नवी पहाट...भाग १७

" बाबा, माफ करा मी आलो नाही. खरं तर मला यायची खूप इच्छा होती पण, आई पुढे काही चाललं नाही माझं. 'आपण सो

मागील भागात आपण बघितले…

निताच्या एकदम अशा वागण्यामुळे दीपकराव एकदम चक्रावले. ह्या बाईने सुनेच्या तब्बेतीची साधी विचारपूस केली नाही, आणि वरून तोऱ्यात मुलगी ठेवून घ्या बोलते. खरं तर दीपक रावांना निताचा खूप राग आला होता. त्यांनी लगेच मध्यस्ती मामांना फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. 

दुसरी कडे नंदिनीची तब्बेत काही सुधारत नव्हती. आठ दिवस होऊन गेले नंदिनी ॲडमिट होती. विशेष म्हणजे नंदिनीच्या सासरचे कोणीच म्हणजे, नीरज सुद्धा नंदिनीला बघायला आला नाही, इतकचं काय त्यांनचा एक फोन देखील आला नाही. 

आता पुढे…

आठ दिवसांनी मध्यस्थी मामांचा दीपकरावांना फोन आला.

" नमस्कार भाऊ." मध्यस्थी मामांनी बोलायला सुरुवात केली.

दीपकरावांनी सुद्धा नमस्कार केला.

" कशी आहे नंदिनी? मिळाला का डिस्चार्ज?" काय म्हणतात डॉक्टर?" मामा प्रार्थमिक विचारपूस करून परिस्थितीचा अंदाज घेत होते. 

" बापू, अजून मिळाला नाही तिला डिस्चार्ज. दोन दिवसांनी मिळेल. आता जरा सुधारणा आहे. पण समाधानकारक नाही. अजून आराम सांगितला आहे डॉक्टरांनी." दीपक रावांनी खरी परिस्थिती सांगितली.

" सासरच्यांचा काही फोन? किंवा तुम्ही केला होता का त्यांना फोन? " मामांनी मुळ मुद्यला हात घातला.

" नाही, त्यांचा काही फोन नाही. कोणी आलं नाही. आणि त्यांच्या त्या दिवसाच्या वागण्यामुळे मी सुद्धा फोन केला नाही. आता तर स्पष्टच दिसतं आहे की, त्यांना माझ्या मुलीची काही काळजी नाही. म्हणून तर कोणी भेटायला तर दूरच पण, एक फोन सुद्धा केला नाही. इतर जाऊद्या पण नीरज देखील आला नाही." दीपक रावांच्या आवाजात राग जाणवत होता. 

" भाऊ, शांत व्हा. मी त्यासाठीच फोन केला आहे. तुमचा फोन आल्यावर दोन दिवसांनी मी गेलो होतो त्यांच्या कडे. त्यांना त्यांची चूक समजली आहे. पस्तावा होतो आहे. आणि त्या ताई जे वागल्या त्यामुळे, त्यांना लाज देखील वाटते आहे. आणि म्हणून त्यानी फोन केला नाही की, भेटीस आले नाहीत." मामा त्यांची बाजू सावरत बोलत होते.

" बापू, मला हे मान्यच नाही. तुमच्या सुनेची तब्बेत बरी नाही आणि तुम्ही साधं एक फोन करू शकत नाही. कमीत कमी बायकोसाठी नीरजचा तरी एक फोन यायलाच पाहिजे होता. " दीपकरावांचा पारा चांगलाच चढला होता.

" भाऊ, असं रागात राहून मुलीचं संसार मोडेल. तुम्हाला काही बोलली का नंदिनी ? 'की तिला काही त्रास आहे?' काही सांगितले का तिने इतक्या दिवसात? तुम्ही विचारलं का तिला?" मामांनी प्रश्न केला.

" काय बोलत आहात बापू तुम्ही.? अहो तिची परस्थिती काय आहे. अशा अवस्थेत काय बोलेल ती आणि मी काय विचारू तिला?" दीपकराव अजूनच भडकले.

