सून शेर तर सासू सव्वाशेर

सासू सुनेच्या नात्याची कथा

सून शेर तर सासू सव्वाशेर



"आई, मी निघते हा.. तुम्ही मीनूला शाळेतून घेऊन या हं.. आल्यावर तिला मॅगी किंवा पास्ता करून द्या.. संध्याकाळी जेवायला काय कराल? आज थालीपीठ करूया का? कांदा, कोथिंबीर, गाजर, कोबी बारिक चिरुन ठेवा.. मी आले कि थालीपीठ करीन.." सुधाताईंची सून कविता ऑफिसला निघाली होती.. आणि जातानाच्या सूचना सुरू होत्या.. सुधाताईंनी सगळ्याला मान हलवली.. ती बाहेर गेली हे पाहून पुटपुटल्या. " हि मोठी महाराणी, हुकूम सोडून जाणार.. हिला शाळेतून आणा, भाज्या चिरून ठेवा.. हे करा आणि ते करा.."

" काही बोललात का आई?" पाठून कविताचा आवाज ऐकून त्यांचे ततपप झाले.. " काही नाही.. स्वतःशीच बोलत होते जरा. तू बरी लगेच आलीस?"

" घाईघाईत गजरे घालायची विसरले.. फ्रीजमध्ये ठेवले आहेत. जरा देता का? तुम्ही घालणार का? पण तुम्ही घालतच नाही ना? चला निघते मी.. येते हा, बाबा.." कविता एकदाची गेलेली पाहून सुधाताईंनी हुश्श केले..

सुधाकरराव त्यांची गडबड बघत होते आणि हसत होते.. "किती घाबरतेस ग तिला.. होत नाही तुझ्याच्याने तर सांगना तिला सरळ.."

" सांग तिला.. ती काय ऐकून घेणारी आहे.. आपल्या लेकाला पाहिले ना कसे गुबूगुबू करतो तिच्यासमोर नुसता धाक तिचा.. त्याचीच बोलायची हिंमत नाही.. माझी काय असणार?"

" बघ मग तुझे तू.. थोडा चहा मिळेल का?" 

" हो देते ना चहा देते, नाश्ता हातात आणून देते.. सगळे देते.. मोलकरीण करून ठेवले आहे मला.. ती हि बिनपगारी.." सुधाताई धुसफुसत स्वयंपाकघरात गेल्या.. एका बाजूला चहा ठेवला, दुसरीकडे लेकीला फोन केला.."हॅलो, विदिशा.."

" बोल आई, आज काय नवीन?"

" काय सांगू तुला.. महाराणी गेली ऑफिसला सूचना देऊन, हे असे करा, ते तसे करा.. ना तुझा भाऊ काय बोलत ना तुझे बाबा.. तूच सांग, मी काय मोलकरीण आहे का?"

" आई रडू नकोस ना. मी काय म्हणते तू समोरासमोर बसून बोलून घे ना एकदाच. तू हे सगळे मला सांगणार मी तिला काहीतरी बोलणार.. मग आमची वादावादी होणार.."

" म्हणजे आता मी हे तुला ही सांगायचे नाही का? वाटले होते तू तरी ऐकून घेशील.." सुधाताईंनी रागाने फोन ठेवून दिला..

        

🎭 Series Post

View all