सून झाली मुलगी-सासू झाली आई भाग 2

Sasu sunech premal nat

सून झाली मुलगी-सासू झाली आई...भाग 2

एक दिवस साक्षीला बराच उशीर झाला, तिची मिटींग असल्यामुळे तिला तिथे थांबाव लागलं. यायला बराच उशीर झाला असल्यामुळे सगळ्या स्वयंपाक माधवीला करायला लागला. तिने स्वयंपाक केला आणि हॉलमध्ये येऊन बसली.
मयंकही आलेला होता, माधवीने मयंकला चहा दिला. विनायकराव टीव्ही बघत बसलेले होते, साक्षी आली आणि माधवीने तिच्याकडे बघून नाक मुरडलं.

“मयंक हे असं उशिरा आलेलं मला चालणार नाही, बघ ना सगळं स्वयंपाक मलाच करायला लागला. मग सून असून काय उपयोग? सगळं काही मलाच करावं लागतंय. तुझं लग्न करून हिला घरात आणण्याचा काय अर्थ आहे.”

“आई जरा शांत हो.” मयंकने आईकडे बघितलं.
“अग तिला फ्रेश होऊ दे, मग काय तुला काय बोलायचे ते बोल आणि तू चहा केलास ना तिला थोडा गरम गरम चहा दे की.”

“वा वा काय दिवस आलेत. सून आली बाहेरून की सासूने तिला चहा द्यायचा.”  माधवी बोलत बोलत किचनमध्ये निघून गेली.

साक्षीने लक्ष न देता ती ही तिच्या रूममध्ये गेली. ती फ्रेश होऊन बाहेर आली तोवर माधवीने जेवणाची भांडी डायनिंग वर नेऊन ठेवलेली होती. चौघे जेवायला बसले, साक्षीने सगळ्यांचे ताट केले. सगळ्यांना वाढलं आणि तीही बसली.

“काय ग साक्षी आज एवढा उशीर का झाला तुला.”

“आई माझी मिटींग होती आणि मला बाहेर जावं लागलं होतं, त्यामुळे यायला थोडा उशीर झाला. पण यानंतर असं नाही होणार आहे मी काळजी घेईल. जमेतोवर मीटिंग दुपारी करेल मी, सॉरी यानंतर नाही होणार आहे.”

जेवणाला सुरुवात केली, जेवण झाली आणि सगळे आपापल्या खोलीत गेले.

मयंक रूम मध्ये गेला, साक्षी पुस्तक वाचत बसलेली होती. तो तिच्या जवळ जाऊन बसला.
“साक्षी आईच्या बोलण्याचा राग आला ना तुला? राग मानून घेऊ नकोस गं, असू दे. ती बोलते ना आपण ऐकून घ्यायचं.”

“नाही रे राग नाही आला पण मलाच वाईट वाटलं मला उशीर झाला आणि सगळा स्वयंपाक आईला करायला लागला.”

“अग एक दिवस तिने केला तर काय फरक पडतो? ठीक आहे ना. काम अशी वाटलेली नाही आहेत ना ज्यांना जे करावे असे वाटले ते तुम्ही करू शकता.”
दोघांचही बोलणं झालं आणि दोघेही झोपले. 

सकाळचा स्वयंपाक करून ऑफिसला जाणे ऑफिस वरून आल्यानंतर स्वयंपाक करणे इतर कामे करणे आता हे साक्षीच रुटीन झालेलं होतं. 

सुट्टीच्या दिवशी मयंक आणि साक्षी दोघे बाल्कनीत बसलेले होते, बाजूलाच हॉलमध्ये विनायकराव आणि माधवी बसलेले होते. माधवीच्या मोबाईलवर कॉल आला.

“बोल मिहिरा, कशी आहेस तू?”

“मी छान आहे, मजेत आहे. तू कशी आहे?”
“मी पण छान आहे. काय म्हणते तुझं ऑफिस? ऑफिस जॉईन केलंस ना बेटा. तुझी दगदग होत असेल? सासुबाई काही मदत करतात की नाही तुझी.”

“आई माझ्या सासूबाई मला सगळी मदत करतात आणि मला काहीच करायला लागत नाही. त्या आहेत ना म्हणून मला खूप आधार वाटतो आणि माझ्या ऑफिसचे काम नीट होतं.”

दोघींचं बोलणं झालं आणि तिने फोन ठेवला. त्या दोघींचं बोलणं मयंकच्या लक्षात आलं पण तो काहीच बोलला नाही. 

क्रमश:

🎭 Series Post

View all