Feb 06, 2023
Readers choice

सुंदर आमचं घर... ते ... घर घर की कहानी ?

Read Later
सुंदर आमचं घर... ते ... घर घर की कहानी ?

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, 

तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

 

मराठी मध्ये घराचं वर्णन करणारी किती सुंदर विशेषणे आहेत. नांदतं घर, भरलेलं घर, हसतं खेळतं घर, गोकुळ. ह्या सगळया उपमां, त्या घराच्या एकदर दर्जा किंवा डामडौलापेक्षा त्या घरातील माणसांविषयीच बरच काही बोलून जातात. 

 

टुमदार कौलारू घर, छोटंसं सडा मर्जन केलेलं अंगण, अंगणात तुळशी वृंदावन,  दोन-चार गुलाब, मोगरा, गुलबक्षी ची झाडं, पारिजातकाचा सडा, सुंदरशी सोपी रांगोळी, दाराला तोरण, समोरच ओटी वरची बैठक, माजघरातला किरकिरणारा झोपाळा, पडवीतली चूल, जातं, मागच्या विहिरीवरचा गडगडता

रहाट,  त्या मागच्या केळी, आंबा पोफळीच्या बागेतून येणारा वारा... काय मनानं पोहोचलाय ना सासरी, माहेरी, आजोळी, किंवा एखाद्या लाडक्या मराठी सीरियल मधल्या घरात? पण खर सांगायचं. तर हे मनात जपलेलं घर, किंवा त्याच चित्र प्रत्यक्षात बऱ्याचशा लोकांना व्यावहारिक किंवा प्रापंचिक कारणामुळे अनुभवता येत नाही, अपवाद काही भग्यावंतांचा एखाद महिना तरी वर्षातून गावी जावून राहता येत.

मी शहरातच वाढले असल्यामुळे, मी बघीतलेली आहेत ती शहरातली, बिल्डिंग मधली घर. त्यांचा काडेपेटी सारखी छोटी घरं म्हणून बराच उपमर्द ही होतो. पण त्या घरांनाही एक कॅरॅक्टर असतं. 

कारण... ? घर माणसानं मुळे बनतं, माणसं आली की characterization पण आलच की.

 

आमच्या ओळखीत एक जण होते, त्यांचं घर कधीही जा, पसरलेल. दार उघडल्यावर बरोबर हा मोठा चपलांचा ढीग, त्याच ढिगाऱ्यात आपली चप्पल सरकवयची , पण परत जाताना पटकन मिळेल ह्या हिशेबाने. दाराच्या बाजूला असलेल टीव्हीचं कपाट, त्याच्यावर धुळीला बसायला सुध्दा इंचभरही जागा नाही., सोफे, दिवाण, बेडरूम मधील बेड, डायनिंग टेबल, ओटा सगळीकडे वस्तूच वस्तू. पुस्तकं, कॅसेट्स, कंगवे, purses, bags, सुकलेले दांडी वरून (बाईने) काढलेले  कपडे,  बाजारातून आणलेल्या भाज्या, वर्तमान पत्रे सगळे आनंदाने कुठेही रमलेले दिसतील. मग आलेल्यानेच सोफ्यावरच मासिक उचलून बाजूला पुस्तकांच्या ढीगार्यावर टाकून स्वतःल बसायला जागा करायची ...आता सांगा घर अस्ताव्यस्त की माणसं बेशिस्त.

 

तर आमच्या नात्यातल्या एक बाई, त्यांचं घर एकदम आरशासरख लखलखीत. पांढरी शुभ्र संगमरवरी फरशी,  पाढरी शुभ्र कपाट, चकचकीत ओटा, कधी स्वयंपाक करतात की नाही असा प्रश्न पडावा. दारा बाहेरच चप्पल काढायची आणि दारातच आतल्याबजुला कपाट होत त्यात हाताने उचलून ठेवायची... चुकून एखादा चप्पल आतमध्ये काढायला लागला तर लगेच काका केरसुणी आणि केरभरणं घेऊन येणार, पाहुण्यांसमोर लगेच केर भरणार, म्हणजे आल्या आल्या पाहुणा खजील आपण उगाच ह्यांच्या घरी येऊन कचरा केला. त्यांच्या कडे बसताना सुद्धा एकदम बिचकायला होई, ना जाणो चुकून डोकं भिंतीला लागलं, तेलाचा डाग पडला, त्यांच्या शुभ्र लादिवर चहाच सांडला..ह्या भीतीने लोकं त्यांच्याकडे च हाच काय पाणी पण घ्यायला घाबरायची.

एकदा हात पुसायला म्हणून मी एक बाजूला तारेवर वाळत घातलेला नॅपकिन घेतला, तर त्या पळतच आल्या " अग अग थांब तो लादी पुसायचा पोछा आहे." मी दचकून बघितलं " अरे हा आपल्या घरी ताट पुसायला पण खपून जाईल..इतका स्वछ!!" मग हे घर आरस्पानी की ही अतिशिस्तीची माणसं?

 

एकदा एक बाई आम्ही नवीनच घेतलेल्या घरात आल्या, त्यांनी पण बाजूच्याच बिल्डिंग मध्ये नवीन घर घेतलेलं. काही निमित्त काढून आल्या. मी काही कधी कुणाला घर दाखवायच्या भानगडीत पडताच नाही, इन मिन तीन खोल्या, घर सुरू झालं  की संपत. आणि म्हणा दाखवण्यासारखे असेल तर माणूस दाखवेल ना? तर असो त्यांनी हिंडून स्वतः च बघितलं. बहुदा त्या हिरमुसला असाव्यात. जाताना मला आग्रहाचं निमंत्रण देऊन गेल्या. त्यांच्या घरी दारातच स्वागताला अगडबंब फिश tank. मग तो कसा बँगलोर मधून मगवलाय, त्याचतले मासे अजून कुठून magvlet, त्याच पाणी कुठून आणतात, वगैरे वगैरे अर्धा तास ते आख्यान झाल्यावर मग बाकीचं घर. त्यांच्या मुलींची डॉल हाऊस कम स्टडी कम बेड रूम, त्यातले तीन चार हजार रुपयांचे स्टिकर्स, त्यांचे लिव्हिंग रुम मधलं सेंटर कम डायनिंग टेबल कम चेअर, त्यांच्या वार्डरोबला लावलेले वेताचे पडदे, त्यांचा सात फुटी लांब मास्टर बेड (कारण नवरा उंच होता).. मला भीती वाटायला लागली की आता वॉर्डरोब उघडून अजून काय काय प्रापंचिक दर्शन घडवतायत. 

"पुलंच्या त्या सैतान कम कुलकर्ण्यांच्या अपरधाचा बदला तू म्या पामरीवर का घेत्येस ?" असं दहा वेळेला तरी जिभेवर आलेलं मी गिळून टाकलं.

शेवटी काहीतरी कारण सांगून दीड ते दोन तासांनी घोटभर चहा सुद्धा न घेता (त्यांच्या तावडीतून) सटकले.

 

आता आताच आमच्या परिवारातील कोणी खूपच पॉश वस्तीत, पॉश घर घेतलं. खुप महाग घर, तेवढच महाग इंटिरिअर. अगदी मासिकात शोभतील  इतके सुंदर फोटो होते. घरातून दिसणारा सुंदर सूर्यास्त, त्या सोनेरी प्रभेत बुडलेली अख्खी दुनिया..अगदी अस्मान ठेंगणं वाटावं! कधीतरी जाऊन एक दोन दिवस राहूनच येऊ. घराचं पण कौतुक आणि घरवल्यांच पण कौतुक! पण काही कारणाने माझं  जाणं पुढे पुढे ढकलत होत. मग मध्ये त्यांचाच फोन आला. आता त्यात त्या अतीव सुंदर घराविषयी न बोललो तरच आश्चर्य. 

"आम्ही घरात जेवत नाही"

मी दचकले, " म्हणजे?"

"अग म्हणजे पाहुणे वगैरे आले की त्यांना बाहेरच घेऊन जातो, किंवा क्लब हाऊस वर नेतो आणि तिकडेच बाहेरून मागवतो. इतकं छान इंटिरिअर केलंय.. मला ते अजिबात खराब नाही करायचंय. मी म्हणून मग डायनिंग टेबल च नाही ठेवलं मुद्दामून"

" तेव्हा ठीक आहे, पण मग रोजचं काय? घरी जेवतच नाही? सोफ्यावर डाग पडू नये म्हणून?"

"रोजचं काय ? उभ्या उभ्याच जेवतो..."

आता माझं डोकं गरगरायला लागलं, येवढे पैसे देऊन घेतलेल्या, एव्हढ्या सुंदर घरात आपणच आरामात राहायचं नाही? अगदी आरामात जाऊदे पण सुखाने शांतपणे आपल्याच कमाईचे दोन घास खाता येऊ नयेत. म्हणजे सुंदर घर आपल्या राहण्यासाठी की त्या सुंदर घराच्या शोकेस मध्ये आपण काचकड्याच्या बाहुल्यांसारखे .. आणि शोभे साठी म्हणावे तर मग माझ्यासारखी ने (स्वतःचे आरशातले रुपडे) बघून ती लक्ष्मण रेषा ओलांडूच नये... 

आणि आता जर तुम्हाला उत्सुकता असेल तर आमच घर... 

इकडे अमेरिकेला आल्यावर, पहिल्यांदाच माझी बहीण आली. दारातून चप्पल काढता काढता तिचा पहिलाच प्रश्न " अरे हे काय? इकडे पण तुम्ही असेच राहता???"

"अग तिकडे काय आणि इकडे काय, अगदी अंटार्क्टिका वर गेलो तरी घरातली माणसं तिचं आहेत ना? " माझं थंड उत्तर.

आता ह्यावरून मी, माझी बहिण, आमचं घर( खर तर घरातली माणसं) सगळाच अंदाज तुम्ही बांधला असणारे.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prerana Kulkarni

Freelancer, Writer, Homemaker

मी एक (आधीची careerist बाई आणि आताची ) सामान्य गृहिणी, दोन वाढत्या मुलांची आई. वाचनाची लहानपणापासून खूप आवड. एकदा असंच पुस्तक वाचत असताना मनात आलं कि आपल्या सामान्य आयुष्यातही असे कित्येक गमतीशीर, तर कधी काळजाला चटका लावून जाणारे, आपल्याला धडा शिकवून जाणारे प्रसंग घडतात. एखाद्या उदास क्षणी तेच आपल्याला उभारी देतात, ओठांवर खुद्कन हसू आणतात. कॅव्हिडच्या नकोशा दिवसांमध्ये तर प्रकर्षाने जाणवले की त्या गोष्टी आपण लिहून काढल्या आणि इतरांनाही वाचायला मिळाल्या तर कदाचित ते किस्से त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणतील. शाळा- कॉलेज सोडल्यावर कधीही काही न लिहिलेल्या मला खूप दडपण आले, एक अनामिक भीती वाटली. पण तेव्हा धावून आले ते आपले लाडके पु. लं., त्यांच्याच आवाजातील "राजहंसाचे चालणे असेल मोठ्या डौलाचे, पण म्हणून इतरे जणांनी चलोच नये कि काय ?" ह्या उक्तीने मला धीर दिला. यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्याही बाबतीत थोड्याफार फरकाने घडतच असतील. तुम्हाला आवडल्या तर जरूर कळवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये नक्की शेअरकरा.