नवी पहाट...भाग १५

" बरं मी काय म्हणते नीरजा ताई. स्वराला उद्या पाठऊन द्या सकाळीच. थांबेल तिच्या ताई सोबत दिवस भर. ब?

मागील भागात आपण बघितले….

" आता काही नकोय मला. तुला सांगितलं तर तू नाही आणलेस आणि वरून तुझ्या बाबांनी हे बिलांचे कागद दिले मला. " …नीरज जरा रागावून बोलत होता.

" पण ते का देतील ह्या सामानाचे पैसे. ? " …नंदिनी

" का ? मुलीसाठी इतकं करू शकत नाहीत का? आता हा विषय नको. चल घरी आता. " …नीरज

नीरजच्या बोलण्यावर नंदिनी त्याच्याकडे बघतच राहिली. आपला निर्णय चुकला ह्याची पहिली जाणीव तिला त्या वेळेस झाली. 

आता पुढे…

नंदिनी आणि नीरज घरी पोहोचले. निता सुद्धा जरा रागातच होती. पण तेव्हा ती काही बोलली नाही. 

" नंदिनी पहाटे चार वाजता उठायचं रोज. मला आवडत नाही उशिरा उठलेलं. " … निता असे बोलून निघून गेली. तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. 

नंदिनीने घड्याळाला पहाटे चारचा अलार्म लावला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यावर नंदिनीने आधी अंघोळ केली त्यानंतर घराची झाडलोट, पुसपास केली. तोपर्यंत पाच वाजले होते. त्या नंतर तिने नीरज, नलिनराव आणि वरून साठी डब्बा बनवला. साडे सहा , सातला सगळे घरातून चहा आणि डब्बे घेऊन निघून गेले. त्यानंतर निता आणि नंदिनी दोघीच घरी होत्या. नंदिनीने निता आणि स्वतः साठी चहा केला. नाश्ता बनवला. निताने चहा आणि नाश्ता नाक मुरडतच खाल्ला. किचन अवरून नंदिनी तिच्या खोलीत गेली. तोच निताने आवाज दिला. 

" नंदिनी इकडे ये." … निता

निताचा आवाज येताच नंदिनी तिच्याकडे गेली. निता किचन मध्ये होती.

" हे काय आहे. ही भाजी अशी करायची नाही. मला आवडत नाही. आणि हा चमचा इथे का ठवला? हा वर त्या कपाटात असतो." … निता रागात बोलत होती.

" आई मला अजून आवडी निवडी नीट माहीत नाहीत. तुम्ही सांगा तसं बनवेल मी. आणि घरात कोणती वस्तू कुठे असते हे सुद्धा अजून कळलं नाहीये." … नंदिनी नम्रपणे बोलत होती.

" ठिक आहे. म्हणून सांगते आहे तुला मी. आणि आता झाडलोट करून फारशी पुसून घे. बघ नऊ वाजलेत अजून आवरलं नाही तू." … निता

" आई मी सकाळीच सगळं आवरलं आहे. तुम्ही झोपला होतात म्हणून तुम्हाला दिसलं नाही." … नंदिनी

" जागीच होते मी. बघितलं की तू आवरलं सकाळी. पण आता परत कर. आणि संध्याकाळी चार वाजता परत झाडलोट करायची आणि फारशी पुसून घ्यायची."... निता तोऱ्यात बोलत होती.

" आई, संध्याकाळी झाडलोट तर करेलच मी. पण फारशी पुसायची गरज नाही. "... नंदिनी

" हे बघ ह्या घरात माझ्या नियमांनी वागायचं. उगाच हक्क दाखाऊ नकोस तू. मी सांगितले ते कर. आणि हो फक्त इतकच नाही तर घरातलं सगळं फर्निचर सुद्धा दोन्ही वेळा पुसायच. फ्रीज पुसायचे. चल आता कामाला लाग त्यानंतर आपल्यासाठी स्वयंपाक कर. मग आपण माझ्या खोलीची साफ सफाई करू जरा. "... निता

नंदिनी आधीच अबोल, घाबरट. नीताचे बोलणें निमूट पणे ऐकून घेतलं आणि परत कामाला लागली. घर आवरून, स्वयंपाक केला. जेवणं झाल्यावर निता आणि नंदिनीने निताची खोली अवरली. अर्थात रूम खराब नव्हतीच पण तरी सगळं परत आवरून, संध्याकाळची साफ सफाई केल्यावर परत संध्याकाळचा स्वयंपाक त्यात पण जो येईल त्याला तेव्हा गरम पोळी करून द्यायची त्यामुळे तिचे काम सुरूच होते. सगळ्यांची जेवणं झाली. त्या नंतर किचन स्वच्छ करून भांडी घासून झोपायला तिला बारा वाजले. नंतर नीरजचा हट्ट पूर्ण करून झोपायला अजूनच उशीर झाला. दुसऱ्या दिवशी परत चार वाजता उठली. आता हे रोजचेच झाले होते. दिवसा काही ना काही काम सुरू असायचे. आणि रात्री झोपायला उशीर त्यामुळे नंदिनीला फक्त तीन तास झोप मिळत होती. 

