नवी पहाट... भाग १०

" चालेल की, मी आईला सांगते फोन करून की आम्ही येतोय घरी जेवायला."... नंदिनी पर्स मध्ये एक रुपयाचा कॉइन शोधत म्हणाली. त्यावेळी कॉइन बॉक्स होते. त्यावरून फोन केला जात होता.
मागील भागात आपण बघितले…


" चला जे झालं ते झालं. शेवट गोड झाला. आता कोणता वाद नको."... आजी बोलली.


दुसऱ्या दिवशी सकाळी घरचे पाहुणे पण निघून गेले. करणं त्यांना परत यायचं होतं अजून चार पाच दिवसांनी. फक्त आजी आणि आजोबा राहिले. 

आता घरात नुसता गोंधळ होता. जो तो येता जाता नंदिनीला चिडवत होता. आणि बिचारी साधी नंदिनी लटके रागवत. गालातल्या गालात हसत होती.


आता पुढे…


नीरजा आणि दीपक रावांनी लग्नाच्या मुहूर्ताच्या तारखा काढून आणल्या. समरने आणि वृंदाने जेवणाचा मेनू ठरवला तसं नीरजा आणि दीपकरावांना सांगितलं. त्यांच्या सहमतीने जेवणाची ऑर्डर दिली. फोटोग्राफरला ठरवलं. शुक्रवार पर्यंत सगळी तयारी झाली. स्वराने नंदिनीच्या हातावर मेहेंदी काढली. नंदिनी अबोल होती पण तिचे बोलके डोळे चमकत होते. आयुष्याच्या नव्या वळणावर ती उभी होती. नव्या सुरुवातीची स्वप्न रंगवत होती. नव्या पहाटेची वाट बघत होती. एक नवीन अध्याय सुरू होणार होता तिच्या आयुष्यात.


शनिवारी सगळे घरचे पाहुणे आणि इतर पाहुणे जमा झाले. सुमारे पन्नास लोकं होते. घर मोठं होतं विशेषतः हॉल त्यामुळे सगळं छान पार पडलं. सगळ्यांच्या साक्षीने नीरज आणि नंदिनीचा साखरपुडा पार पडला. कॅमेरामॅन ने खूप फोटो काढले. सुपारी फुटली. 


लग्नाची तारीख काय काढायची ह्यावर चर्चा सुरू होती. 

" दीपकराव पुढच्या महिन्यात एकच मुहूर्त आहे. त्या नंतर दिवाळी नंतरच आहे मुहूर्त."... नलिनराव


" आता स्वराची आणि नंदिनी ची परीक्षा जवळ आहे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये त्यामुळे दिवाळी नंतरचा मुहूर्त काढू, असं आम्हाला वाटतं."... दीपकराव


" हो आणि पुढच्याच महिन्यात म्हणजे खूप घाई होईल, त्यामुळे दिवाळी नंतर बरं पडेल."... नीरजा


" अरे बापरे, म्हणजे आमच्या नंदिनीला घरी न्यायला इतकी वाट बघावी लागेल का आम्हाला? नाही इतका उशीर नको आपण पुढच्या महिन्यातच करू लग्नं".... निताने बोलता बोलता निताने बाजूला बसलेल्या नंदिनीचा हात घट्ट पकडला.


" अहो पण ताई मुलींची परीक्षा आहे फेब्रुवरी आणि मार्च मध्ये कसं जमेल त्यांना?" … नीरजा काळजीने बोलतं होती.


" नंदिनीला काही काम करुदेणार नाही मी परीक्षेच्या काळात. आणि स्वरा करतेच आहे अभ्यास. तिची तर परीक्षा मार्च मध्ये आहे, त्यामुळे तिला सुद्धा काही अडचण येणार नाही."... निता अजिबात ऐकायच्या मूड मध्ये नव्हती. 


" आम्हाला इतकी वाट बघायला जड जाईल. त्यामुळे आपण पुढच्याच महिन्यात लग्नं उरकून टाकू. म्हणजे आमची नंदिनी आमच्या घरात येईल.".... निता


निता सतत 'आमची नंदिनी' म्हणत होती आणि इकडे सगळ्यांना आनंद आला तरी वाईट वाटतं होतं. आपली मुलगी, बहिण आता आपली नाही राहिली लगेच त्यांची झाली. ही भावना त्यांना दुखावत होती.


