नवी पहाट... भाग ४

‘”आम्हाला फारशी काही माहिती मिळाली नाही. ती लोकं थोडी अलिप्त असतात. कोणतं जास्तं मिसळत नाहीत. पण बोलून चालून चांगली आहेत. असं समजलं.”.... नीरजा

मागील भागात आपण बघितले....


“ समर तुझ्या मित्रांना सांग आणि बघ काही माहिती मिळते का ते. मुलाने त्याच्या ऑफिसच्या माणसाचा नंबर दिला आहे. शक्य झालं तर भेट त्या माणसाला. पण आधी फोन वर माहिती घे. मी त्यांच्या शेजाऱ्यांकडे विचारपूस करतो.” ...दीपकराव


समरने मान डोलावली.आणि नंतर सगळेच कामाला लागले.


मुलाकडे निरोप पाठवण्यात आला की “ आम्हाला थोडा वेळ द्या विचार करायला."


आता पुढे...


दुसऱ्या दिवशी स्वरा आणि नंदिनी गप्पा मारत बसल्या होत्या. स्वरा नंदिनीच्या मनात काय सुरु आहे हे समजण्याचा प्रयत्न करत होती. नंदिनी अबोल असल्यामुळे ती तिचं मत स्पष्ट मांडायची नाही. त्यामुळे स्वरा नंदिनीच्या मैत्रिणीची भूमिका पार पाडायची. दोघी बहिणी होत्या पण त्याच बरोबर मैत्रिणी देखील होत्या.


“ ताई कसा वाटला मुलगा?”.... स्वरा


“ नीट कळलं नाही गं. तुला माहित आहे की दिसण्यावरून मी कोणाला पसंत करणार नाही. तो माझा क्राईटेरियाच नाहीये. मला जीव लावणारा मुलगा हवा आहे.”... नंदिनी


“ हो मान्य आहे. पण तरी काहीतरी तर वाटलं असेल ना तुला? बरं,वाईट, ओके काहीतरी तर आलाच असेल ना डोक्यात तुझ्या?”...स्वरा


“ हमम, तसा बरा वाटला मुलगा. बघू आता बाबा काय म्हणतात ते. त्यांना आवडला असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही.”.... नंदिनी


“ अगं लग्नं तुला करायचं आहे. बाबांना नाही. तुझं मत असायला हवं ना?”... स्वरा


“ हो, बरोबर आहे. पण मला नक्कीच त्यांच्यापेक्षा जास्तं कळतं नाही.” ... नंदिनी


“ धन्य आहेस तू. सगळं जरी बरोबर असलं तरी तुझं मत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे ना.”.... स्वरा


“ तू जा बरं अभ्यास कर. माहिती काढूदेत आधी मग बघू.” नंदिनीने तूर्तास विषय टाळला.


आता लगेच बोलून विषय वाढवण्यात काही अर्थ नाही. असा विचार करून स्वरा तिथून निघून गेली.


संध्याकाळी दीपकराव ऑफिस मधून घरी आले. त्यांचा एक नियम होता. संध्याकाळी सगळे सोबत जेवत असतं. त्यानुसार सगळे सोबत जेवायला बसले.


“ बाबा मी आज गेलो होतो मुलाच्या ऑफिस जवळ.”... समर जेवता जेवता बोलत होता.


“ मग काय झालं?”... दीपकराव


“ दुरून बघितलं मुलाला. ऑफिस मध्ये जात होता. म्हणजे तिथेच काम करतो हे नक्की. बाकी अजून काही दिवस लक्ष ठेवायला सांगितलं आहे माझ्या मित्राला, मी पण जाईलच तसं तिकडे. आणि त्या माणसाला सुद्धा कॉल करेल एक दोन दिवसांत.” .... समर


“ ठिक आहे. कमीत कमी त्याचं ऑफिस मध्ये काम करतो ह्याची तरी खात्री झाली. ठेव तू लक्ष आणि मग बघू आपण.”...दीपकराव


“ अहो, तुम्ही कधी जाणार त्यांच्या घराकडे? शेजाऱ्यांना विचारतो म्हणालात ना?”... नीरजा


“ आज माझ्या मित्राला बोललो स्थळा बद्दल. त्याच्या ओळखीचं कोणीतरी त्याचं एरिया मध्ये राहतात. तर त्यांना सांगणार आहे माहिती काढायला. आणि येत्या शुक्रवारी मला पण सुट्टी आहे तर आपण दोघे जाऊ विचारपूस करू.”... दीपकराव.


