सून मी या घरची.. भाग ६

कथा घराला बांधून ठेवणाऱ्या सूनेची


सून मी या घरची.. भाग ६

मागील भागात आपण पाहिले की हे घर बाहेरून दिसते तसे एकसंध नाही हे संहिताला समजते. बघू आता पुढे काय होते ते.


" मला चाळीस समोसे द्या." ओळखीचा आवाज आल्याने संहिताने वळून बघितले.

" काकू तुम्ही?" समोसे घेत असलेल्या संहिताने शैलाकाकूंना विचारले.

" तू इथे काय करते आहेस?" चपापलेल्या शैलाकाकूंनी विचारले.

"मी इथे मैत्रिणींसोबत आले होते. निघतच होते. पण म्हटलं घरी जाताना काहीतरी घेऊन जावं, तर तुम्ही दिसलात. तुम्ही इथे सहजच?"

" अं.. अग जरा समोसे घ्यायला आले होते. यांना खावेसे वाटले. मला ना आज घरी करायचा कंटाळा आला होता. आणि यांची चव अगदी मी केलेल्या समोशांसारखीच असते. पण मी इथून खरेदी केलेलं कोणाला सांगू नको हं." शैलाकाकू टेन्शनमध्ये आल्या होत्या.

" नाही सांगणार काकू." संहिता त्यांना धीर देत म्हणाली.

" मॅडम तुमचे चाळीस समोसे." समोरच्या काऊंटरवरून आवाज आला."

" चाळीस? एवढे समोसे?"

" अग.. घरातल्या सगळ्यांनाच आवडतात ना." काकूंनी पैसे दिले. दोघी घरी जायला निघाल्या. टॅक्सीत काकू बाहेर बघून गाणं गुणगुणत होत्या.

" काकू, तुम्ही गायचा का?" संहिताने विचारले.

" थोडंफार. लहानपणी शिकले आहे गाणं नेहमी नंबर असायचा माझा शाळा, कॉलेजमध्ये." काकू बोलू लागल्या.

" मग नंतर?"

" नंतर? माझ्या सासूबाईंना गाणं अजिबात आवडायचे नाही. त्यानंतर गाणं संपलं ते संपलंच. आता फक्त कधीतरी गुणगुणते."

"अच्छा.. चला उतरूया का? आलंच घर."
संहिता टॅक्सीचे पैसे देईपर्यंत काकू हातातलं पार्सल लपवत घेऊनही गेल्या. काकूंची ती धडपड बघून संहिताला कसेतरीच वाटले. तिने मनाशी काहीतरी ठरवले.


"तू? शैला, नेत्रा घरी कोणीच नाही." मधूकाका दरवाजातच उभे राहिले होते.

" हो का? पण मला आत तरी येऊ द्याल का? आईंनी तुमच्यासाठी भाजी पाठवली होती." संहिता म्हणाली. नाईलाजाने मधूकाकांनी संहिताला आत येऊ दिले.

" काका, तुम्हाला आवडलं नाही का मी इथे आलेलं?" संहिताने थेट विचारले.
तिचा हा प्रश्न आलेला बघून काका थोडे सटपटले.

" असं काही नाही. घरात मी एकटा असलो की सहसा कोणी येत नाही म्हणून." त्यांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला.

" घरात कोणीच नाही, मग एकट्याला कंटाळा येत नाही का? म्हणजे वेळ कसा जातो तुमचा?" कुतूहलाने संहिताने विचारले.

" मी वाचन करत बसतो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा."

" अय्या हो.. मला पण आवडते. मीनाआत्यांची काही पुस्तके वाचायला घेतली आहेत. तुमच्याकडे कोणती आहेत?"

" मी पौराणिक वाचतो. माझी आवड मीनासारखी उथळ नाही." काका तुच्छपणे बोलले.

" मग तुम्हाला महाभारत जास्त आवडत असेल ना?" संहिताने विचारले.

" नाही. रामायण." काकांना संभाषण वाढवायचे नव्हते.