"भाऊ, मी साधं विचारलं. तिला मुळात काही त्रास नाहीच तर काय सांगेल ती तुम्हाला ? हा विषय इथेच थांबवा. आणि प्रकरण जास्तं न लांबवता नंदिनीला डिस्चार्ज मिळाला की, दोन तीन दिवसात पठवून द्या. ते लोक घेतील तिची काळजी. ती आता फक्त तुमची मुलगी नाही तर, त्यांची सून देखील आहे." मामा जरा तुसडेपणाने बोलत होते 

" हे बघा बापू. नंदिनीशी बोलल्यावर आम्ही ठरवू काय करायचे ते. आणि राहिला प्रश्न काळजीचा तर, मला एक सांगा त्यांना इतकी काळजी आहे तिची, तर यायला पाहिजे होत त्यानी लगेच तिला भेटायला. कमीत कमी एक फोन करता आला असता. त्यांनी तसं काहीच केलं नाही उलट तुमची मुलगी ठेऊन घ्या म्हणालेत मला. ही काय पद्धत झाली वागण्याची?

दुसरी गोष्ट,नंदिनी इतके दिवस तिथेच होती. काय काळजी घेतली त्यानी त्यांच्या सुनेची? काळजी घेतली असती तर आज माझी मुलगी त्यांच्याकडे असती दवाखान्यात नाही. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आधी मग बघू पुढे काय ते. आणि हो नंदिनी पूर्ण बरी झाल्याखेरीज तिला पाठवायचा प्रश्नच येत नाही. " दीपकरावांनी स्पष्ट नकार देत फोन ठेवून दिला.

दोन दिवसांनी नंदिनी घरी आली. अजून सुद्धा तिच्यात त्राण नव्हते. घरातील सगळे तिच्या सेवेत रुजू झाले. चार दिवसांनी संध्याकाळी दाराची बेल वाजली. दीपकरावांनी दार उघडले. समोर नीरज होता. दीपकरावांना खरे तर खूप राग येत होता. पण तरी त्यानी त्यांची मर्यादा न ओलांडता नीरजचे हसून स्वागत केले. नीरज आत आला. नीरजा, दीपकराव, समर त्याच्या समोर बसले. सगळेच गंभीर होते. वृंदाने पाणी दिले. सगळ्यांच्या नजरा त्याला बघत होत्या. पाण्याचे दोन घोट त्याने घेतले. पण सगळ्यांच्या नजरेने ते सुद्धा त्याच्या घशात अडकत होते.

" बाबा, माफ करा मी आलो नाही. खरं तर मला यायची खूप इच्छा होती पण, आई पुढे काही चाललं नाही माझं. 'आपण सोबत जाऊ माफी मागायला नंदिनीला बरं वाटलं की, असा तिचा हट्ट होता.' पण आज न राहून आलो मी. आईला माहीत नाही की, मी इथे आलो आहे." नीरज त्याची बाजू मांडत बोलत होता.

" नीरजराव तुम्ही येऊ शकला नाहीत. पण कमीत कमी ऑफिसमधून एक फोन तर करता आलाच असता तुम्हाला." दीपकरावांच्या आवाजात रुक्ष पणा होता.

" हो, चुकलंच माझं. खरं तर मी खूपच घाबरतो आईला. मी फोन केला, असं तिला कळलं तर काय होईल? ह्या विचारानेच मी फोन केला नाही ." नीरज परत स्पष्टीकरण देत होता.

नीरजची सबब न पटण्यासारखी होती. 'फोन करायला घाबरणारा आज न सांगता कसा आला?' हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. दीपकराव पुढे काही बोलणार तितक्यात..

" बाबा, नंदिनी कशी आहे? मला तिच्याशी बोलायचे आहे. तिची माफी मागायची आहे. हरकत नसेल तर एकट्यात बोलू का तिच्याशी." नीरज

" ती आत आहे. उठवत नाही तिला. तुम्ही जा आत, बोला तिच्याशी." नीरजा 

नीरज उठून नंदिनीच्या खोलीत गेला. नंदिनी झोपलेली होती. त्यानी तिच्या डोक्यावर हात ठेवला त्यामुळे तिला जाग आली. 

" कशी आहेस? हे बघ मी तुझ्या साठी हा अर्ज आणला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख चार दिवसांची आहे. मला वाटतं तू बी.एड कारावास. " नीरज

नंदिनी ने नुसतीच मान डोलावली. दोनच मिनिटात नीरज बाहेर आला.

" तिला खूप अशक्त पणा आहे. आराम करुदेत तिला. मी आता निघतो." नीरज

दीपकराव आणि नीरजाने जेवणाचा आग्रह केला पण, नीरज थांबला नाही. धावती भेट घेऊन तो निघून गेला. नीरज गेल्यावर सगळे नंदिनीच्या खोलीत गेले.