“ चालेल. समर चांगली माहिती काढ. मुलांचं कुठे काही प्रकरण तर सुरू नाही ना याची खात्री करून घे.”... नीरजा.


“ हो आई. आहे सगळं माझ्या डोक्यात. त्याचं दृष्टींनी लक्ष ठेवतो आहे.”... समर


“ चला आता जेवण करा आरामात. बाकी माहिती मिळाली की ठरवू.”... वृंदा.


सगळे परत जेवण्यात मग्न झाले. पण तरी डोक्यात तेच विचार सुरू होते. तितक्यात त्या मामांचा फोन आला.


“ हॅलो बोला बापू.”... दीपकराव फोन उचलत बोलू लागले.


“ नमस्कार भाऊ. झाली का जेवणं?”.... मामा


“ हो बस होतच आलं. आता हातच धुतो.”... दीपकराव


“ करा जेवण मग बोलू नंतर.”... मामा


“ अहो, नको बोला तुम्ही. झालंच आहे जेवणं. फक्त हात धुतो मग बोलू. एक मिनिट थांबा.”... दीपकराव


दीपक राव पटकन हात धुऊन आलेत. बाकी सगळे अजून जेवत होते. दीपकराव सगळ्यांच्या सोबत तिथेच फोनवर बोलत बसले.


“ हा बोला बापू.” ... दीपकराव


“ कसे आहात? काय सुरू आहे? काढली का माहिती तुम्ही?”... मामा


“ बसं बापू सुरू आहे रोजचच ऑफिस घर. आम्ही काढतो आहे मुलाची माहिती.”... दीपकराव


“ भाऊ तुम्ही काढा माहिती. पण खरंच सांगतो त्याची काही गरज नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मला माहित आहे की मुलगा आणि लोक चांगली आहेत. म्हणूनच मी हे स्थळ सुचवलं तुम्हाला.”... मामा


“ अहो तुमच्यावर विश्वास आहेच हो. पण तरी एक आमचं समाधान म्हणून काढतो माहिती.”... दीपकराव


“ मुलाचे वडील म्हणजे नलीनराव माझे जुने मित्र आहेत. मी चांगलं ओळखतो त्यांना. अर्थात त्यांच्या कुटुंबाशी कधी संबंध आला नाही. पण ते सुद्धा चांगले आहेत. तुम्ही डोळे झाकून मुलगी द्या. तिला काडीचाही त्रास होणार नाही बघा तुम्ही.”... मामा अगदी विश्वासाने बोलत होते.


त्यांच बोलणं ऐकून दीपकराव फक्त हसले आणि “कळवतो रविवार पर्यंत.” असं सांगून बाकीचं बोलणं टाळलं.


त्यांच्या दोघांचा हा संवाद घरात सगळे ऐकत होते. कारण दीपकरावांनी फोन स्पीकरवर ठेवला होता. फोन ठेवल्यावर दीपकरावांनी सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक नजर फिरवत अंदाज घेतला की कोणाची काय प्रतिक्रिया असेल.


“ तुम्ही सळ्यांनी ऐकलं आमचं बोलणं. ? त्यासाठीच मी फोन स्पीकरवर ठेवला होता. आता सांगा कोणाचं काय मत आहे?”... दीपकराव


“ आपण चौकशी करू.” सगळे एकदम म्हणाले. तसं सगळ्यांनी एकमेकांना बघितलं आणि पण सगळे सारखाच विचार करतो म्हणून सगळे समाधानाने हसले.


