सून मी या घरची.. भाग ८

कथा घराला बांधून ठेवणाऱ्या सूनेची


सून मी या घरची.. भाग ८

मागील भागात आपण पाहिले की संहिता मंथनला घेऊन काव्याच्या कॉलेजमध्ये जाते. घरी चंदूकाका चिडलेले असतात. आता बघू पुढे काय होते ते.


" संहिता, तू जा बघू घरी. आपण नंतर बोलू." नेहाकाकू संहिताला जवळजवळ बाहेरच काढत होत्या. पण मंथन आणि काव्या तिला नजरेने विनवत होते.

" काकू, मी जाणारच आहे. पण त्याआधी मला काकांना एकच प्रश्न विचारायचा आहे. काव्या आणि मंथन चुकले. पण त्यांची चूक समजून न घेता आरडाओरडा केला तर ती चूक परत होणार नाही, असे आहे का?"

" म्हणजे?" धुमसणार्‍या काकांनी विचारले.

" काका, मंथन सिगारेट ओढत होता. पण त्याने आजच मला वचन दिलं आहे सिगारेट न ओढण्याचं. मग अशावेळेस त्याला मारायचे की तो वचन पाळतो की नाही ते बघायचे? आणि काव्या.. ती कॉलेज बुडवते हे तुम्हाला आत्ता समजले. पण ती हे का करते हे समजले का? तिच्या कॉलेजमध्ये रस्त्यावरच्या मुलांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओचे एक सेशन झाले. ते काम तिला एवढं भावले की लेक्चर बुडवून ती रस्त्यावरच्या मुलांना शिकवायची."

" आपलं शिक्षण बुडवून?" काकांचा राग अजूनही होता.

" ते तर मलाही नाही पटलं. काव्या तू जर शिकलीस, स्वतःच्या पायावर उभी राहिलीस तर आणि तरच त्या मुलांसाठी काहीतरी करू शकशील ना?" संहिता बोलत होती. तिचे बोलणे ऐकून काव्याने रडायला सुरुवात केली.

" मला भिती वाटली बाबांची खूप. त्याचवेळेस मला त्या मुलांची खूप दयासुद्धा आली म्हणून." काव्या हमसून हमसून रडू लागली.

" काका, मुलांना दरारा वाटायला हवा की आदर हे तुम्ही ठरवा. मी निघते." रडणार्‍या काव्याला थोपटून संहिता तिथून निघाली.

" आजचा पराक्रम कळला ना तुमच्या नातसूनेचा?" जेवताना मीनाआत्याने विषय काढला.

" मीना, आपण जेवल्यावर बोलूयात का?" श्रीकांतराव म्हणाले.

" का? आता का नको? आई, बाबा तुमच्या सूनबाई चंदूदादाला कायकाय सुनावून आल्या म्हणे." मीनाआत्या बोललीच.

" संहिता खरंच?" आजोबांनी आश्चर्याने विचारले.

" नोकरी करायची सोडून लष्कराच्या भाकर्‍या थापायच्या." मीनाआत्या परत म्हणाली.

" आत्या, आपलीच माणसं आहेत ना ती? चुका माणसांच्याच हातून होतात ना? चुकला होता मंथन. त्याची फक्त बाजू मांडली मी." संहिता बोलू लागली.

" तुमच्याकडे मोठ्यांशी असं बोलू नये, हे शिकवलं नाही का ग? किती प्रत्युत्तर करशील?" आत्याचा पारा चढला होता.

" पण आत्या मी काय उलटं बोलले? मला वाटलं होतं की मी मंथन आणि काव्याला काकांच्या मारापासून वाचवलं म्हणून तुम्ही कौतुक कराल?" संहिताच्या डोळ्यात पाणी आलं.

"तुला काय सतत तुझ्यासमोर दिवे ओवाळलेले आवडतात? हे केलं की कौतुक करा, ते केलं की कौतुक करा."
मीनाआत्या बोलतच होती.

" मीना, ती काहीतरी बोलते आहे का? तू का चिडते आहेस एवढी?" आजी मध्ये बोलल्या.

" म्हणजे आता तुलाही मीच चुकीची वाटते आहे? हो.. ती नातसून आहे ना लाडाची? आणि मी कोण?" मीनाआत्या रडत तिथून उठून गेली.

