सून मी या घरची.. भाग ३

कथा घराला बांधून ठेवणाऱ्या सूनेची


सून मी या घरची.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की मीनाआत्याच्या वागण्याने संहिता भारावून गेली आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" हनिमूनला जाताय तर तिकडचे सगळे बुकींग नीट केले आहे ना?" आजोबांनी विचारले.

"आजोबा, आम्ही उद्या जाणार आणि तुम्ही आत्ता विचारताय?" थोडा वैतागूनच विशाल बोलला.

" तुमची काळजी वाटते म्हणून विचारले ना त्यांनी?" श्रीकांतराव विशालला ओरडले.

" पण बाबा." विशालने बोलायचा प्रयत्न केला.

" अरे दादा, नको ओरडूस त्याला आता. लग्न झाले त्याचे." चंदूकाका हसत बोलला.

" लग्न झाले म्हणून काय झाले? उद्या त्याच्या मुलांसमोरही मी असाच ओरडणार." बाबा म्हणाले.

या सगळ्यांची थट्टामस्करी चालू असताना मधूकाका मात्र एका कोपर्‍यात एकटेच बसून होते. ते बघून शैलाताई त्यांच्या जवळ गेल्या.

" तुम्ही एकटेच इथे का बसलात? चला ना सगळ्यांसोबत बसा. जरा गप्पा मारा."

" मी तुला सांगितलं जाऊ नको म्हणून? मला बोलावलं म्हणून आलो आहे ना इथं? मग आता आग्रह कशाला?" मधुकाका तिरसटपणे बोलले. डोळ्यातलं पाणी लपवत शैलाकाकू तिथून निघाल्या.

" बरं विशाल, तिथून येताना काही घेऊन येऊ नकोस हं." मीनाआत्या सांगू लागली.

" असं कसं, असं कसं?" काव्या मध्ये बोलली. "मला तर तू जिथे जाशील तिकडच्या प्रत्येक ठिकाणची काही तरी गोष्ट हवी आहे."

" मलाही पार्सल पाठवून दे." काव्याला टाळी देत समीरा बोलली.

" केरळला जातो आहेस तर मसाले आण. छान मिळतात तिथे. आणि तिकडची ती स्पेशल साडी पण घेऊन ये." शैलाकाकू म्हणाल्या.

" आई, अहो ते तिथे फिरायला चालले आहेत." नेत्रा समजवायचा प्रयत्न करू लागली.

"वहिनी, आम्ही जाणार आहोत खरेदीला. प्रवासाच्या आयटिनरी मध्ये त्यांनी दिली आहे एक संध्याकाळ खरेदीसाठी." संहिता बोलली.

" अरे व्वा.. मग छानच की." शैलाकाकू विजयी मुद्रेने बोलल्या. त्यावर मग कोणीच काही न बोलता गप्पा आवरत्या घेतल्या.


संहिता आणि विशाल दोघेही केरळला पोहोचले. तिथे फिरताना दोघेही मनानेही एकमेकांच्या जवळ येत होते. घरी परत यायच्या आदल्या दिवशी दोघेही खरेदी करायला गेले. तो बाजार बघून एवढे दिवस एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या त्या दोघांना अचानक घरच्यांनी सांगितलेल्या यादीची आठवण झाली.

" संहिता, मी काव्यासाठी इथूनच वस्तू घेतो. आपण जिथे जिथे फिरलो त्या जागांची नावे आणि या वस्तू यांची जोडी जुळवायची जबाबदारी तुझी." विशाल म्हणाला.

" आणी समीराताईंचे काय?" संहिताने विचारले.

" ताईचं असं काही नसतं. तिच्यासाठी अश्या वस्तू घेऊ की ज्या तिला कुरिअर करता येतील. तिच्यासोबत जिजूंसाठीही काहीतरी घेतले पाहिजे."

" ते घेऊच. मला ना तुमच्या मीनाआत्या आवडल्या. किती समजून घेत होत्या त्या मला. पण त्या जास्त कोणाशी बोलताना दिसल्या नाहीत."

" आत्या म्हणजे जरा मूडी प्रकरण आहे. तुला येईलच अनुभव. असली तर सूत नाहीतर भूत. असा तो प्रकार आहे."

" विशाल, एक विचारू?" संहिता बोलू की नको विचार करत होती.

" तुला परवानगीची गरज आहे?" विशाल आश्चर्य दाखवत म्हणाला.

" तुला राग नाही ना येणार?"

" विचारून तर बघ." विशाल मस्करीच्या मूडमध्ये होता.

" म्हणजे बघ हं." संहिता जपून शब्द वापरत होती. "तसेही जाताना आपण प्रत्येकासाठी काही ना काही घेतले असतेच. पण तरिही काकूंनी सगळ्यांसमोर सांगितले."

" अग शैलाकाकूची ती सवयच आहे. आजी तर म्हणते की कोणी वाण्याकडे जरी गेले ना तरी ही तिथून लिमलेटची गोळी तरी मागवेलच." विशाल हसत बोलला. संहिताने पण हसल्यासारखे दाखवले पण तिला हसू आले नाही. लग्नाच्या दिवशी साडीवरून झालेली बोलणी तिच्या मामेबहिणीच्या कानावर पडली होती. तिने ती लगेच स्मिताताईंच्या कानावर घातली होती. कोणी काही बोललं नाही पण नाही म्हटलं तरी ती गोष्ट संहिताच्या घरच्यांना खटकली. मानपान असं काही ठरलं नसताना संहिताच्या आईने तिच्या सासरच्या सगळ्यांसाठी काही ना काही घेतले होते. तरिही काकूंनी हे बोलणं संहिताच्या मनालाही लागले होते.


संहिता आणि विशाल साडीच्या दुकानात गेले. तिथून घरी व्हिडिओ कॉल करून प्रत्येकीला हवी तशी साडी घेतली. मसाल्याचे पदार्थ घेऊन झाले. घरातल्या पुरूषांसाठी सुद्धा काही ना काही दोघांनी घेतले. आणि शेवटी एकदाचे दोघेही घरी परतले.

प्रवासात संहिताला आठवत होते, ते निघताना गजबजलेले घर. निरोप द्यायला आलेले आईबाबा, काकाकाकू, आत्या. सगळ्यांच्या शंभर सूचना, त्यातून निर्माण होणारे विनोद. आत्ताही तसेच काहिसे होईल असे तिला वाटत होते. उत्साहाने तिने घराची बेल वाजवली. सुनिताताईंनी दरवाजा उघडला.

" अरे व्वा, वेळेत आली म्हणायची तुमची गाडी."

" हो आई."

" तू बस. मी पटकन चहा,कॉफी करते. तुला काय आवडतं चहा की कॉफी?" सुनिताताईंनी विचारले.

" मला काहिही चालेल. आज घरात कोणीच नाही का?" इथेतिथे बघत संहिताने विचारले.

" कोण हवं तुला?"

" काव्या, मंथन, काकू, आजीआजोबा, आत्या.."

"आजी आजोबा आत्ताच मंदिरात गेले. काकू त्यांच्या घरी. पुरूषमंडळी, आत्या ऑफिसला. तुला काय वाटले, सगळे असतील इथे स्वागताला?" सुनिताताईंनी हसत विचारले.

" तसं नाही.. पण." संहिताचा उतरलेला चेहरा बघून सुनिताताईंना वाईट वाटले.

" आता तुम्ही आलात हे कळले ना की येतील सगळे. नको वाईट वाटून घेऊस. विशाल कुठे राहिला?"

" तो सामान घेऊन येतो आहे. मी पुढे आले." संहिता बोलत असतानाच बाहेरून शैलाकाकूंच्या बोलण्याचा आवाज आला.

" मी बघितलं तुम्हाला टॅक्सीतून बाहेर पडताना. काय मग कशी झाली ट्रिप?"

सुनिताताई संहिताकडे बघून हसल्या.

" झाली सुरुवात माणसे यायची."


संहिताला पण ओढ वाटू लागली आहे तिच्या सासरच्या माणसांची. राहिल का ही अशीच, ते बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all