नवी पहाट..भाग १

महिलांचा, पुरुषांचा, मुलांचा, मोठ्या मुलांचा गट अशा वेगवेगळ्या गटांच्या स्पर्धा होत. त्यात समर, नंदिनी, स्वरा आणि नीरजाने सुद्धा सहभाग घेतला. आणि त्यांच्या वयोगटात घेण्यात आलेल्या प्रत्येक सपर्धेत आपला झेंडा रोवला. स्पर्धेतील जास्तीत जास्त बक्षिसे राठोड कुटुंबाला म्हणजे नंदिनीच्या कुटुंबाला मिळाली. त्यामुळे कॉलनीत सगळ्यांना समजले की ‘ राठोड ‘ नावाचे नवीन कुटुंब आले आहे राहायला. आणि कॉलनीत त्यांची ओळख निर्माण झाली.

आई वडील आपल्या मुलीचं लग्न खूप थाटत लावतात. ह्याच अपेक्षेने की मुलीचा संसार सुखाचा व्हावा. पण खरंच असं होता का? सगळ्यांच्याच बाबतीत असं होत नाही. ही कहाणी आहे अशाच एक संघर्षाची. एका निरागस मुलीची. तिच्यावर झालेल्या अन्यायाची. तिने झेललेल्या संकटांची. जो घोड्यावर बसू देत नाही आणि पायीसुध्दा चालुदेत नाही, ज्याला आपण समाज म्हणतो अशा दुतोंडी, बघ्या, आणि कोणाच्याही परिस्थितीवर हसणारा, मजा बघणाऱ्या समाजाची. ही कथा आहे नंदिनीची. फक्त एकच नव्हे तर अशा अनेक नंदिनिंची.



नंदिनी... दिसायला सुंदर, गोल चेहेरा, किंचित मोठे डोळे, सरळ नाक, रंग गव्हाळ पण आकर्षक ठेवणं. लांब सडक केसांची नेहमी वेणी घातलेले. अगदी साधं राहणीमान. जीन्स घालणं माहीत नाही, घातलीच कधी तर फक्त कॉलेज डेज् च्या वेळी.
अगदी कमी बोलणारी. स्वयंपाक, घरकाम, अभ्यास, कलाकुसर सगळ्यात हुशार. नावं ठेवायला जागा नाही अशी ही सालस मुलगी.


आई -वडील, मोठा भाऊ, ती आणि लहान बहीण असं तिचं पाच जणांचं सुखी कुटुंब. नंदिनी लहान असताना तिची आई सतत आजारी असायची त्यामुळे कमी वयातच घराची जबाबदारी सांभाळली नंदिनीने. घरातली मोठी मुलगी म्हणून जरा जास्तच समंजस होती. तिच्या उलट तिची बहीण. खोडकर, बिनधास्त. आरे ला कारे करणारी. पण तिघा भावंडांमध्ये खूप प्रेम होतं.
नंदिनी सारखी सालस मुलगी आपली सून व्हावी असं कोणालाही वाटे. सगळे म्हणायचे “ नंदिनी ज्या घरात जाईल त्या घराचं सोनं होईल.”



चला तर मग बघुया नंदिनीची जीवनगाथा...



नंदिनी दहावीत होती. तेव्हा तिची आई खूप आजारी पडली. भाऊ होता पण कोणी बाई जवळ असणं गरजेचं होतं. त्यात गावाकडून कोणी येण्यासारखा नव्हतं. त्यामुळे केत्येक महिने तिची शाळा बुडली. परिस्थितीच अशी होती त्यामुळे तिला घरी राहणं भाग होतं. घरात इतर कामाला बाई लावलेली होती पण स्वयंपाक मात्र नंदिनी आणि तिचे बाबा मिळून करत असतं.


लहान बहिणीला तयार करून शाळेत पाठवायची जबाबदारी पण नंदिनीने उचलली. घरातलं आवरून आईला बघून उरलेल्या वेळात जमेल तसा अभ्यास ती करत होती. काही महिने असेच गेले त्यानंतर तिच्या आईची म्हणजे नीरजाची तब्बेत सुधारू लागली. तोपर्यंत नंदिनीची दहावीची परीक्षा तोंडावर आली होती. इतके महिने बुडालेला अभ्यास तिने घरीच केला. कोणता क्लास नाही की काही नाही. सगळं स्वतः केलं.


घाबरतच बिचारीने परीक्षा दिली. बघता बघता निकालाचा दिवस उजाडला. आपण नक्की नापास होणार ह्याची तिला खात्री होती. त्यामुळे ती निकाल बघायला शाळेत गेलीच नाही. पण निकाल काय लागला हे तर बघावच लागणार होतं ना? म्हणून समर म्हणजे तिचा मोठा भाऊ गेला.


