नवी पहाट... भाग १६

नीरजा आणि दीपकराव दवाखान्यात खुर्चीवर बसले. डोक्यात विचारांचे वादळ उठले होते. मनात असंख्य प्र?

मागील भागात आपण बघितले…

दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी लवकर उठलीच नाही. बऱ्याच दिवसांनी तिला अशी झोप लागली होती. आठ वाजता दीपक राव प्रेमाने त्यांच्या लाडक्या लेकीला उठवायला गेले. त्यांनी मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्यांना धक्काच लागला. नंदिनी तापाने फणफणत होती. दीपकरावांनी लगेच ताप मोजला. तिला १०२ ताप होता. 

दीपकरावांनी त्वरित डॉक्टरांना फोन करून घरीच बोलावून घेतले. डॉक्टरांनी काही रक्त तपासण्या केल्या. संध्याकाळी रिपोर्ट्स आल्यावर डॉक्टरांनी दीपकरावांना दवाखान्यात बोलावून घेतले. आणि त्यांनी जे काही सांगितले त्यामुळे आधी तर दीपकराव आणि नीरजा त्यानंतर समर, वृंदा, स्वराच्या पायाखालची जमीनच सरकली.

आता पुढे…

दीपकराव आणि नीरजा डॉक्टरांच्या त्वरित भेटीला गेले. 

" काका, स्पष्ट सांगतो आहे. नंदिनीचे रिपोर्ट्स चांगले आले नाहीत. तिच्या रिपोर्ट्स नुसार तिच्या अंगात रक्तच नाहीये. म्हणजे शरीरात जितकं रक्त असतं त्या पेक्षा खूप कमी आहे. म्हणून तिच्या डोळ्यांखाली काळे वर्तुळ आले आहेत. मला तर नवल वाटते आहे की, ह्या अशा परिस्थितीत ती उभी कशी होती. खूप अंगावर काढलं तिने आणि म्हणून इथे आल्याबरोबर सगळं बाहेर निघालं.

काका - काकू, तुम्ही तिच्याशी बोला. तिला नक्कीच काहीतरी त्रास आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की तिला बरं वाटल्याशिवाय सासरी पाठवू नका."... डॉक्टर राहुल दीपक रावांना सांगत होते. डॉक्टर राहुल सात आठ वर्षांपासून दीपकराव आणि त्यांच्या कुटुंबियांचे डॉक्टर होते त्यामुळे त्यांचे एक मेकांशी आपुलकीचे नाते होते. त्यामुळे डॉक्टर राहुल दीपकरावांना काकाच म्हणत त्यात डॉक्टर वयाने सुद्धा खूप लहान होते. 

डॉक्टरांचे बोलणें दीपकराव आणि नीरजा ऐकत होते. त्यांना तर काय बोलावे सुचेना. 

" डॉक्टर, 'काही त्रास आहे का तुला?' असं आम्ही तिला कित्येकदा विचारले. पण ती कधीच काहीच बोलली नाही." नीरजा काळजीच्या स्वरात बोलत होती.

" काकू, ती आधीच अबोल आहे. त्यात आपला त्रास आई बाबांना सांगून त्यांना दुःख होईल, असा तिने विचार केला असेल. किंवा खरंच नसेलही काही त्रास. पण रिपोर्ट्स बघून असं वाटत नाही की काही त्रास नाही तिला. तुम्ही बोला किंवा तिच्या मैत्रिणीला सांगा बोलायला कदाचित तुम्हाला नाही पण मैत्रिणीला बोलेल काही.

काका, सध्याची तिची परिस्थिती बघता, उपचारासाठी मी तिला दोन चार दिवस ॲडमिट करून घेतो. तुम्ही तिला घेऊन या." डॉक्टर राहुल बोलत होते.

डॉक्टरांशी बोलून दीपकराव आणि नीरजा बाहेर आले. दवाखान्यातून त्यानी घरी फोन केला. 

" समर, नंदिनीला घेऊन ये दवाखान्यात. तिला ॲडमिट करावं लागणार आहे." दीपक रावांनी फोन ठेवला. पण त्यांच्या चेहेऱ्यावर चिंतेची छटा होती. 

नीरजा आणि दीपकराव दवाखान्यात खुर्चीवर बसले. डोक्यात विचारांचे वादळ उठले होते. मनात असंख्य प्रश्न होते पण त्यांची उत्तरे फक्त नंदिनी देऊ शकत होती.

" नीरजा तिला बरं वाटू देत. मग बोलू आपण तिच्याशी." दीपकराव विचारातच बोलत होते.

" हो, मला पण असच वाटतं, तुम्ही तिच्या सासरी फोन करून सांगून द्या की तिला बरं नाहीये. बरं वाटलं की पाठवू आम्ही ." नीरजा बोलत होती तितक्यात समर आणि नंदिनी 

आले. 

नंदिनीला चालता सुद्धा येत नव्हते. समर तिला आधार देत घेऊन आला होता. डॉक्टरांनी नंदिनीला ॲडमिट करून घेतले. दिपकरावांनी औपचारिकता पूर्ण केल्या. दोघांचे चेहरे बघून समरला अंदाज आला होता की काहीतरी गंभीर विषय आहे. नीरजा नंदिनी जवळ बसली. दीपक राव आणि समर दावाखण्याबाहेर थांबले.

" बाबा,काय झालं आहे?" समरने विचारले.

