नवी पहाट ...भाग १८
मागील भागाची लिंक खाली देत आहे.
https://www.irablogging.com/blog/sunrise-_15162
मागील भागात आपण बघितले …
नंदिनी काही बोलत नव्हती. त्यामुळे तिला न पाठवण्याचे काही कारण सांगता येत नव्हते. त्यामुळे दीपक रावांनी तिला पाठवण्यास होकार दिला. पुढच्या रविवारी तिला घेऊन जाऊ असे ठरले. आणि मंडळी निघून गेली. जाताना निताने नंदिनी कडे कटाक्ष टाकला. त्यात एक छद्मी हास्य होते. ज्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. पण तिच्या नजरेतील
छद्मी पणा नंदिनीच्या काळजाचा थरकाप करून गेला.
शिल्लक कारण होते. थोडक्यात निभावले. म्हणत सगळ्यांना समाधान झाले. नंदिनी देखील खोटे खोटे हसत होती. खुश असल्याचा मुखवटा घालून वावरत होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
आता पुढे…
निता, नलीन, नीरज घरी गेले खरे पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते.
" फारच खमकी आहे पोरगी, इतका त्रास दिला आपण तिला, तरी बापाला काही सांगितले नाही का, पैसे मागितले नाही." निता घरात पाय ठेवताच सुरू झाली.
" बघ तर. दुसरी एखादी असती तर आता पर्यंत घरी सांगितलं असतं. नाहीतर पळून गेली असती किंवा जीव तरी दिला आता." नलीन तोंड वाकवत बोलत होता.
" चार दिवस आधी गेलो होतो. तेव्हाच तिला धमकी दिली होती मी. तरी जरा भीती होतीच की, सांगते की काय घरी. बरच झालं, जे तिने अजून काही सांगितले नाही. आता तिचे मनोबल तोडायला सोपं जाईल." नीरज कुच्छितपणे हसून बोलत होता.
" अजून एक आठवडा, मग आहेच आपल्या तावडीत ती परत. आता असे हाल करू तिचे की, तिच्या बापाकडे तिला पैसे मागावेच लागतील आणि तिचा बाप सगळा पैसा द्यायला तयार होईल आपोआप." निता डोक्यात कट रचत बोलत होती.
त्यांच्या मनात काय कट कारस्थान सुरू आहे, ह्याची तीळ मात्र देखील कल्पना नव्हती दीपक रावांना.
दुसरीकडे…..
बघता बघता गुरुवार उजाडला. एकीकडे नंदिनीची जायची तयारी सुरू होती. इतक्या दिवसांच्या मुक्कमा मुळे सगळे विखुरलेले समान परत जमा करून नंदिनी हळू हळू बॅग भरत होती. बॅग भरताना मध्येच तिचे डोळे पाणावले. कोणाचे लक्ष जाऊ नये म्हणून पटकन डोळे पुसले. पण तिचे पाणावलेले डोळे नीरजाच्या नजरेतून सुटले नव्हते.
" नंदिनी, बाळा काय झालं? " नीरजा नंदिनीच्या डोक्यावर मायेने हात फिरवत विचारात होती.
" कुठे काय, तुमच्या पासून परत दूर जाणार म्हणून डोळ्यात पाणी आले इतकचं." आईच्या मायेचा स्पर्शाने नंदिनीला हुंदका आवरणे कठीण झाले होते. कशी बशी डोळ्यांच्या कडा पुसत ती बोलली.
" वेडा बाई, अगं दूर कुठे आम्ही ? कधी ही एक फोन कर लगेच हजर राहू तुझ्या समोर आम्ही. आणि हो एक लक्षात ठेव आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत." नीरजा बोलत होती आणि नंदिनीने एकदम तिला मिठी मारली. त्या प्रेमाच्या मिठीत नंदिनीने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
" आई कदाचित तुमच्या सगळ्यांना मी हे शेवटचे बघते आहे. तुझी ही प्रेमळ मिठी शेवटची असेल." नंदिनी मनातच बोलत होती. या पुढे आपल्याला हे प्रेम मिळणार नाही ह्याच विचारात ती हे क्षण मनात साठवत होती. तिच्या मनात काय सुरु आहे ह्याचा थांग पत्ता तिने कोणालाच लागू दिला नव्हता.
" आई तुझ्या हातची मस्त कळण्याची भाकरी आणि ठेचा खाऊ घालना मला. खूप इच्छा आहे माझी खायची." नंदिनी नीरजाच्या मिठीतुन बाजूला होत विषय बदलवत आणि शेवटची इच्छा पूर्ण करून घेऊ ह्या विचाराने बोलत होती.
नीरजाने लगेच तिची मागणी मान्य केली. संध्याकाळी कळण्याची भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि ठेचा असा बेत ठरला. नंदिनी सोबत देण्यासाठी नीरजाने खास बेसनाचे लाडू बनवले होते. जे नंदिनीला फार आवडायचे.
रात्री सगळे मस्त जेवले. नीरजाच्या हातची कळण्याची भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि ठेचा ह्या पुढे एखाद्या फाईव स्टार हॉटेलचे जेवण सुद्धा फिके होते. त्यामुळे हा विशेष बेत म्हणजे सगळ्यांसाठी पर्टीच असायची.
