नवी पहाट... भाग २०

" नंदिनी." म्हणत समर आणि वृंदाने तिला मिठी मारली. समर आणि वृंदाने तिला प्रेमाने गोंजाराले. नंदि?

नवी पहाट भाग २०

मागील भागात आपण बघितले…

" तो काय बोलेल. तोच खूप खोटारडा आहे. फसवले आपल्याला त्या लोकांनी. लग्ना आधी पगार पंचवीस हजार सांगितला. पण खरा पगार फक्त तीन हजार आहे. ऑफिस मध्ये त्याची माहिती सांगणारे त्याचेच मित्र. त्यांनी त्याच्या सांगण्यावरून खोटी माहिती दिली. 

आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा त्यानी सगळं सांगितलं. खरं तर तेव्हाच घरी सांगणार होते पण म्हटलं पागरच कमी आहेना, करू थोडी तडजोड. वाढेल पगार अजून सुरुवात आहे. म्हणून गप्प बसले." नंदिनी

आता पुढे…

" पण तो तुला जीव तर लावतो ना?" स्वप्नाने नेमका प्रश्न केला.

ह्या प्रश्नावर नंदिनी गप्प राहिली. काय सांगू आणि कसे सांगू असा प्रश्न तीला पडला होता. 

आपल्या संस्कृतीत अशा विषयांवर मोठ्यांशी बोलले जात नाही. त्यामुळे अनेक मुली गप्प बसतात आणि सहन करतात. नंदिनी ही त्यातलीच एक होती.

नंदिनीच्या डोळ्यातील बेचैनी स्वप्नाने हेरली.

"नंदिनी मला मैत्रीण समज आणि सगळं सांग बघू. मनात ठेऊन आता काही उपयोग नाही." सप्ना नंदिनीच्या मनात शिरायचा प्रयत्न करत होती.

" कसं सांगू मावशी? त्याचा जीव फक्त वासने वर आहे. त्याच्या स्पर्शात प्रेम जाणवतच नाही मला." मोजक्याच शब्दात नंदिनीने सगळे सांगितले.

नंदिनीच्या बोलण्याचा अर्थ आणि तिची व्यथा स्वप्नाच्या लक्षात आली. 

तितक्यात दाराची बेल वाजली. स्वप्नाने दार उघडले. समोर समर आणि वृंदा होते. दोघे लगबगीने आत आले. नीरजा, स्वरा, प्रज्ञा देखील आतून बाहेर आल्या.

" नंदिनी." म्हणत समर आणि वृंदाने तिला मिठी मारली. 

समर आणि वृंदाने तिला प्रेमाने गोंजाराले. नंदिनीला भेटून दोघे नीरजा आणि स्वराला भेटले. दोघी समर आणि वृंदाच्या गळ्यात पडून रडल्या.

" काय झालं? नीट सांग स्वरा. तुझा फोन आला आणि आम्ही धावतच निघालो. डॉक्टर बोलले की झोपेच्या गोळ्यांचा परिणाम कमी करेल हे औषध. काय प्रकार आहे सांग आम्हाला." समर काळजीने विचारात होता कारण, नक्की काय झाले आहे हे त्याला माहीतच नव्हते.

" स्वरा तू इतकी का थर थरत आहेस? आई काय झालं हिला?" स्वरा अजून देखील सावरली नव्हती. त्यामुळे अजून सुद्धा तिचे हात थर थरत होते. ते बघुन वृंदा विचारात होती.

" थांब सगळं सांगते तुझे बाबा येतीलच इतक्यात. त्यांच्या समोर सांगते." नीरजा असे बोलतच होती, तोच दीपकरवा आले. 

दीपकरावांना घडलेल्या प्रकाराची तीळ मात्र देखील कल्पना नव्हती. सगळ्यांना असे बघून नक्की काहीतरी घडले आहे ह्याचा अंदाज त्यांना आला होता. दीपकराव आल्या बरोबर कोणीच काहीच बोलले नाही. त्यांनी हातातली BAG नेहमीच्या जागी ठेवली. त्यातील डब्बा काढून टेबलवर ठेवला. सगळ्यांकडे एक हसरा कटाक्ष टाकला. सगळे असेच वर वर हसले. दीपकराव फ्रेश व्हायला आत गेले. ते फ्रेश होऊन आले तोंपर्यंत वृंदाने सगळ्यांसाठी चहा बनवला.