" नंदिनी, काय गं म्हणालेत जावई? इतक्या लवकर झालं पण बोलून तुमचं ?" नीरजा

नंदिनी ने तो बी. एड चा फॉर्म दीपकरावांना दिला. पण काही बोलली नाही.

" नंदिनी तुला काही त्रास आहे का तिथे? असेल तर स्पष्ट सांग. तुझा वडील समर्थ आहे तुझ्या साठी लढायला. अजिबात काळजी करू नकोस." दीपकरावांनी नंदिनीला सरळ प्रश्न केला.

" हो आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. पण काही लपवू नकोस तू आमच्या पासून. जे असेल ते सांग." नीरजा आणि समर एकदम बोलले.

"नाही मला काहीच त्रास नाही. बाबा हा ॲडमिशनचा फॉर्म भरून द्याल का? त्यांची इच्छा आहे की, मी बी.एड करावं." नंदिनी निर्विकार पणे बोलत होती.

" अगं मग तुझी तब्बेत इतकी कशी खराब झाली? तू काहीतरी लपवते आहेस." नीरजा काळजीने विचारात होती.

" आई, अगं नवीन आहे तिथे मी. सवय नाही तुमच्या पासून दूर राहायची. बाकी काही कारण नाही. मी आता झोपते." नंदिनी बोलून झोपून गेली.

त्या नंतर सगळे बाहेरच्या खोलीत आले. 

घरात कोणालाच तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. पण आता करणार काय? ती काहीच सांगत नव्हती. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याखेरीज काहि पर्याय नव्हता.

" नंदिनी जरी बोलत असली तरी माझा तिच्या बोलण्यावर विश्वास नाही." नीरजा

" हो. माझा पण नाही." समरने नीरजाला दुजोरा दिला.

" आपण अजून काही काळ वाट बघू. मग ठरवू काय ते. तो पर्यंत त्या लोकांचा पण निरोप येईलच काहीना काही. पण इतक्यात तिला पाठवायचे नाही. बी. एड करते तर करुदेत." दीपकराव विचारात बोलत होते.

नंदिनीची तब्बेत आता सुधारत होती. बी. एड चा अर्ज देखील करून झाला होता. आठ दिवसांनी एका रविवारी अचानक निता, नालिन, नीरज आणि मध्यस्थी मामा घरी आले. नीरजाने हसून सगळ्यांना आत येण्याची विनंती केली. 

" नीरजाताई, दीपक भाऊ. मी तुमची मनापासून माफी मागते. मी जे वागले ते चुकीचेच होते. पण माझ्या मनात मात्र पाप नाही हो. त्या दिवशी दुसऱ्या कोणा कारणावरून आधीच माझी चीड चीड झाली होती. त्यामुळे कुठचा राग कुठे निघाला. नंतर माझी मलाच लाज वाटत होती." निता डोळ्यात पाणी आणून बोलत होती.

नालीन आणि नीरजने सुद्धा माफी मागितली. सगळ्यांनी खूप विनवणी केली. निताने नंदिनीसाठी येताना फळ आणली होती ती देत, नंदिनीच्या डोक्यावर हात फिरवला. 

नंदिनी काही बोलत नव्हती. त्यामुळे तिला न पाठवण्याचे काही कारण सांगता येत नव्हते. त्यामुळे दीपक रावांनी तिला पाठवण्यास होकार दिला. पुढच्या रविवारी तिला घेऊन जाऊ असे ठरले. आणि मंडळी निघून गेली. जाताना निताने नंदिनी कडे कटाक्ष टाकला. त्यात एक छद्मी हास्य होते. ज्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. पण तिच्या नजरेतील 

छद्मी पणा नंदिनीच्या काळजाचा थरकाप करून गेला.

शिल्लक कारण होते. थोडक्यात निभावले. म्हणत सगळ्यांना समाधान झाले. नंदिनी देखील खोटे खोटे हसत होती. खुश असल्याचा मुखवटा घालून वावरत होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

पुढील भागात बघू काय होते नियतीच्या मनात. नंदिनी सासरी जाईल की नाही. सत्य सगळ्यांच्या समोर येईल की नाही? आणि आलेच समोर सत्य तर ते कशा प्रकारे येईल. वाटते तितकी सोपी आहे का ही गोष्ट किबजून काही वाढून ठेवले आहे दीपकराव आणि नीरजाच्या समोर?

क्रमशः

© वर्षाराज

प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all