नवी पहाट... भाग ११

" निता ताई, नलिनराव आमची नंदिनी लाडात वाढली आहे. सगळ्या कामात हुशार असली तरी अबोल आहे. पटकन व्यक्त होतं नाही ती. तिची काळजी वाटते आम्हाला."... दीपकराव" आमच्या मुलीला सांभाळून घ्या, हीच विनंती." … नीरजाने हात जोडत निता आणि नलिनरावांना विनंती केली. तिच्या डोळ्यात पाणी होतं.


मागील भागात आपण बघितले….


नंदिनी जेवली आणि मग घडलेला प्रकार घरी सांगितला.


" बाबा मला नीरजच वागणं जरा विचित्र वाटलं.". … नंदिनी


" अगं नसेल आवडत त्यांच्या घरी उशिरा आलेलं. असतात काही लोकं अशी."... समर आणि वृंदाने तिची समजूत घातली.



एका मागून एक दिवस जात होते. त्या दिवसा नंतर नीरज आणि नंदिनीची एकतट्यात भेट कधी झालीच नाही. लग्नाची तयारी जोरावर होती. लग्नासाठी एक मोठं ग्राउंड बुक केलं गेलं. कॅटरिंगची ऑर्डर दिली. अहेर आणून झाले. त्यांची पॅकिंग झाली. स्वराने जसं जमेल, वेळ मिळेल तसं अगदी सुरेख रुखवत बनवलं. 



आता पुढे…


 लग्नाच्या पत्रिका छापून आल्या होत्या. रीतीनुसार पहिली पत्रिका घरच्या देव्हाऱ्यात ठेवली. नंतर कुलस्वामीनी, खंडोबा देव , ग्राम देवता ह्यांना आमंत्रण देण्यात आलं. मग पत्रिका वाटायला सुरुवात केली. पहिलं आमंत्रण हे वर पक्षाला देतात त्यानुसार दीपकराव आणि नीरजा, नीरजच्या घरी गेले. निता आणि नलिनरावांनी त्यांचं छान स्वागत केलं. दीपकरावांनी नालिनरावांना पत्रिका देत नमस्कार केला. 


आता पर्यंत त्याची बऱ्यापैकी ओळख झाली होती. त्यामुळे आवघडले पणा नव्हतं आता त्यांच्यात.


" निता ताई, नलिनराव आमची नंदिनी लाडात वाढली आहे. सगळ्या कामात हुशार असली तरी अबोल आहे. पटकन व्यक्त होतं नाही ती. तिची काळजी वाटते आम्हाला."... दीपकराव


" आमच्या मुलीला सांभाळून घ्या, हीच विनंती." … नीरजाने हात जोडत निता आणि नलिनरावांना विनंती केली. तिच्या डोळ्यात पाणी होतं.


" अहो ताई नका काळजी करू. नंदिनी फक्त त्या घरातून ह्या घरात येणार. बाकी काही बदलणार नाही तिच्या साठी. आम्ही काळजी घेऊ तिची."... नलिनराव


" नीरजाताई, रडू नका. आम्हाला मुलगी नाही. त्यामुळे नंदिनी आमची सून नसून मुलगीच आहे. तुम्ही निश्चिंत रहा."... निताने अगदी प्रेमाने नीरजाची समजूत काढली.


निता आणि नलिनरावांच्या बोलण्याने नीरजा आणि दीपकराव सुखावले. आता त्यांना जरा बरं वाटतं होतं. 


दिवस पंख लावावे असे भूर् कन उडून गेले. आता नंदिनीचे त्या घरात मोजून चार दिवस राहिले होते. हळू हळू पाहुणे यायला सुरुवात झाली होती. हळद लग्नाच्या दिवशी सकाळी लागणार होती. दोन दिवस आधी नंदिनीला मेहेंदी लागली. त्या दिवशी समरने नंदिणीच्या हट्टासाठी शंभर लोकांची पावभाजी स्वतः बनवली. अर्थात कापकुप करायला जमलेल्या पाहुण्यांनी मदत केलीच होती. दुसऱ्या दिवशी देव दैवत पार पडलं.


अखेर लग्नाचा दिवस उजाडला. वृंदा आणि मावशी सकाळीच जाऊन देवाला विडा ठेऊन आल्या होत्या. त्यानंतर नंदिनीला हळद लागली. सगळे खूप हळद खेळले, आणि मग जेवणं झाल्यावर लग्नस्थळी गेले.


लग्नं एका मोठ्या मैदानात होतं. मैदानाच्या मुख्य दारावर कमान उभरण्या आली होती. तिथून आत जाताना झालर लावलेले पडदे दुतर्फा होते, त्यांचा रस्ता तयार करून आगमणाचा मार्ग मुख्य मैदाना पासून वेगळा केला होतं. सुमारे वीस पावलं आत गेल्यावर, तो पडद्याचा रस्ता संपल्यावर उजव्या बाजूला मोठं मोकळं मैदान होतं. त्यात खुर्च्या टाकलेल्या होत्या. हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली गेली होती. समोरच मोठं स्टेज होतं जे फुलांनी सजवलेलं होतं. त्यात मधोमध राजा राणीच्या खुर्च्या होत्या. स्टेज च्या दोन्ही बाजूला डेझर्ट कूलर होते. वर झुंबर लावलेले होते. स्टेज च्या खाली एका बाजूला रुखवत साजवले होते.


