नवी पहाट...भाग २९

"थांब काही दिवस शांत रहा. नंदिनी सोबत जे झाले त्यामुळे स्वरा च्या मनावर देखील त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे इतक्यात तिला काही बोललो तर ती चिडेल. काही काळ जाऊदे मग बोलू." दीपकराव बोलले.


मागील भागात आपण बघितले …


" आई बाबा, तुम्ही माझ्या भल्यासाठी प्रयत्न करत आहात. पण असेल लोक असतील तर मला लग्नच करायचे नाही. नालायक माणूस माझ्याच घरात येऊन मलाच एका रात्री साठी… शी. त्याची हिम्मत कशी झाली असं बोलण्याची? समजतो कोण तो मला? बाबा खरंच नका शोधू कोणी माझ्यासाठी." असे बोलून नंदिनी आत निघून गेली.


नीरजा आणि दीपकराव मात्र एकमेकंकडे बघेत होते. त्यांनी देखील नंतर नंदिनीच्या लग्नाचा विषय काढला नाही.


आता पुढे…


नंदिनी च्या मनाची अवस्था खूप खराब होती पण तरी त्यातून तिने स्वतः ला सावरले.


त्यादिवशी नंदिनीने सगळं सांगितल्यावर दीपकरावांनी सुबोधच्या घरच्यांना चांगलेच सुनावले.

"प्रकार आम्हाला कळायच्या आत सुबोध घरातून निघून गेला नाहीतर जोड्यानी मार खाल्ला असता त्याने. आधी मुलावर चांगले संस्कार करा आणि मग लग्नाचा विचार करा त्याच्या." असे बरेच काही दीपक रावांनी ऐकवले.


दीपक रावांचे बोलणें सुरू असताना समर तिथे आला आणि त्यांच्या बोलण्यातून घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आलं तसा तो धावत बाहेर गेला. कारण तो घरी यायच्या आधीच सुबोध त्याला समोरच्या नाक्यावरच्या सिग्नलवर दिसला होता. त्याने गाडी काढली सुबोध गेला त्या दिशेने गेला पण तितक्या वेळात तो निघून गेला होता. समर रागा रागात घरी आला. तोपर्यंत दीपक रावांचा फोन झाला होता.


"नंदिनी बाहेर ये." समर दारातूनच नंदिनी ला आवाज देत होता.


नंदिनी त्याच्या आवाजाने बाहेर आली.


"तू लगेच का नाही सांगितलं? त्याला दोन पायांवर घरी जाऊ दिला नसता मी." समर हाताच्या मुठी आवळत बोलला.


"दादा लगेच सांगितलं. पण तो मी सांगायच्या आत निघून गेला. तू शांत हो. बघ मी पण शांत झाले आहे. अशा निर्लज्ज माणसांसाठी आपण आपलं रक्त का जाळायचे? असे लोकं येत राहतील वेगवेगळ्या प्रवृत्तीचे कोणा कोणाला मारणार आपण?" नंदिनी बोलली.


"नंदिनी उगाच मला समजावू नकोस. फक्त एक सांगतो, मी त्याला शोधायला जाणार नाही, पण परत समोर आला ना तो तर तो त्याच्या घरी नाही हॉस्पिटल मध्ये जाईल ह्याची काळजी मी घेईल." समर एक भुवई उंचावून बोलला.


"नंदिनी बाळा आम्हाला माफ कर. आमच्यामुळे तुला आज हे असं काही ऐकावं लागलं." दीपक राव बोलले.


"बाबा ह्यात तुमची काय चूक. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. पण आता परत लग्नाचा विषय नको मला. मी एकटी सुखी आहे." नंदिनी बोलली.


"ठिक आहे. परत नाही करणार लग्नाचा विषय. तुला त्रास नाही देणार आम्ही." दीपक राव बोलले.


जे काही झाले होते त्या नंतर त्यांच्यात देखील नवीन काही ऐकायची किंवा बघायची हिम्मत राहिली नव्हती.