" आत्या.. " संहिता तिच्या मागे जाऊ लागली.

" संहिता, तू जेवून घे. काही गरज नाही उठायची." सुनिताताई म्हणाल्या.

" पण आत्या??" संहिता म्हणाली.

" ती खाईल नंतर काहीतरी. तिला ना सवयच झाली आहे जेवताना कुरापती काढायची." आजी म्हणाल्या. सगळे परत जेवू लागले. संहिता मात्र अन्न चिवडत होती. कसंतरी तिने ताटात वाढलेलं संपवलं आणि आवरून ती आपल्या खोलीत गेली.

" समजलं आता तरी का नको म्हणत होतो ते?" रडणार्‍या संहिताला विशालने विचारले.

" तू पण मलाच बोलणार आहेस का?" संहिताने विचारले.

" बोलून तू ऐकणार आहेस का?"

" तू फक्त चिडणार आहेस का माझ्यावर?"

" काय करू मग? तुला कोणी सांगितलं होतं आत्याला उलटं बोलायला?"

" मी काय उलटं बोलले?"

" तुला तुझी चूक मान्यच करायची नाही. बोलली असतीस सॉरी तर विषय संपला असता पण नाही.."

" तू भांडतो आहेस माझ्याशी?"

" हो.. कारण इतके दिवस आम्ही कोणीच एकमेकांच्या आयुष्यात लुडबुड करत नव्हतो. छान चालू होतं सगळं. पण तू आलीस आणि सगळंच बिघडलं. आधी काय तर हॉटेलसारखे गुलाबजाम, नंतर काय तर मंथनची बाजू आणि आता घरात ही भांडणे." विशालचा आवाज चढला होता.

" हे सगळं माझ्यामुळे होते आहे?" संहिताने दुखावलेल्या आवाजात विचारले. आपण काय बोलून गेलो आहोत हे विशालला जाणवले.

" तसं नव्हतं म्हणायचं मला.. पण तू नको ना पडू या सगळ्यात." विशाल संहिताला समजावू लागला.

" तुझ्यामते कुटुंब म्हणजे काय रे? फक्त एकत्र येऊन मजा केली, टाईमपास केला की झालं? काका मंथन, काव्याला या वयातही मारतात. पण आपण मध्ये पडायचे नाही. काव्याला आठवड्यातून एक दिवस घरी सोडलं की आपली जबाबदारी संपली. बरोबर ना? मग पुढे जे व्हायचे आहे ते होईल. तुला जमत असेल हे वागणं, मला नाही जमणार. मी झोपते आहे." बोलून संहिताने टेबललॅम्प बंद केला. दोघेही वेगवेगळ्या बाजूला तोंड करून झोपले.

दोनतीन दिवस दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. म्हणजे विशाल बोलायला गेला की संहिता तिथून निघून जायची. घरातल्यांनाही तिचे गप्प राहणे जाणवू लागले होते. पण ही कोंडी फोडायची कशी तेच समजत नव्हते.

" संहिता, आज रात्री आमच्या खोलीत झोपशील का?" सुनिताताईंनी विचारले. त्यावर काहीच न बोलता संहिता फक्त हो म्हणाली. खरंतर तिला आश्चर्य वाटत होतं की अचानक सुनिताताईंनी हे का सांगितलं, पण तरिही ती बोलली मात्र काहीच नाही. संहिता गुपचूप सुनिताताईंच्या खोलीत झोपायला गेली. ती सतत मोबाईल बघत होती.

" काय ग, आवडलं नाही का तुला इथे झोपायला बोलावलेले?" सुनिताताईंनी विचारले.

" असं नाही आई." संहिताने मोबाईल बंद केला आणि झोपायला गेली. बाराला पाच कमी असताना दरवाजा वाजला. सुनिताताईंनी दरवाजा उघडला. विशाल, मंथन आणि काव्या झोपलेल्या संहिताच्या कानात येऊन जोरात ओरडले..

" हॅपी बर्थडे टू यू.. हॅपी बर्थ डे टू डिअर संहिता.."


वाढदिवसाच्या उत्साहात मिटेल का संहिता आणि विशालचा दुरावा. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all