सून झाली मुलगी-सासू झाली आई भाग 1

Sasu sunech premal nat

सून झाली मुलगी सासू झाली आई भाग1
जलद लेखन कथामालिका
विषय- अरे संसार संसार

विनायक आणि माधवीच्या लग्नाला तीस वर्षे पूर्ण झाली होती. आज त्यांच्या मुलांनी मयंक आणि मिहीरा दोघांनी सरप्राईज पार्टी अरेंज केलेली होती.

“आई बाबा लवकर तयार व्हा, आपल्याला बाहेर जायचं आहे.” मयंक त्यांच्या खोलीत गेला.

“अरे कुठे जायचं आहे?” माधवीने विचारलं.

“आई प्रश्न नको.”  मिहीरा आईच्या खांद्यावर हात ठेवत बोलली.

दोघेही तयार झाले,
मिहीराने माधवीला छान तयार करून दिलं. चौघेही पार्टीसाठी निघाले, तिथे गेल्यानंतर माधवी आणि विनायक दोघांनाही सरप्राईज मिळालं.


तिथे विनायक आणि माधवीचे काही जुने मित्र मैत्रिणी आलेले होते. मयंक आणि मिहीराने छान अरेंजमेंट केलेली होती. दोघांनाही खूप आनंद झाला. बऱ्याच वर्षानंतर माधवीही खूप आनंदी होती.

पार्टी झाली आणि सगळे आपापल्या घरी परत गेले. मयंक आणि मिहिरा दोघांचेही शिक्षण झालेलं होतं. मयंकचं इंजीनियरिंग होऊन तो चांगल्या कंपनी जॉबला होता. मिहिरा आयटीमध्ये कामाला होती. सगळं छान व्यवस्थित सुरू होतं. 

आता मयंक आणि मिहिरा साठी लग्नाची स्थळ यायला लागलेली होती. सकाळी दोघेही ऑफिसला जायचे, माधवी सकाळी उठून दोघांसाठी डबे बनवायची, सगळ त्यांच्या हातात द्यायची. त्यामुळे मिहिराला घरी काम करण्याची सवय नव्हती. थोडाफार आईला मदत करायची पण ऑफिस असल्यामुळे ते क्वचितच व्हायचं.


मिहिरासाठी स्थळ आलं, स्थळ चांगलं होतं. घरच्यांनी लग्न पक्क करून ठेवलं. आता वाट होती ते मयंकच्या लग्नाची, विनायकरावांची इच्छा होती की मयंक आणि मिहिराचं लग्न एकत्र व्हावं. म्हणून मयंकसाठी मुलगी शोधण सुरू झालं.

एक स्थळ चालून आलं, स्थळ खूप चांगलं होतं.

मुलगी शिकलेली होती जॉब वर होती त्यामुळे जास्त विचार न करता लग्न पक्क झालं. दोघांचाही साखरपुडा एकत्र झाला. लग्नाची तारीख काढण्यात आली. दोघांच्या सासरच्यांना सांगून ठेवण्यात आलं होतं की आम्हाला लग्न एकत्र करायचे त्यामुळे तारीख सर्वांनी मिळून ठरवायची आहे. ठरल्याप्रमाणे लग्नाची तारीख ठरवण्यात आली.

लग्नाची तयारी सुरू झालेली झालेली होती. नवरदेव नवरीच्या पसंतीचे कपडे दागिने सगळं घेऊन झालं आणि मिहिरा आणि मयंकच्या डोक्यावर अक्षदा पडल्या. 

मिहिरा लग्न होऊन सासरी गेली आणि मयंकची पत्नी साक्षी घरात सून म्हणून आली.


साग्र संगीताने साक्षीचा गृहप्रवेश झाला. नवीन लग्न म्हणून सुनेचं कोड कौतुकही करून झालं. मयंक आणि साक्षी दोघेही हनिमून साठी फिरायला गेले.

आठ दिवसानंतर परत आले, नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले आणि दोघांचा संसार सुरू झाला.

दोघांनी ऑफिस जॉईन केलं, साक्षीचं ऑफिस बरच लांब असल्यामुळे तिला गाडी घेऊन दिली, ती आता स्वतः ड्राईव्ह करून ऑफिसला जायची. सकाळी लवकर उठून ती सगळी कामे करायची आणि रात्री आल्यानंतर इतर कामे करायची, स्वयंपाक करायची.


तिला सकाळी लवकर निघायला लागायचं आणि रात्री तिला यायला उशीर होत होता त्यामुळे मधातली जी काही कामे होती ती माधवीला करायला लागायची आणि त्यामुळे आता माधवीची चिडचिड व्हायला लागली होती.


क्रमशः

🎭 Series Post

View all