नवी पहाट... भाग २५

दुसऱ्या दिवशी दीपकराव त्यांच्या वकिलांना भेटले. नंदिनी सोबत झालेली घटना सांगितली. येणाऱ्या तारखेला कोर्टात नंदिनीच्या वकिलांनी खणखणीत आवाजात नंदिनीवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. परिणामी कोर्टाने नियमा नुसार तलाकला मान्यता दिली आणि सहा महिन्यांच्या अवधी नंतर रीतसर तलाक पूर्णपणे मान्य होणार होता.


नवी पहाट… भाग२५


मागील भागात आपण बघितले ..


"खरं तर चूक माझीच झाली मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि कोणताही विचार न करता तुला त्रास दिला. कोणत्या शब्दात मी तुझी माफी मागू? मला कळत नाहीये. पण एक नक्की सांगेल की अशा लोकांकडे परत जाऊ नकोस. तू एक चांगली मुलगी आहेस आणि इथून पुढे तुला कसली ही मदत लागली तर मला सांग मी शक्य तितकी मदत नक्की करेल तुला." मॅडम बोलल्या.


आता पुढे…


"पण त्यांनी सांगितलं काय हे तरी सांगा आम्हाला?" नीरजा बोलली.


"जे तुम्ही सांगितले त्याच्या अगदी विरुद्ध. म्हणजे नंदिनी त्याला त्रास देते, त्याच्या आईला सून वास करते, नीट जेवायला देत नाही. स्वयंपाक करत नाही. असं बरंच काही सांगितले. ते पण इतकं रडून की, मला खरंच वाटले आणि तिथेच मी फसले. कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता तुला त्रास दिला. पण हळू हळू समजले की, तू तशी नाहीस आणि म्हणूनच तुम्हाला इथे बोलावून तुम्हा दोघींची माफी मागायची असे ठरवले. माफ करा मला." मॅडम हात जोडून बोलल्या.


"नाही मॅडम, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही आमच्या नंदिनीच्या गुरू आहात आणि गुरूने विद्यार्थ्याची माफी मागणे योग्य नाही." नीरजा बोलली.


"हो मॅडम माझी माफी मागू नका. उलट मीच तुमचे आभार मानते. तुम्ही माझी सत्याशी ओळख करून दिली. तुम्ही जर हे सगळं मला नसतं सांगितलं तर, कदाचित माझ्या मनात एक किंतू परंतु होता तो कायम राहिला असता. पण आता माझ्या मनात कोणताही परंतु नाही. मी घेतलेला निर्णय योग्यच आहे ह्यावर मी आता ठाम आहे. त्या घरात माझं भविष्य नाही ह्याची मला खात्री पटली आहे. तुमचे अजून एका गोष्टी बद्दल आभार, तुम्ही अनाहुतपणे माझ्याशी जे वागलात त्याचा नक्कीच माझ्या मनावर परिणाम झाला. पण आज ह्या क्षणी त्या घटनांचा विचार केला तर असं लक्षात आले की, तुम्ही त्रास तिला पण येणाऱ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग माझ्या समोर उभे राहणार आहेत ज्यांना मला सामोरे जायचे आहे. प्रत्येक वेळी मी आई बाबांचे बोट धरून नाही ना जाऊ शकत. निश्चितच त्यांची आणि घरातल्या सगळ्यांची साथ मला आहे पण माझी लढाई मलाच लढवी लागणार आहे. त्यामुळे मी खंबीर राहणे गरजेचे आहे. तुम्ही मला आयुष्याचे शहाणपण दिले.

माझे आई बाबा मला लहानपणा पासून हेच समजावत होते पण मीच समजले नाही. आता मात्र चांगलीच अद्दल घडली मला. त्यामुळे तुमचे खूप आभार. आता येणाऱ्या आयुष्यात मी कधीच कमकुवत पडणार नाही. आज पासून मी हा निर्धार करते." नंदिनी बोलत होती तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता.


थोड्यावेळाने नंदिनी आणि नीरजा घरी जायला नघल्या. पाठमोऱ्या नंदिनीला बघून मॅडम समाधानी होत्या. तिच्यात एक नवीन उमेद निर्माण झाली होती. \" मी परत अशी चूक करणार नाही." असे त्यांनी मनातच स्वतः ला सांगितले.


नंदिनी नीरजा घरी आल्या, झालेला सगळा प्रकार संध्याकाळी त्यानी घरी सांगितला.


"हिम्मत तर बघा बाबा त्या लोकांची. कसे असे वागू शकतात लोक?" समर बोलला.


"जे होतं ते चांगल्या साठीच होतं. त्यामुळे आता हिम्मत हरयची नाही. त्या लोकांची पातळी आपल्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर ह्यातून मोकळं व्हायचे आहे." दीपकराव बोलले.


दुसऱ्या दिवशी दीपकराव त्यांच्या वकिलांना भेटले. नंदिनी सोबत झालेली घटना सांगितली. येणाऱ्या तारखेला कोर्टात नंदिनीच्या वकिलांनी खणखणीत आवाजात नंदिनीवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. परिणामी कोर्टाने नियमा नुसार तलाकला मान्यता दिली आणि सहा महिन्यांच्या अवधी नंतर रीतसर तलाक पूर्णपणे मान्य होणार होता.


ह्या सहा महिन्यात नंदिनीला एका बी.एड कॉलेज मध्ये नोकरी लागली. सोबतच दुसऱ्या एका कॉलेज मध्ये ती अधून मधून गेस्ट लेक्चरर म्हणून सुद्धा जात होती. मुलांना रोज काय नवीन पद्धत वापरून शिकवता येईल ह्याच विचारात ती असे. आजचे तिचे विद्यार्थी भावी शिक्षक होते, त्यामुळे त्यांना उत्तमरित्या घडवण्याचा तिचा प्रयत्न असे.

तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि शिकवण्याच्या पद्धती मुळे ती विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका होती. प्रेमळ असली तरी अभ्यासाच्या बाबतीत हलगर्जी पणा ती अजिबात खपवून घेत नसे.

तिच्यात कमालीचा आत्मविश्वस निर्माण झाला होता. कोणासोबत काय आणि कसे बोलावे ह्याची कला तिला आता चांगलीच अवगत झाली होती. आरे ला कारे ने उत्तर द्यायला तिला आता जमत होते. तरी तिने तिचा चांगुल पणा सोडला नव्हता. लोक ओळखायला ती शिकत होती.


तिची नोकरी ती अगदी मन लावून आणि प्रामाणिकपणे करत होती. विशेष म्हणजे तिला त्यात आनंद मिळत होता. त्यामुळे ती अजूनच खुश होती. बघता बघता सहा महिने संपले आणि कोर्टाची तारीख उजाडली. आजचा दिवस अंतिम निर्णयाचा होता.


नंदिनी, नीरजा दीपकराव आणि समर दिलेल्या वेळेत कोर्टात पोहोचले. दोन्ही पक्षांचे वकील पण हजर झाले. नीरज, निता, नलिनराव सुद्धा हजर होते. न्यायधिश साहेबांनी दोन्ही पक्षांना परत एकदा विचारले की, \"तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात का?\" दोघं कडून होकार आला आणि न्यायधिश साहेबांनी निकाल जाहीर केला. आता तलाकवर शिक्का मुर्तब झाला होता. नंदिनी सह तिच्या घरच्यांनी सुटकेचा श्वास घेतला.


थोड्यावेळात नंदिनी आणि तिच्या घरचे कोर्टाच्या अवराच्या बाहेर निघाले. समोरच नीरज उभा होता. तो तिच्याशी बोलण्यासाठी आला. त्याला बघून नंदिनीच्या तळ पायाची आग मस्तकात गेली. माणसाने किती निर्लज्ज असावं ह्याची सीमा त्याला नव्हती. इतकं सगळं होऊन परत तो तिच्याशी बोलण्याची हिम्मत करत होता.


