सूनबाई आणि कुरडया

स्वयंपाक येत नसलेल्या सुनेची कथा

सूनबाई आणि कुरडया...




     "मी काय म्हणते सूनबाई, आता घ्यायची का वाळवणं करायला?" शालिनीताईंनी मोनिषाला विचारले..

" वाळवणं??" शहरातल्या कॉन्व्हेंट शाळेत शिकलेल्या मोनिषाने आश्चर्याने विचारले..

" तुम्हाला वाळवणं कशाला म्हणतात ते माहित नाही?" शालिनीताईंनी डोळे बारिक करत विचारले..

" नाही.. माहिती आहे.. तुम्हीच सांगा कधी करायचे ते.." मोनिषा सावरून घेत म्हणाली..

" एक दोन दिवसात चांगला दिवस बघू. आणि मग सांडगे घालू.. तुम्ही डाळी आहेत का ते घ्या बघून.." शालिनीताईंनी हुकूम सोडला.. त्या अजून पुढे काही बोलणार इतक्यात मोनिषाचा फोन वाजला.. "सासूबाई, खूप महत्वाचा फोन आहे.. मी येतेच पाच मिनिटात.." मनातल्या मनात त्या फोनला धन्यवाद देत मोनिषा तिथून निघाली.. ते पाहून शालिनीताईंच्या कपाळाला आठ्या पडल्या..

" वाळवणं विचारते? हिला खरेच यातले काही येते तरी का? कि मोहितने आम्हाला गंडवले?" त्या मनाशी विचार करत होत्या..


मोहित इनामदार.. इनामदार घराण्याची पुढची पिढी.. इनामदार म्हणजे गावचे मोठे प्रस्थ.. जुन्यातले जुने जपणारे त्याचबरोबर नावीन्याची कास धरणारे.. त्यालाच अनुसरून शालिनीताई आणि विलासरावांनी त्यांच्या लेकाला पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवले होते.. तिथे त्याने अभ्यासाचे धडे गिरवता गिरवता प्रेमाचे धडेही गिरवले.. तो प्रेमात पडला मोनिषा सरपोतदार हिच्या.. आता झाले असे होते.. मोनिषाचे घर होते खूपच पुढारलेले.. म्हणजे थोडेबहुत जुने जाऊ द्या मरणालागुनी प्रकारचे.. त्यामुळे यांच्या घरात ना जुन्या पद्धती ना रीतीरिवाज.. सगळे आधुनिक.. मोनिषाची आई स्मिता आणि बाबा सुधीर हे दोघेही मोठ्या हुद्द्यावर त्यामुळे त्यांची उठबस हि फक्त पार्ट्यांमध्ये किंवा मिटिंगमध्ये.. तर अशा मोहितचे आणि मोनिषाचे जुळले.. दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंतले होते.. दोघांनाही शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी परदेशी जायचे होते. मोनिषाच्या घरी मोहित पसंत होता.. अडचण होती मोहितच्या घरच्यांची.. कारण शालिनीताईंना सून हवी होती ती स्वयंपाकात सुगरण, सुशिक्षित, सुसंस्कृत, सुस्वरूप, शालीन अशी.. आता मोनिषा बाकी सगळ्या आघाडीवर पास होत होती.. अडचण एकच होती.."सुगरण" मोनिषाची स्वयंपाकघरात एवढी हुशार होती कि एकदा तिला तिच्या आईने गवती चहा करायला सांगितला तर तिने गवत घालून पाणी उकळले आणि तसा चहा आईला दिला.. तो चहा बघून दुखत असलेले तिच्या आईचे डोके फुटायचे फक्त बाकी होते.. हा किस्सा तिनेच मोहितला सांगितला होता.. आता या अशा सुगरणीची आपल्या आईसमोर काय डाळ शिजणार असा प्रश्न मोहितला पडला होता.. कारण कितीही प्रेम असले तरी त्याला आईवडिलांनाही दुखवायचे नव्हते..

" मोनू, तुला खरेच माझ्याशी लग्न करायचे आहे?" 

" असे कारे विचारतोस बाबू?"

" मग ऐक ना.. थोडा तरी स्वयंपाक शिक ना.. हे बघ असेही आपण थोडेच दिवस इथे राहणार आहोत.. नंतर तर परदेशी जाणार आहोतच.. मग थोडक्या गोष्टींसाठी आईबाबांना का दुखवायचे?"

" स्वयंपाक हि काय लहान गोष्ट आहे का? चटके बसतात.. तुला काय होते आहे बोलायला? आणि अशाच अटी माझ्या घरातल्यांनी घातल्या असत्या तर चालल्या असत्या का?"

