सून मी या घरची.. भाग ११

कथा घराला बांधून ठेवणाऱ्या सूनेची


सून मी या घरची.. भाग ११


मागील भागात आपण पाहिले की मीनाआत्याच्या हट्टी स्वभावामुळे तिचे लग्न मोडले आहे. संहिता मिळवून देईल आत्याचे हरवलेले प्रेम परत, बघू या भागात.


"तुला कशासाठी भेटायचे होते मला?" अजयने बोलायला सुरुवात केली.

" भेटायचे म्हणजे.. काल आजी तुमच्याबद्दल काय काय सांगत होत्या. मग मलाही उत्सुकता वाटली, आमच्या खत्रुड आत्यांवर कोणी प्रेम केलं असेल त्या व्यक्तीला बघण्याची." शब्द जुळवत संहिता बोलत होती. या शब्दांची विशालसोबत प्रॅक्टिस केली होती तरी ती बोलताना थोडी धास्तावलेलीच होती.

"मीना खत्रुड नाहीये.." अजय वैतागून बोलला.

" सॉरी हं.. पण त्यांचं वागणंच असं आहे मग आम्ही काय बोलायचं? हो की नाही विशाल?" संहिताने विशालला खुणावले.

" हो.. हो.." गडबडलेला विशाल म्हणाला. तो एकटक अजयकडे बघत होता. "काका, तू मला ओळखलं नाहीस का?" त्याने न राहवून विचारले.

" मग तू बोलत नाहीस जास्त? मला आठवतंय, तू जेव्हा घरी यायचास तेव्हा किती आपुलकीने चौकशी करायचास सगळ्यांची. मला, दादाला बाईकवर फिरवायचास. आणि आज बघतही नाहीस?" विशालचा गळा दाटून आला.

" जुन्या आठवणींचा काही फायदा आहे का? तसेही नाते तुटले आहे मग कशाला त्या जुन्या आठवणी उगाळायच्या? आताही हिने मला भेटायला बोलावलं म्हणून आलो मी."

" खरंच? तुम्हाला उत्सुकता नव्हती का भेटायची? आणि तुम्हाला आमच्या घरातल्या बातम्या तर समजत होत्याच ना?"

" हो, होती उत्सुकता. आमचं लग्न तुटल्यानंतर पहिल्यांदाच मीनाच्या घरचे कोणीतरी समोरून बोलायला आले. म्हणून भेटलो मी तुला."

" तुमचं मीनाआत्यावर प्रेम आहे म्हणून नाही ना आलात?" संहिताने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता अजय दुसरीकडे बघू लागला.

" आत्यावर प्रेम नाही मग लग्न का नाही केलंत अजून? की फक्त लोकांना दाखवण्यापुरतं?" संहिता बोलत होती. तिचे बोलणे ऐकून अजय चिडला.

" हो आहे माझे प्रेम अजूनही मीनावर. ते इतर कोणालाही दाखवायची गरज नाही मला." अजयचा आवाज चढला होता.

" इतरांना नका दाखवू पण त्यांच्यापर्यंत तर ते जाऊ दे." संहिता हळू आवाजात बोलली. आपल्याला संहिताने बोलण्यात पकडलं हे बघून अजय गप्प बसला.

" मला सांगा, इथे तुम्ही प्रेमाच्या आगीत जळणार, तिथे आत्या. काय फायदा या प्रेमाचा?" संधीचा पुरेपूर फायदा घेत संहिता बोलत होती.

"ती कशाला जळेल? ती तर जाळेल." कडवटपणे अजय बोलला.

" ते तर ती करतेच आहे. तिच्या कडवट वागण्याने.." विशाल बोलून गेला.

" काका, तुम्ही लग्न मोडल्याचा नाही म्हटलं तरी आत्यांना धक्का बसला आहे. त्या दाखवत नसल्या तरिही. एकदा बोलून घ्या ना आत्यांशी. तुम्ही जर परत एकत्र आलात तर आजीआजोबांना पण खूप आनंद होईल."

" मला विचार करायला वेळ हवा." अजय म्हणाला.

" एवढे वर्ष विचारच करत बसलात. आता विचार नको कृती करा." विशाल म्हणाला.

" ती माझ्याशी बोलली नाहीतर?" अजय अजूनही साशंक होता.

" ती जबाबदारी माझी. तुम्ही फक्त मी तुम्हाला देते तो रोल नीट पार पाडा म्हणजे झालं." संहिताने हुकूम सोडला.