सगळ्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण निता आणि नलिनराव काही केल्या ऐकत नव्हते. शेवटी दीपक रावांना हार मानावी लागली. आणि लग्नाची तारीख पुढच्याच महिन्याची म्हणजे जानेवरीची ठरली.


सगळी धाम धूम होती घरात. इतक्या जवळची तारीख म्हणजे खूपच धावपळ होणार होती. लग्नं म्हणजे किती गोष्टी असतात. शॉपिंग, मानपान, पाहुणचार, जेवण, अहेर, परतीचा अहेर बापरे सगळं इतक्या कमी वेळात करायचं होतं.


साखरपुडा झाला सगळे आपापल्या घरी परतले. दीपक रावांच्या घरचे काही पाहुणे मात्र थांबले होते. म्हणजे रवि भाऊ, केदार काका आणि शीतल मावशी, शिरीष काका आणि मावशी. आजी आणि आजोबा तर होतेच. त्या दिवशी सगळे दमले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे एकत्र बसले.


" वृंदा तू एक काम कर एक वाही घेऊन ये त्यात आपण सगळं लिहू."... समर


" हो आणते." असं म्हणत वृंदा आत निघून गेली.


" स्वरा आणि नंदिनी तुम्ही तुमचा जास्तीत जास्तं अभ्यास करून घ्या लग्नाच्या पंधरा दिवसात काही इतका अभ्यास होणार नाही. स्वरा विशेषतः तू समजलं?"... नीरजा


" हो आई." … स्वरा आणि नंदिनी एकदम बोलल्या. त्या नंतर स्वरा क्लासला निघून गेली. 

वृंदा आतून एक वाही घेऊन आली. दीपक रावांनी तिच्या कडून वाही घेतली आणि एक एक नोंदणी करायला सुरुवात केली .


" सगळ्यात पहिले पाहुण्यांची यादी बनवू म्हणजे बाकीच्या गोष्टींचा अंदाज येईल आपल्याला. "... दीपकराव बोलत होते.


त्या नुसार पाहुण्यांची यादी तयार झाली.
त्या नंतर मानाच्य पाहुण्यांची संख्या किती,? लग्नात येणाऱ्या बायका किती त्यानुसार साड्या लागतील, शर्ट पँट पीस किती लागतील? अशा अनेक गोष्टी नोंदवल्या गेल्या. प्रत्येक जण काही ना काही आठवून सांगत होतं त्या नुसार यादीत बदल होतं होते. तरी अजून पक्की यादी तयार झाली नव्हती. संध्याकाळी घरचे सगळे पाहुणे निघून गेले.


त्या काळात मोबाईल फोन इतके प्रचलित नव्हते. त्यामुळे नीरज आणि नंदिनी ह्यांचं फोन वर बोलणं होतं नसे. शॉपिंगला भेटायचे तितकीच त्यांची भेट. एकदा ते दोघेच ठरवून भेटले. घरी तसं आधीच सांगितलं होतं त्यानी.


नंदिनी खूप छान तयार होऊन संध्याकाळी नीरजला भेटायला गेली. नीरज ऑफिस मधून येणार होता. येताना त्याने ऑफिस मधून दीपक रावांच्या फोन वर फोन केला की, "नंदिनीला सांगा पाण्याची बॉटल घेऊन ये." दीपकरावांनी तसा निरोप दिला. पण त्यांना सगळ्यांनाच जरा विचित्र वाटलं. पण बाहेरच पाणी नसेल पचत असा विचार केला सगळ्यांनी.


नंदिनी आवरून पाण्याची बॉटल घेऊन संध्याकाळी साडे सहाला नीरजला भेटली. तिला बघून नीरज खूप खुश झाला. नंदिनीने त्याला पाण्याची बॉटल दिली, त्याने ते पाणी एकदम गटागट पिऊन टाकलं. खूप तहान लागली होती त्याला.


दोघे एका पार्क मध्ये बसले. नंदिनी साठी हा अनुभव फारच वेगळा होता. इतर मुलींना असं त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत बसलेलं बघितलं होतं तिने. पण ती त्या वाटेला कधी गेलीच नाही. आता तिच्या हक्काचं माणूस होतं तिच्या जवळ ह्या जाणिवेनेच तिला खूप छान वाटतं होता. अबोल नंदिनी खूप लाजत होती. नीरज बोलतं होता ती नुसतीच मान डोलवत होती. रात्रीचे आठ वाजले होते. नंदिनीला भूक लागली होती.


