका!", असं म्हणून तिथेच उड्या मारायला लागली आणि पटकन झोक्याजवळ गेली.

"अहो मी बसू ह्याच्यावर…", तिने परत मागे फिरून विचारले. त्यानेदेखील उत्तरादाखल मान हलवली आणि हळूच गालात हसू लागला… त्याचं काम तर झालं होतं!

"अधरा एक गाणं म्हण ना…"

"अहो काहीही काय… म्हणजे असं कसं अचानक!"

"आईची आठवण आली म्ह्णून…"

"थांबा, मी आलेच!", असं म्हणून अधरा तिथून उठली आणि टेबलवरून तेलाची बॉटल घेऊन आली.

"हा, बसा आता इथे खाली…", अधरा झोक्यावर बसत म्हणाली.

डोळ्यात दाटलेले अश्रू थोपवत तोसुद्धा तिथे शांत बसला आणि तिथे सूर घुमू लागले.


"देख लो हमको करीब से,
आज हम मिले हैं नसीब से,
देख लो हमको करीब से,
आज हम मिले हैं नसीब से,
ये पल फिर कहाँ और,
ये मंजिल फिर कहाँ…

हो गजब का है दिन सोचो जरा,
ये दीवानापन देखो जरा,
तुम हो अकेले, हम भी अकेले,
मजा आ रहा है, कसम से,
कसम से…

क्या कहूँ मेरा जो हाल है,
रात दिन तुम्हारा खयाल है
हो क्या कहूँ मेरा जो हाल है,
रात दिन तुम्हारा खयाल है,
फिर भी जाने जां,
मैं कहाँ और तुम कहाँ…

हो गजब का है दिन सोचो जरा,
ये दीवानापन देखो जरा,
तुम हो अकेले, हम भी अकेले,
मजा आ रहा है, कसम से,
कसम से…"


"छान वाटलं, गाणं पण आणि ती ट्रीटमेंट पण!", ओजस लहान मुलांसारखं गोड भाव चेहऱ्यावर आणून तिला म्हणाला.

"थॅंक्यु…", अधराने पदराने कपाळावर आलेलं तेल पुसलं आणि उठायला लागली.

"बस ना थोडा वेळ… छान वाटतंय!", तो मान खाली घालून तिचा पदर हातात घेऊन म्हणाला.

तिने त्याला उलटं फिरून बसायला लावलं आणि हलकेच त्याचं डोकं मांडीवर घेतलं. केसात हात घालून त्याला हळूहळू गोंजारू लागली…

"उद्या कामावर नाही जायचं…?"

"जायचं आहे पण इच्छा नाहीये!"

"अधरा, एक बोलू… प्लिज ?"

"हो, ऐकतेय मी तुम्हाला…"

"तुझ्याजवळ असलं ना की आईजवळ असल्यासारखं वाटतं गं… चार वर्ष सांभाळालं मी स्वतःला, पण तुला बघितल्यापासून खूप आठवण येतेय तिची… कळायला लागल्यापासून आईच एक होती जी सगळं काही होतं माझ्यासाठी! खूप छान होती माझी आई, एका प्रसन्न मुद्रेसारखी… कितीही दमून आलं तरी आईला मारलेली घट्ट मिठी सगळं विसरायला लावायची! तुला माहितेय, आईची एक खूप जवळची मैत्रीण अवनी काकू… तिने पण आईसारखंच एक मुलीला दत्तक घेतलेलं. खूप छान चालू होतं सगळं, त्या काकूसुद्धा पोलीस ऑफिसर होत्या. साधारण चार पाच वर्ष एकत्र असू आम्ही! पण मग त्यांची बदली झाली आणि त्या दोघी निघून गेल्या. काकुंच नाव लक्षात राहील पण तिला विसरलो मी, फार अंधुक आठवते ती मला… आईसोबत कधीतरी हट्टाने गाणं गायला बसायची! चार वर्षांपूर्वी आई आणि काकू भेटणार होत्या. आई इकडून कोकणात निघालेली आणि त्या कोल्हापूर वरून येणार होत्या असं आईने सांगितलेलं. दोघी भेटल्या आणि गाडी घेऊन तारकर्लीला निघालेल्या… आणि तिथेच घाटात एका ट्रकने दोघींना धडक दिली. मी ड्युटीवर होतो पण जस कळालं तसं लगेच गेलो… दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवलेले… कोलमडलेलो मी! अवनी काकूंची मुलगी बहुतेक काही कामानिमित्त बाहेर देशात होती. ती पण तिकडून बसली पण मला घाई होती म्हणून मी आईची बॉडी घेऊन निघून गेलो. काकूंची बॉडी तिने दुसऱ्या दिवशी घेतली, असा निरोप मला मिळाला. मला तिला भेटायचं होत पण नाही जमलं तेव्हा! आई गेल्यानंतर खूप दिवस लागले मला त्यातून बाहेर पडायला. सगळं नीट चालू होतं आणि माझी बदली झाली म्हणून इकडे आलो. तू भेटलीस! तुला पहिल्यापासून आईची सतत आठवण येते आणि नकळत तू कायम जवळ असावीस असं वाटतं…", ओजस तिचा पदर घट्ट धरून सगळं तिला सांगत होता.

अधरासुद्धा डोळे बंद करून शांतपणे ऐकत होती. एक लख्ख चित्र तिच्यासमोर डोळ्यांसमोर होतं!

वो हमारे जिंदगी मैं एक शाम की तरह आये हैं…
अब रात भी हसीन होगी और सवेरा भी!

🎭 Series Post

View all