थोड्यावेळाने समर घरी आला. त्याचा चेहेरा पडलेला होतं. त्याला बघूनच नंदिनी मोठ्याने रडायला लागली. तिची आई तिला समजावत होती. पण ती काही शांत होत नव्हती. समरने हळूच स्वराच्या म्हणजे त्यांच्या सगळ्यात लहान बहिणीच्या कानात काहीतरी सांगितलं. साधारण चौथीत असलेली स्वरा तशीच ती पळत बाहेर गेली आणि बाहेर स्कूटरला लटकवलेली एक पिशवी घेऊन परत आली. तो पर्यंत समर सुद्धा नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात दीपकराव सुद्धा ऑफिस मधून घेरी आली. त्यांना बघतच पप्पा मी फेल झाले म्हणत त्यांना मिठी मारत रडू लागली.


इतका वेळ गंभीर असलेला समरला मात्र आता जोरात हसू येत होतं. तो जोरात हसायला लागला आणि सोबत दीपकराव सुद्धा हसत होते.


“ मी नापास झाले आणि तुम्ही सगळे काय हसता आहात?” नंदिनी रागात बोलली.


तिच्याकडे हसत बघत समरने नंदिनी समोर मिठाईचा डब्बा उघडला. ती त्याच्या कडे बघत होती.


त्यातली एक मिठाई उचलत त्यानी नंदिनिला भरवली आणि म्हणाला “ वेडाबाई, गंमत करत होतो तुझी आम्ही. तू नुसती पास नाही झालीस तर फर्स्ट क्लासने पास झाली आहेस. आणि पप्पांना मी ऑफिसमध्ये फोन करून कळवल होतं. त्यामुळे त्यांना सुद्धा माहीत होतं.”


त्यावर सगळे हसायला लागले. नीरजाने देवापुढे मिठाई ठेवली. इतक्या कठीण परिस्थितीत आणि कमी वेळात. कोणताही क्लास नसताना स्वतः अभ्यास करून नंदिनी उत्तम गुणांनी पास झाली ह्याचं कौतुक सगळ्यांनाच होतं. तिच्या ह्या यशासाठी त्या रात्री सगळे बाहेर जेवायला गेले.


दुसऱ्या दिवशी तिचे आजोबा म्हणजे आईचे वडील त्यांच्या कडे आले. तिच्या ह्या यशाला बक्षीस म्हणून तिला त्यानी सायकल घेऊन देली. तिच्या आई वडिलांनी तिला कपडे घेतले.


अकरावीसाठी तिने पुढे सायन्स घ्यायचं ठरवलं. समरच्याच कॉलेज मध्ये तिने दाखला घेतला. सुट्टीचे दिवस संपले आणि नंदिनी कॉलेजला जाऊ लागली. तिच्या आजोबांनी दिलेल्या सायकल वरून. सगळं छान सुरू होतं. पण काही महिन्यांनी दीपकरावांची बदली झाली. आणि ते मुंबईला गेले. मुलांचं शैक्षणिक वर्ष अजून अर्ध बाकी होतं. ते संपलं की तुम्ही सगळे मुंबईला या असं ठरलं. त्यानुसार शाळा कॉलेज संपल्यावर सगळे मुंबईला शिफ्ट झाले.


नवीन ठिकाण. नवीन शाळा, कॉलेज. नवीन मित्र सगळंच नवीन होतं सगळ्यांसाठी.


हळू हळू सगळे रमत होते. विस्कटलेली घडी पुन्हा बसत होती. नवीन ठिकाणी स्वतः ला घडवत होते, परिस्थितीशी जुळवून घेत होते. नवीन घराची लवकरच सवय झाली सगळ्यांना. पण शाळा आणि कॉलेज मध्ये मात्र वेगळे चॅलेंजेस होते.


तिथे आधीच सगळ्यांचे ग्रुप झाले होते त्यामुळे नवीन येणाऱ्या मुलांना जुनी मुलं त्यांच्यात घेत नसतं. समर बोलका होता आणि मुलांमध्ये मुलींनसारखी गटबाजी जरा कमी होती. त्यामुळे तो सर्वात आधी रुळला. स्वरा सुद्धा बोलकी होती पण तिच्याशी शाळेत कोणी बोलत नसे. सहावीत असलेल्या स्वराने पहिली सहामाही परीक्षा होई पर्यंत एकटीनेच डब्बा खाल्ला. कोणी तिच्यासोबत बोलतच नव्हतं तर काय करणार ती.? परीक्षेत प्रथम क्रमांक आल्यावर सगळे तिच्याशी बोलायला लागले. त्यांनतर मात्र सगळ्यांशी तिची छान गट्टी जमली. सगळे चांगलेमित्रा झाले ते कायमचे.


