सूर जुळले भाग ९

Love Story

सूर जुळले भाग ९


बोलता बोलता मानसीची परीक्षा संपली होती. शेवटच्या पेपरच्या दिवशी मानव तिला कॉलेजवर घ्यायला गेला होता. पेपर सुटल्यावर मानव तिला हॉटेलमध्ये जेवण करायला घेऊन गेला. 


इतक्या दिवस बाकी राहिलेल्या गप्पा ते दोघे मारत होते. जेवण झाल्यावर मानव मानसीला पुण्याबाहेर एका टेकडीवर घेऊन गेला.


"इथे किती शांत वाटतं ना?" मानसी म्हणाली.


"म्हणून तर मी तुला इथे घेऊन आलो आहे." मानवने सांगितले.


दोघेजण एका खडकावर हातात हात घेऊन बसले. 


"मनू, उद्या तू घरी जाशील. मला तुझी किती आठवण येईल." मानव म्हणाला.


"आठवण तर मलाही येईल, पण दुसरा काही पर्यायही नाहीये." मानसीने सांगितले.


"तू घरी असल्याने फोनवर जास्तवेळ बोलताही येणार नाही. मनू, आपलं कसं होणार?" मानव नाराज होऊन म्हणाला.


"मॅसेज करत जाऊ." मानसी म्हणाली.


"तू माझ्यापासून दूर जाशील, ही कल्पनाही मला सहन होत नाहीये." मानवचा आवाज भरलेला होता.


मानसीने त्याच्या हनुवटीला धरुन त्याचा चेहरा आपल्यापुढे केला.


"मानव, तू रडतो आहेस का?"


मानवने तिला मिठी मारली. मानसीने त्याच्या केसातून आपला हात फिरवला.


"मानव, माझ्यावर किती प्रेम करतोस रे."


मानसीने आपल्या हाताने त्याचे डोळे पुसले.


मानवने हळूच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. 


दोघेही एकमेकांत हरवून गेले होते.


"मानव, अंधार पडला आहे, आपण निघूयात." मानसी म्हणाली.


मानवने मानसीला तिच्या रुमवर सोडवले.


"उद्या पप्पा आल्यावर फोन कर." मानवने सांगितले.


मानसी होकारार्थी मान हलवून निघून गेली.


रुमवर गेल्यावर मानसीने पटपट आपलं सर्व सामानाची पॅकींग केली. 


इशा व मानसी गेल्या चार वर्षांपासून रुममेट होत्या. 


उद्यापासून आपले रस्ते वेगवेगळे असतील, या कल्पनेने दोघींनाही भरुन आले होते.


दुसऱ्या दिवशी मानसीचे पप्पा तिला घ्यायला आले होते. मानवला फोन करुन मानसीने मानव व पप्पांची भेट घालून दिली होती. मानसी पप्पांसोबत आपलं सामान घेऊन नाशिकला निघून गेली.


मानव व मानसीमध्ये मॅसेज मधून दररोज बोलणं व्हायचं. मानसी बाहेर गेल्यावर मानवला फोन करायची, पण जास्तवेळ बोलणं होत नव्हतं. 


"मानव, तुझी खूप आठवण येते आहे. मला तुला भेटायलाही येता येत नाही. घरी कारण तरी काय सांगू?" मानसीने मानवला मॅसेज केला.


"मनू, मी तुला भेटायला येऊ शकतो, येऊ का?" मानवने विचारले.


"तू कारण नसताना आमच्या घरी कसा येऊ शकशील? ते काही शक्य नाहीये. असूदेत." मानसी म्हणाली.


"तू एकदा हो तर म्हण." मानव म्हणाला.


"मी हो म्हणून तू लगेच थोडी येणार आहेस का? काहीपण." मानसी म्हणाली.


"तू हो तर म्हण." मानव म्हणाला.


"हो." मानव खूप मागे लागल्यामुळे मानसीने मॅसेज केला.


पुढील पाच मिनिटात दरवाजावरील बेल वाजली.


"मनू, दरवाजा उघड." पप्पांनी सांगितले.


मानसीने दरवाजा उघडला आणि ती शॉक झाली.


"मनू, कोण आलंय?" पप्पांनी विचारले.


"काका, मी मानव. तुमची मुलगी मला घरात घेत नाहीये." मानवने सांगितले.


मानवला दारात बघून मानसीला काय करावे? तेच सुचत नव्हते.


मानसीचे पप्पा आपल्या जागेवरुन उठून दरवाजाच्या दिशेने आले.


"मनू, त्याला आत येऊ दे. मानव, तू ये रे."


मानव आत येऊन सोप्यावर बसला. मानसीच्या आईने त्याला पाणी आणून दिले.


"मानव, दादाने फोन केला नसता, तर तू नाशिकमध्ये आला आहेस, हेही कळलं नसतं. दादा, वहिनी नाशिकमध्ये नसले तरी हेही घर त्यांचंच आहे. कधीही नाशिकमध्ये आलात तरी हक्काने घरी येत जा." मानसीचे पप्पा म्हणाले.


"अहो, दूध घेऊन येतात का?" मानसीच्या आईने विचारले.


"हो, घेऊन येतो. मानव, तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी दूध घेऊन येतो." मानसीचे पप्पा म्हणाले.


मानवने मान हलवून होकार दर्शवला.


"मनू, मानवला बाथरुम दाखव, त्यांना काय हवं नको ते बघ." मानसीचे पप्पा बाहेर जाताना सांगून गेले


"मनू, बाहेरच्या बाथरुम मधील गिझर खराब झाले आहे. मानवला तुझ्या रुममधील बाथरुम दाखव." आईने सांगितले.


मानसी मानवला आपल्या रुममध्ये घेऊन गेली. मानसी काही बोलणार इतक्यात मानवने तिच्या ओठांवर बोट ठेवले आणि त्याने तिला मिठी मारली. 


"आई येईल." म्हणून मानसी बाजूला झाली.


"तू काही कामानिमित्ताने नाशिकला आला होता का?" मानसीने विचारले.


"तुझ्यासाठी काहीपण." बोलून मानव बाथरुममध्ये गेला.


मानसीला आईने आवाज दिल्यावर ती बाहेर आली.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all