मैदानाच्या एका टोकाला जेवणाच्या पदार्थांचे वीस पंचवीस स्टॉल लावलेले होते. पुढे आईस क्रीम आणि पानाचा सुद्धा स्टॉल होता. मैदानाचे सगळ्यात मोठे आकर्षण होते ते म्हणजे मधोमध लावलेला मोठ्ठा फाऊंटन. आणि तिथून स्टेज पर्यंत केलेली लायटिंगची मांडणी. लग्नं गोरज मुहूर्तावर असल्यामुळे मैदानात रोशनाई होती. छोटे, मोठे, हॉलोजाणं असे सगळेच लाईट होते. 


स्टेजच्या बाजूला दोन छोट्या खोल्या होत्या. वर आणि वधु पक्षासाठी. नंदिनी तिथे तयार होत होती. इंग्लिश कलरचा भरजरी शालू. छान हेअर स्टाईल, नवरीच्या मेकअप ह्यात ती अजूनच सुंदर दिसत होती.


सगळ्या मांडवात चर्चा होती. लग्नाची तयारी खूप छान केली दीपकरावांनी. असं लग्नं आता पर्यंत झालं नाही आपल्यात. खूप पैसा खर्च केला लग्नासाठी, आणि त्यात खूपच छान स्थळ मिळालं दीपकरावांना. आपल्याला माहीत असतं तर आपण आपल्या मुलीसाठी विचारलं असतं. नशीब लागतं बुवा असं स्थळ मिळायला. एकाच घरात दोघी मुली देतात की काय? दुसरा जावई शोधायचं कामाचं ठेवलं नाही दीपकरावांनी. अर्थात असं काहीच नव्हतं. हा विचार दीपकरावांनी केलाच नव्हता. पण लोकांना बोलायला काय लागतं? उचलली जीभ की लावली टाळ्याला. असे एक ना अनेक विषयांच्या चर्चेला उधाण आलं होतं. 


थोड्याच वेळात वरात मांडवा समोर आली. नीरजाने नीरजचे औक्षण केलं. नंदिनी सुद्धा तिथेच उभी होती. नंतर नीरज आणि नंदिनी एकमेकांचा हात धरून स्टेज वर आले. त्यांच्यासाठी फुलांचा रस्ता तयार केलेला होता. 


गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि वाजंत्री सावधान म्हणताच त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि दोघे विवाह बंधनात अडकले. बाहेर उभी असलेली वाजंत्री मंडळींनी वाजंत्री वाजवली, आणि आकाशात विविध आकाराची आतिषबाजी झाली, त्यानी आसमंतात रोशनाई झाली. सगळे त्या दृष्याकडे बघतच राहिले. 


लग्नं लागताच सगळे जेवणाच्या स्टॉल वर तुटून पडले. पक्वांनांची रेलचेल होती. त्यात नंतर आईसक्रीम आणि पान ह्यांनी अजूनच सगळ्यांना खुश केलं. एका बाजूला काही पाहुणे जेवत होते, तर दुसऱ्या बाजूला काही पाहुणे वर वधूला आशिर्वाद देण्यासाठी स्टेज वर जात होते. सुमारे बाराशे पाहुणे आले होते लग्नाला. सगळ्यांचे भेटून झाल्यावर लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. सप्तपदी, फेरे, कन्यादान सगळं छान पार पडलं. 


त्या नंतर दोन्ही कुटुंबियांचे आणि मानाच्या पाहुण्यांची जेवणं झाली म्हणजे मनाची पंगत बसली. रात्रीचे दहा वाजत आले होते. त्यामुळे पाठवणीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू झाली.


पाठवणी, विदाई, बिदाई कोणताही शब्द असो. तो फक्त शब्द नसतो त्यात खूप गहिरे भाव असतात. हा क्षण प्रत्येक मुलीच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या साठी अत्यंत कठीण क्षण असतो.


ज्या मुलीला जीवापाड जपून लहानाचं मोठं करतात तिला असं एक क्षणात आपल्या पासून दूर कारणं खूप कठीण असतं. त्या घरात आपण वाढलो ते घर एका रात्रीत सोडून जाणं ते पण कायमचं खरंच किती कठीण असतं मुलींसाठी.


पण तरी ही जगाची रीत आहे. प्रत्येक आई वडिलांना आणि मुलींना ह्यातून जावं लागतं. तसच नंदिनी, नीरजा, दीपकराव, समर, स्वरा आणि वृंदाला सुद्धा ह्यातून जावं लागणार होतं. एक दिवस सुद्धा कधी कोणा कडे एकटी न राहिलेली नंदिनी आता कायमची दुसऱ्या घरात जाणार होती. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. 


