2.jpeg)
नुकताच 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता' दिवस साजरा झाला... खरं सांगा... तुमच्यापैकी कितीजणांना माहित होतं... बरं... ठीक आहे.. जागतिक दिवस जरा बाजुला ठेवू आपण.. या मासिक दिवसांबद्दल तुम्हाला किती माहित आहे.. किती जण व्यक्त होतात... मोकळेपणाने.. अंधश्रद्धे पलीकडे सुद्धा याचं काही महत्व आहे हे किती जण दुसऱ्यांना पटवून देऊ शकतात??? आईला चालत नाही... सासूला चालत नाही... हा विटाळ... तो विटाळ.... 'आमच्याकडे पाळतात बाई अजूनही' असं कौतुकाने सांगणाऱ्या महिला सुद्धा कमी नाहीयेत.. आजही किती तरी जणींना या त्रासातून जावं लागतं... या दिवसांत होणाऱ्या शारीरिक त्रासापेक्षा... मानसिक त्रासच जास्त होतो..
म्हणून हा किस्सा....
तर किस्सा सांगण्याआधी थोडंसं बॅकग्राऊंड... नवी मुंबईच्या सिडको चाळीत आमचं १०*१० चं घर.. आणि या घरात आम्ही ६ जण... आई बाबा आणि आम्ही ४ बहिणी.... २००२ सालापर्यंत आम्हा सगळ्या बहिणींची पाळी सुरु झाली होती... म्हणजे घरात एकूण ५ जणी... त्यामुळं महिन्यातले ३ आठवडे आमच्याकडे... ही.. ४ दिवसांची माहेरवाशीण मनमुराद बागडायची.. 'आता तुझी पाळी.. मीच देते टाळी' म्हणत घरभर नाचायची...... '
शिवताशिवत', 'कावळा शिवणं', 'बाहेरची असणं' अशी गोंडस नावं आम्हाला ऐकायला मिळायची... आमच्या आजूबाजूला बऱ्याच बायका पाळायच्या हे सगळं... देवाला चालणार नाही... कोप होईल... वगैरे वगैरे... आमच्याकडे आईनं कधी बाजूला बसवलं नाही की ती स्वतः बसली नाही... कधी विटाळ ही पाळलं नाही... आणि तिनं पाळायचं ठरवलं असतं तरी एवढ्याश्या घरात... ते ही अशी आमची लाईन लागलेली असताना कसं शक्य होतं... हो पण लहानपासून ती ऐकत आली होती देवाला शिवायचं नाही.. देवीचं अंगात येणं... वगैरे... त्यामुळं देवाला स्वतःहून हात लावायचा नाही एवढं एकच ती सांगायची...
माझी सक्खी आत्या आमच्या पासून जवळच राहायला होती... ५ मिनिटाचं अंतर दोन्ही घरात... तिच्याकडे मात्र या गोष्टी खुप काटेकोर पाळल्या जायच्या... कारण.... मामांच्या (आत्याबाईंचे अहो) अंगात देवी यायची.... विटाळाचं जेवलं की... मग ते आमच्याकडे असायचे जेवायला ते ४ दिवस....
तर आता आपला किस्सा... साल 2003... माझ्या फर्स्ट इयर ची फायनल एक्साम चालू होती... मी माझा अभ्यास करत बसले होते... सकाळीच '४ दिवसांची पाहुणी' मला भेटायला आली होती आणि नेहमीप्रमाणे आल्या आल्या तिनं नुसता धुडगूस घातला होता... ओटीपोट... पोटरी... यांना पार बेजार करुन सोडलं होतं... बसल्या जागेवरून उठलं की भसकन खालच्या दाराने बाहेर यायची.... नको नको करुन सोडलं होतं... खुप अभ्यास राहिला होता आणि हिचा गोंधळ सुरूच होता..
आत्यानी सकाळीच निरोप पाठवला होता तिच्या छोटया मुलाकडून... मामा आजपासून आमच्याकडे असतील जेवायला.... ४ दिवस.... त्यात त्या महिन्यात लाईट बिल खूपच लेट आले होते... अगदी लास्ट पेमेंट डे ला बिल टाकून गेले होते सकाळी सकाळी.. त्यामुळं आई ची खूपच धांदल उडाली होती.... सगळं आवरून घाई घाईत गेली बिल भरायला.... तेव्हा कुठे हे ऑनलाईन.. मोबाईल... लाईन मध्ये तासंतास उभं राहून बिल भरावं लागायचं... जाताना मला सांगुन गेली "मामा आले तर त्यांना थांबून ठेव... नाहीतर हाताने वाढून घ्याला सांग... मी आलेच बिल भरून"... मी माझ्या या सगळ्या गोंधळात... आईनं सांगितलेलं माझ्या डोक्यात कितपत गेलं काय माहित..
मामा माथाडी कामगार होते... दुपारी घरी यायचे जेवायला... माझी अगदी मन लावून घोकंपट्टी चालू होती तेवढ्यात मामा आले... आल्याआल्या 'आई कुठाय' म्हणून विचारलं.. ती बिल भरायला गेल्याचं त्यांना सांगितलं... तसं ते म्हणाले "चल वाढ पटकन लई भूक लागलीये".... उठून त्यांना जेवायला वाढलं... आईनं सांगितलेलं डोक्यातून साफ उतरलं होतं... मस्तपैकी पोटभर जेवून मामा गेले... मी सगळं आवरून पुन्हा अभ्यासाला लागले..
मामा गेल्यानंतर अर्ध्या एक तासात आई आली... बिचारी मामा आले असतील या भीतीने धावत पळत आली होती.... त्यात मुंबईची गर्मी... घामाने अक्षरशः भिजली होती बिचारी... दारातूनच तिने "मामा आले नाही का अजून" विचारलं... मी बोलून गेले "आले होते... जेवून पण गेले...."
आई अशी भडकली.... "अगं काय अक्कल हाये का नाय.... तुला सांगुन गेले होते ना... तू नको वाढू त्यांना... ". एकतर माझी आधीच वाट लागली होती त्यात आईचा ओरडा.. मी म्हटलं "मग काय झालं? मी वाढलं तर.."... आई "कप्पाळ माझं" म्हणत दारातूनच आत्याच्या घरी पळाली... पाणी सुद्धा न पिता... बिचारीला टेन्शन आलं होतं... अंगाबिंगात आलं तर केवढ्याला पडायचं...
धापा टाकत आई आत्याकडे पोचली.. तर मामासाहेब मस्त डाराडूर झोपले होते.... त्यांची देवी काय त्यांना भेटायला आली नव्हती... आईचा जीव तेवढ्यापुरता भांड्यात पडला पण टेन्शन कमी झालं नव्हतं... मामा रात्री सुद्धा आमच्याकडे जेवले... तेव्हाही ते ओके होते... दुसऱ्या दिवशी ही त्यांना काही झाले नाही... आईला काय सुचलं माहित नाही पण त्या दिवशी आईने मला रात्री मामांना वाढायला सांगितलं.. मामा जेवून गेले... मजेत... काहीच झालं नाही... पुढचे 2 दिवस मीच त्यांना रात्रीचं जेवण द्यायची... पण त्यांची देवी काही भेटली नाही की दिसली नाही...
कशी येइल.... तिला कुठं माहित होतं मला शिवायचं नाही ते... सगळा मनाचा खेळ... माहित असतं तर आतापर्यंत देवी नं येऊन हू.. हू.... हू... करायला सुरवात केली असती... पण माहित नव्हतं तर काहीच झालं नाही... देवी काय भक्ताला भेटायला आली नाही.... त्यांच्यातल्या देवीनं आम्हाला काय दर्शन दिलं नाही... पुण्य कमी पडलं वाटतं आमचं !!!!
*******
या निमित्तानं काही महत्वाचे प्रश्न... ज्यांची उत्तरं वाचकांकडून मिळतील अशी अपेक्षा करते..
१. सिद्धिविनायक/ किंवा इतर कोणत्याही प्रसिद्ध मंदिरात जाताना बाहेर बऱ्याच महिला फुलं नारळ विकत बसलेल्या दिसतात... त्यांच्यापैकी किती जणी 'त्या दिवसांत' आपला व्यवसाय बंद ठेवतात? विचारलंय कधी? ४ दिवस काम बंद करुन घरी बसणं परवडेल त्यांना?
२. 'आई' होणं हे देवानं दिलेलं वरदान आहे... आणि 'आई' होण्यासाठी पाळी गरजेची आहे.. थोडक्यात 'पाळी' हे देवाचंच तर वरदान आहे... मग जे वरदान त्यानं स्वतः दिलंय त्या दिवसांत तो आपल्याला त्याच्यापासून दूर कसं ठेवेल... त्या दिवसांत आपल्या स्पर्शाने तो कसा विटाळेल...
३. ज्या लोकांना विटाळ चालत नाही त्यांना विटाळानं झालेलं बाळ त्यांच्या घराचा कुलदीपक/पणती म्हणून चालतं..
४. काही लोकांचा विटाळ सोयीनुसार असतो... काहींना लेकीचा विटाळ चालतो... सुनेचा नाही.. तर काहींना स्वतःला कामाचा त्रास व्हायला लागला की... तिनं डोक्यावरून अंघोळ करुन कामं केलेली चालतात... तुमच्याही आजूबाजूला असतीलच असे नमुने..
५. घरातली बाई...एखाद्या मोठ्या पूजेच्या वेळी.. पाळी येऊ नये म्हणून गोळ्या घेऊन पाळी लांबवते... आणि एवढं करूनही पाळी आलीच तर तिला बाजुला बसवलं जातं.. पण तुम्ही बाजारात जाऊन एवढ्या गर्दीतून जे पूजेचं सामान आणता.. तेव्हा त्या गर्दीत कितीतरी बायका 'त्या' दिवसांत असतात.. मग ते सामान तुमच्या पूजेला कसं चालतं?
६.बाईच्या पाळीचा विटाळ गोमुत्राने कसा जातो.? (गोमूत्राचे औषधी गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे... पण विटाळ आणि गोमूत्र यांचा संबंध काय? )
७. पाळीत वापरलेल्या पॅड वर साप गेला तर बाईला मुल होत नाही म्हणे.... असं असेल तर सापाला एक ऍडव्हान्स पॅथॉलॉजि लॅब च म्हणावं लागेल... जो पॅड वर असलेलं रक्त कुणाचं आहे हे ओळखून बरोबर तिलाच शाप देतो....