मागील भागात आपण पाहिले की संहिताचे विशालशी लग्न ठरले आहे. आता बघू पुढे काय होते ते.
" अरेरे.. किती धक्के माराल? बाईमाणूस बघाल की नाही आजूबाजूला?" मीनाआत्या बँडवाल्याला ओरडत होती.
" पण काकू मध्ये तुम्हीच आलात ना? तुम्हाला दिसले नाही का मी गाडी पाठी घेतो आहे ते. मला काय पाठी डोळे आहेत का?" बँडवाल्याने विचारले.
" काकू?? काकू कोणाला म्हणतोस?" मीनाआत्या चिडली होती.
" ए मीनाताई, काय करते आहेस तिथे? लवकर ये. काकूने बोलावले आहे." चंदूकाका ओरडला.
" आलेच.. याला तर बघते नंतर." मीनाआत्या आपली साडी सावरत गेली आणि बँडवाल्याने हुश्श केले.
" काय ग मीनाताई, भाच्याच्या लग्नातही काय भांडते?" चंदूकाकाने हसत विचारले.
" अरे धक्का दिला आणि वर वाद घालत होता तो. आणि तू काय मला ताई म्हणतोस? लहान आहे मी तुझ्यापेक्षा." मीनाआत्या केस उडवत म्हणाली.
" हो ग माझी आई. आहेस लहान पण वागणं? आणि कशाला त्रास देत होतीस त्या बिचाऱ्याला? चुकून लागला असेल धक्का."
" चुकून कसा लागतो?"
" बरं बाई त्याने मुद्दाम मारला. आता चिडू नकोस. नाहीतर काकू चिडेल उगाचच." काकाने विषय आवरता घेतला.
"ए.. मंथन.. जरा आईस्क्रीम आणून दे ना." सोफ्यावर बसलेल्या शैलाकाकूंनी हुकूम सोडला.
" काकू.. तू इथे बसली आहेस? तुला वर कधीचे शोधत आहेत." मंथन म्हणाला.
" ते वर बसलं ना की काकू सतत कामं सांगतात. माझे पाय लागले दुखायला. म्हणून इथे येऊन बसले. तरिही आहेतच का पाठी?" नाक मुरडत शैलाताई बोलल्या.
" अग काकू, ते वहिनीकडची माणसं आहेर करत आहेत म्हणून बोलावलं होतं. नसेल जायचं तर नको जाऊस."
" आता एवढं बोलावत आहेत तर जायला पाहिजे ना. काका बघ कुठे आहे तुझा. पाठवून दे त्यांनाही."
" बरं काकू."
" वहिनी, कुठे होता तुम्ही? कधीचे शोधत होतो तुम्हाला. तुमचा फोनही बंद येत होता." घाबरलेल्या सुनीताने विचारले.
" अग, इथेच होते. मी कुठे जाणार? कशाला बोलावलं मला?"
" अहो ते संहिताच्या घरची माणसं आहेर करायला आली होती. तुम्ही नव्हता म्हणून तुमची साडी इथेच ठेवली. स्मिताताई परत येते म्हणाल्या."
" बघू साडी. हा काही रंग आहे का ग? मला नको बाई ही साडी." शैलाताई साडी खाली ठेवत म्हणाल्या. त्या साडीवरून होणारे पुढचे रामायण थांबवण्यासाठी नेहा मध्ये आली.
" वहिनी, माझी साडी तुम्ही घ्या. पण आता आवरा पटापट."
" आधी ती साडी बघू. आवडली तरच घेईन. नाहीतर नको मला." शैलाताई म्हणत होत्या. सगळ्यांनी डोक्याला हात मारून घेतला.
" शैला, त्या त्यांनी दिलेल्या मानाच्या साड्या आहेत. तुला आवडल्या नसतील तर नको घेऊस. पण आता इथे नाटक नको." आजींनी आवाज दिल्याबरोबर शैलाताई गुपचूप उठल्या. नंतरचे लग्न मात्र कोणत्याही कुरबुरीशिवाय पार पडले. संहिता विशालच्या घरी आली.
" संहिता, नाव घेतल्याशिवाय आत प्रवेश नाही." दार अडवून उभी राहिलेली समीरा म्हणाली.
" शंकराला बेल वाहते वाकून आणि विशालचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून." संहिताने उखाणा घेतला.
" मगाशी पण हाच घेतला होतास. काहीतरी नवीन घे ना." पाठीमागून काव्या बोलली.