नंदिनीला मात्र जरा जास्तच जड जात होतं. कारण ती आधीच अबोल होती. कशीबशी एक दोन मुलींशी तिची मैत्री झाली तीपण अगदी कामापुरती. मुलांशी तर ती बोलायचीच नाही. मित्र मंडळी कमी आल्यामुळे आणि सरळ स्वभावामुळे घर आणि कॉलेज इतकचं तिचं विश्व होतं. ट्यूशन सुद्धा घरीच होती तिची त्यामुळे तिथे सुद्धा मैत्रिणी बनायचा काही मार्ग नव्हता.


नीरजा सुद्धा आजूबाजूच्या बायकांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होती. शेजार चांगला होता त्यामुळे तिला जास्तं जड नाही गेलं. एकंदरीत सगळेच वेगवेगळी लढाई लढत पुढे जात होते. स्वतः ला सिद्ध करत होते.


दीपकराव आणि नीरजा खूप कष्टाळू होते. आज पर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी मिळाली नव्हती. शून्यातून त्यानी त्यांचा संसार उभारला होता. वडिलोपार्जित असं त्यांच्या जवळ काही नव्हतं. जे होतं ते सगळं स्वतः च्या कष्टाचं. संकटांशी लढत झगडत त्यानी त्यांच विश्व निर्माण केलं होतं. परिस्थितीनुरूप शक्य ते सगळे लाड करत आपल्या मुलांचे. कधी दुखवत नसतं. त्यांची हीच लढाऊ वृत्ती मुलांमध्ये सुद्धा आली होती. आली होती म्हणण्यापेक्षा त्यानी ती मुलांमध्ये रुजवली होती.


ते सतत मुलांना सांगत. “आयुष्यात सगळ्या गोष्टी सहज मिळत नसतात. आणि आपल्याला त्या मिळतील अशी अपेक्षा सुद्धा करू नका. कारणं सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत फार कमी असते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असो लढत रहा. मेहेनत करा. यश लवकर येणार नाही कदाचित तरी हार न मानता प्रयत्न करत रहा. ओळख, मानसन्मान तर मुळीच सहज मिळत नसतो. तो कमवावा लागतो हे कायम लक्षात ठेवा.”


मुंबईला येण्याआधी सुद्धा त्यानी मुलांना आयुष्याच्या ह्या कटू सत्याची जाणीव करून दिली होती. कारण औरंगाबाद आणि मुंबई यात खूप फरक होता. मुख्यतः विचारसरणीचा. त्याकाळात औरंगाबाद सुशिक्षित असलं तरी विचारांनी मुंबईच्या तुलनेत कमी पुढारलेलं होतं.


त्यांच्या ह्याच शिकवणीचा परिणाम म्हणून मुलं लढत होती. ओळख निर्माण करत होती. त्यात दीपकराव आणि नीरजाने मुलांना खूप साथ दिली.


हळू हळू सगळे रुळले. आता मुंबई त्यांना आवडू लागली होती. त्यांच एक नवीन विश्व निर्माण झालं होतं. आजूबाजूचा परिसर ओळखीचा झाला होता. त्यात भर म्हणून गणपतीचे दिवस आले. पाच दिवसांचा सार्वजनिक गणपती असायचा त्यांच्या कॉलनी मध्ये. त्यात रांगोळी, गायन, पाककृती, धावणे, कॅरम अशा अनेक वेगवेगळ्या सर्धा घेतल्या जात असे.


महिलांचा, पुरुषांचा, मुलांचा, मोठ्या मुलांचा गट अशा वेगवेगळ्या गटांच्या स्पर्धा होत. त्यात समर, नंदिनी, स्वरा आणि नीरजाने सुद्धा सहभाग घेतला. आणि त्यांच्या वयोगटात घेण्यात आलेल्या प्रत्येक सपर्धेत आपला झेंडा रोवला. स्पर्धेतील जास्तीत जास्त बक्षिसे राठोड कुटुंबाला म्हणजे नंदिनीच्या कुटुंबाला मिळाली. त्यामुळे कॉलनीत सगळ्यांना समजले की ‘ राठोड ‘ नावाचे नवीन कुटुंब आले आहे राहायला. आणि कॉलनीत त्यांची ओळख झाली.


एकंदरीत साधारण एका वर्षात सगळं सुरळीत सुरू झालं.


नंदिनीला आता बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा होता. तिला एकटीला जायचं नव्हतं म्हणून ती नीरजाला सोबत घेऊन गेली. त्यांनतर हा नियमच सुरू झाला. फॉर्म भरायचा असेल, फी भरायची असेल, दाखला घ्यायचा असेल, काहीही असो नंदिनी एकटी जात नसे, सोबत आईला घेऊन जात असे.




क्रमशः



प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all