त्यात पण सतत टेन्शन असायचे की वेळेत जाग आली पाहिजे नाहीतर सासू काय म्हणेल. सतत भीती असायची.

नीरजा दोन दिवस आड फोन करायची. नाहीतर निता नीरजाला फोन करायची. नंदिनी हसून सगळ्यांशी बोलायची. कधीच कोणती तक्रार तिने केली नाही. त्यामुळे कोणाला काही शंकाच आली नाही.   

दोन आठवडे असेच गेले. नीरजाने नंदिनीला पाच दिवस झाले फोन केला नाही.

" काय गं काय सांगितले आईला पाच दिवस झाले फोन आला नाही त्यांचा?"... निता

" नाही आई काहीच बोलले नाही मी." नंदिनी घाबरून बोलत होती.

नंदिनीकडे बघतच निताने नीरजाला फोन लावला. 

ट्रिंग ट्रिंग… फोनची घंटी वाजली.

नीरजा स्वयंपाक घरात होती. घाई घाईने येत नीरजाने फोन उचलला.

" हॅलो नीरजाताई नमस्कार. मी निता बोलते आहे." …निता डोळ्यात राग आणि ओठावर हसू ठेऊन बोलत होती.

" हॅलो, हो हो निताताई नमस्कार." …नीरजा सध्या मनाने बोलली.

" काय झालं ताई? काही चुकलं आमचं? पाच दिवस झाले फोन नाही केला तुम्ही." …निता

" अहो, नाही नाही ताई. तसं काही नाही. लेकीच्या घरी सतत फोन करणं बरं दिसत नाही. म्हणून फोन केला नाही मी. तुम्ही उगाच गैरसमज नका करून घेऊ." नीरजाने खरं करणं सांगितले. 

" अहो तुमची मुलगी आहे नंदिनी अगदी रोज बोलतजा तिच्याशी. तुम्हाला आणि तिला बरं वाटेल. आमची काहीच हरकत नाही बरं." … नीताच्या मनात एक आणि ओठांवर एक होते. 

नंदिनी बिचारी सगळं ऐकत होती. 

" बरं मी काय म्हणते नीरजा ताई. स्वराला उद्या पाठऊन द्या सकाळीच. थांबेल तिच्या ताई सोबत दिवस भर. बरं वाटेल आमच्या नंदिनीला." … निता

" अहो ताई असं बरं वाटत नाही. बहिणीच्या सासरी जाणं." …नीरजा

" ते काही नाही. तुम्ही तिला पाठवाच. मी वाट बघेल." …निता काही ऐकायला तयार नव्हती.

थोडावेळ बोलून दोंघिनी फोन ठेवला. 

" मम्मा मी अजिबात जाणार नाहीये ताईकडे. तू मला आग्रह करू नकोस आधीच सांगते आहे." नीरजा काही बोलायच्या आतच स्वराने नकार घंटा वाजवली.

" स्वरा अगं जा. बघ ताई बरी आहे का? तू गेलीस तर तिला आधार वाटेल. घरचे कसे आहेत ? ह्याचा जरा अंदाज येईल आपल्याला. आणि वेळ मिळेल तसं तिला विचार की काही त्रास नाही ना तिला. फोन वर सगळ्यांच्या समोर तिला काही बोलता येत नसेल. तू गेलीस तर तुला सांगेल तरी ती. तसे ते लोक असे काही वाटतं नाही. पण कमीत कमी त्यानी इतका आग्रह केला आहे तर जा.".. वृंदा स्वराला समजावत होती.

" बरोबर आहे वृंदाचे. मी पण तेच बोलणार होते. तू जा." …नीरजा 

नाईलाजाने स्वरा दुसऱ्या दिवशी नंदिनीच्या घरी गेली. तसं पहिल्यांदाच ती एकटी जात होतो त्यामुळे घरा जवळच्या स्टॉपवर वरून तिला घ्यायला आला होता. साधारण दुपारी बाराला स्वरा तिथे पोहोचली. निताने खूप प्रेमाने तिचे स्वागत केले. नंदिनीशी तर तिचे वागणे इतके प्रेमळ होते की स्वराला जरा सुद्धा शंका आली नाही. निताने स्वतः स्वराच्या आवडीचे पदार्थ बनवले होते. दुपारी सगळ्यांची जेवणं झाली. नंदिनीने नेहमी प्रमाणे सगळं किचन आवरून घेतले. 