" मला, सुचत नाहीये." खरंतर विधी, लग्न, रिसेप्शन, पाठवणी या सगळ्याने संहिता दमलेली होती. तिने मदतीसाठी विशालकडे बघितले. पण तो हे सगळं एन्जॉय करताना दिसत होता.
" ए मुलींनो, बस करा हे सगळं. घेतला ना तिने उखाणा. किती त्रास द्याल तिला?" मीनाआत्या संहिताची बाजू घेत म्हणाल्या.
" पण आत्या तिने तोच उखाणा परत घेतला." मुलींनी धुसफूस केली.
" मग तुमच्या भावाला घ्यायला सांगा नवीन उखाणा. तिला येऊ द्या आत." आत्याने संहिताला आत यायला खुणावले. आत्याला आपली मनस्थिती समजली हे कळून संहिताला थोडे बरं वाटलं. लक्ष्मीपूजन झाले. झोपायची तयारी सुरू झाली.
"तुम्हाला चालणार असेल, तर संहिताला झोपू दे माझ्या खोलीत. चालेल ना ग?" मीनाआत्याने विचारले.
" हो.." बावरलेली संहिता म्हणाली.
" मग चला झोपा लवकर. उद्या पूजेसाठी सकाळी उठायचे आहे." आजी म्हणाल्या.
संहिता आपली छोटी बॅग घेऊन आत्याच्या खोलीत गेली. तिने रात्री झोपताना नेसायची म्हणून साधी साडी काढली. ती बघून मीनाआत्या हसली.
संहिता आपली छोटी बॅग घेऊन आत्याच्या खोलीत गेली. तिने रात्री झोपताना नेसायची म्हणून साधी साडी काढली. ती बघून मीनाआत्या हसली.
" तू घरी साडी नेसून झोपतेस?"
" नाही.. पण आई म्हणाली होती." संहिता बोलू लागली.
" नाही ना.. मग गाऊन घाल. इथे सगळे आपलेच आहेत. कोणी काही बोलणार नाही." मीनाआत्या प्रेमाने बोलल्या. त्यांचे आपुलकीचे शब्द ऐकून संहिताला भरून आले. लग्नाच्या आधी मीनाआत्यांबद्दल तिने ऐकले होते. पण व्यवस्थित भेट अशी झालीच नव्हती. पण आज त्या ज्या पद्धतीने बोलत होत्या, त्यामुळे पहिल्या भेटीतच तिच्या मनात त्यांना स्थान मिळाले होते.
"संहिता, उठतेस ना?" मीनाआत्या तिला उठवत होत्या. संहिता दचकून उठली.
" खूप उशीर झाला का?" तिने विचारले.
" नाही. पण थोड्याच वेळात गुरूजी येतील हो. आवरून घे. आईला म्हणजे माझ्या आईला उशीर झालेला आवडत नाही."
"आवरते.. " म्हणत संहिताने पटापट आवरून घेतले. गुरूजी यायच्या आधी आवरून ती तयार होती. ते बघून सगळ्यांनाच तिचे कौतुक वाटले. नेहाकाकू, नेत्रा प्रसादाची तयारी करत होत्या तर सुनिताताई आणि आजी पूजेची. शैलाताई एका बाजूला बसून तुळशीपत्र निवडत होत्या.
" शैला, फक्त पाने घे. देठ घेऊ नकोस." एका बाजूला आजी ओरडत होत्या. संहिता हे सगळं बघतच बसली.
" घाबरू नकोस. या घरात हे असेच चालते." मीनाआत्या हळूच संहिताला बोलली. "तो बघ तुझा हिरो तुझ्याकडे बघतो आहे." आत्या संहिताला चिडवत होती. ते बघून संहिता लाजली. विशाल खरंच अनिमिष नजरेने तिच्याकडे बघत होता.
" एकमेकांकडे बघून झाले असेल तर पूजेला बसा." नेहाकाकू बोलली आणि हास्याचा फवारा उडाला.
संहिता आणि विशाल पूजेला बसले. पाठीमागे सगळ्यांच्या थट्टामस्करीला ऊत आला होता. एकाबाजूला हव्याहव्याश्या जोडीदाराची साथ तर दुसरीकडे हे आनंदी वातावरण. सुख सुख म्हणजे अजून काय असते? संहिताच्या मनात विचार येत होते.
एकत्र कुटुंबाची मजा संहिता अनुभवत होती. हे असेच कायम राहिल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा