नवी पहाट...भाग २१

त्यांच्या बोलण्यावर नीता,नलिन मध्यस्थी मामा, नीरज एकमेकांकडे बघत होते. " पण का? आमचं काही चुकलं का?" नलिन साळसूद पणाचे आव आणत होता." तुम्ही आमच्या मुलीला जी वागणूक देता ते सगळं सांगितलं आहे तिने आम्हाला." नीरजा जरा रागातच बोलली." हे बघा भाऊ. असं एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. आपण बोलून मार्ग काढू जर काही अडचण असेल तर." मध्यस्थी मामा." बोलून मार्ग काढायचा नाहीच आहे. मला फक्त जाब विचारायचा आहे तुम्हाला नलिनराव." दीपकराव गरजले." काय ते स्पष्ट विचारा." मध्यस्थी मामा" तुम्हाला आम्ही लग्नं ठरवताना सांगितले होते की, हुंडा द्यायच्या आम्ही विरोधात आहोत. तुम्ही सुद्धा हुंडा नको म्हणून लग्नाला तयार झालात. बरोबर ना? बापू, केदार आणि शिरीष सुद्धा होते त्यावेळी." दीपकराव


नवी पहाट भाग २१


मागील भागात आपण बघितले…

" नाही बाबा, असं काही नाही. तुम्हाला त्रास नको स्वराच्या भविष्या साठी. हे केलं मी. त्या लोकांच्या हातून मरण्या पेक्षा इथे माझ्या लोकांमध्ये मरण चांगल. असा विचार केला. पण आता मला माझी चूक कळली आहे.मी परत असं कधीच करणार नाही. मी वचन देते सगळ्यांना." नंदिनी सगळ्यांना वचन देत बोलली.


आता पुढे ..


दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीच्या सासरचे आणि मध्यस्थी मामा, दीपकरावांच्या घरी गेले. दीपकरावांनी निर्विकार चेहऱ्याने त्यांना आत घेतले. त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव बघून सगळ्यांच्या लक्षात आले की, काहीतरी झाले आहे.


" नमस्कार बसा." दीपकरावांनी नमस्कार करून सगळ्यांना हातानेच बसण्याचा इशारा केला.


नीता, नलिन, नीरज आणि मध्यस्थीमामा आत आले. तोच आतून केदार काका आणि शीरिष काका बाहेर आले. त्यांना दीपकरावांनी कालच फोन करून बोलावून घेतले होते. आणि ते सुद्धा एका फोनवर मिळेल ती ट्रेन पकडून ऐनवेळी आले होते. सकाळी ते आल्यावर दीपकरावांनी घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. आणि परस्थिती बघता त्यानी देखील नंदिनीला परत न पाठवणेच योग्य राहील हाच सल्ला दिला.
त्यांना बघून नीरज, नलिन आणि नीताला धक्काच बसला. मध्यस्थी मामा पण चकित झाले.

" अरे वाह. नमस्कार, तुम्ही कधी आलात?" मध्यस्थी मामांनी नमस्कार करत केदार आणि शिरीष काकांना विचारले.


" आज सकाळीच आलो. " केदार काका

तोपर्यंत सगळ्यांनी पाणी घेतले. घरी आलेल्यास किमान पाणी तरी द्यावे,मग तो दुश्मन असला तरी, हा दीपकरावांचा नियम होता.

" सहजच येणं केलं का?" काहीतरी गडबड आहे. म्हणून जाणून घेण्यासाठी मध्यस्थी मामा खोलात विचारणा करत होते.


दरम्यान समर देखील बाहेर येऊन बसला. नीरजला बघून त्याच्या तळ पायाची आग मस्तकात जात होती. बाहेर येताच खुर्चीवर बसताना त्याने नीता,नलिन व नीरजकडे एक करडा कटाक्ष टाकला. सगळ्यांच्या वागण्यातला बदल त्यांना जाणवत होता.


" मीच बोलावून घेतले आहे त्यांना." दीपकराव कडक आवाजात बोलत होते.


" काय झालं भाऊ? काही विशेष कारण?" मध्यस्थी मामा.


" हो. विशेष कारण आहे." समर एक भुवई उंच करून बोलला.

एव्हाना वातावरण गंभीर आहे ह्याची जाणीव नीता, नीरज, नलिन आणि मध्यस्थी मामांना झाली होती.


" हे बघा नलिन राव. विषय उगाच फिरवून बोलणं मला आवडत नाही. म्हणून स्पष्टच सांगतो. नंदिनीला आम्ही परत पाठवणार नाही." दीपकराव ठाम पणे म्हणाले.


त्यांच्या बोलण्यावर नीता,नलिन मध्यस्थी मामा, नीरज एकमेकांकडे बघत होते.

" पण का? आमचं काही चुकलं का?" नलिन साळसूद पणाचे आव आणत होता.

" तुम्ही आमच्या मुलीला जी वागणूक देता ते सगळं सांगितलं आहे तिने आम्हाला." नीरजा जरा रागातच बोलली.

" हे बघा भाऊ. असं एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. आपण बोलून मार्ग काढू जर काही अडचण असेल तर." मध्यस्थी मामा.


" बोलून मार्ग काढायचा नाहीच आहे. मला फक्त जाब विचारायचा आहे तुम्हाला नलिनराव." दीपकराव गरजले.

" काय ते स्पष्ट विचारा." मध्यस्थी मामा


" तुम्हाला आम्ही लग्नं ठरवताना सांगितले होते की, हुंडा द्यायच्या आम्ही विरोधात आहोत. तुम्ही सुद्धा हुंडा नको म्हणून लग्नाला तयार झालात. बरोबर ना? बापू, केदार आणि शिरीष सुद्धा होते त्यावेळी." दीपकराव

" हो बरोबर." नलिनने उत्तर दिले.


" मग पैशांसाठी माझ्या मुलीचा छळ का करता? तुम्हाला हुंडा पाहिजे होता तर, आधीच सांगायचे होते. नसते केले आम्ही लग्नं." दीपकराव चांगलेच चिडले होते


" आम्ही छळ करतो? तुमची मुलगी खोटं बोलते. तिलाच रहायचं नसेल आमच्याकडे म्हणून सगळं नाटक आहे हे तिचं." दीपक रावांच्या बोलण्यावर नीता उलट बोलत होती.


" हे बघा आमची नंदिनी खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही." केदार काका

" तुमच्या मुलाचा खरा पगार सुद्धा तुम्ही सांगितला नाही. बरोबर आहे ना हे? तुमच्याच मुलाने खरा पगार सांगितला. विचारा हवं तर तुम्ही नीरजला." दीपकराव रागातच होते.


नीता आणि नलिनने नीरज कडे एक नजर बघितले त्यानी मानेनेच होकार दिला.


" हो मग सांगितलं ना नंतर. लपवून नाही ठेवला." नीलिन

" तेच म्हणतो आहे मी. नंतर का? आधी का नाही सांगितला. आणि बापू तुम्हाला ही माहीत नव्हतं का हे सगळं?" दीपकराव


" मला माहित नव्हते. पण आता जे झालं ते झालं. थोडं फार भांडणं सगळ्याच घरात असतं. तुम्ही नंदिनीला पाठवून द्या." मध्यस्थी मामा


" थोडं फार असतं तर आपण इथे नसतो बसलो भाऊ." शिरीष काका


" नंदिनीने काल आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे प्रकरण साधं नक्कीच नाहिये." केदार काका


" आज कालच्या मुली जरा सहन करत नाहीत काही. त्यात मुली म्हणजे तुमच्या लाडाच्या. घ्या अजून डोक्यावर." मध्यस्थी मामा नंदिनीकडे रागाने बघत होते.


" भाऊ माझी मुलगी कशी आहे मला ठाऊक आहे. मी केलेत त्यांच्यावर संस्कार म्हणून तिने इतके दिवस सगळं सहन केलं." नीरजा मध्यस्थीच्या बोलण्यावर चिडली.

" हो आहेत माझ्या मुली लाडाच्या. त्यांना काही मी आगीत ढकलून देण्यासाठी जन्म नाही दिला. मी माझ्या नंदिनीला पाठवणार नाही. " दीपकराव


" नका पाठवू. दिलच काय तुम्ही तुमच्या मुलीला.? लग्न ही काही राजेशाही थाटात केलं नाही. लग्नं करण्याची एपत नव्हती तर, मंदिरात करायचं होतं लग्नं." नीताचा तोल सुटला.


" आज पर्यंत नंदिनीच्या लग्ना सारखं लग्नं कोणाचं झालं नाही. तुमचे नातेवाईक पण डोळे फाडून नजरा बघत होते." केदार काका चांगलेच चिडले होते.


" अगं तुझ्या बहिणीचा तर विचार कर. तू अशी नवऱ्याला सोडून आलीस तर तिच्याशी कोण लग्नं करेल.? त्या पेक्षा तू मेलीस तर चालेल " मध्यस्थी मामा नंदिनीला दटावत होते.

" तिचा बाप समर्थ आहे तिचं लग्न करून द्यायला. आणि माझ्याच् समोर माझ्या मुलीच्या मरणाची भाषा करता तुम्ही. शोभते का तुम्हाला बापू? दीपकरावांच्या डोळ्यात आग होती.

खूप वाद झाला. नंदिनीला होणाऱ्या त्रासाचे पाढे वाचले गेले पण नीता, नलिन, मध्यस्थी मामा \"चोर तो चोर वरून शिरजोर\" होते. दीपकराव त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आणि शेवटी नीरज, नीता, नलिन मध्यस्थी मामा निघून गेले.


दुसरीकडे….


" मी घेऊन येईल नंदिनीला परत तुमच्याकडे. दीपक रवाना जरा शांत होऊ देत." मध्यस्थी मामा नलिनला म्हणत होते.


" काहीही करा पण ती परत आली पाहिजे. आणि एकदा आली की परत तिच्या माहेरी जिवंत काही जाणार नाही ती." इति नीता


पुढील भागात बघू. मध्यस्थी मामा दीपक रावांना समजावू शकतील की नाही? काय होईल ? सोपा असेल का नंदिनीचा पुढचा प्रवास?


क्रमशः

© वर्षाराज


प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all