नीरज अगदी नंदिनी समोर येऊन उभा राहिला. समरने त्याला करड्या आवाजात जायला सांगितले पण तो हलाल नाही.


"मला माफ कर." इतकचं तो नंदिनीला बोलला.


त्याच्या बोलण्यावर नंदिनी अजूनच भडकली. तिने आजूबाजूचा कोणाचाही विचार न करता नीरजच्या कानाखाली एक सणसणीत जाळ काढला. जितक्या जोरात तिला शक्य होते तितक्या जोरात संपूर्ण ताकदीनिशी तिने निरजच्या कानाखाली वाजवली. आजूबाजूला चालेल गोंधळ एकदम शांत झाला. सगळे नंदिनीकडे बघत होते. नीरज खाली मान घालून उभा होता. निता आणि नलिन दुरूनच सगळा प्रकार बघत होते.


"जा केलं आता तुला माफ." असे म्हणून नंदिनी त्याला एका हाताने धक्का देऊन पुढे निघून गेली.

नीरजा, दीपकराव, समर एक क्षण एकमेकांकडे बघत राहिले. तिच्या मनात त्याच्या बद्दल किती राग होता हे तिच्या कृतीतून त्यांनाच नव्हे तर त्या वेळी तिथे उपस्थित सगळ्यांनाच समजले होते. नंदिनीने केलेल्या कृत्यामुळे मनोमन नंदिनीच्या घरचे खुश झाले.


घरी परत येताना त्यानी पेढ्याचा बॉक्स घेतला. साडेचार वर्षांच्या संघर्षा नंतर, लढ्या नंतर आज त्यांचा विजय झाला होता.

समर ने घरी आल्यावर वृंदा आणि स्वराला घडलेला प्रकार सांगितला. त्या देखील खुश झाल्या.


"नंदिनी आम्ही तिथे काही बोललो नाही. पण आता तरी सांग की तू त्याचा कान का शेकलास?" नीरजा तो प्रसंग आठवून गालात हसत विचारत होती.


"आई किती तो निर्लज्ज. आता सॉरी म्हणतो मला. आधीच नीट वागला असता तर ही वेळ आली नसती माझ्यावर. आयुष्यातील साडेचार वर्ष घालवली त्या माणसाने माझी. तेव्हा काहीच वाटलं नाही त्याला आणि आता आला सॉरी म्हणायला. ती वर्ष तो कधीच परत करू शकणार नाही. त्याच्या सॉरी ने ती साडेचार वर्ष परत येणार नाहीत. आज जर त्याच्या कानाखाली जाळ नसता काढला मी, तर मला आयुष्यभर खंत राहिली असती की, मी त्याला असच जाऊ दिले. खरं तर चपलेने मारण्याची इच्छा होती मला पण आजूबाजूचे भान ठेवून फक्त एका कानाखाली वाजवली." नंदिनीच्या डोळ्यात अजून देखील राग होता.


"आज माझी लेक मोकळी झाली." म्हणत दीपक रावांनी नंदिनीच्या डोक्यावर हात फिरवला. त्यांचे डोळे पाणावले होते. नीरजाने पटकन नंदिनीला मिठी मारली. आज वाहणारे अश्रू आनंदाचे होते.


त्या नंतर सगळ्यांनी तो दिवस साजरा केला. समर मत्रा किती तरी वेळा तो प्रसंग सांगून सांगून हसत होता.


"बरं केलं नंदिनी तूच मारलं त्याला नाहीतरी माझ्या हातचा मार त्यानी आज नक्कीच खाल्ला असता." समर बोलला.


"तू नाहीतर ताईच्या हातून का होईना, म्हणजे त्याचा आज मारखायचा दिवस होता हे नक्की." स्वरा हसत बोलली.



तलाक झाला तरी अजून नंदिनीच्या आयुष्यातील संकट संपली नव्हती.

पुढे काय काय झाले हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा. नवी पहाट


क्रमशः
© वर्षाराज



प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.


🎭 Series Post

View all