थोड्या वेळात दीपकराव फ्रेश होऊन बाहेर आले. हातात चहाचा कप घेतला आणि परत एक नजर सगळ्यांकडे बघितले. 

" काय स्वप्ना, प्रज्ञा काशा आहात दोघी? घरी कसे आहेत सगळे? आज बऱ्याच दिवसांनी आलात?" चहाचा पहिला घोट घेत दीपकरावांनी स्वप्ना आणि प्रज्ञाची चौकशी केली.

" आम्ही छान आहोत." स्वप्नाने बळीच हसत उत्तर दिले.

स्वप्नाच्या बोलण्यात नेहमीचा सहजपणा नव्हता. त्यामुळे घरात जे काही घडले आहे, ते एकतर हिच्या समोर किंवा हिला माहीत आहे ह्याची खात्री त्यांना झाली. थोडावेळ असाच गेला सगळे गप्प होते. 

दीपकरावांनी एक नजर समरकडे वळवली. तो जरा विचारात होता. त्यांनी नजरेनेच भुवया उंचावून 'काय झालं आहे?' अशी खूण केली. समरने खालचा ओठ जरा बाहेर काढत, दोन्ही खांदे उडवत, डोकं नाकराच्या मुद्रेत हलवत 'काही कल्पना नाही' ह्या अर्थाची खूण केली. आता दीपकराव सगळ्यांना बघत होते. नंदिनी आणि नीरजा खाली बघत होत्या. स्वराची नजर जरा अधीर वाटतं होती. हिलाच माहीत आहे काय झालं आहे ते. हे त्यांनी अचूक हेरले.

" स्वरा बाळा काय झालं आहे?" दीपकरावांना अचूक ठाऊक होते की, कोणता प्रश्न कोणाला विचारायचा. 

बाबांच्या प्रश्नावर स्वरा धावतच त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या मिठीत शिरली. स्वरा सगळ्यात लहान आणि दीपकरावांच्या जरा जास्तच लाडाची. तिचा सुद्धा त्यांच्यात जास्तच जीव होता. कधी एकदा बाबांना सांगते असं तिला झालं होतं.

स्वराच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला. परत एक नजर सगळ्यांकडे बघितले. नंदिनी आणि नीरजा सुद्धा रडत होत्या.

" बाळा, उगी हो बरं आता. मी आलो आहे ना? काय झालं सांग बघू मला." दीपकराव स्वराला समजावत होते.

त्यांच्या ह्या प्रश्नावर स्वराने इती पासून अहा: पर्यंत सगळे सांगितले. सांगताना तीचे हुंदके थांबत नव्हते. हात अजून पण कापत होते.

" खूप हिमतीची आहे माझी लेक. देवाची कृपा तू वेळेत उठलीस आणि योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली. पण मला का फोन केला नाहीस?" दीपकरावांना प्रश्न पडला.

" तुम्ही ट्रेन मध्ये होतात बहुतेक त्यामुळे तुमचा फोन लागला नाही. मग विचार केला की घरी आल्यावर सांगू उगाच तुम्हाला टेन्शन येईल." इति स्वरा

" बरं. नंदिनी इकडे ये बाळा. आम्हाला न सांगता हा मार्ग तुला सोपा वाटला ? अगं एकदा तरी आमचा विचार करायचा होता. तुला काही झालं असतं तर आमचं काय झालं असतं?" खरंतर दीपकरावांना नंदिनीचा राग येत होता पण. तिच्यावर चिडून काही उपयोग नव्हता. तिला समजून घेणे गरजेचे होते.

"डोक्यावर पडली होतीस का गं? किती वेळा विचारलं तुला तेव्हा एक शब्दं बोलली नाहीस आणि आता इतकं मोठं पाऊल उचललं. आता तरी सांग काय झालं आहे. चांगला धडा शिकवू त्या लोकांना." समर सगळं ऐकून चांगलाच चिडला होता.

