सून मी या घरची.. भाग ४

कथा घराला बांधून ठेवणाऱ्या सूनेची


सून मी या घरची.. भाग ४

मागील भागात आपण पाहिले की आधी मोठ्या कुटुंबात जायला घाबरणारी संहिता हळूहळू रूळू लागली आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" अहाहा.. काय इडली झाली आहे! एक नंबर काकू. असं वाटतं ही इडली आणि सांबार संपूच नये." विशाल मिटक्या मारत खात होता.

" किती तो मस्का? मस्का मारला नसतास तरी तुला इडल्या वाढल्या असत्या. अनिश तुला ही वाढू का?" नेहाकाकूने हसत विचारले.

" काकू नको. माझं झालं." अनिश बशी उचलत म्हणाला.

" असं काय रे अनिश. एवढंसं खाऊन काय उठतोस? नेत्रा बघ जरा तुझ्या नवर्‍याकडे." चंदूकाकाने आवाज दिला.

" नेहा, आजची रविवार सकाळ खरंच छान झाली हं. पण आज अचानक तू हे का काढलंस ते मात्र नाही समजलं." सुनिताताई हात पुसत म्हणाल्या.

" अहो वहिनी, नवीन सूनबाईंना जेवायला बोलवायचं होतं. मग म्हटलं रोजचा शिरस्ता मोडून काहीतरी वेगळं करू. तसंही यांच्या पूजेनंतर एकत्र येणं असं झालंच नाही ना. त्या निमित्ताने सगळे भेटले तरी." नेहाकाकू म्हणाल्या.

" सध्या ना आपलं असं झालं आहे, दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. बाजुला रहात असूनही एकत्र येण्याचे प्रसंग कमीच बघ."

" तुमची इडली खाऊन झाली असेल तर हे घ्या गोड गुलाबजाम." शैलाकाकू डब्बा घेऊन आल्या.

" अचानक गुलाबजाम? ते ही तू आणलेस?" आजींनी आश्चर्याने विचारले.

" हो. म्हटलं नेहाने इडली केली मग आपण गुलाबजाम तरी न्यावेत."

" त्यापेक्षा वहिनी जेवायला बोलावलं असतंस तरी चालले असते. तुझ्या हातची भरली वांगी खाऊन जमाना झाला." चंदूकाका म्हणाला.

" जेवायला बोलवेन नंतर. आधी हे गुलाबजाम कसे झालेत ते सांगा." शैलाकाकूने विषय बदलला.

" मस्तच आहेत. काकू कसे केलेस सांग ना. मी पण करते आणि कॉलेजमध्ये मैत्रिणींना दाखवून भाव खाते." काव्या गुलाबजाम खात म्हणाली.

" त्यात काय सांगते नंतर. तू अजून घे ना." शैलाकाकू सगळ्यांना आग्रहाने गुलाबजाम खायला घालत होत्या आणि ते कसे छान झाले आहेत याची स्तुती ऐकत होत्या. संहिताने गुलाबजाम खाल्ला. न राहवून तिच्या तोंडून निघून गेले

" ते आस्वाद हॉटेल आहे ना, अगदी तिकडच्या सारखी चव आली आहे याला." ते वाक्य ऐकून शैलाकाकूंचा चेहरा उतरला.

" हो का? पण वहिनींचे गुलाबजाम होतात खूप छान. आणि आवरा आता लवकर. संहिता, तुला आईकडे जायचे होते ना?" सुनिताताई म्हणाल्या. इतकावेळ गप्पांमध्ये रंगलेलं कुटुंब मग आपापल्या कामाला निघून गेले.

" वहिनी, तू हॉटेलमधून आणलेस का गुलाबजाम?" आजूबाजूला कोणी नाही हे बघून मीनाआत्याने विचारले.

" काहिही काय मीना? तुला असं वाटतं का? पण मी एक रेसिपी वाचली होती. त्याची मदत घेऊन मी केले आहेत. माझं ना कोणाला कौतुकच नाही. मी एवढ्या मेहनतीने चांगलं काही करते तर संशयच येतो सगळ्यांना. तुम्हाला सुनिता आवडते, नेहा आवडते एवढंच काय नेत्राही चालते. माझंच मेलीचं नशीब खोटं. नवरा असा ना म्हणून हो." शैलाकाकूने डोळ्यातून पाणी काढले.

