Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

सून मी या घरची.. भाग ५

Read Later
सून मी या घरची.. भाग ५


सून मी या घरची.. भाग ५

मागील भागात आपण पाहिले की सुनिताताई संहिताला मीनाआत्यापासून लांब रहायला सांगतात. आता बघू पुढे काय होते ते." काय रे , आज तोंड पाडून का आलास?" ऑफिसमधून आलेल्या विशालला बघून सुनिताताईंनी विचारले.

" मला प्रमोशन मिळाले." विशाल रडक्या स्वरात म्हणाला.

" मग यात रडण्यासारखे काय आहे?" सुनिताताईंना समजेना.

" प्रमोशन आणि बदली दोन्ही झालं आहे."

" बदली? कुठे?" संहिताने ओरडून विचारले.

" बंगलोरला.."

" एवढ्या लांब?"

" हो ना.."

" तू नाही म्हणून सांग." सुनिताताई बोलल्या.

" सुनिता.. मुलांच्या प्रगतीच्या मध्ये येऊ नको." श्रीकांतराव म्हणाले.

" अहो पण आपला लेक तिथे गेला तर इथे आपण काय करायचे?" सुनिताताई रडवेल्या झाल्या होत्या.

" विशाल, तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. कधी जायचे आहे तुला तिथे?" बाबांनी विचारले.

" महिन्या दोन महिन्यात जावे लागेल. बाबा, मी तरिही प्रयत्न करणार आहे इथेच राहण्याचा. त्यामुळे ही बातमी आता तरी कोणालाच सांगू नका. अगदीच काम झाले नाही तरच मी घेईन बदली." विशाल आत निघून गेला. सुनिताताईंनी संहिताला खुणावले.

" हे तू खरंच छान केलंस." बेडरूममध्ये येत संहिता म्हणाली. "आत्ता कुठे मी या घरात आले आहे. इकडच्या लोकांना समजून घेते आहे तर लगेच ही बदली."

" बघ, तुला ही आवडली ना माझी माणसं? आणि इथे आईबाबांना सोडून कसा जाणार मी? अनिशदादा असला तरी तो किती जणांकडे बघणार? आजीआजोबा, काकाकाकू, आईबाबा, आत्या. मी नाहीच जाणार." विशाल बोलत होता आणि संहिताला ते पटत होते.


" संहिता, आहेस का?" नेत्राने आवाज दिला.

" हो.. वहिनी. या ना."

" काकू कुठे गेल्या?" नेत्राने विचारले.

" त्या त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या आहेत."

"हो का? आज आमच्या घरी पण कोणीच नाही. कधी नव्हे ते ऑफिसमधून लवकर आले आणि बघते तर कोणीच नाही. नेहाकाकू पण नाहीत. आज सगळेच बरे बाहेर गेले आहेत." नेत्रा कंटाळली होती.

" तुम्ही बसा आधी. मी चहा करते. तो घेऊ आणि छान गप्पा मारू." संहिता हसत म्हणाली.

" चालेल. चल मी पण येते स्वयंपाकघरात."

" मग कसं वाटलं आपलं घर? इकडची माणसे?" नेत्राने विचारले.

" खूपच छान आहेत. मी ना ही एवढी जवळची नाती पहिल्यांदाच बघते आहे. मला खूप मजा येते आहे. किती प्रेम करतात एकमेकांवर." संहिता उत्साहाने बोलत होती. नेत्रा तिच्याकडे बघत होती.

" काय झालं? मी काही चुकीचे बोलले का?" संहिताने विचारले.

" अंहं.. मी मला बघते आहे तुझ्यात. मी जेव्हा नवीन लग्न होऊन आले ना इथे तेव्हा मी पण अशीच होते उत्साही. आता बघ." खिन्नपणे नेत्रा हसली.

" आता काय झाले? माणसं तिच आहेत ना?" संहिताने विचारले.

" माणसं तिच असतात, स्वभाव तेच असतात पण परिस्थिती बदलते." नेत्रा बोलत होती.

" म्हणजे? मला समजेल असं सांगा ना."

" काही नाही. चहा झाला बघ तुझा." नेत्राने विषय बदलायचा प्रयत्न केला.

" वहिनी, तुम्ही आत्यांशी बोलत नाही?" संहिताने विचारले.

" तुला कोणी सांगितले?" नेत्राने चमकून विचारले.

" मला जाणवले. चुकीचे आहे का ते?"

" बोलत नाही असं नाही. पण नाही होत बोलणं." नेत्रा म्हणाली.

" काही खास कारण? म्हणजे वाटलं तरच सांगा."

" न सांगण्यासारखं काय त्यात? सगळ्यांनाच माहित आहे. आत्यांना मी केलेलं कोणतंच काम आवडायचं नाही. प्रत्येक गोष्टीत चुका काढायच्या. नवीन होते तेव्हा ऐकून घेतलं पण.."

" पण त्या तर तुमचे फारच कौतुक करत होत्या. तुम्हाला कसं त्यांनी नोकरी करायला भाग पाडले." संहिताच्या तोंडून निघून गेले. संहिताने जीभ चावली.

"त्या सगळ्यांना तेच सांगतात. मला ना लग्न झाल्यावर थोडा स्वतःचा असा वेळ हवा होता म्हणून मी ब्रेक घेतला होता. तेव्हा आत्या माझ्या पाठी लागल्या होत्या जॉबसाठी. त्यांना सांगूनही ऐकत नव्हत्या. नोकरी कशी महत्वाची आहे येताजाता लेक्चर द्यायच्या. शेवटी वैतागून मी परत ऑफिस जॉईन केलं. आता मला सांग हे चूक की बरोबर?" नेत्राने विचारले. हे ऐकून संहिता गप्प बसली.
" आता आमच्या आईच बघ ना. नेहमी बाहेरून वस्तू आणतात आणि स्वतः केले आहे असं सांगतात. मी बोलायला गेले की मी वाईट होते. हे घर बाहेरून छान दिसत असलं तरी तसं नाहीये. आतून दुभंगलेले आहेत सगळे." नेत्रा सांगत होती.

" मग तुम्ही या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न नाही केलात?"

" आधी विचार केला होता. पण माझे स्वतःचेच प्रॉब्लेम सुरू झाले तर सोडून दिले."

" काय झालं?"

" अनिशला नैराश्य आले आहे. त्याची ट्रिटमेंट सुरू आहे. त्यात बाबांचे वागणे. कधीतरी असं वाटतं निघून जावं इथून." नेत्राच्या डोळ्यात पाणी होते.

"वहिनी.." संहिताने नेत्राच्या खांद्यावर हात ठेवला.

" बरं वाटलं ग तुझ्याशी बोलून. घरातल्या गोष्टी बाहेर कोणाशी बोलता येत नाही. बाकी सगळे मोठे पडतात. समीरा तिथे दूर , काव्या लहान. बरं झालं तू आलीस."

" जावाजावांच्या गप्पा रंगलेल्या दिसत आहेत. " सुनिताताई दरवाजा उघडून कधी आल्या ते या दोघींना समजलेच नाही.

"नाही ओ काकू. घरी कोणी नव्हतं म्हणून नेहाकाकूंकडे गेले तर आज त्याही बाहेर. एकटं रहायचा कंटाळा आला म्हणून इथे आले तर तुम्ही ही नव्हता." नेत्रा स्पष्टीकरण देऊ लागली.

" अग अग.. तुझेच घर आहे हे. कधीही ये. गप्पा मार. मी सहजच बोलले." सुनिताताई म्हणाल्या. त्या दोघींची बोलणी सुरू असताना संहिताच्या मनात मात्र नेत्राची वाक्य रुंजी घालत होती.
" घर बाहेरून छान दिसत असलं तरी आतून दुभंगलेले आहे. जमेल आपल्याला हे घर एकत्र करायला?"


संहिताच्या जमणार आहे घर एकसंध करायला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//