Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

सूर जुळले भाग ६

Read Later
सूर जुळले भाग ६

सूर जुळले भाग ६


मानसी व मानवमध्ये फोन होऊ लागले होते. मॅसेजही होत होते. मानसी तिचा अभ्यास सांभाळून मानवसोबत गप्पा मारत होती. एखाद्या दिवशी बोअर झालं की, रात्री आईस्क्रीम खाण्याच्या निमित्ताने दोघे अधूनमधून भेटून गप्पा मारत होते. 


एके दिवशी मानसी मोबाईलमध्ये बघत होती, तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती.


"मानसी, मोबाईलमध्ये बघून हसत का आहेस?" इशाने विचारले.


"अग मानव त्याच्या बहिणीच्या लग्नाला बंगलोरला गेला आहे ना, तर त्याने लग्नातील काही फोटोज मला पाठवले. त्यावरुन मी त्याची खेचत होते." मानसीने सांगितले.


"मानसी, तू मानवच्या प्रेमात पडली आहेस का?" इशाने विचारले.


आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवून मानसी म्हणाली,

"काहीतरी काय. आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहोत."


"हा प्रश्न एकदा स्वतःच्या मनाला विचारुन बघ. मी तुला गेल्या चार वर्षांपासून ओळखते आहे. मानवचा फोन आला की, तू हातातील पुस्तक बाजूला ठेवून देते. तो म्हणेल तेव्हा तू त्याला भेटायला जाते. रात्री अकरा वाजता वॉकच्या निमित्ताने त्याचाशी गप्पा मारायला जाते. आजवर तू एकाही मुलाला एवढे महत्त्व दिले नसशील.


हे मी तुला आधीच म्हणणार होते, पण परीक्षा होती, म्हणून काहीच बोलले नाही. आज शेवटचा पेपर झाला, म्हणून बोलले. मानवचा मॅसेज आला तरी तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल येते. मला जे जाणवलं ते मी सांगितलं. बाकी तुला कबूल करायचं नसेल तर नको करुस." इशा म्हणाली.


"इशा, मी या सगळ्याचा विचारच केला नव्हता. मानव सोबत मला बोलायला आवडतं, ते मी मान्य करते, पण त्याचा अर्थ मी त्याच्या प्रेमात पडले आहे, असं तर होणार नाही ना." मानसी म्हणाली.


यावर इशा म्हणाली,

"एकदा तू स्वतःला त्याबद्दल विचार. हे बघ मानसी तू मानवच्या प्रेमात पडली असली, तरी त्यात गैर असं काहीच नाहीये, फक्त ते तुझ्यासाठी क्लिअर असलं पाहिजे."


"मी या सगळ्याचा विचार करते." मानसी म्हणाली.


पुढील दोन ते तीन दिवसांनी मानसी लायब्ररीत अभ्यास करत बसलेली होती, तिला मानवचा फोन आला, म्हणून तिने बाहेर येऊन फोन उचलला.


"हॅलो, मानसी काय करते आहेस?" मानवने विचारले.


"ऑफ लेक्चर असल्याने लायब्ररीत अभ्यास करत बसले होते." मानसीने उत्तर दिले.


"माझ्या घरी तुला यायला जमेल का?" मानवने विचारले.


"मानव, तू काही मस्करी करतोस. मला बंगलोरला यायला कसं जमेल?" मानसी म्हणाली.


"अग वेडाबाई, मी पुण्यातील घराबद्दल बोलतो आहे." मानवने सांगितले.


"तू पुण्यात कधी आलास? आणि कंपनीत का गेला नाहीस?" मानसीने विचारले.


"मी आज सकाळीच पुण्यात आलो. एअरपोर्टच्या बाहेर पडताना माझ्या हातातील बॅग पायावर पडली. पाय दुखत असल्याने मला कंपनीत जाता आले नाही." मानवने सांगितले.


"अरे बापरे! तू डॉक्टरकडे गेला होतास का? तुला जास्त लागलं आहे का?" मानसीच्या बोलण्यात काळजी दिसून येत होती.


"मी डॉक्टरकडे जाऊन आलो. जास्त लागलं की नाही, हे तू बघितल्यावरचं कळेल." मानव म्हणाला.


"मी थोड्याच वेळेत घरी येते. तुला काही खायला घेऊन येऊ का?" मानसीने विचारले.


"मी ऑनलाईन ऑर्डर करतो. फक्त तू घरी ये." मानव म्हणाला.


मानसीला मानवची काळजी वाटू लागल्याने ती इशाला सांगून मानवच्या घरी गेली. जाताना काही फळं व नारळपाणी घेऊन ती गेली.


मानसी मानवच्या घरी पहिल्यांदा गेली होती. तिने दरवाजावरील बेल वाजवली. मानवने दरवाजा उघडला. मानवला त्याच्या पायावर धडधाकट उभा होता. मानसी त्याच्याकडे शंकेने बघत घरात गेली. मानवने दरवाजा लावून घेतला.


"मानव, तुझ्या पायाला लागले होते ना?" मानसीने विचारले.


मानव हसून म्हणाला,

"मी तुझी गंमत केली होती. माझ्या पायाला लागलं नाहीये."


मानसी चिडून म्हणाली,

"मानव, तू डोक्यावर पडला आहेस का? इथे येईपर्यंत माझ्या जीवात जीव राहिला नव्हता. तुला कधी एकदा बघते, असं झालं होतं."


बोलताना मानसीच्या डोळयात पाणी आले होते. 


"तुझ्या जीवात जीव का राहिला नव्हता?" मानवने विचारले.


यावर मानसी म्हणाली,

"ते सोड, पहिले मला एक सांग, तू माझ्याशी खोटं का बोललास?"


मानव काय उत्तर देईल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//