
" प्रीती माझा आल्याचा चहा बनवला का गं?"
" अरे प्रसाद, मी मॉर्निंग वॉकला गेले होते. तू बनवतोस का आजपासून तुझा चहा?"
"आज काय अचानक एकदम मॉर्निंग वॉक वगैरे?"
" अरे असंच! तूच म्हणतोस ना,तुझे वजन खूप वाढले आहे,मॉर्निंग वॉकला जात जा."
" बर झालं! सुरूवात तर झाली तुझी.बनवेल मी माझा चहा रोज."
" सूनबाई अग विशूला आल्याचा आणि मला वेलचीचा चहा बनवतेस का?"
" आई, मी आजपासून सर्वांसाठी एकच चहा आणि एकच नाष्टा बनवणार आहे.चहामध्ये चहा मसाला टाकला की आल्याचा आणि वेलचीचा दोन्हीही फ्लेवर आपोआप येतील. माफ करा मला काही प्रत्येकाचे वैविध्य जपता येणार नाही. मला लवकर कामे आटोपून हॉबी क्लास जॉईन करायचा आहे."
" हे काय खुळ भरलय तुझ्या डोक्यात? घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी तुलाच माहीत आहेत. त्या जपल्या गेल्या नाहीत तर उगाच वादावादी होऊ शकते.प्रत्येकाला घरातील गृहिणीने सांभाळून घ्यायचे असते, हे तुला नव्याने शिकवावे लागेल का आता? आधीच वांझोटीचे ओझे आहे तुझ्या नशिबात! मग हा तोरा कशासाठी दाखवतेस?"
" कसे आहे ना आई, हे दुःख मी आजवर खूप सहन केलं.तुमच्या मैत्रिणींनी,आपल्या नातेवाईकांनी आजपर्यंत या गोष्टीवरून मला खूप उणेदुणे बोलणे केले.प्रसाद सोडून मला कधीही कोणी मानसिक आधार दिला नाही.तुम्ही मला आधार दिला बऱ्याचदा पण तो बोलूनही दाखवला. "
" वहिनी आज काय झालंय ? आईशी तुम्ही अशा काय बोलताय?"
" विशू ,तू यापासून जरा लांबच रहा.आजपर्यंत मी माझ्या दुःखाला कुरवाळत खूप रडले,पडले.माझी कहाणी म्हणजे बऱ्याच लोकांचा चर्चेचा विषय ठरला.मला वांझोटेपणाचा शाप आहे,तसाच काही बायकांना विधवा असण्याचा,अपंग मुल असल्याचा,नवरा नीट नसल्याचा,तरुण मुलं व्यसनाधीन असण्याचा शाप आहे.पण मला अशा बायकांना माझ्या जीवनशैलीतील बदल दाखवून,आपण स्वतःच स्वतःचा आधार बनू शकतो हे दाखवून द्यायचे आहे.आता हा बदल कसा ? तर मला ज्या गोष्टींतून आनंद मिळतो त्या मी करणार म्हणजे करणारच.मी आता माझी आणि माझ्या आनंदाची काळजी घेणार.नशिबाने पुढ्यात जे मांडून ठेवले आहे,ते स्वीकारून पुढे चालण्यात मला शहाणपण वाटते आहे."
" हो प्रीती,तू अगदी बरोबर बोलते आहेस.मला पण असच वाटतं की प्रत्येक महिलेने किंवा वैफल्यग्रस्त माणसाने असा सकारात्मक विचार करावा.आनंदाचं इंद्रधनुष्य स्वतःच तयार करावं,कुठल्याही ऊनपावसाची वाट बघू नये आणि स्वतःचा आधार स्वतःच बनावं."
" प्रसाद,तू माझ्या बरोबर या माझ्या निर्णयात सहभागी आहेस,हे बघून मला खूप आनंद होतोय.पण तरीही माफ करा तुम्ही सर्व जण मला.मी माझ्या आनंदासाठी टोकाची भूमिका कधीही घेणार नाही.घरातील कामे ,जबाबदाऱ्या सांभाळून,प्रत्येकाच्या आवडीनिवडी माझ्याप्रमाणे जपून मी माझा आनंदाचा मार्ग शोधणार आहे;कारण माझ्या आनंदाचा, समाधानाचा आधार प्रसादने सांगितल्याप्रमाणे मला स्वतःच व्हायचे आहे."
" सूनबाई पटला ग बाई तुझा विचार मला. पण तू नक्की काय करायचे ठरवले आहेस?"
" आई मी आता माझा छंद जोपासणार आहे. तोच तोपणा न ठेवता माझ्या प्रत्येक कृतीत नावीन्य आणणार आहे.कधी भाजी तुमच्या तर कधी माझ्या पद्धतीने करणार आहे.कधी वाटले चालत जावे तर कधी सायकल वरही जाणार आहे.ज्या गोष्टी येत नाहीत त्या करून पाहणार आहे. तुम्हाला हे सर्व चालणार आहे ना आई?"
" हो .मला पटले प्रीती तुझे.आजवर खूप सोसलंस तू पोरी.पण तू आता स्वतःसाठी जग.मला तू तुझ्या आनंदासाठी, आधारासाठी काहीही केलेलं चालणार आहे.लोक काय म्हणतील असा विचार तू अजिबात करू नकोस.तुझ्या आनंदाला, समाधानाला तू तुझा आधार बनवले हे बघून मला खूप भरून आलय.आजपर्यंत तुला जे मी उणेदुणे बोलणे केले, त्यासाठी मला माफ करशील ना?"
"अहो आई ,मला तुमचा पाठिंबा हवाय या सगळ्यात.मी तुमच्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे कधी माझे चुकले तर बोलाही मला तुम्ही ,अगदी हक्काने! तुम्हाला माफ करणारी मी कोणी एवढी मोठी व्यक्ती नाहीये!"
" माझा पाठिंबा तुझ्यासोबत नेहमी असेल."
"खूप खूप धन्यवाद आई.अशाच माझ्या पाठीशी रहा नेहमी! "
" वहिनी मी सुद्धा तू जसा चहा बनवशील तसा घेईल.मलाही तू आनंदी हवी आहेस."
" थँक्यू विशू."
" अरे मी पण आहे बर माझ्या प्रीतीसोबत! मला विसरले की काय सगळे?"
प्रसादने असे विचारताच घरात एकच हशा पिकला.घरातील वातावरण प्रितीच्या स्पष्ट बोलण्याने हलके फुलके झाले.आता प्रिती आधीपेक्षा अधिक आनंदी तसेच समाधानी राहू लागली.
वाचकहो,आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे काही ना काही विवंचनेमुळे त्यांच्या आयुष्यात उदास आहेत; म्हणून नैराश्याचे आणि आत्महत्येचे बळी ठरत आहेत. आहे ती परिस्थिती स्वीकारून स्वतःच्या आनंदाला आपला आधार बनवला तर आपले दुःख पचवून, नव्याने आयुष्याचा अर्थ समजून घेऊन जगता आले तर खूप मजा येईल,हेच प्रीतीने आज घरच्यांना पटवून दिले.त्यामुळे त्यांनीही तिच्या या निर्णयाचे स्वागत केले.शेवटी आपली माणसे आपले सुख ,समाधान यात नेहमी आपल्या सोबतच असतात. फक्त गरज असते ती मोकळ्या संवादाची! मग चला तर ,स्वतःला आणि आपल्या आनंदाला आपला आधार बनवूया आणि नशिबी असलेल्या दुःखाला पचवून जगण्याचा निखळ आनंद लुटू या.
©® सौ.प्रियंका शिंदे बोरुडे