" आठ वाजलेत आपण खाऊया का काही?" … नंदिनीने हळूच विचारलं.

नीरजने त्याच्या घड्याळात बघितले आणि एकदम उभा राहिला.

" अगं हो खरंच की, आठ वाजले. कळच नाही वेळ कसा गेला."... नीरज


नंदिनी त्याला असं एकदम उभं राहिलेलं बघून जरा विचारात पडली. ती त्याला बघत होती. नीरज बोलत होता.


" नंदिनी आपण एक काम करू, आपण घरीच जाऊ."... नीरज


" चालेल की, मी आईला सांगते फोन करून की आम्ही येतोय घरी जेवायला."... नंदिनी पर्स मध्ये एक रुपयाचा कॉइन शोधत म्हणाली. त्यावेळी कॉइन बॉक्स होते. त्यावरून फोन केला जात होता.


" नाही, तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. मी वेळेत घरी गेली नाही तर आई रागावेल मला."... असं बोलून नीरजने त्याची बॅग घेतली आणि चालायला लागला.


नंदिनी त्याच्या मागे पळत गेली. 

" पण तुम्ही सांगितलं आहे ना घरी की, माझ्या सोबत आहात? तरी रागावतील का?"... नंदिनी


" हो माहीत आहे घरी. पण तरी रागवेल आई. तू नको इतके प्रश्न विचारू भेटू आपण नंतर बाय. " असं म्हणत तो रिक्षात बसून निघून पण गेला.

नंदिनीला खूप वाईट वाटलं की नीरज असा एकदम निघून गेला. ती सुद्धा घरी आली. 

सगळे तिच्याकडे बघत होते.

" कशी झाली पहिली भेट?" वृंदा विचारात होती

" ठिक होती. ए वाहिनी मी फ्रेश होते. जेवायला काय केलं आहे? मला खूप भूक लागली आहे."... नंदिनी बोलता बोलता आत निघून गेली.


तिचं बोलणं ऐकून सगळे एकमेकांकडे बघत होते. सगळ्यांची जेवणं झाली होती. आज नंदिनी भेटणार नीरजला म्हणजे दोघे जेवणं सोबत करतील असा त्यांचा अंदाज होता. म्हणून तिचा स्वयंपाक केलाच नव्हता.


 नीरजा आणि वृंदा पटकन किचन मध्ये गेल्या तिच्या साठी भाजी आणि दोन पोळ्या केल्या. तितक्यात नंदिनी आली.


" अरे कमी झाला का स्वयंपाक?"... नंदिनी


" नाही तुझा हिशोब नव्हता जेवणात आम्हाला वाटलं ती बाहेर जेवणं करशील आज."... वृंदा


वृंदाच बोलणं ऐकून नंदिनीचा चेहरा एकदम पडला. 


" नंदिनी तू जेवण कर आधी मग बोलू.". … नीरजाने नंदिनी साठी ताट वाढलं.


नंदिनी जेवली आणि मग घडलेला प्रकार घरी सांगितला.


" बाबा मला नीरजच वागणं जरा विचित्र वाटलं.". … नंदिनी

" अगं नसेल आवडत त्यांच्या घरी उशिरा आलेलं. असतात काही लोकं अशी."... समर आणि वृंदाने तिची समजूत घातली.


एका मागून एक दिवस जात होते. त्या दिवसा नंतर नीरज आणि नंदिनीची एकतट्यात भेट कधी झालीच नाही. लग्नाची तयारी जोरावर होती. लग्नासाठी एक मोठं ग्राउंड बुक केलं गेलं. कॅटरिंगची ऑर्डर दिली. अहेर आणून झाले. त्यांची पॅकिंग झाली. स्वराने जसं जमेल, वेळ मिळेल तसं अगदी सुरेख रुखवत बनवलं. 


पुढील भागात बघू लग्नं कसं पार पडत ते. आणि येणारी नवी पहाट नंदिनीच्या आयुष्यात कोणते रंग घेऊन येते.




क्रमशः



प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all