" वहिनी, तुला दुखवायचे नव्हते मला. सॉरी." मीनाआत्या तिथून निघून गेली.


" विशाल, एक विचारू?" झोपायची तयारी करत असलेल्या संहिताने विचारले.

" बोला मॅडम.."

" काका काकूंचा काही प्रॉब्लेम आहे का?"

" नाहीतर. आज गेलो होतो की आपण त्यांच्याकडे. हसत तर होते दोघे चांगले."

" नेहा काकू नाही. शैलाकाकू. ते मधूकाका पण आज दिसले नाहीत." संहिता म्हणाली.

" मधूकाका आमच्यामध्ये असूनही नसल्यासारखे असतात." विशाल गंभीर होत म्हणाला. "ते आधी असायचे सगळ्यांमध्ये. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक बाई आली होती. ती आली आणि गेली. पण शैलाकाकूंशी त्यांचे संबंध बिघडले ते बिघडलेच. काकूंचा माझं तेच खरं करायचा स्वभावही याला कारणीभूत असू शकतो. त्या घटनेनंतर काकूंचं वागणं मात्र खूप बदललं आहे. काका त्यांच्याकडे करत असलेल्या दुर्लक्षाची भरपाई त्या दुसरीकडून करत असतात. म्हणून आम्ही त्यांना काहीच बोलत नाही." संहिता मन लावून ऐकत होती. ते बघून विशाल वैतागला.

" मला ना आता वाटायला लागलं आहे, माझ्यापेक्षा जास्त तुला या गोष्टींमध्येच जास्त रस आहे."

" असं का म्हणतोस?" डोळे मोठे करत संहिताने विचारले.

" मग काय? एवढी छान रोमँटिक रात्र आणि विषय कसला तर काकाकाकूंचा. त्यांना सोड आणि माझ्याकडे बघ." संहिताला मिठीत घेत विशाल म्हणाला. संहिता हसत त्याच्या मिठीत गेली तरी तिच्या डोक्यातून मात्र काकाकाकू जात नव्हते.


" हॅलो आत्या." ऑफिसला निघालेल्या मीनाआत्याला संहिताने आवाज दिला.

" हॅलो. बोल, काय हवं आहे?"

" तुमच्याकडे कोणतं पुस्तक आहे का वाचायला? विशालला काही वाचनाची आवड दिसत नाहीये. मला दुपारी कंटाळा येतो."

" मी विचारणारच होते तुला. तू एवढी शिकलेली मग नोकरी वगैरे का नाही करत? आता ती नेत्रा बघ. ती पण करतेच की नोकरी. आता किती मोठ्या पोस्टवर आहे." मीनाआत्याच्या आवाजात कुठेतरी संहिताला असूया जाणवली. "ती सुद्धा जेव्हा आली ना तेव्हा अशीच टाईमपास करायची. मी तिच्या पाठी लागून लागून तिला नोकरी करायला भाग पाडलं. पण केलेल्याची जाण आहे का बघ?"

" तुम्ही मदत केली त्यांना?" मीनाआत्याबद्दलचा संहिताच्या मनात असलेला आदर दुणावला.

" सांगते काय? खूप मोठी गोष्ट आहे. आता ऑफिसला जायची घाई आहे म्हणून. सुट्टीच्या दिवशी दुपारी ये कधीतरी माझ्या खोलीत. बोलू निवांत. आईला माहित आहेत माझी पुस्तके. तिला विचार. ती देईल तुला. निघते मी." हसून संहिताला टाटा करून मीनाआत्या निघाली.

" संहिता, मीनाशी काही बोलत होतीस का?" सुनिताताईंनी विचारले.

" हो आई. मला काही पुस्तकं हवी होती वाचायला."

" संहिता, तू माझी सून आहेस म्हणून सांगते. मीनापासून थोडं अंतर ठेवूनच वाग." सुनिताताई कुजबुजल्या.


संहिताच्या मनाचा अगदी गोंधळ उडाला आहे. मीनाआत्या ज्या एवढ्या चांगल्या आहेत त्यांच्यापासून लांब रहायचे? खरंच आत्याचा काही प्रॉब्लेम आहे का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all