सून शेर तर सासू सव्वाशेर अंतिम भाग

कथा सासूसुनेची


सून शेर तर सासू सव्वाशेर.. अंतिम भाग


" माझ्याकडे अजिबात बघू नका.. मला मीनू आणि घर दोन्ही सांभाळायला जमणार नाही." सुधाकरराव म्हणाले..
" माझी आज खूप महत्वाची मिटिंग आहे, मला जायलाच पाहिजे.." विवेक म्हणाला.
" ओके.. मी राहते आज घरी" कविता म्हणाली.. "विवेक तू आज ऑफिसमध्येच खा काहीतरी." विवेक हो म्हणत गेला..
" विवेक" सुधाकररावांनी हाक मारली.
"आई आजारी आहे हे ऐकूनसुद्धा तुला तिला काय झाले आहे, हे विचारावेसे नाही वाटले? तुला फक्त तिच्याकडून होणारी कामे झाली नाहीत म्हणून वाईट वाटले.. पण बाजूच्या खोलीत जाऊन चौकशी करावीशी वाटली नाही.."
" सॉरी बाबा, आज जरा ऑफिसचे टेन्शन होते म्हणून सुचले नाही." विवेक अपराधी स्वरात म्हणाला.
" हेच जर कविता आजारी असते तर झाले असते.." सुधाकररावांनी विचारले. " मला विषय वाढवायचा नाही. जा चहा कर. मला हिला सुद्धा द्यायचा आहे."
विवेक ऑफिसला गेल्यानंतर कविताच्या कामाला सुरुवात झाली. आधी मीनूला शाळेत सोडायचे होते.. तिने जरा दबकतच सुधाकररावांना विचारले, " बाबा तुम्ही मीनूला शाळेत सोडू शकाल का?"
" नाही, मी जरा हिला घेऊन डॉक्टरकडे जाऊन येतो.. उगाच अंगावर काढण्यात काय अर्थ आहे? अजून एक जरा जमले तर पेज कर हिच्यासाठी. जेवण जाईल असे वाटत नाही. आणि आपल्या कामवाल्या मावशी येतील दुपारी, त्या वेळेपर्यंत तू घरी यायचे बघ. नाहीतर लादीभांडी पण आपल्यालाच करायला लागतील."
" बरं बाबा.." असे म्हणत कविता तिथून निघाली.. बाहेर आली तर बराचवेळ रिक्षा मिळेना. शेवटी कंटाळून ती तशीच मीनूला घेऊन घरी आली.. नशीब कामवाल्या मावशी येऊन गेल्या नव्हत्या.. त्यांनी ढिगभर कपडे कवितासमोर ठेवले.
" हे काय मावशी? हे एवढे कपडे इथे का ठेवलेत?"
" मग कुठे ठेवू?" मावशींनी विचारले.
" कपाटात. घड्या घालून. "
" ते मी नाही करत. काकू करतात.."
" हो का?"
" हो. भांडी घासून ठेवली आहेत. ती लावायची आहेत."
" काय?" आधीच मीनूच्या मागे लागून दमलेली कविता या जास्तीच्या कामाने थकली होती.. समोर सुकलेली झाडे पाण्याची वाट पहात होती.. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी, कि तिने सगळ्यांसाठीच फक्त खिचडी आणि कढी केली होती. सुधाताई थकलेल्याच वाटत होत्या. तरी सुधाकरराव त्यांची काळजी घेत होते.
दुपारी मीनू झोपल्यावर तिला थोडा वेळ मिळाला तेव्हा पटकन तिने बाकीची कामे करून टाकली.. ते होईपर्यंत परत संध्याकाळचा चहा, रात्रीच्या जेवणाची तयारी, मध्ये मीनूचे खाणे होतेच.. कविताला आता कळत होते, घरी काय कामे असतात ती..
संध्याकाळी थोडे बरे वाटले म्हणून सुधाताई हॉलमध्ये येऊन बसल्या होत्या.. कविता सुद्धा त्यांच्याशेजारी येऊन बसली.. "आई, आपणना मीनूला शाळेतून आणायला आणि सोडायला रिक्षा लावूया.. आणि मावशींनाच भांडी लावायला आणि कपड्यांच्या घड्या करायला सांगूया. थोडे जास्तीचे पैसे देऊ या. चालेल का तुम्हाला?"
" मी कोण सांगणार बाई? सध्या तुम्ही कमवता.." सुधाताई म्हणाल्या.
" असे का म्हणता? मी एवढी वाईट आहे का?" कविताने विचारले..
" असे कुठे मी म्हटले, पण आम्ही बाबा पिकले पान.. नाही म्हटले तरी मोठ्या आवाजाची , आरडाओरड्याची भिती असतेच ना?"
" सॉरी.. ते काय आहे ना, मला ना लहानपणापासून बॉसींग करायची सवय आहे.. तीच मी इथे पण वापरत होते.."
" पण त्याने माझा थरकाप व्हायचा.." सुधाताई परत पुटपुटल्या.
" काही बोललात का?"
" नाही ग.. कुठे काय?"
तेवढ्यात विवेक घरी आला. येताच तो सुधाताईंकडे आला. "आई मला खरेच माफ कर. सकाळी माझ्या लक्षात आले नाही. पण बघ येताना तुझ्या आवडीचे खायला आणले आहे."
" एवढे काय मनाला लावून घेतोस? तू कधीही बोलायला आलास तरी चालेल. पण तू बोलणे हेच माझे खरे औषध आहे रे.."
सुधाकरराव खुर्चीत बसून हा समारंभ पहात होते.. आणि हे दृश्य पहायला मिळाले म्हणून देवाला धन्यवाद देत होते..
पण सुधाताई मनातल्या मनात हसत होत्या आणि धन्यवाद देत होत्या त्या मासिकातील कथेला आणि कांद्याला ज्याने हि आजारी पडायची कल्पना सुचवली...

कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all