पण आता दीपक राव आणि नीरजा समोर अजून एक प्रश्न होता तो म्हणजे नंदिनी सारखेच स्वरा ने देखील लग्नं न करण्याचा निर्णय घेतला होता.


"काय ही आता कसं करायचं?" नीरजा बोलली.


"थांब काही दिवस शांत रहा. नंदिनी सोबत जे झाले त्यामुळे स्वरा च्या मनावर देखील त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे इतक्यात तिला काही बोललो तर ती चिडेल. काही काळ जाऊदे मग बोलू." दीपक राव बोलले.


दरम्यान एक वर्ष भर घरात नंदिनी किंवा स्वराच्या लग्नाचा विषय कोणीच केला नाही.

एक दिवस..

"आई बाबा आपल्याला स्वरा साठी मुलगा बघावा लागेल." नंदिनी ने स्वतः हून विषय केला.

"हो. पण ती लग्नं करायचे नाही म्हणून असून बसली आहे." नीरजा


"आई जे काही घडलं तिने डोळ्यांनी बघितले आहे त्यामुळे ती अशी रिॲक्ट करणं स्वाभाविक आहे." नंदिनी


"पण आता तिला तयार कसे करायचे?" नीरजा


त्यांचे बोलणे स्वराच्या कानी पडले आणि तिची नकारघंटा सुरू झाली. पण नीरजा, दीपक राव, नंदिनीने मिळून तिला मुलं बघण्यासाठी तयार केले.

"ताईच्या आधी मी लग्नं करणार नाही." म्हणून ती देखील असून पडली.
शेवटी नंदिनी ने खूप समजावून स्वराला तयार केले. पस्तीस मुलांना नकार दिल्यावर एक वर्षानी शेवटी छत्तीसाव्या मुलाला नकार देण्याचे काही कारण सापडले नाही. त्यामुळे त्याला होकार दिला आणि स्वराच्या लग्नाचा बार उडाला.


आपण आगीत उडी घेत आहोत ह्याच विचाराने स्वराने लग्न केले पण तिच्या नशिबाने मुलगा खूप चांगला मिळाला. त्याने हळूहळू तिला समजून घेत तिच्या मनात जागा मिळवली. कारण तिची मनस्थिती काय असेल ह्याची जाणीव त्याला होती. तो तिला खूप जपत होता. लग्नानंतर सहा महिन्याने स्वरा घरी आली तेव्हा तिला असे सुखात बघून नंदिनी देखील खुश झाली. स्वराला आणि तिच्या नवऱ्यालाला म्हणजे राजला बघून नंदिनी समाधानी होती.


"ताई आता तू देखील लग्नं कर." स्वरा.

"हो ताई. अशी एकटी किती दिवस राहणार? आम्हाला पण बरं वाटेल तू लग्न केलस तर." राज नंदिनी ला सख्या बहिणी प्रमाणे मनात असे सोबत तो तिचा मित्र देखील बनला होता.
बोलण्यात एकदम हुशार असलेल्या राज ने नंदिनी ला लग्नासाठी तयार केले. नीरजा आणि दीपक रावांनी राज चे आभार मानले.
माणसांवरून विश्वास उडालेल्या स्वरा आणि नंदिनीला पुन्हा नव्याने उभारी देण्याचे काम राज ने केले. स्वराच्या आयुष्यात नवी पहाट आणि नंदिनी च्या आयुष्यात नव्या पहाटेची स्वप्नं रुजविण्याचे काम राज ने केले. त्याच्या येण्याने नीरजा आणि दीपक राव निश्चिंत झाले. त्यांना जणू दुसरा मुलगा मिळाला होता. नंदिनीला भावासारखा मित्र, समरला भाऊ, आणि स्वरा ला प्रेम मिळाले होते.


क्रमशः
© वर्षाराज

प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.


🎭 Series Post

View all