" अच्छा आदर्श पुरूष राम."

" मला रामायणाच्या विरूद्ध बोलले आवडत नाही." काकांचा आवाज चढला होता.

" काका, मला सांगा. राम जे सीतेबरोबर वागला ते बरोबर होते का? मला ना तिची दयाच येते. आधी वनवास, मग रावणाकडे बंदिवास नंतर परत वनवास. काय आयुष्य होते बिचारीचे." संहिता काकांच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत होती.
" म्हणजे बघा हं ज्या नवर्‍यासाठी ती माहेर सोडून आली, त्या नवर्‍याने मात्र लोकांसाठी तिलाच सोडले. तुम्हाला पटते का हे? बिचार्‍या शैलाकाकू.."

" तू शैला म्हणालीस?" काकांनी विचारले.

" मी कशाला शैला म्हणू? काकू थोडीच बिचार्‍या आहेत? त्यातर किती करत असतात सगळ्यांसाठी. आणि तुम्ही कुठे त्यांचा रामासारखा त्याग केला आहे?" संहिता हसत म्हणाली. आपला बाण निशाण्यावर लागला आहे हे बघून ती तिथून निघाली.

" मी निघते हं आता. नाहीतर आई म्हणतील भाजी द्यायला गेली आणि तिथेच राहिली." संहिताने काकांकडे बघितले. ते स्वतःच्या विचारात मग्न झालेले दिसले.

"सीतेचा वनवास नाही संपला पण भरल्या घरातला काकूंचा वनवास तरी संपू दे देवा." अशी प्रार्थना करत संहिता तिथून निघाली.


"हे धंदे करायला कॉलेजला जातोस का? थांब तुझ्या बापालाच सांगते." मीनाआत्यांचा आवाज वाढला होता.

" अग आत्या, मस्करी सुरू होती. मी सिगरेट नाही ओढत. खरंच." मंथन कळवळून सांगत होता.

" पकडलं गेल्यावर प्रत्येकजण असंच बोलतो." मीनाआत्या काहीच ऐकून घेत नव्हती. संहिताला बघून मंथनने तिला मध्ये घेतले.

" वहिनी, सांग ना आत्याला. हातात सिगरेट घेतली म्हणजे काय लगेच ओढली असा अर्थ होतो का?" संहिता मध्ये काही बोलणार तोच आत्या म्हणाली,

" तुला याचा स्वभाव माहित नाही. मस्करीच्या नावाखाली सगळं खपवत असतो. आईबापाला काहीच पडलेलं नाही. तरीही आपण आपलं कर्तव्य केलेलं बरं." मीनाआत्याने मंथनचा हात धरला. आणि त्याला घरी घेऊन गेली. मंथनने संहितालाही सोबत येण्याची विनंती केली.

" नेहा,बघ तुझ्या लेकाची थेरं." आत्याने आवाज दिला.

" काय झालं ताई?" नेहाकाकूने विचारले.

" नाक्यावर उभा राहून सिगारेट ओढत होता. मला बघून खाली टाकली."

" मंथन खरंच?" नेहाकाकूने विचारले.

" आई.." नेहाकाकूने मंथनच्या कानाखाली वाजवली. परत ती हात उचलणार तोच संहिता मध्ये पडली.

" काकू.. नको." रडवेल्या चेहर्‍याने मंथन आत निघून गेला तर विजयी मुद्रेने मीनाआत्या बाहेर गेली. ते बघून नेहाकाकूने रडायला सुरुवात केली.

" काकू, तुम्ही का रडताय?"

" बघ ना.. यांच्यासाठी मरमर मरायचं. आणि यांनी हे असं वागायचं. हा मुलगा असा आणि ती काव्या तशी. यांना काही सांगायला जावं तर हे मलाच बोलणार. मी तरी कुठे कुठे पुरी पडणार?"


हसर्‍या चेहर्‍याने वावरणाऱ्या नेहाकाकूंच्या चेहर्‍यामागेही आहे दुःख? या घरातल्या अडचणी संपणार की नाही? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all