" शांत हो समर. तिच्या वर चिडून काय होणार? आधीच ती खचली आहे." वृंदा समरला शांत करत बोलली.

" मी बोलले नंदिनीशी." स्वप्नाने आता चर्चेत भाग घेतला.

स्वप्नाने सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून सगळे चांगलेच संतापले होते. 

" ह्या लोकांची इतकी हिम्मत की माझ्या बहिणीचा जीव घ्यायची भाषा करतात." समर बोटं मोडत बोलत होता.

" नंदिनी तू हे सगळं आधीच सांगायला पाहिजे होतं. जीव देऊन काय मिळालं असत तुला?" आता वृंदा सुद्धा चिडली होती.

" ते लोकं खूप वाईट आहेत. आणि परत समाजाचा विचार डोक्यात आला. मी असं माहेरी आले तर स्वराशी कोण लग्नं करेल? हेच सांगून ते मला नेहमी गप्प बसवत. त्या दिवशी नीरज आला होता तेव्हा तेच सांगून गेला." नंदिनीने अजून एक कारण सांगितले.

" तिच्या नशिबाने तिचं जे होईल ते होईल. समाज काय पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही बसू देत नाही. अशा समाजाचा काय विचार करायचा. आमच्या साठी आमची मुलगी आणि तिचा जीव महत्त्वाचा. एका मुलीसाठी आम्ही दुसऱ्या मुलीचा बळी नाही देऊ शकत." नीरजा चांगलीच गरजली.

" तू माझा विचार करू नकोस. मला लग्नाची गरज नाही. पुढे बघू काय ते. मुलांचा काही काळ नाही पडलेला. आणि तू जीव दिल्यावर केलं असतं मी लग्नं, असं वाटतं का तुला? ताई तुझी बहीण खंबीर आहे. लोकांना काय विचार करायचा करू दे. अशा बुरसटलेल्या विचाराच्या समाजात लग्नं करून राहण्या पेक्षा मी एकटी राहील. आणि माझ्या नशिबात जे असेल ते होईलच, त्या साठी तू का सहन करावं? अजिबात नाही. तू सहन करणार नाही." स्वराच्या डोळ्यात आग होती.

सगळे बोलत होते. दीपकराव मात्र शांत होते. 

" हॅलो. बापू उद्या नंदिनीला घ्यायला येणार आहेत ते. तुम्ही पण या जरा. त्या दिवशी होतात ना तुम्ही. आता पण तुमच्या समोर होऊ देत." दीपकरावांनी मध्यास्थी मामांना फोन करून बोलावून घेतले.

त्यांच्या बोलण्याकडे सगळे बघत होते.

" असे बघू नका. मी काही माझ्या मुलीला मारण्यासाठी पाठवणार नाहीये. पण ह्या प्रकरणाचा जाब विचारनार आहे मी. म्हणून बापूंना बोलवलं. नंदिनी परत जाणार नाही. " दीपकरावांच्या नजरेत एक वेगळाच क्रोध होता. 

थोड्यावेळात स्वप्ना आणि प्रज्ञा निघून गेल्या. कोणालाच जेवणाची इच्छा नव्हती. दीपक राव नंदिनी जवळ गेले.

" बेटा आमच्यावर विश्वास नव्हता का तुझा? जे हे पाऊल उचलले?" दीपकरावांच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते.

" नाही बाबा, असं काही नाही. तुम्हाला त्रास नको स्वराच्या भविष्या साठी. हे केलं मी. त्या लोकांच्या हातून मरण्या पेक्षा इथे माझ्या लोकांमध्ये मरण चांगल. असा विचार केला. पण आता मला माझी चूक कळली आहे.मी परत असं कधीच करणार नाही. मी वचन देते सगळ्यांना." नंदिनी सगळ्यांना वचन देत बोलली.

पुढे बघू नंदिनीच्या सासरचे काय म्हणतात? काय असेल त्यांची प्रतिक्रिया?

क्रमशः

© वर्षाराज

प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all