दीपकरावांनी समरला सगळी हकीकत सांगितली तसा तो पण विचारात पडला. 

" बाबा आपण बोलू ती घरी आली की. पण खरं सांगू? नीरज मागे तिला घ्यायला आला होता, तेव्हाचे त्याचे वागणे आवडले नव्हते मला." समरने त्याचे मन मोकळे केले. 

" आवडलं तर मलाही नाही समर. पण असं एकदम काही बोलता येत नाही जावयाला. त्यात नंदिनी सुद्धा इतक्या दिवसात काही बोलली नाही. मग आपण कसे बोलणार काही.?" दीपकराव

" बाबा किती कमाल आहे त्या लोकांची. सामान बोलावून घेतले, पण आज पर्यंत पैसे काही दिले नाही. आणि त्या बद्दल बोलत सुद्धा नाही." समर

" मलाही ते खटकत आहे समर. ह्या लोकांच्या मनात नक्की काय आहे काही कळत नाही. " दीपकराव

" बाबा जोपर्यंत नंदिनी काही सांगत नाही तो पर्यंत आपल्याला काही कळणार नाही. तिच्याशी बोलावंच लागेल. " समर थोडा रागात थोडा काळजीत बोलत होता. 

थोड्यावेळाने समर, नंदिनी आणि नीरजा साठी जेवणाचा डब्बा घ्यायला निघून गेला. दीपकराव नंदिनी आणि नीरजा सोबत आत वॉर्डात बसले होते. नंदिनीला सलाईन लावली होती. ताप आणि अशक्तपणामुळे नंदिनी झोपून गेली. 

नीरजा आणि दीपकराव त्यांच्या लाडक्या लेकीची अवस्था बघून बेचैन होत होते. समरने घरी जाताच वृंदा आणि स्वराला सगळी बातमी सांगितली. त्या दोघी सुद्धा विचारात पडल्या.

" दादा आम्ही पण येतो तुझ्या सोबत दवाखान्यात." स्वरा

" नको, तुम्ही घरी थांबा. मी जाऊन येतो. येताना बाबांना घेऊन येतो. उद्या सकाळी आई घरी येईल फ्रेश व्हायला, तेव्हा तुम्ही दोघी जा. तिच्या जवळ सतत कोणी तरी पाहिजे. " समर स्वराला सांगत होता. 

वृंदा आणि स्वराने स्वयंपाक आधीचच करून ठेवला होता. नंदिनीसाठी मऊ मुगाची खिचडी बनवली. समर नीरजा आणि नंदिनीचा डब्बा घेऊन गेला. सोबत स्वराने तिच्या आई आणि ताई साठी ब्रश, टूथ पेस्ट, आईसाठी रात्री झोपायला बेडशीट काही बिस्कीट आणि देवाचा अंगारा दिला.

नंदिनीला जबरदस्ती खाऊ घालून दीपकराव आणि समर घरी आले. त्या दिवशी कोणालाच जेवण गेले नाही. अन्नाचा अपमान नको म्हणून सगळ्यांनी जबरदस्ती दोन घास पोटात ढकलले. दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपक रावांनी नंदिनीच्या सासरी फोन केला. 

" हॅलो ताई, नमस्कार." दीपकराव

" नमस्कार भाऊ." निता

" ताई, नंदिनीला काल पासून खूप ताप आहे. काल रात्री तिला ॲडमिट करावे लागले. दवाखान्यातून यायला उशीर झाला म्हणून रात्री फोन केला नाही मी." दीपकराव नम्र पणे सांगत होते.

" बरं मग? " निताने कोरड्या आवाजात प्रश्न केला. ज्याचे दीपक रावांना नवल वाटले.

" ताई, नंदिनीला आज काही पाठवता येणार नाही. तिला बरं वाटल्यावर पाठवतो आम्ही. तुम्ही काळजी करू नका." दीपकराव 

" हे बघा, पाठवायचे असेल तर आजच पाठवा. आणि इतकीच जर तुमची लेक लाडाची असेल, तर कायमची ठेवून घ्या तुमच्या कडे. " निताने रागात बोलून फोन ठेवला.

निताच्या एकदम अशा वागण्यामुळे दीपकराव एकदम चक्रावले. ह्या बाईने सुनेच्या तब्बेतीची साधी विचारपूस केली नाही, आणि वरून तोऱ्यात मुलगी ठेवून घ्या बोलते. खरं तर दीपक रावांना निताचा खूप राग आला होता. त्यांनी लगेच मध्यस्ती मामांना फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. 

दुसरी कडे नंदिनीची तब्बेत काही सुधारत नव्हती. आठ दिवस होऊन गेले नंदिनी ॲडमिट होती. विशेष म्हणजे नंदिनीच्या सासरचे कोणीच म्हणजे, नीरज सुद्धा नंदिनीला बघायला आला नाही, इतकचं काय त्यांनचा एक फोन देखील आला नाही. 

पुढील भागात बघू नंदिनी तिला होणाऱ्या त्रासबद्दल घरी सांगेल का की नाही?

माझ्या वाचक मित्रांनो. . दीपक रावांनी "नंदिनीला लगेच पाठवत नाही, बरं वाटलं की पाठवतो". असे सांगून बरोबर केले की नाही. ? तुमचा अभिप्राय द्या.

क्रमशः

© वर्षाराज

प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all