" बापरे.. तुझी बायको खूपच डेंजर आहे रे." अजय विशालची मस्करी करत म्हणाला.

" तुझ्या बायकोपेक्षा कमीच.." तिघे निघाले लवकरच भेटण्यासाठी.


" आईबाबा, आजीआजोबा, आत्या रविवारी माझ्या एका दूरच्या मामाचा साखरपुडा आहे. आईचा फोन येईलच आमंत्रणासाठी. पण मी तुमच्या कानावर घालून ठेवते." संहिताने जेवताना सांगितले.

" तुझ्या दूरच्या मामाचा साखरपुडा. त्यात माझे काय काम? मला नाही वेळ." मीनाआत्या म्हणाली.

" वेळ नसायला काय झालं? अशीही ती पुस्तकंच वाचत बसणार ना तू? त्यापेक्षा चल तिकडे. नाहीतरी संहिताच्या घरचं पहिलं आमंत्रण आहे. कशाला उगाच नकार द्यायचा?" आजी ओरडली.

" आई, मी तिथे कोणाला ओळखते तरी का?" मीनाआत्या म्हणाली.

" आपल्या घरातले सगळेच असणार आहेत. काकाकाकूंना ही आमंत्रण आहे." विशाल बोलला.

" पण हिच्या दूरच्या मामाचा आपल्याशी काय संबंध?" मीनाआत्याने विचारलेच.

" मला काही माहीत नाही. रविवारी आपण सगळे तिथे जाणार म्हणजे जाणार. विषय संपला." आजोबांनी सांगितल्यावर आत्या तेवढ्यापुरती गप्प झाली. तरिही नंतर तिची धुसफूस चालूच राहिली.

रविवारी सगळेच छानपैकी आवरून तयार झाले होते. आजींनी पैठणी नेसली होती. आत्याही साडी नेसून आली आणि या सगळ्यांना बघून चाटच पडली.

" तुम्ही सगळे एवढे का नटला आहात? असं वाटतंय संहिताच्या नाही आपल्याच घरी कोणाचातरी साखरपुडा आहे."

" संहिताचे घर आणि आपलं घर काय वेगळं आहे का? काहिही असतं तुझं मीनाक्का." चंदूकाका चिडवत म्हणाला.

" तुला मी किती वेळा सांगितलं आहे मला ताई म्हणू नकोस म्हणून." आत्या चिडली.

" ताई कुठे म्हटलं? मी तर आक्का अशी हाक मारली."

" आई, सांग ना याला. हा असाच चिडवत राहिला तर मी नाही येणार."

" चंदू, नको रे चिडवूस तिला. आणि आवरा लवकर. नवरदेव वाट बघत असेल तिथे." आजी म्हणाली.

" आपली कशाला कोणी वाट बघेल? ते वाट बघतील त्यांच्या नवरीची." आत्या पुटपुटली. आत्याकडे दुर्लक्ष करून सगळे हॉलवर आले. प्रवासात उत्सुकता म्हणून मीनाआत्याने संहिताला विचारलेच.

" तुझा मामा म्हणजे वयाने जास्तच असतील ना? मग या वयात लग्न, ते ही साखरपुडा वगैरे विधी करून?"

" ते मामाचं प्रेम होतं एकीवर. लग्न मोडलं म्हणून इतकी वर्ष त्याने लग्न केलं नाही."

" मग आता अचानक?"

" ते त्याला समजलं, एकटं राहणं किती कंटाळवाणे असते ते. कितीही प्रेमळ, चांगले असले तरी भावाबहिणींचे संसार ते त्यांचेच. किती दिवस तो इतर कोणासाठी तरी उगाचच झुरणार?" संहिता बोलत होती.

" आणि त्या मुलीचं काय झालं?" आत्याच्या चेहर्‍यावरचा उत्साह मावळला होता.

" काय माहित? पण फार छळलं हो तिने माझ्या मामाला.. असं आई सांगते. बिचारा सगळं तिच्या मनासारखं करायचा पण तरिही हिच्या नाकाच्या शेंड्यावर सतत राग. वैतागला होता बिचारा.. असं आई सांगते." संहिता बोलत होती.


" नाव काय या तुझ्या बिचार्‍या मामाचं?" आत्याने विचारले. तोच विशालने गाडी थांबवली.

" उतरा.."

" म्हणजे?"

" हॉल आला उतरा.."
नाईलाजाने आत्या गाडीतून उतरली. आणि विशालने संहिताच्या हातावर टाळी दिली.


होईल का संहिता आणि विशालचा प्लॅन यशस्वी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all