Login

सून मी या घरची.. अंतिम भाग

कथा घराला बांधून ठेवणाऱ्या सूनेची


सून मी या घरची.. भाग १२

मागील भागात आपण पाहिले की विशाल आणि संहिता अजयला भेटतात. आता बघू पुढे काय होते ते.


" अग संहिता, किती तो उशीर? मामा कधीची वाट बघतो आहे तुझी?" संहिताची आई म्हणाली. "काकू तुम्ही तिथे याल का, काय हवं नको ते बघायला? आणि सुनिताताई तुम्ही जरा खाण्यापिण्याचे बघाल का?" संहिताच्या आईने आत्या सोडून बाकी सगळ्यांना कामाला पाठवले.

" मी एकटी इथे काय करू?" वैतागून आत्या म्हणाली.

" माझ्यासोबत येता का?" संहिताने विचारले. आत्या संहितासोबत वराच्या खोलीत गेल्या.

" मामा.." संहिताने हाक मारली. मामाने मागे वळून बघितले.

" अजय तू??" आत्याचा विश्वास बसत नव्हता.

" तुम्ही ओळखता एकमेकांना?" खूप हसू येत असताना चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव आणणे संहिताला खूप कठिण जात होते.

" हो.. जुनी ओळख आहे." अजय कडवटपणे बोलला.

" मग तुम्ही बसा बोलत. मी तोपर्यंत विशालसोबत फोटो काढून येते." संहिताने खोलीचा दरवाजा लावून घेतला. ती तिथून निघणार तोच चंदूकाका तिथे आला. त्याने खुणेनेच काय असे विचारले. ते दोघे आत आहेत हे संहितानेसुद्धा खुणेने सांगितले. ते ऐकल्यावर तो लगेचच दरवाजाला कान लावून उभा राहिला. त्याच्यापाठोपाठ आजी, शैलाकाकू सुद्धा. मग नाईलाजाने संहिता सुद्धा आतल्या गोष्टी ऐकू लागली.

" तुझे लग्न आहे हे ऐकून छान वाटलं." मीनाआत्या रुक्षपणे बोलली.

" अजून किती वर्ष एकटं राहणार? आणि कोणासाठी?"

" मग आता भेटली वाटते, तुझ्या हो ला हो करणारी? तुझे म्हणणे ऐकणारी?" मीनाआत्या रडकुंडीला आली होती फक्त दाखवत नव्हती.

" हो ला हो करणारी कशाला हवी? समजून घेणारी असली तरी पुरे. मुख्य म्हणजे दुसर्‍यालाही मत असते, आणि त्याचाही आदर करायचा असतो एवढंच हवं होतं मला." अजय बोलत होता.

" मग तुझ्या नवीन बायकोत आहेत वाटतं हे गुण?"

" नव्हते. पण ती समजून घेईल असं म्हणाली तरी आहे."

" आणि मी? माझं काय? मी इतकी वर्ष तुझी वाट बघत राहिले ते व्यर्थ?"

" तुला बरं माहित माझं लग्न झालं नाही ते?"

" आशा सांगत होती मला." मीनाआत्याने मान खाली घातली.

" मग इतक्या वर्षात आली नाहीस कधी बोलायला ते?" अजय गंभीरपणे बोलत होता.

" तू तरी कुठे आलास? मी तर कठोरच होते. पण तू तर होतास ना, प्रेमाचा पुतळा. मग का नाही आलास?"

"आता ते सगळं बोलून काही फायदा आहे का? आज माझा साखरपुडा आहे."

" तू खरंच मला सोडून लग्न करणार?"

" माझ्याकडे दुसरा उपाय आहे का? तुला बदलायचे नाही आणि मला माझे नवीन आयुष्य सुरू करायचे आहे."

" पण मला तुझ्याशीच लग्न करायचे होते ना?"

" तो भूतकाळ झाला. मला माझ्या भविष्यकाळाकडे बघायचे आहे."

" म्हणजे मला तुझ्या आयुष्यात कधीच स्थान नव्हते? मीच वेडी तुला काय काय समजून तूझी वाट बघत राहिले. येणाऱ्या स्थळांना नकार देत राहिले." मीनाआत्याने भोकाड पसरले.

" मीना, तू भांड माझ्याशी पण रडू नकोस. तू रडलीस तर मला पुढचे डायलॉग आठवणार नाहीत. " अजय बोलून गेला आणि बाहेर उभे असणाऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.

" डायलॉग?" आत्याने डोळे वटारले.

" खाल्ली माती." अजय पुटपुटला.

" माझ्याकडे बघून बोल. तू खरंच लग्न करत होतास?" आत्याने तिचा आवाज लावला.

" तू जर हे असं बोलणार असशील तर नक्कीच करेन हं." उसन्या आविर्भावाने अजय बोलला.

" कोण कोण सामिल आहे या नाटकात?" मीनाआत्याने कंबरेवर हात ठेवून विचारले.

" ते नंतर बघू. आधी तुझा काय निर्णय आहे ते सांग."

" माझा निर्णय काय सांगायला पाहिजे का? अजूनही तुला समजला नाही का?" मीनाआत्या लाजत म्हणाली.

" पण मग लग्नानंतरही तू तुझेच खरे करणार की माझेही ऐकणार?"

" ते काय सांगायला पाहिजे?" आत्याने लाजत विचारले. अजय तिच्या लाजेने लाल झालेल्या चेहर्‍याकडे बघतच राहिला.

" खूप छान दिसतेस ग तू.."

" तू नसताना त्या दिसण्याला काय अर्थ होता?" आत्याचा आवाज कष्टी झाला होता. न राहवून अजय पुढे झाला. त्याने आत्याला जवळ घेतले.

" एका मूर्खपणाची चांगली शिक्षा भोगली आपण. आता नको वेगळं व्हायला."

" खरंच.." आत्याही त्याच्या कुशीत विसावली. तोच बाहेरून चंदूकाकाचा आवाज आला.

" मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे. साखरपुडा करायचा असेल तर लगेच बाहेर या." ते ऐकून आत्या बाजूला झाली. दोघेही बाहेर आले तर सगळेच त्यांची वाट बघत होते.

" काय मग, करायची का संहिताच्या दूरच्या मामाच्या साखरपुड्याची सुरुवात?" श्रीकांतरावांनी विचारले. आत्याने लाजून आजींच्या कुशीत तोंड लपवले. साखरपुडा झाला. लग्नाचा मुहूर्तही लवकरात लवकरचा काढायचा ठरला. सगळे घरी आले. खूप खुश होते सगळेच. थोडावेळ गप्पा मारायला म्हणून सगळे एकत्र बसले होते.

" छान झाला कार्यक्रम. खूपच मजा आली." मधूकाका म्हणाले.

" हो रे.. पण थोडं दमायलाही झाले आहे. जरा चहा मिळाला असता तर.." चंदूकाका म्हणाला.

" करतेच.." असं म्हणत नेत्रा आणि संहिता दोघी उठल्या.

" तुम्ही बसा.. मीच करते." मीनाआत्या कधी नव्हे ते म्हणाली.

"कशाला तू करतेस?" मधूकाका म्हणाला.

" असं कसं? सवय नको का व्हायला लग्नानंतर?" श्रीकांतरावांनी उत्तर दिले.

" काय गरज आहे? तो बिचारा अजय चहा, स्वयंपाक सगळं शिकला असेल हिच्याशी लग्न करायचे म्हटल्यावर. " चंदूकाका बोलले आणि सगळे हसायला लागले.

" नका रे अशी चेष्टा करू माझ्या लेकीची. चालली हो सासरी ती पण. आणि सगळं क्रेडिट या संहिताला बरं." आजी म्हणाल्या. "अजयरावांचा फोटो काय शोधला, त्यांच्याशी बोलली काय? माझा तर विश्वासच बसत नाही. सोन्याच्या पावलांनी आली आहे ही. साखरपुडा उरकला तसेच मीनाचे लग्नही छान करूया." आजींनी संहिताची अलाबला घेतली. संहिताने नेत्राकडे बघितले. दुखावलेपणाचा एक भाव तिच्या चेहर्‍यावर दिसून आला. संहिताने डोळे बंद करून घेतले. मनाशी एक निर्णय घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

"लग्न धडाक्यात करूयाच. पण आम्ही दोघं तयारी करायला नसू याचं वाईट वाटतं आहे मला."

" म्हणजे?" सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

" विशालची कंपनी ट्रान्स्फर मागे घ्यायला तयार नाही. वर्षासाठी का होईना आम्हाला तिथे जावेच लागेल. त्यानंतर येऊच आम्ही परत." संहिता बोलताना सगळ्यांचे चेहरे निरखत होती. नेत्राच्या चेहर्‍यावर सुटकेची भावना दिसत होती. काव्या आणि मंथनला वाईट वाटले असावे. पण तेवढ्यापुरतंच. आईबाबा, आजीआजोबा नाराज वाटले थोडे. विशालने बोलायला तोंड उघडले पण संहिताकडे बघून मिटले. साखरपुड्याने झालेला आनंद क्षणात मिटला. कोणी काहीच न बोलता आपापल्या घरी गेले. विशाल, संहिता सुद्धा आपल्या खोलीत आले.

" तुझे ना वागणेच मला समजत नाही? बदली घेऊ नको म्हणणारी तू आता म्हणालीस बदली मिळते आहे. बोलायच्या आधी विचारायचे तरी? आणि तुलाच जाणून घ्यायचं होतं ना माझ्या घरातल्यांना? मग अचानक काय झाले असे?" विशाल चिडला होता. संहिता मात्र शांत होती.

" आता मी बोलू?"

" बोला.."

" आजी माझं कौतुक करत असताना नेत्रावहिनींचा चेहरा बघितलास?"

" नाही.." विशाल रागाने धुमसत होता.

" त्यांच्या चेहर्‍यावर तेच भाव होते, जे शैलाकाकूंच्या चेहर्‍यावर असायचे. आईंशी, आजींशी बोलल्यावर मला समजले की आईंचं झालेलं कौतुक शैलाकाकूंना खटकायचे. मग त्यांनी कौतुकाचे चार शब्द ऐकण्यासाठी बाहेरचे पदार्थ आणून स्वतः केले आहेत असं सांगायला सुरुवात केली. त्यांच्या स्वभावामुळे काकांची बदललेली मनस्थिती सगळं त्या एका क्षणात जाणवलं मला."

" अग पण त्या एकट्याच आहेत का घरात? मंथन आणि काव्याचं काय? तूच तर त्यांना काकांच्या मारापासून वाचवलं ना?" संहिता हसली.

" लहान आहेत रे अजून. त्यांना तेव्हा माझी गरज होती. कारण नवीन सुनेसमोर काका त्यांना मारायची शक्यता कमी होती. आता काकांनीही मुलांवर हात उगारणं बंद केलं आहे. मग त्यांना माझी गरज काय?" खिन्नपणे संहिता बोलली.

" मग आजीआजोबा? आईबाबा? "

" आईबाबांना वाईट वाटणं साहजिकच आहे. पण तुला सांगू आजीआजोबांना नाही वाटणार एवढं काही. त्यांच्यामागे त्यांचेच एवढे व्याप आहेत की त्यांना आपली कमतरता जाणवेल पण तेवढी नाही."

" तुला तर आता माझ्या प्रत्येक नातेवाईकांमध्ये काही ना काही दोष दिसतो आहे?" विशालचा चेहरा उतरला.

" दोष असं नाही रे. पण तू माझ्यावर चिडल्यानंतर मी नीट विचार केला. मग मला जाणवलं, कुटुंब कधी एका माणसाचे नाही होऊ शकत रे. कुटुंब सगळ्यांचं मिळून होतं. इथे मी बघितलं लोकांच्या मनाप्रमाणे वागा तुम्ही खूप चांगले पण जरा त्यांच्या मनाविरुद्ध वागा तुम्ही वाईट. आणि खरं सांगू, आजी आज माझं एवढं कौतुक करत होत्या, पण इतक्या वर्षात तुम्हाला कधी सुचलं नाही त्या अजयकाकांचा शोध घ्यावा. किंवा आत्यांच्या मनाचा विचार करावा. थोडा पुढाकार घ्यावा? मध्ये मी आत्यांना काही बोलले नव्हते तरी त्या एवढ्या चिडल्या होत्या माझ्यावर. तेव्हा तुम्हा कोणालाच नाही का वाटलं आत्यांना थोडं समजवावं? असं असतं का रे कुटुंब?" संहिता बोलत होती.

" मग आपण कायमचं तिकडे रहायचे?" विशालने नाराज होत विचारले.

" वेडा आहेस का? मला तुला तुझ्या कुटुंबापासून तोडायचे नाही. पण इकडची परिस्थिती बिघडू नये म्हणून मिळालेल्या संधीचा फायदा उचलायचा. भांडणं होऊन मनं दूर जाण्यापेक्षा आता गोड असतानाच थोडे बाजूला झालेलं काय वाईट? दूर राहिलं की नाती आपोआप परत घट्ट होतात."
संहिता विशालला समजावत म्हणाली. विशाललाही ते पटले. मीनाआत्याच्या लग्नाचा मुहूर्त मग लगेचच काढला गेला. लग्न होताच विशाल आणि संहिता बाहेरगावी गेलेच पण त्यांना वर्षाच्या आतच परत यायला लागले. कारण? कारण म्हणजे संहिताला तिकडे अगदी कडक डोहाळे लागले. तिथे तिला एकटीला घरी ठेवून विशालला कामावरही जाता येईना. बरं इथून तिथे कोणी जाणार तर नेत्राकडेही गोड बातमी होती. आजीआजोबांना वेध लागले होते पतवंडांना खेळवण्याचे. मग काय विशाल आणि संहिताला लवकरात लवकर परत येण्याचा निर्णय घ्यावाच लागला. शेवटी कितीही भांडली, नाराज झाली तरी आपली माणसं ही आपलीच असतात. आणि मुलांवर चांगले संस्कार हे कुटुंबाशिवाय दुसरीकडे कुठे होणार? मुलांना प्रेम, जिव्हाळा कुटुंबातच मिळणार ,बरोबर ना?


ही होती संहिताची कथा. कोणत्याही नवविवाहित सुनेला हवं असतं आपलेपणा असलेलं सासर. प्रत्येकवेळी ते तसं असेलच असं नाही. मग अशावेळेस नेत्रा सारखी हार न मानता संहितासारखा सर्व बाजूंनी विचार केला तर घराचा स्वर्ग नक्कीच होईल.

कथा कशी वाटली ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all