समर चार दिवस सतत नीरजच्या ऑफिस जवळ जायचा. त्याला येताना जाताना पाहायचा. ऑफिस मधून घरी आणि घरून ऑफिस एवढाच त्याचा कार्यक्रम असायचा. कधी कोणाला भेटताना दिसला नाही. शिवाय नीरजच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला कॉल केला आणि भेटलासुद्धा. मुलाचं रेकॉर्ड क्लीन होतं.


दीपकराव आणि नीरजा ठरल्याप्रमाणे शुक्रवारी निरजच्या घराच्या परिसरात गेले. तिथे आजू बाजूच्या लोकांना विचारून माहिती काढायचा प्रयत्न केला. त्यांना घरच्यांची जास्तं माहिती मिळाली नाही कारण तसे ती लोकं जास्तं कोणतं मिसळत नसतं. पण येता जाता बोलतं असतं. त्यावरून चांगली आहेत माणसं असं शेजाऱ्यांच्या बोलण्यातून समजलं.


दरम्यान नंदिनी सुद्धा विचार करत होती. एकंदरीत सगळ्या माहितीवरून लोकं आणि मुलगा चांगला वाटला तिला.


शनिवारी संध्याकाळी सगळे एकत्र बसले. कारण मिळालेल्या माहितीवरून त्यांना आता निर्णय घ्यायचा होता.


“ बाबा मुलाचं कुठे काही लफड नाही. असं दिसून आलं. म्हणजे इतक्या दिवसात बघितलं ते आणि जी माहिती मिळाली त्यावरून हे पक्कं झालं. कोणाशी जास्तं बोलत नाही तो.कामाशी काम असतं.” ... समर त्याच्या माहितीच्या आधारे बोलतं होता.


‘”आम्हाला फारशी काही माहिती मिळाली नाही. ती लोकं थोडी अलिप्त असतात. कोणतं जास्तं मिसळत नाहीत. पण बोलून चालून चांगली आहेत. असं समजलं.”.... नीरजा


“ माझ्या मित्राच्या ओळखीतून सुद्धा जास्तं काही समजलं नाही. “... दीपकराव


“ मग आता काय करायचं?”...वृंदा विचारात होती.


“ मला वाटतं. आपण शक्य ते सगळे प्रयत्न केलेत माहिती काढायचे. आणि स्थळ हे जवळच्या व्यक्तीने सुचवलं आहे त्यामुळे जास्तं शंका घेण्याचे काही कारण नाही. बापू इतक्या विश्वासाने सांगत आहेत म्हणजे सगळं चांगलं असावं.”...दीपकराव


“ हो मला सुद्धा तेच वाटतं आहे.”... नीरजा


‘” पण ताईला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे.”... स्वरा


“ हो तिच्या मना विरुद्ध काही करायचे नाहीच. तिच्या उत्तरावर पुढचं सगळं अवलंबून आहे.”... दीपकराव


“ नंदिनी तुला काय वाटतं.? तू स्पष्ट सांग.”... वृंदा


“ बेटा तुझ्यावर कोणतीच जबरदस्ती नाही. तुला नसेल आवडलं तर अजून उपवर बघता येतात. त्यामुळे तू तुझं मत सांग.”... नीरजा


“ हे बघ नाही सांगायचं असेल तर काही प्रश्न रहात नाही. पण हो सांगायचं असेल तर अजून बऱ्याच गोष्टी असतात. त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल नंतर. म्हणजे बघ कुंडली जुळली पाहिजे, घ्याय द्यायच्या गोष्टी, मानपान अशा बरच गोष्टी असतात. त्यामुळे होकार दिला म्हणजे लगेच लग्नं ठरलं असं होत नाही.”... दीपकराव


सगळे आता नंदिनीकडे बघत होते. तिच्या उत्तरावर आता पुढचा खेळ अवलंबून होता.


नंदिनी नीरजला होकार देईल का? काय सुरू आहे नंदिनीच्या मनात.



क्रमशः



प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.


🎭 Series Post

View all