" आई तुमच्या सारख्या भाकरी कोणालाच जमत नाहीत. तुमच्या हाताला काही वेगळीच चव आहे" वृंदा जेवता जेवता सासूचे कौतुक करत होती.
" बघ आई, तुझं कौतुक करते आहे. म्हणजे तुझ्यावर परत स्वयंपाकाची सगळी जबाबदारी टाकेल बघ ही. सांभाळून जरा." समर वृंदाला चिडवत होता.
" तू गप रे. माझी सून नाहीच मुळात अशी. उगाच आमच्यात भांडणं लावू नकोस तू . आणि कोणी काहीही बोललं तरी माझा माझ्या सूनेवर विश्वास आहे. समजलं?" नीरजा वृंदाची बाजू घेत बोलत होती.
" समर,आता तू काही बोलू नकोस नाहीतर उपवास घडेल आपल्याला. महिला मंडळ एक झाले आहे." दीपकराव
" अहो बाबा चिंता नाही. आपल्याला येतो की स्वयंपाक. आपण करू की." समर बोटाला लागलेली चटणी पुसत म्हणाला.
" हो का? मग उद्या पाव भाजी बनव आमच्या साठी." नंदिनी लगेच बोलली.
" चल पुरे झालेत लाड. सगळं एकदम खाशील का? पुढच्या वेळी येशील त्यासाठी काहीतरी राहूदे की." समर गमतीच्या मूड मध्ये होता.
" पुढचं कोणी बघितलं आहे. येईल की नाही मी." नंदिनी विचारायचं बोलत होती. तसे सगळ्यांनी एकदम तिच्याकडे बघितले.
सगळे आपल्याकडे बघत आहेत हे लक्षात येताच तिने पटकन चेहेऱ्यावरचे भाव बदलवले.
" म्हणजे बघा, आता इतके दिवस इथे आहे. परत लवकर कसं येता येईल मला? बरोबर ना? मग चल बनव उद्या पाव भाजी." नंदिनीच्या खुलास्यानी तिच्या आधीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
" पण एका अटीवर, आम्ही कोणी घीललही तुला मदत करणार नाही आणि स्वयंपाक खोलीतील पसारा पण आवरणार नाही." नीरजाने लगेच अट घातली कारण समर स्वयंपाक करणार म्हणजे त्याच्या हाताखाली दोन माणसं लागणार आणि पसारा तर प्रचंड करणार हे तिला माहीत होते.
" अगदी बरोबर बोललात आई. फार पसारा करतो हा." वृंदा
" माझ्या कडे तर मुळीच बघू नकोस दादा, मी अजिबात येणार नाहिये स्वयंपाक घरात. आणि हो बाकी दिवस स्वयंपाक कोणी ही करा फक्त आम्हाला जेवायला द्या." स्वराने समर तिला काही बोलणार त्या आतच मदतीला येणार नाही म्हणून हात वर केले. तसे सगळे हसायला लागले.
" जेवायला तरी येशील ना की ते पण नाही येणार?" समर स्वराला चिडवत होता.
*********
दुसऱ्या दिवशी जो तो आप आपल्या कामाला निघून गेला. संध्याकाळी समरने पाव भाजीचा घाट घातला. परत सगळे माजा करत जेवले. नंदिनी तिच्या मनात हे क्षण साठवत होती.
त्या दिवशी रात्री झोपताना तिने सगळ्यांशी खूप गप्पा मारल्या. सगळ्यांच्या आठवणी, प्रेम मनात भरून घेतले. आणि झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी सगळे कामाला निघून गेले. घरात नंदिनी आणि नीरजा दोघीच होत्या. दुपारची जेवणं झाल्यावर नीरजाला जरा बाहेर जायचे होते.
" नंदिनी मी जरा स्वप्ना कडे जाऊन येते. सकाळी फोन होता तिचा. काही काम आहे म्हणे." नीरजा आवरताना बोलत होती.
स्वप्ना म्हणजे नीरजाची मैत्रीण. मुंबईत जेव्हा ते नवीन राहायला आले होते, ज्या भाड्याच्या घरात नव्याने सुरुवात करत होते तेव्हा स्वप्ना त्यांची शेजारी होती. तेव्हा पासूनची त्यांची मैत्री. आता जरी ते शेजारी नसले तरी त्यांची मैत्री कायम होती. स्वप्नाची मुलगी प्रज्ञा आणि स्वरा एकाच वर्गात होत्या, त्याच बरोबर एकदम चांगल्या मत्रिणी देखील होत्या. त्यामुळे त्यांचे संबंध अजूनच घट्ट होते.
नंदिनीने नीरजाच्या बोलण्यावर मान डोलावली. थोड्या वेळात नीरजा निघून गेली तेव्हा दुपारचे साधारण चार वाजत आले होते.
नीरजा घरातून निघाल्यावर बाहेरच तिला स्वरा भेटली.
" येते स्वप्ना मावशीला भेटून." असं सांगून नीरजा निघून गेली.
मैत्रिणीशी बोलून स्वरा दहा मिनिटांनी घरी आली. तीन वेळा घराची बेल वाजवली पण नंदिनी दार उघडत नव्हती.
नंदिनी दार उघडेल का? स्वराची प्रतिक्रिया काय असेल? बघुया पुढील भागात.
क्रमशः
© वर्षाराज
प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका