Mar 02, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी

सुंदरी

Read Later
सुंदरी
सुंदरी

(सदर कथा काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


"चला सगळे, काल आपण काय शिकलो होतो? सांगा सांगा पटकन. मीना, तू उठ बरं. बोल मी काल काय शिकवले होते तुम्हाला?" असे बोलून सुंदरी तिच्या खुर्चीत जाऊन बसली.

मीना हळूच उठली खाली मान घालून उभी होती. नुकतीच ह्या वातावरणात आलेली असल्याने ती सध्या जास्तच बुजरी आणि अबोल झाली होती.

पायाचा अंगठा खालच्या कोबा असलेल्या जमिनीवर खरडत ती नुसती उभी होती. सुंदरीने पुन्हा आवाज दिल्याने ती भानावर आली. तिने बोलायला सुरुवात केली, "काल तुम्ही अभंग शिकवला होता."

सुंदरीने हलकेच हसून तिला विचारले, "कोणी लिहिलेला अभंग होता? त्याचा अर्थ काय होता?"

मीना अजूनही सुंदरीला जरा घाबरतच होती. पण तरीही तिने बोलायला सुरुवात केली,"जे का गांजले…गांजले, त्यासी म्हणे तो ना पुरे. रामदास स्वामींचा आहे अभंग."

सुंदरीने जरा वैतागून मीनाला विचारले, "ए वेडाबाई, काल शिकवलेले नीट वाचले आहे की नाही? रामदास स्वामी नाही तुकाराम महाराजांचा आहे हा अभंग! तुझ्या पण किती चुका आहे. त्यांनी सांगितले की जो अडीअडचणीत समोरच्याची मदत करतो तोच खरा माणूस. त्याच्यातच खरा देव दडलेला आहे. तोच साधू, समजले का? तुला मोठी होऊन प्राध्यापिका व्हायचं आहे बोलली होतीस ना? आता अभ्यास कर नाहीतर तुझं स्वप्न बोंबललं समज."

मीनाने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या जागेवर बसली.

तितक्यात तिथे चमेली आली. चमेली पण सुंदरीसोबत एकाच खोलीत राहत होती. पण दोघींचा स्वभाव आणि विचार यांच्यात खूप विरोधाभास होता. सुंदरीचे असे लहान मुलांना शिकवणे तिला आवडत नव्हते. चमेली ह्याबद्दल सारखे तिला टोमणे देत असे. आजही तिला खोलीत मुलांना शिकवत आहे हे बघून चमेलीच्या कपाळावार आठ्या आल्या. तरीही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता कंबर लयबद्ध हलवत ती खोलीत आली. आपल्या डाव्या हाताला हनुवटीखाली घेऊन हसू लागली.

सुंदरीला तिचे असे शिकवताना येणे आवडत नव्हते. आता चमेली काय नवीन घेऊन आली हे जाणून घेण्यासाठी तिने न राहवून विचारले, "काय ग चमेली? का आलीस इथं? तुला इथे यायला आवडत नाही ना."

चमेली नाक मुरडतच म्हणाली, "सुंदरी, मला तुझा हा फालतूपणा नाही आवडत."

सुंदरी जरा नाराज होऊन म्हणाली, "चमेली, अगं याला फालतूपणा नको बोलूस शिक्षण आहे हे. जशी जागरण करून एका देवीची पूजा करतो तशी ह्या देवीची आराधना गं अभ्यासातून."

चमेली तटस्थपणे म्हणाली, "पण सुंदरी ह्याचा आपल्याला काय उपयोग? शेवटी आपलं नशीब फुटकं आहे हे विसरू नकोस. आपल्याला येऊन न येऊन सगळं सारखंच. तू नाही का.."

सुंदरी तिचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाली, "थांब गं, पुरे आता जास्त बोलू नकोस. सगळे इथेच बसले आहेत. पण तू इथे का आली ते तर सांग?"

चमेलीने डोकं खाजवत सांगितले, "अगं सुंदरी, ते गोदाम्माने सगळ्यांना बोलावले आहे. ते आज नाच शिकवायला नवीन कथक डान्सर आलीये, सगळ्यांना खाली बोलावले आहे. तुला नसेल यायचे तर येऊ नकोस असं पण तिने सांगितलं आहे. चला सगळे पटकन."

गोदाम्मा म्हणजे एकदम कडक स्वभावाची आणि जरा बेरकी व्यक्तिमत्व. गोदाम्मा नाव ऐकले तर सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडत असे. तिला सगळे त्या वस्तीची डॉन म्हणत असत. पण याला एकच अपवाद होता तो म्हणजे सुंदरी. सगळे जण पटापट हातातली वह्या पुस्तके खाली ठेऊन निघून गेले.

चमेली काकूळतीने सुंदरीला म्हणाली, "अगं सुंदरी, का इतकं कष्ट घेतेस? शिक्षण वगैरे आपले काम नाही. आपण फक्त नाचायचं, टाळ्या वाजवून पैसे कमवायचे आणि वेळ पडल्यास कोणाच्या शरीराची भूक मिटवायची. बाकी काय करू शकतो गं आपण? आणि ह्या मुली जरी असल्या तरी ह्यांच्या आया पण.. आपल्याला कुणी बसमध्ये बसायला जागा देत नाही.. हे नोकरी वगैरे लांबच राहिले." (आणि डोळ्यातले अश्रू पुसत खोलीबाहेर गेली.)

चमेली बोलून निघून गेली, पण सुंदरीच्या डोळ्यात पाणी देऊन गेली. खरं तर चमेली काय चुकीचे बोलत होती, एक किन्नर किंवा साध्या भाषेत बोलायचे तर तृतीयपंथी म्हणून जगताना खूप अवघड जात होते. एकीकडे समान कायदा वगैरे होता पण दुसरीकडे असे वातावरण. तिने बाल्कनीतून बाहेर पाहिले तर दोन दिवसांपूर्वी एका जोडप्याने नुकतेच चार पाच महिन्यांचे बाळ आणले होते. ते बाळ तृतीयपंथी आहे हाच काय त्या बाळाचा दोष होता. दुसरे तृतीयपंथी त्या बाळाला बळेच दूध पाजत होते. पण ते काही केल्या रडणं थांबवत नव्हते. सुंदरीला त्या बाळाला बघून रडूच कोसळले. पण तिने स्वतःच्या भावना मनात दाबून ठेवल्या आणि खोलीत येऊन आसवे गाळू लागली. तिला तिचे लहानपण आठवले. तिच्या आई वडिलांनी तिचे नाव सुहास ठेवले होते. अवघे बारावे वर्ष, तिला आपल्या आयुष्याच्या सत्याविषयी कळले, की ती ना धड स्त्री होती ना पुरुष. घरात लहानपणी सगळे तिला घालून पाडून बोलत होते. लहान वय असल्याने काही कळत नव्हते. तशी अभ्यासाची आवड आणि हुशारी तिच्याकडे होती म्हणून काय तिचा नेहमीच शाळेत पहिला क्रमांक यायचा. पण एक दिवस असेच तिचे बाबा परस्पर तिला इथल्या किन्नर वस्तीत सोडून गेले. आठवण म्हणून फक्त आईसोबतचा तिचा एक फोटो होता आणि गळ्यात एक चांदीची चैन, बाकी काहीच तिला आठवत नव्हते. नंतर आईवडील कधी वळून बघायला सुद्धा आले नाहीत. थोडा वेळ डोकं शांत झाल्यावर ती स्वतःच्या हातातले सामान घेऊन खोलीबाहेर निघाली. तिने रोज पैसे मागून उदरनिर्वाह करण्यापेक्षा कष्ट करून पैसे कमवायची जिद्द धरली होती. ती बाजारातल्या एका कोपऱ्यात हातगाडीवर टिकल्या, बांगड्या, कानातले विकायची.

खोलीबाहेर आली तर गोदाम्मा तिला उपहासात्मक बोलली, "जिसका काम उसको साजे, दुजा करे तो डेंगा बाजे!"

हा गोदाम्माने तिला दिलेला एका प्रकारचा टोमणा होता. तिने गोदाम्माला टाळत आपला रस्ता धरला.

नेहमीची वाट धरून ती बाजारात गेली. आता जिथे साखर तिथे मुंग्या असणे साहजिकच आहे. काहीजणांना सुंदरीचे असे वस्तू विकणे पसंत नव्हते, पण तरीही कितीही विरोध झाला तरीही ती मागे हटली नव्हती. ती रोज तिच्या हातगाडीवर सामान विकायची. बाजारातल्या काही बायका मात्र तिच्या असण्याने निर्धास्त असायच्या.

आज तिला पोहचायला जरा उशीर झाला, तर तिच्या हातगाडीवर अपूर्वा नावाची एक हुशार आणि चुनचुणीत मुलगी उभी होती. ती नेहमीच या वाटेवरून तिच्या घरातून शाळेत आणि शाळेतून घरी जायची. येता जाता तिने सुंदरीला केलेले स्मितहास्य आणि कुणाच्या नकळत हळूच उंचावलेला हात, हाच काय त्या दोघींमधला संवाद होत होता. सुंदरीला वाटत होते की तिने एकदा त्या मुलीशी बोलावे आणि त्या मुलीलाही तसेच वाटत होते, पण त्या ठिकाणच्या एका चांगल्या प्रस्थ असलेल्या पाटलाची एकुलती एक कन्या असल्याने तिने तिच्याशी बोलणे टाळलेच होते. ती अपूर्वा मात्र अल्लड आणि बाबांची लाडकी अशी बेधुंद होती. ती आवर्जून सुंदरीला "बाय सुंदरी ताई " असे बोलून रोज ती ह्याच वाटेने निघून जायची. आपण स्वतः कोण, आपले अस्तित्व काय याचा ठावठिकाणा शोधणाऱ्या सुंदरीला ताई बोललेले ऐकून आधी जरा वेगळेच वाटले होते. पण अपूर्वाचा गोड आवाज ऐकून ती मनोमन सुखावत होती. वस्तीत सुंदरी आक्का आणि गोदाम्माच्या तोंडून नको असलेला शब्द म्हणजे चिकणी ऐकून तिचे कान विटले होते.

आज नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे "अष्टमीचा", खूप खास दिवस होता. अपूर्वाला बघून तिच्या मनाची कळी खुलली. अपूर्वा धावतच तिच्यापाशी आली आणि म्हणाली,"ताई कुठे होतीस? किती वेळ झाला मी तुझा वेट करतेय? मला सायन्स ऑलिंपियाडमध्ये बघ हे बक्षीस मिळाले."


"अरे वा! एक मुलगी खूप हुशार आहे. शाब्बास! पण काय गं, तू हे दाखवायला माझ्याकडे आलीस? तुझ्या बाबांना कळले ना, तर मला पण त्रास आणि तुला पण. जा बरं तू आपल्या घरी." सुंदरी आपसूक म्हणाली. सुंदरीच्या हातगाडीला पहिला विरोध त्यांचाच होता.

हे ऐकून अपूर्वा किंचित नाराजीच्या सुरात म्हणाली,"मला फक्त माझ्या मापाच्या त्या रेड बांगड्या हव्यात."

सुंदरीने तिला बांगड्या काढून दिल्या. अपूर्वाने पटकन बांगड्या हातात घातल्या.

"कितीला आहेत बांगड्या?" अपूर्वा हातातल्या बांगड्यांशी खेळत म्हणाली.

"तश्या तर ऐंशी रुपयाला आहेत. पण काय आज एका मुलीला बक्षीस मिळाले, तर आज तिला फक्त साठ रुपयाला." सुंदरी तिच्या विक्रेता असलेल्या लकबीत म्हणाली.

अपूर्वाने तिला पैसे काढून दिले तितक्यात तिथे अपूर्वाचे बाबा आले आणि म्हणाले,"अपूर्वा, तुम्हाला किती वेळा सांगितले ह्याच्याकडून काही घ्यायचे नाही. काढा त्या बांगड्या, द्या तिला परत."

"साहेब राहू द्या, हवं तर पैसे नका देऊ. आज अष्टमी आहे, हातातल्या बांगडया नका हो काढू." सुंदरी काकुळतीने म्हणाली.

मुलीच्या रडकुंडीला आलेल्या चेहऱ्याकडे बघून अपूर्वाच्या बाबांना राहवले नाही. त्यांनी शंभर रुपयांची नोट सुंदरीच्या दिशेने भिरकावली आणि मुलीला घेऊन जाऊ लागले. तितक्यात सुंदरीने त्याना अडवले, "थांबा पाटील, बांगड्या साठ रुपयाला आहेत. हे बाकीचे चाळीस रुपये." सुंदरी पैसे पुढे करत म्हणाली.

पाटील जरा गुर्मीतच म्हणाले, "चाळीस रुपये आहेत फक्त, ठेव चहा पाण्याला. तसंही तू कमावतोस किती?"

"साहेब कष्टाची कमाई खाते मी, वरचा एकही रुपया मला पचणारा नाही. हे घ्या तुमचे पैसे, माझी आत्ताच बोहनी झालीये." आणि सुंदरी हातगाडीपाशी आली.

पाटलाला सुंदरीच्या वागण्याचा खूप राग आला. पण आपण काही केले तर अपूर्वाच्या मनावर परिणाम नको व्हायला म्हणून त्याने तिला बळेच घरी पाठवले आणि आपल्या खास माणसांना घेऊन सुंदरीच्या हातगाडीपाशी आला. ती काही बोलण्याच्या आधी त्याने आणि त्याच्या माणसांनी तिच्या सगळ्या वस्तू फोडून टाकल्या. तिला काही कळण्याच्या आत तिच्या वस्तू होत्याच्या नव्हत्या झाल्या होत्या. कोणीही पुढाकार घेऊन तिच्या मदतीला आले नाही. प्रत्येक वेळी त्यांना आर्थिक मदत करणारी सुंदरी, तिथल्याच लोकांना परकी होती.

तिचा तो तुटलेला, फुटलेला, अस्ताव्यस्त पडलेला, स्वाभिमानाने जगण्याचा आधार पाहून ती कपाळाला हात लावून बसली होती आणि आसवे गाळत होती. तिने हळूहळू सगळ्या वस्तूंची जमवाजमव केली. ज्या वस्तू सुस्थितीत होत्या त्यांना पुन्हा रचून विकू लागली. दुपार टळली, तिन्हीसांज झाली. सुंदरी सामान विकत होती, पण अन्नाचा एकही कण तिच्या पोटात गेला नव्हता. अपमानाचे घोट गिळल्यावर कोणाला पोटाची भूक आठवणार?

. इतक्यात एक जण धावतच बाजारात आला, "अरे ऐका.. ऐका.. कोणाचं रक्तगट ओ निगेटिव्ह आहे का? पाटलांची पोरगी गच्चीवरून पडून रक्त गेलंय,जास्त रक्त हवंय."

कोणीच काही बोलेना. कोणीही पुढे आले नाही. सुंदरी पुढे आली आणि म्हणाली, " मी आहे, ओ नेगेटिव्ह. काय रे हणम्या कुठल्या दवाखान्यात दाखल केलंय पोरीला? मी देते रक्त."

"त्ये तिकडं मागच्या आळीत." हणम्या म्हणाला.

सुंदरी घरी जाण्याच्या तयारीतच होती. ती हणम्यासोबत जात असताना बाजूच्या पताभाऊने तिला अडवले, "अगो, तुझं आज त्याने नुकसान केला आणि त्याच्या पोरीला का वाचवते तू? चांगला नाय त्यो माणूस."

"तुम्ही मला सकाळी मदत केलीत का भाऊ? नाही ना. मग पाटलाला वाईट म्हणणारे तुम्ही कोण?" एवढे बोलून सुंदरी दवाखान्यात आली.

पाटलांशी एकही शब्द न बोलता, ती डॉक्टरांशी बोलली, "डॉक्टर, हा बघा माझा रिपोर्ट, मी रक्त देऊ शकते. मी रक्त दिलेले चालेल ना? मला खंडाच्या सुपारीचेही व्यसन नाहीये. मी बडीशेप पण खात नाही."

"हो, तुम्ही रक्त देऊ शकता. पाटील तुम्हाला चालेल ना?" डॉक्टर म्हणाले.

पाटलांनी होकार दर्शवला. सुंदरीने अपूर्वाला रक्त दिले आणि ती शुद्धीवर आल्यावर घराकडे जायला निघाली. तितक्यात पाटील तिच्या पायावर डोके ठेवून फक्त आसवे गाळत होता. तो पाटील उठला आणि बोलू लागला, "जिथे मला तुझा स्पर्श सुद्धा नको होता, अशुभ वाटत होता, तिथे तू रक्त देऊन माझ्या मुलीला वाचवले. तिची आई देवाघरी गेली तेव्हापासून ही माझी लेक माझं सर्वस्व आहे. सुंदरी मला माफ कर."

पण सुंदरी काही न बोलता घरी निघून आली. रस्त्यात तिच्या मनात आले की माणूस किती स्वार्थी प्राणी आहे. जो पाटील माझा चेहरा पण बघत नव्हता, तो आज माझ्या पायावर डोकं ठेऊन रडत होता. तितक्यात तिचे घर आले. पाहते तर दारात मीना पुस्तक घेऊन बसली होती. सुंदरीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तोच मीना म्हणाली, "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे सो आपुले। तोचि साधू ओळखवा, देव तेथेची जाणावा।। बरोबर ना आक्का?"

आता सुंदरीच्या डोळ्यात एक समाधानाची लकेर दिसत होती. तिला असे वाटत होते कि आता ह्यापुढे पाटील पुन्हा तिला किंवा दुसऱ्या किन्नर किंवा गरीब लोकांना छळणार नाही आणि दुसरी गोष्ट तिला तिची लाडकी मीना भविष्यात प्राध्यापक झालेली दिसत होती.

©®ऋचा निलिमा

(ह्या कथेचे copyright लेखिकेकडे राखीव आहेत. कृपया साहित्य चोरू नये.)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//