नंदिनी नीरजा, दीपकराव, समर, स्वरा, वृंदाच्या गळ्यात पडून रडत होती. तितक्यात केदार काकांनी दीपकरावांच्या खांद्यावर हात ठेवत, " उशीर होतोय त्यांना, बाराच्या आत ते घरी पोहोचले पाहिजे." असं सांगितलं. स्वतः ला सांभाळत त्यानी मान हलवली. नीरजाने नंदिनीला गुळाचा खडा आणि पाणी दिलं, आणि गाडीत बसवलं. नंदिनी खिडकीतून बाहेर बघत होती. तिच्या गालावर अश्रूंचे ओघळ वाहत होते. डबडबलेल्या डोळ्यांनी, भरलेल्या अंतः कारणाने नीरजा आणि दीपकरावांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याला, समर आणि स्वराने त्यांच्या लाडक्या बहिणीला, वृंदाने तिच्या मैत्रिणीला निरोप दिला. गाडी हळू हळू मांडवातून बाहेर पडत होती. त्यांच्या पाठोपाठ दुसरी गाडी पण निघाली ज्यात स्वरा आणि आत्या नंदिनीच्या पाठराखण म्हणून जात होत्या . दोन्ही गाड्या बाहेर पडल्या तोच दीपकराव आणि नीरजाने एकमेकांना घट्टा पकडले आणि जाणाऱ्या गाड्यांना बघून रडत होते. शीतल मावशी, मामा मामी, केदार काका, रवी काका त्यांची समजूत काढत होते. नेहमी हसत राहणार समर सुद्धा खूप रडला. 


मांडवात मोजकेच घरचे पाहुणे होते. थोडावेळ सगळे तिथेच थांबले . नंतर बाकीच्या सामानाची आवराआवर करुन सगळे घरी गेले. घरात पाय टाकल्या बरोबर सगळ्यांना एकदम खाली खाली जाणवलं. विशेषतः दीपकराव, नीरजा, समर आणि वृंदाला. पाठवणी एका मुलीची झाली होती पण दिसत दोघी नव्हत्या. त्यामुळे त्यांना जास्तं खालीपण जाणवतं होतं. त्यांचे डोळ्यात परत पाणी तरळले. 


" सावरा स्वतः ला सगळे. नंदिनी काही खूप दूर नाही. जवळच आहे. आणि स्वरा तर येईल उद्या घरी."... रवीकाका.


" हो आता जरा आराम करा. उद्या जायचं आहे आपल्याला त्यांच्या कडे, सत्नारायण आहे सकाळी आणि मग संध्यकाळी रिसेप्शन. त्यामुळे आता आराम गरजेचा आहे.".... केदार काका


त्या नंतर सगळे अंथरुणात पडून राहिले पण कितीतरी वेळ कोणालाच झोप लागली नाही.


*****************



दुसरीकडे.



नंदिनीची गाडी नीरजच्या घरी पोहोचली. आता ती जरा शांत झाली होती. नीरज नंदिनी, आणि इतर पाहुणे, स्वरा आणि आत्या वर गेले . वर गेल्यावर दरवाज्यात निता आरतीचे ताट घेऊन उभी होती. नंदिनी आणि नीरजची आरती ओवळली. नंदिनीने माप ओलांडून गृह प्रवेश केला. त्या नंतर देवाचं दर्शन घेतलं. काही पारंपरिक खेळ खेळले गेले. म्हणजे अंगठी शोधा, उखाणा घ्या असे. ह्या सगळ्यात खूप उशीर झाला होता. 



घरात पाहुणे होते त्यामुळे सगळीकडे पाहुण्यांचे सामान होतं. वरूनने म्हणजे नीरजच्या भावाने नंदिनी, स्वरा आणि आत्याच्या झोपायची खोली मोकळी करून दिली. बाकी सगळे जागा मिळेल तिथे झोपले.


दिवसभराचा थकवा होता त्यामुळे त्यांना पडल्या पडल्या झोप लागली. परत सकाळी लवकर उठायचं होतं. दुसऱ्या दिवशी हळद उतरवायची होती. त्या नंतर सत्यनारायानाची पूजा आणि मग रिसेप्शन होतं. त्यामुळे दुसरा दिवस सुद्धा बिझी होता. 



मित्रांनी गोष्ट इथे संपली नाही तर इथून सुर झाली आहे. बघुयात काय काय घडेल नंदिनीच्या आयुष्यात.? ह्या वळणावर तिचं आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे. असं काय होणार आहे की ज्यानी तिचं आयुष्य बदलणार आहे? कोण बदलवेल तिचं आयुष्य? काय घडणार आहे तिच्या सोबत. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट.




क्रमशः


प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.


🎭 Series Post

View all