" नंदिनी अगं सकाळ पासून उभी आहेस. जा दोघी जरा आराम करा आता." …निता

" नको आई मी ठिक आहे. " नंदिनी घाबरत पण त्याच बरोबर चेहेऱ्यावरचे भाव लपवत बोलत होती.

" अगं आराम गरजेचा असतो. जा असं ही दुपार आहे आणि आता काही काम नाही जा दोघी आराम करा." असं म्हणत निता निघून गेली.

नंदिनी आणि स्वरा दोघी नंदिनीच्या खोलीत गेल्या. आराम करायचा म्हणून स्वरा दार लोटणार तोच नंदिनीने " उघडच ठेव नाहीतर गरम होतं जास्तं. " असे म्हणून दार उघडेच ठेवायला लावले. 

दोघी असच गप्पा मारत होत्या. 

" ताई मी बघते आहे, तू खूप थकलेली दिसते आहेस. बारीक पण झालीस. काही त्रास आहे का तुला? मला सगळं सांग. मी सांगेल घरी." स्वराने संधी साधून दबक्या आवाजात विचारले.

" नाही गं. काही त्रास नाही. सगळं नवीन आहे. ॲडजेस्ट करायला वेळ लागेल ना मला. त्यामुळे थोडं सांभाळून वागते मी. इतकचं बाकी काही नाही." … नंदिनी उसणा आव आणत बोलत होती.

" ताई खरं सांग." स्वरा

" खरंच काहीच नाही. काळजी करू नका." … नंदिनी इतक्या हसून बोलत होती की स्वराला तिच्या चेहेऱ्यावर त्रासाची लकीर पण दिसली नाही. 

संध्याकाळ झाली. स्वरा सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेली. घरी सगळा इति वृत्तान्त सांगितला. तरी निरजाच्या मनात शंकेची पाल चूक चुकतच होती. शेवटी आईचे मन ते.

बघता बघता महिना झाला. नंदिनी मात्र सगळं सहन करत होती.पहिला आषाढ होता नंदिनीचा, त्यामुळे रीती नुसार पहिला आषाढ तळायला नंदिनीला दोन दिवस माहेरी आणायचे होते. नीरजा आणि दीपकरावांनी नंदिनीच्या घरच्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. ठरल्या दिवशी नंदिनी आणि घरचे सगळे दीपक रावांच्या घरी गेले. आणि नंदिनी दोन दिवसांसाठी माहेरी थांबली. 

" काय गं अशी दिसते आहेस? निताताई पण बोलत होत्या मला. की नंदिनीच्या चेहेऱ्यावर नवीन नवरीचे तेज दिसतच नाही. तुम्ही समजावा तिला. बघ कसे काळे वर्तुळ आलेत डोळ्यां खाली तुझ्या. नीट खात जा जरा. "... सगळे गेल्यावर नीरजा जरा रागावून बोलत होती.

"बरं" म्हणून नंदिनी झोपायला निघून गेली.

" वृंदा. तू बोलून बघ. मला वाटतं नंदिनी काही लपवत आहे. तुम्ही एकाच वयाच्या तर ती तुला सांगेल काही." नीरजा

" हो बोलेल मी तिच्या शी. काळजी करू नका."... वृंदा

दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी लवकर उठलीच नाही. बऱ्याच दिवसांनी तिला अशी झोप लागली होती. आठ वाजता दीपक राव प्रेमाने त्यांच्या लाडक्या लेकीला उठवायला गेले. त्यांनी मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्यांना धक्काच लागला. नंदिनी तापाने फणफणत होती. दीपकरावांनी लगेच ताप मोजला. तिला १०२ ताप होता. 

दीपकरावांनी त्वरित डॉक्टरांना फोन करून घरीच बोलावून घेतले. डॉक्टरांनी काही रक्त तपासण्या केल्या. संध्याकाळी रिपोर्ट्स आल्यावर डॉक्टरांनी दीपकरावांना दवाखान्यात बोलावून घेतले. आणि त्यांनी जे काही सांगितले त्यामुळे आधी तर दीपकराव आणि नीरजा त्यानंतर समर, वृंदा, स्वराच्या पायाखालची जमीनच सरकली.

पुढील भागात पाहू डॉक्टरांनी असे काय सांगितले. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे 

क्रमशः

© वर्षाराज 

प्रिय वाचक मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात लिहिले जाणारे प्रसंगाचे वाचनाच्या दृष्टीने नाटकीय रूपांतर केले आहे. तरी कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. कोणी दुखावले गेल्यास क्षमा असावी. ही घटना एका व्यक्तीची आहे. कोणीही वयक्तिक संदर्भ लावू नये. तुम्हाला माझी कथा कशी वाटली. हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा नवी पहाट. आणि लाईक करायला विसरू नका.