" मोनू मी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणले असते.. स्वयंपाक काय आहे.. आणि असे हि बघ आपल्याकडे लताकाकू आहेत स्वयंपाकाचे बघायला.. तु फक्त बेसिक करून ये.. मी करतो बाकीचे मॅनेज.."

" बघ हा.."

" हो ग माझा शोना.."

आणि खरेच लग्नाआधी मोहितने आधी लताकाकूला मॅनेज केले कोणालाच काहीच न कळू देण्याच्या बोलीवर.. त्यांचाही तसा त्याच्यावर जीव होताच.. त्याच्या प्रेमापायी त्याही हो बोलल्या.. आणि मोनिषा तशीही कोणालाही पसंत पडावी अशीच होती. त्यामुळे बघता क्षणीच शालिनीताईंनी होकार दिला.. लग्नाची गडबड सुरू झाली.. त्याहीपेक्षा मोनिषाची जास्त धावपळ सुरू होती.. मोहितसाठी ती साडी नेसायला शिकली पण... पण तो स्वयंपाक काही जमेना.. तेल तापल्यावर फोडणी घालण्याऐवजी ती डोळे घट्ट मिटून घ्यायची.. शेवटी स्मिताताई आणि त्यांच्या स्वयंपाकाच्या मावशी दोघींनीही तिच्यासमोर हार मानली.. मग तिही हे सगळे सोडून खरेदीच्या मागे लागली.. 


       लग्न लागले.. मोनिषा इनामदारांची सून होऊन घरी आली.. सुरवातीचे काही दिवस वेगवेगळे विधी, देवदेव, नंतर हनिमून या सर्वात कसे निघून गेले कळलेच नाही.. आणि मग दिवस आला स्वयंपाकघराच्या प्रवेशाचा.. इनामदारांकडे हा हि एक मोठा सोहळा होता.. शालिनीताईंनी चांगला मुहूर्त बघितला. सगळी तयारी केली.. आणि त्याच दिवशी सकाळी मोहितचे परदेशी कंपनीत सिलेक्शन झाल्याची बातमी आली.. मोहितला आठवड्याभरात निघायचे होते.. पण मोनिषाचे झाले नव्हते.. मोनिषा रडकुंडीला आली होती.. कारण मोहित तिथे गेल्यावर तिला एकटीला इथे रहायचे होते..

" मी जाऊ कि नको?" रडणार्‍या मोनिषाला मोहितने विचारले..

" मी काय सांगू?" मोनिषाचे रडणे अजून वाढले..

" तू अशी रडलीस तर माझा पाय कसा निघेल. मी तिथे जातो.. सगळे सेटल करतो.. आणि बोलावतो ना तुला लगेच.. फक्त महिना दे मला.."

" नक्की? "

"हो.."

" मग काही दिवस मी आईकडे जाऊ?"

" मी आईला विचारतो.."

पण अपेक्षेप्रमाणेच शालिनीताईंनी नकार दिला..

" तुमचे आताच लग्न झाले आहे.. या घराण्याच्या सूनबाई आहात तुम्ही.. इकडचे रीतीरिवाज, कुळाचार तुम्हालाच करायचे आहेत. त्यामुळे मोहित परदेशी गेले तरी तुम्ही या सगळ्याची माहिती करून घ्या ."

   नवी नवरी असल्याने मोनिषाला काही बोलताही येईना.. त्यात भर म्हणून तिचे आईबाबाही ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले होते.. त्यामुळे तिला सासरी राहण्यावाचून पर्याय नव्हता.. त्यातही कुळाचार ती सगळेच लिहून ठेवत होती.. पण स्वयंपाकाची टांगती तलवार तिच्या डोक्यावर सतत होती.. पहिल्या दिवशी तिने कसातरी लताकाकूंच्या सहाय्याने शिरा केला.. पण सगळ्यांच्या चेहर्‍यावर तो कसा झाला ते कळत होते.. तरिही शालिनीताईंनी त्यांचा हेका काही सोडला नाही.. आणि त्यात आता हे वाळवणं..

       मोनिषाने डोके चालवले.. तिने नेटवर सांडग्याची रेसिपी शोधली.. लताकाकूंना विचारून ते कन्फर्म केले.. आणि वाळवणाला सुरुवात केली.. सांडगे झाल्यावर शालिनीताईंनी ऑर्डर दिली कुरडयांची.. लताकाकूंनी गहू भिजवायला वगैरे मदत केली.. पण त्या वासानेच मोनिषाला कसेतरी व्हायला लागले.. पण शालिनीताईंसमोर बोलणार कोण? दोन दिवस कसेतरी तिने ते केले.. आता तिसऱ्या दिवशी ते वाटून तिला गव्हाचा चीक काढायचा होता.. ते ऐकून आणि नेटवर बघून मोनिषाला भरपूर टेन्शन आले होते.. ती गेली आधी गहू वाटायला.. पण गहू मिक्सरमध्ये कमी तिच्या चेहर्‍यावर जास्त होते.. तिची दया येऊन लताकाकू तिची मदत करायला जात होत्या.. तोच शालिनीताई कडाडल्या..

" काही गरज नाही लताबाई तुम्ही मध्ये जाण्याची.. मोहितने तर आम्हाला सांगितले होते कि मुलगी सुगरण आहे म्हणून पण तिला तर गहूही वाटता येत नाहीत.. बघू आता कुरडया कशी करते ती.."

मोनिषाच्या डोळ्यातून गंगायमुना वहात होत्या तर डोक्यात मोहितचा राग येत होता.. कसातरी तिने तो सगळा गहू वाटला.. आणि बाकीचे काम लताकाकूंवर टाकून पळाली.. रात्री नेहमीप्रमाणे मोहितचा फोन आला.. 

" काय करते माझी मोनू?"

" घटस्फोटाचे कागद तयार करते आहे."

" का? काय झाले? अग इथे मी तुला इथे लवकरात लवकर कसे आणता येईल हे बघतो आहे आणि तू असे बोलतेस.."

" मग काय करू? आज तुझ्या आईने मला गहू वाटायला लावले.. त्याचा तो वास.. ते सगळे चिकट चिकट.. आणि उद्या मला त्या कुरडया करायच्या आहेत.."

" वॉव.. कुरडया.." मोहित जोरात ओरडला.. पण परिस्थिती बघून त्याने टोन बदलला.. " लताकाकू?"

" त्या येतात मदतीला.. पण सासूबाई मदत करू देतील तर शपथ.. मला तर असे वाटते कि त्यांना मला काही येत नाही हे माझ्या तोंडून ऐकायचे आहे.."

" हे आधी का नाही सांगितलेस मला?"

" मी नेटवर पाहिले तर सोपे वाटले.. पण ते तसे नाही.. माझे काय होणार उद्या?" मोनिषा रडायला लागली..

" उगी उगी.. तू रडू नकोस.. मी बघतो काय ते.."


मोहितने मोनिषाचा फोन ठेवला..थोडे नेटवर सर्च केले हवी ती माहिती मिळवली आणि शालिनीताईंना फोन लावला.. 

" आई अग उद्या संध्याकाळी माझा तो मित्र आहे ना त्याच्याकडे तुला जायला जमेल?"

"उद्या? कसे शक्य आहे.. सूनबाईंनी कुरडयांचा घाट घातला आहे. लक्ष ठेवायला नको?"

" हो का.. " मोहित हिरमुसल्या स्वरात म्हणाला.. " खरेतर मी तुला सरप्राईज देणार होतो.. पण तूच मला दिलेस.. तुझ्या आवडत्या गायिकेची खाजगी मैफल आहे. मी दोन तिकिटे काढली होती.. पण आता तुला कुरडया महत्त्वाच्या आहेत तर मी काय करू?" 

शालिनीताईंचा जीव खालीवर व्हायला लागला..शालिनीताई गाण्याच्या फार शौकीन होत्या.. त्यातही त्या गायिका म्हणजे शास्त्रीय संगीतातील मोठे नाव.. त्यांच्या अत्यंत आवडत्या.. त्या गायिका आजकाल फार कमी गात होत्या.. त्यांची मैफिल चुकवायची म्हणजे.. 

" पण ती तिकिटे तू कशी पाठवणार?" शालिनीताईंनी विचारले..

" मोबाईलवर आई.. पण नकोच. तू कुरडया कर.. मी कॅन्सल करतो ती तिकिटे.." मोहितने मुद्दाम डिवचले..

" गुपचूप पाठवून दे.. लताबाई बघतील काय करायचे ते.."

  तो कार्यक्रम होता दुसर्‍या शहरात.. पण याआधीही शालिनीताई आणि विलासरावांनी अशा कार्यक्रमांना हजेरी लावली होती.. त्यामुळे ते सकाळी लवकर निघाले.. निघताना शालिनीताई मोनिषाला सूचना द्यायला विसरल्या नाहीत.. बिचारी मोनिषा गेली कुरडया करायला.. लताकाकूंनी गव्हाचा चीक काढून ठेवला होता.. तिने आदल्या दिवशी परत रेसिपी पाहिली होती.. लताकाकू येईपर्यंत तिने रेसिपी बरहुकूम चीक शिजायला ठेवला होता.. पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली पण तो चीक काही घट्ट होईना.. नेटवर तर पाच मिनिटात झाला होता.. मोनिषाने लताकाकूंना हाक मारायला सुरूवात केली..

" लताकाकू, लताकाकू..."

" काय झाले सूनबाई? आग लागल्या सारख्या का ओरडताय? आणि हे काय?"

" तुम्ही येईपर्यंत मी तो चीक शिजवायला घेतला.. पण तो घट्टच होत नाही.."

" पण तुम्हाला कसे माहीत कसे शिजवायचे ते?"

"मी नेटवर पाहिले काल.."

लताकाकू विचार करत होत्या.. चीक हलवून हलवून मोनिषाचे नाजूक हात लाल झाले होते..

" मला सांगा, पाणी गरम घेतले होते कि गार?"

" त्यांनी तसे काहीच सांगितले नव्हते.. कि सांगितले होते? पण मी तुम्ही इथे ठेवलेला चीक घेतला.. तो गॅसवर शिजायला ठेवला.. कधीची हलवते आहे.." मोनिषाने परत रडायला सुरुवात केली..

" काय सूनबाई.. एवढ्या शिकल्या सवरलेल्या तुम्ही.. आणि एवढ्याशा गोष्टीपायी रडताय? त्यादिवशी इंग्रजी बोलताना कशा होत्या? आणि आता कशा आहात?"

"मग काय करू? मला नाही येत स्वयंपाक.. आणि सासूबाईंना तर सुगरण हवी.."

"असं नाय सूनबाई.. त्यांचे म्हणणे असे कि आपल्या हातून रांधून आपले पोट भरता आले पाहिजे.. आता आपले दादासाहेब त्यांनापण स्वयंपाक येतो आणि आपल्या मोहितलापण.. मोहित आहे खाण्याचा भोक्ता म्हणून त्यांना सुगरण सून हवी होती.."

" पण आता मी काय करू ते सांगा.. माझा हात दुखला.."

"व्हा बाजूला.. यात मीठ टाकले का?"

" टाकायचे असते?" लताकाकूंनी डोक्यावर हात मारला.. त्यांनी त्या पीठाचे पापड केले.. 

" काकू.. हे तर पापड झाले? मी जर चुकत नसेन तर कुरडया गोल असतात.. बरोबर?"

" हो ग माझी गुणाची बाय.. अगदी बरोबर.. हे पीठ वाया जाऊ नये म्हणून मी त्याचे पापड केले.."

" मग कुरडया?"

" त्या मी घरी करून ठेवल्या आहेत.. हे पापड थोडे सुकले कि मी माझ्या घरी नेते आणि कुरड्या इथेआणून सुकवते.."

" काकू.. यु आर ग्रेट.."

" ग्रेट मी नाही.. तुझा नवरा.. ज्याने तुमच्या लग्नाच्या आधीच मला हि कल्पना दिली होती.."

ते दोन दिवस मोनिषाचे छान गेले.. ना वाळवणाचे टेन्शन ना सासूबाईंचे.. शालिनीताई आल्यावर आधी त्यांनी कुरडया पाहिल्या..मोनिषाचे लाल झालेले हातही पाहिले..मोनिषा आणि लताबाई दोघी मान खाली घालून उभ्या होत्या.. कुरडया सुकल्यावर त्यांनी त्या तळायला सांगितल्या.. त्याचा पहिला घास खाताच त्या हसल्या.. पण त्या दिवसापासून त्यांनी तिला स्वयंपाकघरात जायला सांगितले नाही.. पण आता मोनिषाच लताकाकूंच्या सोबत राहून काय काय बघत असायची.. तोपर्यंत मोहितनेसुद्धा खटापटी करून मोनिषाला तिकडे बोलावून घेतले.. 

       मोनिषाने शालिनीताईंना सुखरूप पोचल्याचा फोन केला..

" सासूबाई, तुम्ही चिडणार नसाल तर एक गोष्ट सांगायची आहे.."

"बोला ना.. एवढ्या लांबून कशाला आम्ही आमच्या सूनबाईंवर चिडू?"

" त्या कुरडया ना, मी नव्हत्या केल्या.. लताकाकूंनी केल्या होत्या.."

ते ऐकून शालिनीताई हसायला लागल्या..

" सूनबाई मोहितच्या जन्मापासून लताबाई इथे काम करतात.. त्यांच्या हाताची चव आम्हाला माहीत आहे.

 आणि तुम्ही विमानात पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांनी हे कबूल केले होते.. त्यातर काम सोडून जायला निघाल्या होत्या आम्हाला फसवले म्हणून.. पण आम्हीच म्हटले तुम्ही गेलात तर सूनबाई परत आल्यावर त्यांना कुरडया कोण करून देणार?"


दोघींनीही हसत फोन ठेवला.. शालिनीताई खुश होत्या कारण त्यांच्या इच्छेखातर आपल्याला न जमणारी गोष्ट करायची तयारी मोनिषाने दाखवली म्हणून.. तर मोनिषा खुश होती आपली चूक सासूबाईंनी न चिडता समजून घेतली म्हणून....



कथा कशी वाटली नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई