सूर जुळले भाग ४

Love Story

सूर जुळले भाग ४


मानवने मानसीला तिने सांगितलेल्या पत्त्यावर सोडवले.


"माझा अंदाज बरोबर होता, मी इथून दहा मिनिटांवर राहतो." मानवने सांगितले.


"अच्छा. कधी गरज पडली, तर कोणीतरी ओळखीचं या एरियात रहायला आहे." मानसी म्हणाली.


"हो. तुम्हाला माझी कधी गरज लागली, तर हक्काने फोन करत जा." मानव म्हणाला.


"पण त्यासाठी आपल्याकडे एकमेकांचे फोन नंबर असणं तितकेच गरजेचे आहे ना." मानसी म्हणाली.


"ते तर माझ्या लक्षातच आलं नाही." मानवने त्याचा फोन नंबर मानसीला दिला व तिचा फोन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केला. 


मानव मानसीला सोडून निघून गेला. मानसी तिच्या रुममध्ये गेली, तर तिची रुममेट तिच्या आधीच आलेली होती.


"इशा, तू कधी आलीस?" मानसीने विचारले.


"अर्धा तास झाला असेल. तू एरवी बसने येतेस, मग आज तुला सोडायला कोण आलं होतं? मी खिडकीतून बघितलं." इशा म्हणाली.


"माझ्या बहिणीचा दिर होता, इकडे जवळच राहतो." मानसी बोलून फ्रेश व्हायला निघून गेली.


एक महिन्यानंतर…


कॉलेज सुटल्यावर इशा मानसीला म्हणाली,

"मानसी, मला भूक लागली आहे. दररोज मेसचं रटाळ जेवण करुन कंटाळा आला आहे. जोगेश्वरीत जाऊन मिसळ खाऊयात ना." 


"इशा, एवढी प्रस्तावना देण्यापेक्षा सरळ सरळ मिसळ खायला जाऊयात एवढं बोलली असती तरी चाललं असतं." मानसी म्हणाली.


इशा व मानसी मिसळ खाण्यासाठी जोगेश्वरी मिसळ मध्ये गेल्या. दरवाजातून आत जात असताना मानसी बसण्यासाठी टेबल शोधत होती, तेवढ्यात इशा म्हणाली,


"मानसी, तिकडे कोपऱ्यात जो टेबल रिकामा आहे ना, त्याच्या शेजारील टेबलवर काळ्या रंगाचा शर्ट घातलेला मुलगा बघ ना, किती हँडसम आहे. आपण तिथेच जाऊन बसूयात ना." 


मानसी त्या टेबलच्या दिशेने निघाली, तिच्या पाठोपाठ इशाही तिथे जाऊन बसली. मानसी व इशा टेबलच्या इथे बसल्यावर काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या मुलाने मानसीकडे बघून स्माईल दिली व तो म्हणाला,

"मानसी, आज मिसळ खाण्याचा मूड झाला की काय?" 


"हो. ही माझी रुममेट इशा, तिला मेसचं जेवण करुन कंटाळा आला होता. तोंडाची चव बदलावी म्हणून मग मिसळ खायला आलो." मानसीने सांगितले.


मानसी व तो मुलगा एकमेकांना ओळखतात, याचं आश्चर्य इशाला वाटले, तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव दिसून येत होते. ते बघून मानसी म्हणाली,

"ह्यांच नाव मानव आहे. मला त्या दिवशी यांनीच रुमवर सोडवलं होतं."


इशाने मानवकडे बघून स्माईल दिली.


मानवच्या सोबत एक स्त्री व एक मुलगी बसलेली होती. 


मानव त्यांच्याकडे बघून म्हणाला,

"आई, ही मानसी. प्रिया वहिनीची चुलत बहीण. मानसी, ही माझी आई व ही माझी बहिण श्रुती." 


मानवने ओळख करुन दिली.


"तू इंजिनिअरिंगला आहेस का?" मानवच्या आईने विचारले.


"हो. शेवटच्या वर्षाला आहे." मानसीने उत्तर दिले.


"मानसी, पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. प्रिया वहिनीसोबत ये. लग्न बंगलोरला आहे." श्रुती म्हणाली.


"मला तुमच्या लग्नाला यायला आवडलं असतं, पण पुढच्या महिन्यात सेमिस्टर एक्साम आहे." मानसीने सांगितले.


"अच्छा. मग काही हरकत नाही. लग्नाची काही शॉपिंग करायची होती, म्हणून पुण्यात आलो होतो. लग्नाच्या आधी गावी जाऊन ग्रामदैवताच्या पाया पडतात ना. दोन्ही काम एकत्रचं झाले." श्रुतीने सांगितले.


"तुम्ही नारायणगावला जाऊन आलात का? सावी कशी आहे?" मानसीने विचारले.


"हो, कालच तिकडून आलो. सावी आजारी होती. आजारी असतानाही तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल होती." श्रुतीने सांगितले.


"सावीची स्माईल खरंच खूप गोड आहे. वातावरण बदलामुळे ती आजारी पडली असेल." मानसी म्हणाली.


"मी उद्या श्रुती आणि आई बंगलोरला गेल्यावर मी नारायणगावला जाण्याचा विचार करतो आहे. परवा सकाळी परत येणार आहे. तुम्हाला जर सावीला भेटायला यायचं असेल, तर येऊ शकता." मानव म्हणाला.


"एक असाईनमेंट बाकी आहे. आज ती पूर्ण झाली तर येईल. तसं मी फोन करुन सांगते." मानसीने सांगितले.


मिसळ खाऊन झाल्यावर मानसी व इशा तेथून निघून गेल्या.


बाहेर पडल्यावर इशा मानसीला म्हणाली,

"मानसी, तू मानवला ओळखते, ते पहिले सांगितलं का नाही?" 


"अरे ठीक आहे ना. तू काळ्या शर्ट मधील हँडसम मुलगा म्हटल्यावर मी त्याच्याकडे बघितलं." मानसी म्हणाली.


"तुझं आणि मानवचं लग्न होऊ शकेल ना?" इशाने विचारले.


मानसी तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली,

"आता हे काय मध्येच? आम्ही दोघे नातेवाईक आहोत म्हटल्यावर आमचं लग्न होईल, असं कसं म्हणता येईल. तुझ्या डोक्यात तर काही येत असतं."


क्रमशः


©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all